प्रसादाची शुद्धता राखण्यासाठी देण्यात येणार प्रमाणपत्र
रामनाथी – मंदिरांमध्ये भाविकांकडून अर्पण करण्यात येणार्या प्रसादाची शुद्धता आणि पूजेचे पावित्र्य राखण्यासाठी ओम प्रतिष्ठानकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अंतर्गत चळवळ राबवण्यात येत आहे. या चळवळीनिमित्त ‘ओम प्रमाणपत्र’ वितरणाचा शुभारंभ हरितालिकाच्या मंगलमय दिवशी (६ सप्टेंबर २०२४) सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी त्यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्रास हस्तस्पर्श करून प्रमाणपत्र ‘सनातन प्रसाद निर्मिती केंद्र’, रामनाथी आश्रम यांस प्रदान करण्यात आले.
‘हिंदु शुद्धता मानक प्रमाणित’ दुकानातून प्रसाद आणि पूजा साहित्य खरेदी करण्याचे आवाहन ‘ओम प्रतिष्ठान’ आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी १४ जून २०२४ या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे केले होते. त्यावेळी अखिल भारतीय संत समिती धर्म समाज, महाराष्ट्र क्षेत्राचे अध्यक्ष महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेत शास्त्री महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक अन् महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट, सावरकर प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वरच्या चरणी पहिले प्रमाणपत्र अर्पण करून मंदिर परिसरातील काही निवडक प्रसाद विक्रेत्यांना ‘ओम प्रमाणपत्र’ वितरीत करण्यात आले होते.
ओम प्रतिष्ठान’कडून राबवण्यात येणारी ही चळवळ अत्यंत कौतुकास्पद – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘हिंदु धर्मशास्त्रानुसार, देवाला अर्पण करण्यात येणारा प्रसाद आणि पूजा साहित्य जेवढे सात्त्विक असेल, तेवढा पूजकाला त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. शुद्ध आणि सात्त्विक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अन् त्याचे पावित्र्य राखण्यासाठी ‘ओम प्रतिष्ठान’कडून राबवण्यात येणारी ही चळवळ अत्यंत कौतुकास्पद आहे’, असे गौरवोद़्गार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी या प्रसंगी काढले. पूजकाने त्या-त्या देवतेचा नामजप करत पूजा-अर्चना केल्यास त्याची शुद्धता आणि सात्त्विकता अधिक प्रमाणात वाढेल. त्यामुळे वातावरणातील सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होईल. परिणामी ही चळवळ अधिक फलदायी होईल’, असेही ते म्हणाले.
ओम प्रमाणपत्राचा उद्देश
‘ओम प्रमाणपत्र’ ही एक चळवळ ही हिंदूसंघटनासाठी, तसेच हिंदूंच्या अस्तित्वासाठी राबवण्यात आलेली चळवळ आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांच्या नेतृत्वाखाली चालू झालेल्या या चळवळीसाठी ‘ओम प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात आली आहे. असे असले, तरी हे प्रतिष्ठान सर्वत्रच्या हिंदूंसाठी आहे. ‘प्रसादातील साम्रगी पूर्णतः शुद्ध साम्रगी आहे कि नाही ?’, हे ‘ओम प्रमाणपत्र’ देण्यापूर्वी प्रथम पाहिले जाईल.
हिंदु दुकानदारांच्या सक्षमीकरणासाठी ‘ओम प्रमाणपत्र’ !
देशभरातील दुकानदारांना ‘ओम शुद्धता प्रमाणपत्र’ दिले जात आहे. हिंदु विक्रेत्यांकडून विक्री केले जाणारे उत्पादन, हे हिंदूंनीच बनवलेलेे आहे ना, याचीही खात्री केली जाणार आहे. ‘ओम शुद्धता प्रमाणपत्र’ हा काही पैसे कमावण्यासाठी चालू केलेला व्यवसाय नाही किंवा शासकीय यंत्रणेला आव्हान देण्याचाही प्रयत्न नाही. हा हिंदूंच्याच सक्षमीकरणासाठी केलेला प्रयत्न आहे. ओम प्रमाणपत्राविषयी मुसलमानांनी प्रश्न विचारण्याआधी शंकाकुशंका घेणारे हिंदु समाजातीलच बरेच लोक आहेत; पण त्यांपैकी कुणीही हलाल प्रमाणपत्राच्या विरोधात आवाज उठवलेला ऐकीवात नाही.
‘ओम प्रमाणपत्रा’च्या साहाय्याने शुद्धता मानक प्रमाणित दुकानांची नावे कशी शोधावी ?
‘ओम शुद्धता प्रमाणपत्रा’वर असलेले ‘क्यू.आर्. कोड’ स्कॅन केले की, ओम शुद्धता प्रमाणपत्र घेतलेल्या केंद्राचे नाव आपल्याला भ्रमणभाषवर दिसेल. ते नाव आणि प्रत्यक्ष केंद्रावरचे नाव एकच असेल, तर आपण योग्य ठिकाणी असल्याचे आपल्या लक्षात येईल. जर ‘क्यू.आर्. कोड’ स्कॅन केल्यानंतर दिसणारे नाव आणि केंद्राचे नाव एक नसेल तर ते प्रमाणपत्र अवैध आहे, त्या केंद्राचे नाही हे आपल्या लक्षात येईल. अशावेळी तिथे खरेदी न करता, आपल्याला त्याची तक्रारही नोंदवायची आहे. हिंदूंच्या व्यवसायवृद्धीसाठी ‘ओम शुद्धता प्रमाणपत्र’ चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन ओम प्रतिष्ठानने केले आहे..