गेल्या आठवड्यात आपण स्वयंसूचना बनवतांना काय काळजी घ्यायची ?, हे समजून घेतले. आजच्या सत्संगामध्ये आपण स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेसाठी स्वभावदोष कसे निवडायचे ? आणि त्यांची व्याप्ती कशी काढायची ?, हे समजून घेणार आहोत.
आतापर्यंतच्या सत्संगांत आपण स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेतील स्वयंसूचनांच्या वेगवेगळ्या पद्धती समजून घेतल्या. सारणीलिखाण केल्याने आपल्या अयोग्य सवयी, चुकीचे विचार निघून जात असल्याचा अनुभव अनेक जण घेत आहेत. आपण साधना का करत आहोत ?, तर चिरंतन आनंदप्राप्तीसाठी किंवा देवाची भक्ती करून मोक्ष मिळवण्यासाठी ! हो ना ? ‘स्वभावदोष निर्मूलन आणि देवाची भक्ती करणे याचा काय संबंध आहे ? त्यापेक्षा भाव-भक्ती वाढवण्याच्या प्रयत्नांविषयी सत्संगात अभ्यास असावा’, असे काहींना वाटू शकते. याविषयी एक महत्त्वाचे सूत्र आपण लक्षात घ्यायला हवे की, देवाची भक्ती करण्यासह चित्ताची शुद्धीही व्हायला हवी. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया न राबवताच देवाची भक्ती करणे म्हणजे एकप्रकारे अस्वच्छ किंवा मळकट भांड्यात अमृत भरण्यासारखे आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ही अमृतमय प्रक्रिया ज्यांनी शोधून काढली, ते सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा यामागे संकल्प आणि आशीर्वाद कार्यरत आहे. त्यामुळे देशविदेशातील अनेक जिज्ञासू प्रामाणिक प्रयत्नांनंतर आपले जन्मोजन्मीचे संस्कार नष्ट होत असल्याची, जीवन आनंदी होत असल्याची, तसेच देवाचे अस्तित्व अनुभवता येत असल्याची अनुभूती घेत आहेत. आपणही ही प्रक्रिया राबवून त्याची प्रचिती घेऊया. स्वयंसूचनांच्या पद्धती समजून घेतल्यानंतर आपण आजच्या सत्संगात प्रक्रियेसाठी आपल्यातील स्वभावदोषांची निवड करून त्याची व्याप्ती काढण्याचा महत्त्वाचा टप्पा समजून घेणार आहोत.
दोषांचे वर्गीकरण आणि निवड
आपल्या सगळ्यांमध्येच कमी-अधिक प्रमाणात अनेक स्वभावदोष असतात. उदाहरणार्थ, आळशीपणा, अव्यवस्थितपणा, स्वतःकडे मोठेपणा घेणे, इतरांना समजून न घेणे, रागीटपणा, चिडचिडेपणा… आपल्यात कोणते दोष किती प्रमाणात आहेत आणि ते घालवून आपल्याला कोणते गुण आत्मसात करायचे आहेत, हे सुस्पष्ट असणे महत्त्वाचे असते. आरंभी आपल्याला आपल्यातील स्वभावदोष ओळखून त्यांची यादी बनवायची आहे. त्यानंतर त्या दोषांच्या तीव्रतेचा अभ्यास करून त्या दोषांचे तीव्र, मध्यम आणि मंद अशा प्रकारे वर्गीकरण करायचे आहे. त्यानंतर आपल्यात प्रबळ असलेले २ किंवा ३ स्वभावदोष प्रक्रियेसाठी प्राधान्याने निवडायचे आहेत.
स्वभावदोषांची यादी
पुढे स्वभावदोषांची यादी दिली आहे. ती पाहून आपले निरीक्षण करून आपल्यामध्ये कोणते स्वभावदोष तीव्र, मध्यम आणि मंद स्वरूपात आहेत, त्याची आपल्या वहीमध्ये नोंद करूया. स्वभावदोषांची यादी काळजीपूर्वक पाहूया.
