एकाच वेळी ३ संत घोषित झाल्याची सनातनच्या इतिहासातील दुर्मिळ घटना !‘कर्नाटकच्या साधकांचे अहोभाग्य आहे की, एकाच दिवशी ईश्वराने ३ संतरत्नांच्या रूपात त्यांना अनमोल भेट दिली आहे. ‘दक्षिण कन्नड’ या जिल्ह्यातील ३ साधकांनी एकाच दिवशी संतपद प्राप्त करणे’, ही सनातनच्या इतिहासातील एक अपूर्व घटना आहे. कर्नाटक राज्यातील साधकांमधील ‘प्रेमभाव आणि सेवावृत्ती’ पाहून ईश्वराने त्यांच्यावर ही कृपा केली आहे. साधकांनो, संतांच्या सत्संगाचा लाभ करून घेऊन स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्या !’– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१८.११.२०२४) |
मंगळुरू – कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सनातनचे साधक श्री. सांतप्पा गौडा (वय ८१ वर्षे) यांनी १२९ वे (समष्टी संत), श्रीमती कमलम्मा (वय ८१ वर्षे) यांनी १३० वे (व्यष्टी संत) आणि सौ. शशिकला किणी (वय ७८ वर्षे) यांनी १३१ वे (व्यष्टी संत) संतपद गाठल्याचे सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे संत, वय ४८ वर्षे) यांनी घोषित केले. १८ नोव्हेंबर २०२४ या दिवशी मंगळुरू येथील कुळायित येथे असलेल्या श्री विष्णुमूर्ती मंदिराच्या सभागृहात एका सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली.
पू. रमानंद गौडा या वेळी मार्गदर्शन करतांना म्हणाले, ‘‘गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) कर्नाटकातील सर्व साधकांना केवळ आनंदच नाही, तर चैतन्य देणारी वार्ता दिली आहे. आपण सर्व जण गुरूंच्या पावन चरणी आणि या तिन्ही संतांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करूया.’’
या वेळी तिन्ही संतांचा सन्मान हार घालून आणि भेटवस्तू देऊन करण्यात आला. पू. सांतप्पा गौडा यांचा सन्मान पू. रमानंद गौडा यांच्या हस्ते, तर पू. (श्रीमती) कमलम्मा आणि पू. (सौ.) शशिकला किणी यांचा सन्मान पू. रमानंद गौडा आणि सौ. मंजुळा गौडा (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४३ वर्षे) यांच्या हस्ते करण्यात आला.
असा झाला सोहळ्याचा प्रारंभ !
सोहळ्याच्या प्रारंभी उपस्थित साधकांना चैतन्याची अनुभूती येत होती. ‘भगवंत कोणती आनंदवार्ता देणार आहे ?’, हे जाणून घेण्यासाठी उपस्थितांचे कुतूहल शिगेला पोचले होते. प्रारंभी पू. रमानंद गौडा यांनी मार्गदर्शन करतांना ‘सनातनच्या साधकांनी गेल्या २५ वर्षांत कशा प्रकारे साधना करून प्रगती केली’, याविषयी माहिती दिली.
त्यानंतर श्री. विनोद कामत (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७१ वर्षे), सौ. लक्ष्मी पै (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५७ वर्षे) आणि श्रीमती अश्विनी प्रभु (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५९ वर्षे) यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करतांना त्यांना आलेल्या अनुभूती सांगितल्या.
१. श्री. सांतप्पा गौडा संत झाल्याची घोषणा !
साधकांनी त्यांचे अनुभव व्यक्त केल्यानंतर पू. रमानंद गौडा यांनी श्री. सांतप्पा गौडा यांना अनुभव कथन करण्याचे आवाहन केले. श्री. सांतप्पा यांनी अनुभूती सांगितल्यानंतर त्यांनी श्री. सांतप्पा गौडा यांच्या गुणवैशिष्ट्यांचे कौतुक करून त्यांची ओळख सर्वांना करून दिली. या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्री. सांतप्पा गौडा यांच्याविषयी दिलेला संदेश वाचण्यात आला आणि त्यांना सनातनचे १२९ वे (समष्टी) संत म्हणून घोषित करण्यात आले.
