जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) – कलियुगात सध्या मनुष्याला वारंवार पती-पत्नीचे खटके उडणे, दांपत्याला लवकर मूल न होणे, झाल्यास जन्मतः अपंग असणे, मुला-मुलींचे विवाह लवकर न होणे यांसह विविध त्रासांना सामोरे जावे लागते. कलियुगात ‘नामस्मरण’ ही सर्वश्रेष्ठ साधना असून त्यासाठी कुलदेवता आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ या देवतांचा नामजप करणे आवश्यक आहे. श्री दत्तगुरूंच्या उपासनेने मनुष्यजीवनातील अनेक त्रासांवर मात करणे शक्य आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद़्गुरु स्वाती खाडये यांनी केले.
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. भगवंतराव जांभळे यांच्या मालकीच्या दत्त मंदिरात दत्त जयंतीच्या निमित्ताने उत्सव चालू आहे. त्यात १० डिसेंबरला ‘मानवी जीवनात साधना आणि दत्तोपासना यांचे अनन्यसाधारण महत्त्व’, या विषयावर सद़्गुरु स्वाती खाडये बोलत होत्या. या प्रसंगी सौ. भक्ती भगवंतराव जांभळे यांनी शाल आणि ‘शिवप्रताप’ हा छत्रपती शिवाजी महाराज यांची पराक्रमाची गाथा सांगणारा ओवीबद्ध ग्रंथ देऊन सद़्गुरु स्वाती खाडये यांचा सन्मान केला. या प्रसंगी परिसरातील जिज्ञासू मोठ्या संख्येने उपस्थित होते.