श्रेणी २ सत्संग ५ : स्वयंसूचना बनवतांना घ्यायची काळजी

गेल्या आठवड्यात आपण आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने दायित्व घेऊन सेवा करणे किती महत्त्वाचे आहे, दायित्व घेऊन सेवा करायची म्हणजे काय, त्यामुळे आध्यात्मिक स्तरावर कसा लाभ होतो आणि दायित्व घेण्याची वृत्ती विकसित करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे, हे आपण शिकलो.

स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत आपण आतापर्यंत अ-१, अ-२ आणि अ-३ स्वयंसूचना पद्धतींविषयी जाणून घेतले. आजच्या सत्संगात आपण स्वयंसूचना बनवतांना काय काळजी घ्यायची ?, हे समजून घेणार आहोत. स्वयंसूचना योग्य पद्धतीने बनवल्या गेल्या, तर त्या अधिक परिणामकारक होतात. स्वयंसूचना बनवतांना ती प्रभावी होण्यासाठी आणि मनाकडून लवकर स्वीकारली जाण्यासाठी काय सूत्रे लक्षात घ्यायला हवीत, याविषयी पाहूया.

 

सोपी वाक्यरचना

स्वयंसूचना बनवतांना वाक्यरचना नेहमी सोपी असावी. सूचना मोजक्या आणि योग्य शब्दांत तयार करावी.

 

सूचनेत नकारात्मक शब्दांचा वापर टाळावा

सूचना नकारात्मक नसावी. सूचनेत कधीही ‘न, नाही , नको’ वगैरे नकारात्मक शब्दांचा वापर करू नये. सूचना नेहमी सकारात्मकच असावी.

उदाहरण १ : मी न चिडता बोलीन, अशी वाक्यरचना करण्याऐवजी मी शांतपणे बोलीन, अशी वाक्यरचना करावी.

उदाहरण २ : मी उशिरा उठणार नाही, अशी वाक्यरचना करण्याऐवजी मी लवकर उठीन, अशी वाक्यरचना करावी.

उदाहरण ३ : मी रहादारीचा रस्ता उतावीळपणे ओलांडणार नाही, अशी सूचना करण्याऐवजी ‘जेव्हा मी रहादारीचा रस्ता उतावीळपणे ओलांडत असेन, तेव्हा मला त्याची जाणीव होईल आणि मी तो काळजीपूर्वक आणि आरामात ओलांडीन’, अशी सूचना करावी.

 

स्वयंसूचना कधीही भूतकाळात नसावी

अ-१ आणि अ-२ सूचनापद्धतींची वाक्यरचना भविष्यकाळात असावी.

उदाहरण १ : जेव्हा मी चप्पल अव्यवस्थित ठेवीन, तेव्हा चप्पल योग्य पद्धतीने ठेवण्यातून माझी साधना होणार आहे, याची मला जाणीव होईल आणि मी चप्पल व्यवस्थित ठेवीन.

उदाहरण २ : जेव्हा मुले अभ्यास करण्याच्या ऐवजी मोबाईल पहात असतील, तेव्हा मी मुलांना अभ्यासाचे महत्त्व शांतपणे आणि प्रेमाने समजावून सांगीन.

अशा प्रकारे आपल्याला भविष्यकाळात वाक्यरचना करायची आहे.

अ-३ पद्धतीने स्वयंसूचना देतांना म्हणजे प्रसंगाचा सराव करतांना आपल्याला वर्तमानकाळात स्वयंसूचना द्यायची आहे. उदाहरणार्थ, मी मुलाखतीला जात आहे. मी मुलाखतीची सिद्धता करत आहे. मी सर्व प्रश्नांची शांततेने उत्तरे देत आहे इत्यादी…

 

स्वयंसूचनेत ‘आपण, आपले’ यांऐवजी ‘मी, माझे’ असा उल्लेख करावा

स्वयंसूचनेत ‘आपले, आपण, आमचे’ असे प्रथमपुरुषी बहुवचनी उल्लेख करू नये, तर ‘मी, माझे, मला, माझ्या’, असे प्रथमपुरुषी एकवचनी उल्लेख करावेत.

उदाहरण १ : सुनील जेव्हा ‘अभ्यास झाला का ?’, असे मला विचारील, तेव्हा ‘आपला अभ्यास झाला आहे’, असे मी शांतपणे सांगीन, असे म्हणण्याऐवजी ‘माझा अभ्यास झाला आहे’, असे मी शांतपणे सांगीन, अशी वाक्यरचना करावी.

