प्रयागराज महाकुंभ मेळा २०२५ येथे सनातन संस्थेच्या धर्मशिक्षा प्रदर्शनाचे महामंडलेश्‍वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते उद्घाटन !

‘सनातन धर्मशिक्षा प्रदर्शना’तून अध्यात्मप्रसार करणे, हे महत्त्वपूर्ण आणि मोठे धर्म कार्य ! – महामंडलेश्‍वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज

दीपप्रज्वलन करतांना त्यांच्या डाव्या बाजूला सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, (मध्यभागी) महामंडलेश्‍वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज आणि डॉ. संदीप धुर्वे, तसेच इतर

प्रयागराज, १२ जानेवारी (वार्ता.) – सनातन धर्मातील छोट्या गोष्टी आचरणात आणण्याच्या दृष्टीने सनातन संस्थेचे ‘सनातन धर्मशिक्षा प्रदर्शन’ उपयोगी आहे. सनातन संस्थेद्वारा आयोजित ‘सनातन धर्मशिक्षा प्रदर्शना’च्या माध्यमातून होणारा अध्यात्मप्रसार हे महत्त्वपूर्ण आणि मोठे धर्मकार्य आहे. या कार्यास माझे नेहमी आशीर्वाद आहेत. ६ वर्षांपूर्वी उज्जैन येथील कुंभमेळ्यात सनातन संस्थेशी माझे नाते जोडले होते. तेव्हापासून माझा सनातन संस्थेशी वारंवार संपर्क येत असल्याने मी सनातन संस्थेचा सदस्य असल्याप्रमाणे जोडलो गेलो आहे, असे भावस्पर्शी उद्गार मध्यप्रदेशातील इंदूर येथील महानिर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्‍वर स्वामी प्रणवानंद सरस्वती यांनी येथे केले.

उपस्थित साधकांना मार्गदर्शन करतांना (मध्यभागी) महामंडलेश्‍वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज

‘सनातन धर्मशिक्षा प्रदर्शना’चे दीपप्रज्वलनद्वारे उद्घाटन केल्यानंतर ते मार्गदर्शन करत होते. महाराज आदिवासी क्षेत्रामध्ये होणारे धर्मांतर रोखणे आणि आदिवासी बालकांना गुरुकुलाद्वारे शिक्षण देण्याचे कार्य करतात. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, महाराष्ट्रातील यवतमाळ येथील भाजपचे माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे उपस्थित होते. या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी प.पू. महाराजांना संपूर्ण प्रदर्शनी दाखवली. या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हे आवाहन करतांना म्हणाले की, महाकुंभ मेळ्याला आलेल्या आणि येणार्‍या भाविकांनी धर्ममय दिनचर्या, सनातन धर्माचे सुलभ आचरण, धार्मिक कृत्यांचे शास्त्र, तसेच आनंदी जीवनासाठी अध्यात्म शिकण्यासाठी सनातन संस्थेने आयोजित केलेल्या सनातन धर्मशिक्षा प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा.

प्रदर्शनात अध्यात्म ग्रंथ प्रदर्शन !

‘सनातन धर्मशिक्षा प्रदर्शन’ कुंभमेळ्यातील सेक्टर १९ मध्ये मोरी आणि मुक्ती मार्गाच्या चौकात उभारण्यात आले आहे. १२ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. आध्यात्मिक, आयुर्वेद, तसेच धर्मशिक्षण देणारे ग्रंथ अन् फलक यांचे भव्य प्रदर्शन येथे लावण्यात आले आहे. १३ भाषांमध्ये ३५० हून अधिक संख्या असलेल्या या ग्रंथांमध्ये हिंदु जीवनपद्धत, संस्कृती, धर्म, अध्यात्म, राष्ट्र यांच्याशी संबंधित अमूल्य ज्ञान भाविकांना प्राप्त होणार आहे.

Leave a Comment