नवीन विडी घरकुल (जिल्हा सोलापूर) येथे हिंदु राष्ट्र जागृती सभेला १ सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती !
सोलापूर – काही लोकप्रतिनिधी हिंदु धर्माला संपवण्याची भाषा करत आहेत, तर काही लोकप्रतिनिधी हिंदु धर्माचा अवमान करत आहेत. सनातन धर्म हा चिरंतन आहे. तो कधीही नष्ट होणारा नाही, याला इतिहास साक्षी आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्यामुळे पाश्चात्त्यांच्या विकृतीला ते कवटाळत आहेत. हिंदु धर्मात ‘वृद्धाश्रम’ ही संकल्पना नव्हती; पण आज भारतातील वृद्धाश्रम पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. याचे कारण हिंदूंना लहानपणापासून धर्मशिक्षण दिले गेलेले नाही. त्यामुळे हिंदूंनो, धर्मशिक्षण घेऊन धर्मशिक्षित व्हा, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. त्या ८ जानेवारी २०२५ या दिवशी नवीन विडी घरकुल येथील संकट विमोचन हनुमान मंदिर येथे पार पडलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होत्या. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे यांनीही उपस्थितांना संबोधित केले. या सभेसाठी १ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी बांधव उपस्थित होते. या वेळी सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘लव्ह जिहादचे भयानक वास्तव’ याविषयी हिंदूंना जागृत केले.
या वेळी समितीचे श्री. राजन बुणगे यांनी हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व आणि हिंदूंवर होणारे विविध आघात यांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यात त्यांनी अर्बन नक्षलवाद, लव्ह जिहाद, वक्फ कायद्याच्या माध्यमातून हिंदूंच्या भूमी हडपणे, चित्रपटांच्या माध्यमातून होणारा हिंदु धर्माचा अवमान अशा विविध समस्यांविषयी मार्गदर्शन करून त्यावर एक धर्मयोद्धा बनून हिंदूंचे संघटन करणे हाच उपाय असेल, असे सांगितले.
सभेचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. रोहन कलशेट्टी यांनी केले, तर समितीच्या कार्याचा परिचय समितीचे श्री. संकेत पिसाळ यांनी करून दिला.
वैशिष्ट्यपूर्ण
१. सभा झाल्यानंतर संकट विमोचन हनुमान मंदिर येथे सर्व उपस्थितांनी सामूहिक आरती करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी मारुतिरायाच्या चरणी प्रार्थना केली.
२. धर्मप्रेमी श्री. राजकुमार पवार यांनी स्वतः वक्त्यांना फेटे बांधले आणि सभेनंतर सर्वांना दांडपट्टा चालवण्याचे चित्तथरारक प्रदर्शन दाखवले.
३. सभेच्या निमित्ताने नवीन घरकुल भागातील दोन हिंदुत्वनिष्ठ गटांमध्ये असलेले मतभेद विसरून ते सभेला एकत्रित आले होते. अशा प्रकारे सभेच्या निमित्ताने स्थानिक हिंदुत्वनिष्ठांमध्ये मनोमीलन झाले.