 

सर्वसामान्य सूचनेऐवजी नेमकेपणाने आणि सकारात्मक सूचना द्यावी

स्वभावदोषांवर विशिष्ट सूचना द्यावी. सर्वसामान्य सूचना देऊ नये. सर्वसामान्य सूचनेपेक्षा स्थळ, काळ-वेळ, व्यक्ती, प्रसंग आणि विषय यांचा उल्लेख करून विशिष्ट सूचना दिल्यास अंतर्मनास ती ग्रहण करायला सोपी जाते.

उदाहरण : एखादी व्यक्ती आपल्या समोर आल्यावर आपल्याला तिचे दोषच दिसतात. हे टाळण्यासाठी आपल्याला सूचना द्यायची असेल, तर त्या संबंधित व्यक्तीचे नाव आणि गुण यांचा उल्लेख स्वयंसूचनेत करावा. उदाहरणार्थ, कोणी माझ्यासमोर आल्यास मी त्याचे स्वभावदोष न पहाता गुणच पाहीन. या ऐवजी जेव्हा सुनील माझ्यासमोर येईल, तेव्हा मला त्याच्यातील प्रामाणिकपणा हा गुणच दिसेल, अशा प्रकारची नेमकेपणाने सूचना बनवावी.

सर्वसामान्य सूचना का द्यायच्या नाहीत, तर त्यामुळे आपल्याला नेमके काय सुधारायचे आहे, हे लक्षात येत नाही. ‘मी घाईने कृती करणार नाही’, अशी सर्वसामान्य सूचना लिहिली, तर घाईने कृती करणे म्हणजे काय, तसेच योग्य कृती कोणती आहे, यांचा सूचनेत अंतर्भाव नसल्याने ती चित्ताकडून स्वीकारली जात नाही. नेमकेपणाने सूचना दिली, तर आपल्याला आपली नेमकी कोणती कृती चुकत आहे आणि आपल्याला त्यामध्ये काय सुधारणा करायची आहे, हे नेमकेपणाने लक्षात येते.

उदाहरण : ‘मी घाईने कृती करणार नाही’, असे सर्वसाधारण वाक्य लिहिण्याऐवजी नेमक्या कृतीचा उल्लेख करून वाक्यचना करावी. उदाहरणार्थ, ‘जेव्हा मी चहा घाईने गाळत असेन, तेव्हा तो सांडू शकतो, याची मला जाणीव होईल आणि मी काळजीपूर्वक आणि सावकाशपणे चहा गाळीन.’

 

स्वयंसूचना अंतर्मुखता निर्माण करणारी हवी

स्वयंसूचना ही व्यक्तीला बहिर्मुख करण्याऐवजी अंतर्मुख करणारी असावी.

उदाहरण : ‘जेव्हा बाबा ‘खेळ बंद कर आणि मुकाट्याने अभ्यास कर’, असे मला ओरडून सांगतील, तेव्हा ‘त्यांचा स्वभाव रागीट आहे’, असा विचार करून मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीन’, अशी स्वयंसूचना केली, तर आपल्या मनावर काय बिंबेल, तर बाबा रागीट आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे. असे झाले, तर आपला प्रवास बहिर्मुखतेकडे चालू होईल. प्रक्रियेचा उद्देशच स्वतःला अंतर्मुख करणे, हा आहे. त्यामुळे या प्रसंगात स्वयंसूचना कशी देऊ शकतो, तर ‘जेव्हा बाबा ‘खेळ बंद कर आणि मुकाट्याने अभ्यास कर’, असे मला ओरडून सांगतील, तेव्हा ‘मला परीक्षेत चांगले गुण मिळावेत’; म्हणून ते मला तसे सांगत आहेत, हे माझ्या लक्षात येईल आणि मी खेळ थांबवून लगेचच शांतपणे अभ्यासाला सुरुवात करीन.’

 

स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेशी संबंधित सनातनचे ग्रंथ

सनातन संस्थेच्या वतीने स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेच्या संदर्भात ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहेत. ते www.SanatanShop.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आपण या ग्रंथांचा आवर्जून लाभ घ्यावा.

 

Leave a Comment