२. श्रीमती कमलम्मा संत झाल्याची घोषणा !
त्यानंतर कपड्याने झाकलेल्या एका छायाचित्राचा भावजागृती प्रयोग घेण्यात आला. साधकांना ‘या छायाचित्राकडे पाहून काय अनुभूती आल्या ?’, ते विचारण्यात आले. या वेळी साधकांनी छायाचित्र पाहून भावजागृती होणे आणि अन्य अनुभूती सांगितल्या. त्यानंतर पू. रमानंद अण्णा यांनी श्रीमती कमलम्मा यांना त्या छायाचित्राविषयी सांगण्यास सांगितले. तेव्हा श्रीमती कमलम्मा यांनी ‘गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) स्मरण झाले’, असे सांगितले. त्यानंतर पू. रमानंद गौडा यांनी श्रीमती कमलम्मा यांच्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरानी दिलेला संदेश वाचून त्या सनातनच्या १३० व्या संतपदावर विराजमान झाल्याचे घोषित केले.
३. सौ. शशिकला किणी संत झाल्याची घोषणा !
सोहळ्यात साधकांना ‘मज दर्शन दे रे श्रीराम’ या भजनाची ध्वनीफीत ऐकवून भावजागृती प्रयोग घेण्यात आला. भजन ऐकल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती विचारण्यात आल्या. साधकांनी अनुभूती सांगितल्यानंतर सौ. शशिकला किणी यांनाही त्याविषयी सांगण्यासाठी व्यासपिठावर आमंत्रित करण्यात आले. पू. रमानंद गौडा यांनी सौ. शशिकला किणी यांचा सेवाभाव, प्रेमभाव आणि तळमळ यांचे वर्णन करून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी त्यांच्याविषयी दिलेला संदेश वाचला आणि त्या सनातनच्या १३१ व्या संतपदावर विराजमान झाल्याचे घोषित केले.
‘सेवेची तीव्र तळमळ आणि भावस्थितीचे मूर्तीमंत उदाहरण’ असलेले पुत्तुर (जिल्हा दक्षिण कन्नड) येथील श्री. सांतप्पा गौडा सनातनच्या १२९ व्या संतपदावर विराजमान (वय ८१ वर्षे) !
‘मागील २३ वर्षांपासून, म्हणजे वर्ष २००१ पासून श्री. सांतप्पा गौडा (मामा) सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या वयातही ते प्रतिदिन प्रसारसेवेसाठी बाहेर जातात. ‘सेवा’ हा जणू सांतप्पामामांचा श्वास आहे. एखाद्या दिवशी सेवा करायला मिळाली नाही, तर त्यांना आतून अस्वस्थ वाटते. ‘सेवेची तीव्र तळमळ’ आणि ‘देवावरील श्रद्धा’ यांमुळे कितीही कठीण परिस्थिती असली, तरी त्यांच्या सेवांत कधी खंड पडत नाही.
सांतप्पामामांच्या वाणीत चैतन्य असल्याने ते ज्यांना साधनेविषयी माहिती सांगतात, ते सर्व जण साधना करू लागतात. केवळ साधकांमध्येच नव्हे, तर समाजामध्येही मामांप्रती पुष्कळ आदरभाव आहे. समाजातील व्यक्तीही मामा जे सांगतील, ते ऐकतात आणि त्यांना मामांचा पुष्कळ आधारही वाटतो.
सनातन संस्थेशी परिचय झाल्यापासून ‘सनातन’ हेच माझे कुटुंब असून आता मला पुष्कळ मोठा परिवार मिळाला आहे’, असे वाटून मामांची भावजागृती होते. सांतप्पामामा हे भावस्थितीचे मूर्तीमंत उदाहरण आहेत. भावामुळे त्यांना ‘ईश्वर सतत सोबत आहे’, तसेच ‘स्वतःभोवती देवतांचे संरक्षककवच आहे’, अशा स्वरूपाच्या अनुभूती येतात.