काळजी करणे, दुसर्यांना निरुत्साही करणे, दुसर्यांवर टीका करणे, उद्धटपणा, सहनशीलता नसणे, चिडचिडेपणा, रागीटपणा, भांडखोरपणा, वर्चस्व गाजवणे, आक्रमक वृत्ती, सूडबुद्धी, विध्वंसक वृत्ती, एकाग्रता नसणे, विसराळूपणा, निर्णयक्षमता नसणे, उतावळेपणा, निष्काळजीपणा, अव्यवस्थितपणा, आळशीपणा, गंभीर स्वभाव, औपचारिकता, दुसर्यांविषयी काहीही न वाटणे, एकलकोंडेपणा, असंस्कृतपणा, भावनाशीलता, संदिग्धपणा, निराशावादी वृत्ती, अतिचिकित्सकपणा, पूर्वग्रह, दुसर्यांना किंवा स्वतःला विनाकारण दोष देणे, हेवा वाटणे, मत्सर वाटणे, संशयीपणा, संकुचितपणा, हट्टीपणा, आत्मकेंद्रितपणा म्हणजे केवळ स्वतःचाच विचार करणे, स्वार्थीपणा, आपल्या वस्तू इतरांना न देणे, कंजूषपणा, भित्रेपणा, न्यूनगंड, कामचुकारपणा, चालढकलपणा, विश्वासार्हता नसणे, कृतघ्नपणा, खोटे बोलणे, पक्षपातीपणा, अप्रामाणिकपणा, अनावश्यक बोलणे, मनोराज्यात रमणे, उधळेपणा, गर्विष्ठपणा, दुसर्यांना तुच्छ लेखणे, अतीमहत्त्वाकांक्षी, अतीव्यवस्थितपणा इत्यादी.
स्वभावदोषांची यादी पाहिल्यावर आपल्यामध्ये अनेक स्वभावदोष आहेत, असे वाटू शकते; पण आपल्याला या यादीपैकी आपल्यात अधिक प्रमाणात असणारे म्हणजेच प्रबळ स्वभावदोष प्रक्रियेसाठी निवडायचे आहेत.
प्रक्रियेसाठी स्वभावदोषांची निवड
या स्वभावदोषांच्या यादीमधून आपल्यात असणारे २ किंवा ३ तीव्र स्वभावदोष प्रक्रियेसाठी निवडायचे आहेत. चुकांची वारंवारता, तीव्रता, कालावधी यांचा विचार करून आपण हे स्वभावदोष निवडू शकतो, उदा. एकाच प्रकारच्या चुका होण्याची वारंवारता अधिक आहे, त्या चुकीमुळे होणारा परिणाम गंभीर आहे, मनाच्या स्तरावरील चुकांमुळे अस्वस्थ वाटण्याचा कालावधी अधिक आहे, तर त्या चुकींना कारणीभूत असणार्या स्वभावदोषांची प्रक्रियेसाठी प्राधान्याने निवड करावी. उदाहरणार्थ, एखाद्याकडून प्रत्येक काम करण्यात आळस केला जात असेल, तर आळशीपणा हा स्वभावदोष प्रक्रियेसाठी घेऊ शकतो. समजा बोलतांना इतरांवर कायम टीका केली जात असेल, तर टीका करणे, हा स्वभावदोष प्रक्रियेसाठी घेऊ शकतो. न्यूनगंडामुळे इतरांशी बोलण्यास भीती वाटत असेल, तर प्रक्रियेच्या अंतर्गत न्यूनगंड दूर करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. स्वभावदोषांची निवड करण्यापूर्वी आपणच आपले अंतर्निरीक्षण आणि चिंतन करावे. त्यासाठी आपले कुटुंबीय, परिचित किंवा सहकारी यांचेही साहाय्य घेऊ शकतो.
स्वभावदोषांची व्याप्ती
स्वभावदोषांची निवड केल्यानंतर पुढच्या टप्प्याला प्रक्रियेसाठी निवडलेल्या स्वभावदोषांची व्याप्ती काढायची आहे. याचा अर्थ ते स्वभावदोष कुठे कुठे उफाळून येतात, याची नोंद करायची आहे. कौटुंबिक, वैयक्तिक, सामाजिक, कार्यालयीन आणि इतर अशा ५ स्तरांवर आपण व्याप्ती काढू शकतो.
१. अव्यवस्थितपणा या स्वभावदोषाची व्याप्ती
व्याप्ती कशी काढायची ?, हे आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. समजा एखाद्या व्यक्तीमधे अव्यवस्थितपणा हा स्वभावदोष आहे. अव्यवस्थितपणा हा दोष कुठे कुठे दिसून येतो, ती सूत्रे आपल्याला व्याप्तीच्या अंतर्गत नमूद करायची आहेत. उदाहरणार्थ, घरी चपला नीट न ठेवणे, अंथरूणाची घडी व्यवस्थित न करणे, खणामध्ये कपडे कोंबून भरणे, मांडणीमध्ये भांडी नीट न लावणे; कार्यालयात धारिका म्हणजे फाईल्स वेड्यावाकड्या ठेवणे, टेबलावर सामान अव्यवस्थित ठेवणे; कपडे इस्त्री न करता चुरगाळलेले वापरणे, वैयक्तिक वापराच्या वस्तू अस्ताव्यस्त ठेवणे अशा प्रकारच्या कृतींची नोंद आपल्याला व्याप्तीच्या अंतर्गत करायची आहे. एकदा का एखाद्या स्वभावदोषाची व्याप्ती काढली, तर तो स्वभावदोष घालवणे सोयीचे जाते; कारण आपल्याला नेमक्या काय काय सुधारणा करायच्या आहेत, याचे चित्र आपल्या स्वतःलाच सुस्पष्ट होते. पुढे तो स्वभावदोष जाण्यासाठी स्वयंसूचना देण्यासाठीही या व्याप्तीचा उपयोग होतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शत्रूची पूर्ण माहिती असली, तर त्याला लढाईमध्ये हरवणे सोपे जाते. स्वभावदोषांची व्याप्ती काढणे म्हणजे स्वभावदोषरूपी शत्रूची माहिती गोळा करण्यासारखे आहे.
