सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभाव असलेल्या मंगळुरू येथील सनातनच्या १३१ व्या संत पू. (सौ.) शशिकला किणी (वय ७७ वर्षे) !

१. सनातनशी संपर्क झाल्यानंतर साधनेला आरंभ होणे

सौ. शशिकला किणी

‘सौ. शशिकला किणी (अक्का) यांची लहानपणापासून ‘श्रीरामा’वर श्रद्धा होती. विवाहानंतर त्या मंगळुरू येथे आल्या आणि कर्मकांडानुसार साधना करू लागल्या. मंगळुरू येथे झालेल्या सनातनच्या पहिल्या प्रवचनाला त्या उपस्थित होत्या. त्यानंतर होणारा एकही सत्संग त्यांनी चुकवला नाही. सत्संगात सांगितली जाणारी साधनेची सूत्रे त्यांनी आचरणात आणण्याचा प्रयत्न केला.

२. सौ. शशिकलाअक्का यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

२ अ. हसतमुख आणि शांत स्वभाव

सौ. शशिकलाअक्का नेहमी हसतमुख आणि आनंदी असतात. त्या मितभाषी असून त्यांचा स्वभाव शांत आहे.

२ आ. प्रेमभाव

अक्कांच्या घरी कुणी साधक गेले, तर त्या प्रेमाने साधकांना खाऊ देतात, तसेच आश्रमात देण्यासाठीही त्या खाऊ देतात. सणाच्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर त्या आश्रमासाठी काही पदार्थ बाजूला काढून ठेवतात.

२ इ. साधिकेशी मनमोकळेपणाने बोलणे

अक्कांच्या मनात काही विचार येत असतील, तर त्या लगेच एखाद्या साधिकेशी मनमोकळेपणाने बोलून त्यावर दृष्टीकोन विचारतात. ‘मनात काही अयोग्य विचार रहायला नकोत आणि त्यात अडकायला नको’, अशी त्यांची तळमळ असते.

२ ई. सेवेची तीव्र तळमळ

अक्कांना सेवेची पुष्कळ तळमळ आहे. ‘सनातन प्रभात’ नियतकालिक चालू झाल्यावर त्यांनी ‘अंकवितरण करणे आणि वर्गणीदार करणे’, अशा सेवा केल्या. वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन ‘बालसंस्कारवर्ग घेणे, घरोघरी जाऊन प्रसार करणे, ग्रंथप्रदर्शन लावणे’, या सेवाही त्या करायच्या. आता शारिरीक त्रासांमुळे त्या बाहेर जाऊन सेवा करत नाहीत. त्यामुळे ‘मी गुरुसेवा करू शकत नाही’, अशी त्यांना पुष्कळ खंत वाटते.

२ उ. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होणे

या वर्षी गुरुपौर्णिमेच्या वेळी त्या सभागृहात आल्या होत्या. खरेतर त्यांना जिना चढणे आणि उतरणे, यांसाठी कुणाचे तरी साहाय्य लागते; पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या उत्साहाने आल्या आणि पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत बसल्या. एरव्ही त्यांना इतका वेळ बसणे शक्य होत नाही; पण त्यांच्यातील भावामुळे त्या कार्यक्रमाला बसू शकल्या.

२ ऊ. भाव

सौ. मंजुळा रमानंद गौडा

२ ऊ १. संतांप्रती भाव : अक्कांच्या मनात संतांप्रती पुष्कळ भाव आहे. संतांनी सांगितलेली सूत्रे त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात. सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा जेव्हा शशिकलाअक्कांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जातात, तेव्हा त्या लहान मुलाप्रमाणे ‘मी अजून काय करू ? मला मार्गदर्शन करा’, असे पू. अण्णांना सांगतात.

२ ऊ २. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव : अक्कांमध्ये सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती अपार कृतज्ञताभाव आहे. दिवसभरातील प्रत्येक कृती झाल्यावर त्या प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात. यातून ‘मला पुष्कळ आनंद मिळतो’, असे त्या सांगतात. ‘गुरुदेवांनी माझा हात पकडून मला येथपर्यंत आणले’, या विचाराने प.पू. गुरुदेवांप्रती त्यांचा कृतज्ञताभाव दाटून येतो. अक्का प.पू. गुरुदेवांना शरणागतीने प्रार्थना करतात. तेव्हा त्यांना पुष्कळ आनंद मिळतो.

३. सौ. शशिकला किणी यांना आलेल्या अनुभूती

३ अ. ‘श्रीकृष्ण सतत समवेत असून ‘त्यानेच हात धरला आहे’, असे अक्कांना जाणवणे

अक्का सतत देवाच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करतात. महाप्रसाद बनवत असतांना त्या ‘श्रीकृष्णासाठी महाप्रसाद बनवत आहे’, असा भाव ठेवतात. त्यांना सर्व ठिकाणी श्रीकृष्ण दिसतो. ‘श्रीकृष्ण सतत समवेत असून त्यानेच स्वतःचा हात पकडला आहे’, असे अक्कांना जाणवते.

३ आ. अक्कांना आधार न घेता उभे रहाता न येणे, एकदा महाप्रसाद बनवतांना पडल्यासारखे झाल्यावर ‘कृष्णानेच आपल्याला धरले’, असे त्यांना वाटणे

एका हाताने आधार घेतल्याविना अक्कांना उभे रहाता किंवा चालता येत नाही. महाप्रसाद बनवत असतांनाही त्यांना एका हाताने आधार घ्यावा लागतो. तेव्हा त्या श्रीकृष्णाला प्रार्थना करतात, ‘कृष्णा, ‘आता मी हात सोडत आहे. मला काही झाले, तर तूच बघ.’ एकदा महाप्रसाद करत असतांना त्यांनी हात सोडला. तेव्हा त्यांना एकदम पडल्यासारखे झाले; पण तेवढ्यात ‘कुणीतरी त्यांना धरले’, असेही जाणवले. ‘कृष्णच मला सांभाळतो’, असा त्यांचा भाव आहे.

३ इ. अनुभूती

एकदा स्नान करून येतांना पायरीवरून त्यांचा पाय घसरला. तेव्हा त्यांना ‘कुणीतरी आपल्याला पकडले आहे’, असे वाटले. ही अनुभूती त्यांना दोनदा आली.

‘अक्का म्हणतात, ‘‘आता माझी अन्य कोणतीच इच्छा नाही. ‘केवळ भगवतांचे चरण हवे’, इतकीच माझी इच्छा आहे.’’

– सौ. मंजुळा गौडा (६.८.२०२४)
(‘हे लिखाण सौ. शशिकला किणी संतपदी विराजमान होण्यापूर्वीचे असल्याने लिखाणात त्यांच्या नावाआधी ‘पू.’ असे लावलेले नाही.’ – संकलक)

Leave a Comment