कोची (केरळ) येथे गणेशोत्सव कालावधीत प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शन यांच्या माध्यमातून प्रसार करण्यात आला. त्याविषयीचा वृत्तांत येथे देत आहोत.
१. कन्नड संघ
कोची येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने कन्नड संघ येथे २ दिवस सनातन संस्थेच्या साधकांना गणपति विषयी प्रवचन घेण्याची संधी मिळाली. सनातनच्या साधिका सौ. सुमा पुतलथ यांनी २ दिवस घेतलेल्या प्रवचनात ‘सनातन-निर्मित ‘गणपति’ ग्रंथ, ‘गणपति’ विषयी शास्त्रोक्त माहिती, गणपतीला सर्वप्रथम आपण वंदन का करतो ? गणेशोत्सवाच्या कालावधीत गणपतीला कोणती प्रार्थना करावी ? आणि कलियुगात नामजपाचे महत्त्व’ यांविषयी सांगितले. या दोन्ही विषयांचा लाभ मंडळातील अनेक जिज्ञासूंनी घेतला.
कन्नड संघाच्या सदस्यांची सनातन संस्थेच्या कोची सेवाकेंद्रास भेट !
गणेशोत्सवाला आरंभ होण्याच्या ५ दिवसांपूर्वी कोची येथील कन्नड संघाच्या काही सदस्यांनी सनातन संस्थेच्या कोची सेवाकेंद्राला भेट दिली. (उपस्थितांपैकी ३ जण संस्था घेत असलेल्या ‘ऑनलाईन’ सत्संगाला उपस्थित असतात.) त्यांनी सेवाकेंद्राच्या माध्यमातून संस्थेच्या कार्याविषयी जाणून घेतले. या वेळी कन्नड संघाच्या सदस्यांना सेवाकेंद्र पुष्कळ आवडले. या वेळी कन्नड संघाच्या सदस्यांनी गणेशोत्सव निमित्त संघातील सदस्यांना भेट म्हणून द्यायला कन्नड भाषेतील ‘गणपति’ लघुग्रंथ आणि ग्रंथ यांची मागणी केली. हे लघुग्रंथ आणि ग्रंथ देण्यासाठी साधक कन्नड संघाच्या कार्यालयात गेले, त्या वेळी संघाच्या सदस्यांनी उपस्थितांना ‘कोची सेवाकेंद्रात गेल्यावर काय जाणवले ?, तसेच नियमित सत्संगात जोडल्यामुळे काय वाटते ?’, यांविषयी आलेले अनुभव आपणहून सांगितले.
२. जय महाराष्ट्र मंडळ
या गणेश मंडळात सनातन संस्थेचे साधक गणपतीचे दर्शन आणि प्रवचनाची अनुमती घ्यायला गेले. या वेळी मंडळाच्या पदाधिकार्यांनी सनातनच्या सौ. अवनी लुकतुके यांना ‘गणपति’ या विषयावर माहिती सांगण्यास अनुमती दिली. या प्रवचनाचा लाभ अनेक गणेशभक्तांनी घेतला. या वेळी मंडळाने ग्रंथप्रदर्शन लावण्याचीही संधी दिली, तसेच अनेकांनी शंकानिरसनही करून घेतले.