गोव्यात ३० नोव्हेंबरला सनातन संस्थेचा रौप्य महोत्सवी सोहळा !

प.पू. गोविंददेव गिरि महाराज यांचा गाेव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्या शुभहस्ते अमृतमहोत्सवी सन्मान होणार !

डावीकडून श्री. सुभाष नाईक, श्री. चेतन राजहंस आणि सौ. शुभा सावंत
डावीकडून श्री. सुभाष नाईक, श्री. चेतन राजहंस आणि सौ. शुभा सावंत

पणजी (गोवा) – गोवा राज्यात स्थापन झालेल्या आणि सध्या संपूर्ण भारतात सनातन हिंदु धर्माचा तेजस्वी प्रचार करणार्‍या सनातन संस्थेचा रौप्य महोत्सवी सोहळा ३० नोव्हेंबर या दिवशी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा अमृत महोत्सवी सन्मान गोव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्या शुभहस्ते केला जाणार आहे. या सोहळ्याला केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक, गोव्याचे पर्यटनमंत्री श्री. रोहन खंवटे आणि भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष तथा खासदार श्री. सदानंद तानावडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचीही या सोहळ्याला वंदनीय उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात अमृत महोत्सवी सन्मानानिमित्त प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचे होणारे मार्गदर्शन म्हणजे गोमंतकियांसाठी अमूल्य पर्वणीच आहे. या अमूल्य अशा क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी गोमंतकियांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. या परिषदेला ‘गीता परिवार’चे गोव्याचे महासचिव श्री. सुभाष नाईक आणि ‘सनातन संस्थे’च्या सौ. शुभा सावंत यांचीही उपस्थिती होती.

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक

Sanatan Sanstha 25 Years Goa_PC_E

श्री. राजहंस पुढे म्हणाले,

१. सनातन संस्था ही आध्यात्मिक संस्था असून तिचे सर्व उपक्रम समाजाचे आध्यात्मिक कल्याण साधणारे आहेत. सनातन संस्थेची २५ वर्षे म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक सेवेची २५ वर्षे !

२. सनातन धर्मातील अध्यात्म हे विज्ञान म्हणून अर्थात् ‘अध्यात्मशास्त्र’ म्हणून प्रस्थापित करण्यासाठी सनातन संस्थेने मोठे कार्य केले. अध्यात्मशास्त्रावरील सनातनची ग्रंथसंपदा आणि सनातन शिकवत असलेली ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ यांमुळे आज १२२ साधक संत झाले असून १ सहस्रांहून अधिक साधकांचा प्रवास संतत्वाच्या दिशेने होत आहे.

३. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनामुळे सहस्रो लोक आज तणावमुक्त, व्यसनमुक्त आणि आनंदी जीवन जगत आहेत. रौप्य महोत्सवानिमित्त संस्थेने समाजातील सर्व घटकांसाठी निःशुल्क तणावमुक्त आणि व्यसनमुक्त जीवनासाठी कार्यशाळा आयोजित केल्या.

४. अशा सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव आणि प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा अमृत महोत्सव म्हणजे दुग्धशर्करायोगच आहे.

Leave a Comment