‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सतत समवेत आहेत’, असा भाव असणार्‍या सनातनच्या १३० व्या संत उजिरे, कर्नाटक येथील पू. (श्रीमती) कमलम्मा (वय ८१ वर्षे) !

१. सनातनच्या सत्संगांना जाऊ लागल्यावर आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू केल्यानंतर श्रीमती कमलम्मा यांच्या मनाची स्थिती पुष्कळ सुधारणे

पू. श्रीमती कमलम्‍मा

‘श्रीमती कमलम्मा यांचे आरंभीचे जीवन पुष्कळ हलाखीचे होते. त्यांनी आयुष्यात पुष्कळ कठीण प्रसंग अनुभवले. मिळेल ते काम करून त्या घर चालवायच्या. ‘प्रत्येक दिवस कसा घालवायचा’, याची त्यांना विवंचना असायची.

साधनेत येण्यापूर्वी घरातील एका कठीण प्रसंगामुळे त्यांचे मन अतिशय विचलित झाले. त्या वेळी त्या एका आध्यात्मिक संप्रदायाच्या संपर्कात आल्या. नंतर त्याच संप्रदायातील एका व्यक्तीने त्यांना सनातनच्या सत्संगाला जाण्यास सांगितले. तेव्हापासून त्यांनी एकदाही सत्संग चुकवला नाही. सत्संगात जे सांगितले, ते सर्व कृतीत आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असा नामजप चालू केल्यानंतर त्यांच्या मनाची स्थिती पुष्कळ सुधारली.

२. श्रीमती कमलम्मा यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

२ अ. हसतमुख आणि निरागस स्वभाव

कमलम्मा सतत हसतमुख असतात. त्या एखाद्या लहान मुलाप्रमाणे निरागस आहेत. त्यांच्यामध्ये पुष्कळ भोळा भाव आहे.

२ आ. सेवेची तळमळ

कमलम्मा यांच्या मनात ‘साधनेमुळे स्वतःला जसा लाभ झाला आहे, तसा लाभ सर्वांना व्हायला पाहिजे’, अशी तळमळ आहे. त्यामुळे भेटणार्‍या प्रत्येक व्यक्तीला त्या साधना करायला सांगतात. आतापर्यंत त्यांनी ‘वर्गणीदार बनवणे, ग्रंथप्रदर्शन कक्ष लावणे आणि प्रसारसेवा करणे’, अशा सेवा केल्या आहेत.

१. गुरुपौर्णिमा जवळ आल्यावर कमलम्मा त्यांचे कुटुंबीय, परिचित व्यक्ती, तसेच अन्य व्यक्ती यांच्याकडून अर्पण घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी स्वतः काम करून काही पैसे साठवले होते. ते ‘पैसे माझे नसून गुरूंचे आहेत’, असा त्यांचा भाव आहे.

२. कमलम्मा सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे तळमळीने वितरण करतात. ‘या उत्पादनांमधील चैतन्य सर्वांपर्यंत पोचायला हवे’, असे त्यांना वाटते, तसेच सनातनच्या ग्रंथांचे महत्त्व सांगून ते ग्रंथ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीनेही त्या प्रयत्न करतात.

सौ. मंजुळा रमानंद गौडा

२ इ. भाव

२ इ १. ‘सनातनचे साधक’ हाच माझा परिवार’, असा भाव असणे : स्वतःच्या परिवारापेक्षा कमलम्मांना साधकांप्रती पुष्कळ प्रेम वाटते. ‘सनातनचे साधक’ हाच माझा परिवार आहे’, असा त्यांचा भाव आहे. साधकांना पाहिल्यावर त्यांना अतिशय आनंद होतो.

२ इ २. पू. रमानंद गौडा यांना पाहून भाव जागृत होणे : सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा कधी कधी कमलम्मा यांना भेटायला त्यांच्या घरी जातात. त्या वेळी आजींची भावजागृती होते आणि त्यांच्या मुखातून शब्दच बाहेर पडत नाहीत. त्यांच्यासाठी ‘काय करू आणि काय नको’, अशी त्यांची स्थिती होते.

२ इ ३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सनातन संस्था यांच्याप्रती भाव

अ. सध्या कमलम्मा यांची शारीरिक स्थिती खालावली आहे. ‘त्या चालतांना कधीही पडतील’, अशी त्यांची स्थिती आहे. अशा स्थितीत त्या एका ठिकाणी जात होत्या. वाटेत रस्ता चुकून त्या एका विहिरीच्या दिशेने जाऊ लागल्या. त्या वेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांना थांबवले. तेव्हा ‘आपण रस्ता चुकलो आहोत’, हे त्यांच्या लक्षात आले. त्या आणखी एक पाऊल पुढे गेल्या असत्या, तर विहिरीतच पडल्या असत्या. या प्रसंगानंतर ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच मला वाचवले. ते सतत माझ्या समवेत असतात,’ असे त्यांनी सांगितले. त्या वेळी त्यांची भावजागृती होत होती.

आ. एकदा कमलम्मा सेवेसाठी बसमधून जाणार होत्या. त्या बसमध्ये चढत असतांना अकस्मात् बस चालू झाली आणि त्या खाली पडल्या. तेव्हा जवळपासचे लोक साहाय्यासाठी धावले; पण त्या सहजतेने उठून चालायला लागल्या. त्यांना काहीच लागले नव्हते. तेव्हाही ‘प.पू. गुरुदेव सतत समवेत असतात आणि तेच माझी काळजी घेतात’, असे त्यांनी सांगितले.

इ. सनातन संस्थेविषयी कुणी काही वाईट बोलले, तर ते कमलम्मांना आवडत नाही. ‘मला काही बोलले, तरी चालेल; पण ‘सनातन संस्था आणि प.पू. गुरुदेव’ यांना कुणी काही बोलायचे नाही’, असे त्या म्हणतात.

ई. कमलम्मा यांच्या मनामध्ये सतत गुरुदेवांचे स्मरण चालू असते आणि त्या सतत गुरुदेवांशीच बोलत असतात. ‘माझ्या जीवनात प.पू. गुरुदेवांविना आणखी कुणीही नाही’, असे त्या सांगतात.

३. कमलम्मा यांच्या घरातील खोलीत झालेला पालट

एकदा पू. रमानंदअण्णा कमलम्मा यांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले होते. तेव्हा ‘खोलीतील वातावरण पुष्कळ चैतन्यमय झाले आहे’, असे त्यांच्या लक्षात आले.’

– सौ. मंजुळा रमानंद गौडा, मंगळुरू (७.८.२०२४)
(‘हे लिखाण श्रीमती कमलम्मा संतपदी विराजमान होण्यापूर्वीचे असल्याने लिखाणात कमलम्मा यांच्या नावाआधी ‘पू.’ असे लावलेले नाही.’ – संकलक)

Leave a Comment