वर्ष २०१५ मध्ये मामांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. ‘देवावरील श्रद्धा आणि भाव’ या गुणांमुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत आहे. गुरुपौर्णिमा २०२४ मध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ६९ टक्के होती. आजच्या शुभदिनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते ‘समष्टी संत’ म्हणून सनातनच्या १२९ व्या संतपदावर विराजमान झाले आहेत.
‘पू. सांतप्पा गौडा यांची पुढील आध्यात्मिक उन्नतीही जलद गतीने होत राहील’, याची मला खात्री आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१८.११.२०२४)
‘अध्यात्मप्रसाराची तळमळ आणि ईश्वराप्रती समर्पितभाव’ असलेल्या उजिरै (जिल्हा दक्षिण कन्नड) येथील श्रीमती कमलम्मा (वय ८१ वर्षे) सनातनच्या १३० व्या संतपदावर विराजमान !
‘श्रीमती कमलम्मा यांचे आरंभीचे जीवन पुष्कळ कष्टप्रद होते. वेगवेगळी कामे करून त्यांनी प्रपंचातील कर्तव्ये पूर्ण केली. मागील २० वर्षांपासून, म्हणजे वर्ष २००४ पासून त्या सनातनच्या माध्यमातून साधना करत आहेत. त्यांच्यामध्ये ‘आज्ञापालन’ हा महत्त्वाचा गुण असल्याने सत्संगात जे जे सांगितले, ते सर्व त्यांनी कृतीत आणण्याचा प्रयत्न केला. सत्संगात सांगितल्याप्रमाणे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यामुळे त्यांना पुष्कळ लाभ झाला.
श्रीमती कमलम्मा यांचे साधकांवर पुष्कळ प्रेम आहे. साधकांसाठी कितीही कष्ट करण्याची त्यांची सिद्धता असते. स्वतःच्या परिवारापेक्षा त्यांना साधक-परिवार अधिक आपला वाटतो.
श्रीमती कमलम्मा ‘तळमळ’ या गुणाचे मूर्तीमंत रूप आहेत. सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ समाजापर्यंत पोचावेत, यासाठी त्या तळमळीने प्रयत्न करतात. साधनेमुळे स्वतःला झालेले लाभ इतरांनाही व्हावेत, यासाठी त्या भेटणार्या व्यक्तींना साधनेविषयी माहिती सांगतात. अशा प्रकारे अध्यात्मप्रसार करण्याच्या प्रत्येक संधीचा त्या लाभ करून घेतात. ‘सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सेवा करता येत नाही’, याचे त्यांना वाईट वाटते.
घरी साधनेसाठी पूरक वातावरण नसतांनाही ‘तळमळ, अंतर्मनाची साधना आणि देवाप्रती समर्पितभाव’ या गुणांमुळे कमलम्मा यांची आध्यात्मिक उन्नती होत आहे. वर्ष २०१४ मध्ये त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली होती. गुरुपौर्णिमा २०२४ मध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ६९ टक्के होती. आजच्या शुभदिनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ‘व्यष्टी संत’ म्हणून त्या सनातनच्या १३० व्या संतपदावर विराजमान झाल्या आहेत.
‘पू. कमलम्मा यांची पुढील आध्यात्मिक उन्नतीही जलद गतीने होत राहील’, याची मला खात्री आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१८.११.२०२४)
‘वात्सल्यभाव आणि देवाचे अस्तित्व सतत अनुभवणार्या’ मंगळुरू (जिल्हा दक्षिण कन्नड) येथील सौ. शशिकला किणी सनातनच्या १३१ व्या संतपदावर विराजमान (वय ७७ वर्षे) !
‘मागील २५ वर्षांपासून, म्हणजे वर्ष १९९९ पासून मंगळुरू येथील सौ. शशिकला किणी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत आहेत. बालपणापासूनच त्यांची प्रभु श्रीरामावर नितांत श्रद्धा होती. त्यामुळे त्या रामनाम लिहायच्या आणि श्रीरामाचा नामजपही करायच्या.