२. विसराळूपणा या स्वभावदोषाची व्याप्ती
आपण अजून एक उदाहरण पाहूया. समजा आपल्यामधे विसराळूपणा हा स्वभावदोष आहे. व्याप्ती काढतांना विसराळूपणा कुठे कुठे दिसून येतो, याची आपल्याला नोंद करायची आहे. व्याप्ती काढतांना वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, कार्यालयीन आणि इतर अशा ५ टप्प्यांचा विचार करून व्याप्ती काढू शकतो. उदाहरणार्थ, स्नानगृहातून बाहेर आल्यावर दिवा बंद केला नाही, दुकानातून खरेदी करण्यास सांगितलेल्या साहित्यापैकी काही जिन्नस आणायला विसरलो, रात्री झोपण्यापूर्वी संगणक बंद केला नाही, त्यामुळे तो रात्रभर चालू राहिला, कार्यालयात एका वरिष्ठ अधिकार्यासाठी आलेला महत्त्वाचा निरोप त्यांना सांगण्यास विसरलो, पाण्याची मोटार बंद करायची विसरलो, अशा प्रकारची सूत्रे व्याप्तीमध्ये येऊ शकतात. ही व्याप्ती प्रत्येक व्यक्तीनुरूप वेगळी असू शकेल. प्रत्येकाच्या चिंतनानुसार, निरीक्षणानुसार ही सूत्रे कमी-अधिक असू शकतात.
३. पूर्वग्रह या स्वभावदोषाची व्याप्ती
समजा आपल्यामध्ये पूर्वग्रह हा स्वभावदोष आहे, तर त्याची व्याप्ती काय असू शकते ? उदाहरणार्थ, यजमानांना मी करत असलेल्या कामाची किंमत नाही. ते माझी दखल घेत नाहीत; सोसायटीतील शेजारी नेहमीच तक्रारी करत असतात; मुलाला अभ्यास करण्याविषयी कितीही वेळा समजावले, तरी तो ऐकत नाही; नातेवाईकांना माझ्या नेहमी चुकाच दिसतात असे वाटणे… अशा प्रकारे कुठल्या व्यक्ती, प्रसंग यांच्या संदर्भात पूर्वग्रहदूषितपणे विचार होतो, ती सूत्रे आपल्याला व्याप्तीमध्ये अंतर्भूत करायची आहेत.
प्रक्रियेसाठी स्वभावदोषांची निवड करणे आणि त्याची व्याप्ती काढणे, हा विषय सगळ्यांना समजला ना ? आपण देवाला प्रार्थना करून स्वभावदोषांची व्याप्ती काढण्याचा प्रयत्न करूया. आपण चिंतन करून अधिकाधिक सूत्रे काढण्याचा प्रयत्न करूया; पण किती सूत्रे काढतो, यापेक्षा मनापासून प्रयत्न करत आहोत ना, हे महत्त्वाचे आहे.
आपण जेवढे स्वतःचे निरीक्षण, चिंतन चांगले करू, तेवढी आपल्याला चांगल्या प्रकारे व्याप्ती काढता येईल. या आठवड्यात आपण काय करूया ?, तर आपल्यातील २ किंवा ३ तीव्र स्वभावदोषांची निवड करून त्याची व्याप्ती काढूया. हा आपला या आठवड्यासाठीचा गृहपाठ असेल. व्याप्ती काढण्यासाठी आपण आपले कुटुंबीय, सहकारी, मित्र यांचीही मदत घेऊ शकतो.
आतापर्यंत आपण अ-१, अ-२ आणि अ-३ स्वयंसूचना पद्धतींचा अभ्यास केला. पुढील सत्संगामध्ये आपण आ-१ स्वयंसूचना पद्धत समजून घेणार आहोत, प्रक्रियेच्या दृष्टीने पुढचा सत्संग महत्त्वाचा आहे.