विवाहानंतर कर्मकांडानुसार साधना करतांना त्यांनी मंगळुरू येथे सनातन संस्थेचे प्रवचन ऐकले आणि त्या नियमित सत्संगाला जाऊ लागल्या. नंतर त्यांनी एकही सत्संग कधी चुकवला नाही. सत्संगात सांगितलेली सर्व सूत्रे त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करू लागल्या. नंतर त्यांच्या मनात सेवेची आवडही निर्माण झाली. सध्या शारिरीक त्रासांमुळे त्यांना सेवा करायला जमत नाही. याची त्यांना पुष्कळ खंत वाटते.
सौ. किणी यांना सर्व साधकांप्रती पुष्कळ प्रीती वाटते. ‘सनातनचे सर्व साधक म्हणजे माझी मुलेच आहेत’, असा त्यांच्या मनात वात्सल्यभाव असतो. या भावामुळे त्या साधकांची मनापासून काळजी घेतात. सौ. किणी सतत देवाच्या अनुसंधानात असतात. त्यांना ठायी ठायी भगवान श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवते आणि ‘श्रीकृष्ण स्वतः समवेत आहे’, अशी अनुभूती येते.
वर्ष २०१५ मध्ये सौ. किणी यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. गुरुपौर्णिमा २०२४ मध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ६९ टक्के होती. आजच्या शुभदिनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून त्या ‘व्यष्टी संत’ म्हणून सनातनच्या १३१ व्या संतपदावर विराजमान झाल्या आहेत.
‘पू. (सौ.) शशिकला किणी यांची पुढील आध्यात्मिक उन्नतीही जलद गतीने होत राहील’, याची मला खात्री आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१८.११.२०२४)
संतपदी विराजमान झालेल्या संतांचे मनोगत
सर्वस्व गुरुचरणी अर्पण केले पाहिजे ! – पू. सांतप्पा गौडा
पू. सांतप्पा गौडा म्हणाले, ‘‘आज गुरूंनी मला हे फळ दिले आहे, यामुळे मला पुष्कळ आनंद होत आहे. समष्टी सेवा केल्याने गुरु जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त करून मोक्षप्राप्ती घडवून आणतात. नामजप, प्रार्थना, उपाय आणि कृतज्ञता सतत करत राहिली पाहिजे. आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यामुळे गुरूंच्या कृपेने मी अनेक अपघातांपासून वाचलो आहे. जर आपल्याला खरा आनंद मिळवायचा असेल, तर साधना आणि धर्माचरण केले पाहिजे, तसेच आपले सर्वस्व गुरुचरणी अर्पण केले पाहिजे.’’
माझ्या अंतःकरणातील भावना गुरूंपर्यंत पोचल्या आहेत ! – पू. (श्रीमती) कमलम्मा
पू. (श्रीमती) कमलम्मा म्हणाल्या, ‘‘माझ्या अंतःकरणातील भावना गुरूंपर्यंत पोचल्या आहेत. यामुळे मला पुष्कळ आनंद झाला आहे. माझ्या जीवनातील सर्व समस्या गुरूंनी दूर केल्या आहेत. आता घराघरांत जाऊन गुरुदेवांचे ग्रंथ वितरित करायचे आहेत आणि गुरूंसाठी अर्पण गोळा करून त्यांचे मन जिंकायचे आहे.’’
गुरुदेवांची मी सदैव कृतज्ञ आहे ! – पू. (सौ.) शशिकला किणी
पू. (सौ.) शशिकला किणी म्हणाल्या, ‘‘गुरुदेवांनी माझी एवढी प्रगती करून घेतली आणि मला येथपर्यंत (संतपदापर्यंत) पोचवले आहे, यासाठी मी त्यांची सदैव कृतज्ञ आहे. पुढेही त्यांनीच माझ्याकडून अशीच साधना करून घ्यावी, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते.’’
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक