अनुक्रमणिका
‘लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे’, अशी शिकवण पूर्वी मुलांना दिली जाई. आज मुले उशिरा झोपतात आणि सकाळी उशिरा उठतात. पूर्वी ऋषीमुनींचा दिवस ब्राह्ममुहुर्ताच्या वेळी चालू होत असे, तर आज यंत्रयुगामुळे ‘रात्रपाळीत काम आणि दिवसा झोप’, असे करावे लागते. पूर्वीची दिनचर्या निसर्गाला धरून होती, तर सध्याची तशी नाही. दिनचर्या जितकी निसर्गाला धरून असेल, तितकी ती आरोग्याला पूरक असते. आज तशी ती नसल्यानेच पोटाच्या, घशाच्या, हृदयाच्या अशा नाना व्याधींनी मनुष्य त्रस्त झाला आहे.
पूर्वीच्या काळी स्नानानंतर तुळशीला पाणी घालून तिला वंदन केले जाई, तर आज कित्येकांकडे तुळशीवृंदावनही नसते. पूर्वी दिवेलागणीच्या वेळी ‘शुभं करोति…’ म्हटले जाई, तर आज दिवेलागणीच्या वेळी मुले दूरचित्रवाणीवर कार्यक्रम पहाण्यात मग्न असतात. हिंदु धर्माने सांगितलेल्या आचारपालनापासून हिंदू फार दूर जात आहेत. आचारांचे पालन करणे, हा अध्यात्माचा पाया आहे. ‘विज्ञानाने निर्माण केलेल्या सोयीसुविधांनी नव्हे, तर अध्यात्माला धरून रहाण्यानेच मनुष्य खरा सुखी होऊ शकतो’, हे तत्त्व सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येक कृतीतून आपल्यातील रज-तम घटून सत्त्वगुण वाढणे आणि वाईट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण होणे, हे साध्य होण्याच्या दृष्टीनेच आपल्या प्रत्येक आचाराची योजना केलेली आहे, हे हिंदु धर्माचे अद्वितीय वैशिष्ट्य आहे. ज्ञानयोग, कर्मयोग आदी साधनामार्गांप्रमाणे आचारधर्मही ईश्वरप्राप्तीच्या दिशेने नेणारा आहे. यादृष्टीने आपण दिनचर्या म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व पाहूया.
१. व्याख्या
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत केल्या जाणार्या कृतींना एकत्रितपणे ‘दिनचर्या’ असे म्हणतात.
२. समानार्थी शब्द
‘दिनचर्या’ या शब्दाला ‘आन्हिक’ आणि ‘नित्यकर्म’ असे समानार्थी शब्द आहेत.
३. महत्त्व
अ. निसर्गनियमांनुसार दिनचर्या असणे आवश्यक
मानवाचे संपूर्ण आयुष्य स्वस्थ रहावे, त्याला कोणतेही विकार होऊ नयेत, या दृष्टीने दिनचर्येत विचार केलेला असतो. एखादी व्यक्ती दिवसभरात कोणता आहार-विहार करते, कोणकोणत्या कृती करते यांवर तिचे स्वास्थ्य अवलंबून असते. स्वास्थ्याच्या दृष्टीने दिनचर्या महत्त्वाची असते. दिनचर्या निसर्गाच्या नियमांप्रमाणे असल्यास त्या कृतींचा मानवाला त्रास न होता लाभच होतो. यासाठीच निसर्गनियमांप्रमाणे (धर्माने सांगितलेल्या गोष्टींनुसार) वागणे आवश्यक आहे, उदा. सकाळी लवकर उठणे, उठल्यावर मुखमार्जन करणे, दात घासणे, स्नान करणे इत्यादी.
‘ऋषी सूर्यगतीप्रमाणे ब्राह्ममुहुर्ताच्या वेळी प्रातर्विधी, स्नान आणि संध्या करत. त्यानंतर वेदाध्ययन आणि कृषीकर्म करत अन् रात्री लवकर झोपत. त्यामुळे त्यांना शारीरिक स्वास्थ्य होते; परंतु आज लोक निसर्गनियमांच्या विरुद्ध वागत असल्यामुळे त्यांचे शरीरस्वास्थ्य बिघडले आहे. पशूपक्षीसुद्धा निसर्गनियमांनुसार आपली दिनचर्या करतात.’
– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
आ. आन्हिकाचे काटेकोर पालन करणारी व्यक्ती सहसा
दारिद्र्य, व्याधी, दुर्व्यसन, मनोविकृती इत्यादी आपत्तींचे भक्ष्य ठरत नसणे
‘धर्मशास्त्रात आन्हिकास प्राधान्य दिलेले आहे. एकीकडे शरिरास अत्यंत उपयुक्त आणि पोषक ठरणारे विज्ञान, तर दुसरीकडे मनाची उत्क्रांती आणि विकास साधणारे मानसशास्त्र, अशी दुहेरी जोड देऊन शास्त्राने आन्हिकाचे नियम घालून दिलेले आहेत. आन्हिकाचे काटेकोर पालन करणारी व्यक्ती सहसा दारिद्र्य, व्याधी, दुर्व्यसन, मनोविकृती इत्यादी आपत्तींचे भक्ष्य ठरत नाही.’
येथे एक तत्त्व लक्षात घ्यावे की, उन्नत साधक आणि संत यांची साधना अंतर्मनातून सतत चालू असल्याने त्यांची वाटचाल ईश्वरप्राप्तीच्या दिशेने होतच असते. त्यामुळे त्यांनी प्राथमिक स्तरावरील आचारधर्माचे पालन केले नाही, तरी चालू शकते; कारण ते आचारधर्माच्या पलीकडे गेलेले असतात.
४. वेळेवर झोपून पहाटे उठण्याचे लाभ
सध्याच्या धावपळीच्या जीवनात लोकांची जीवनशैली अत्यंत बिघडली आहे. लोक सकाळी उशिरापर्यंत झोपून रहातात आणि त्याचसमवेत रात्री उशिरा झोपतात. कदाचित् त्यामुळेच सकाळी उशिरा जाग येत असावी. एका संशोधनातून ‘पहाटे उठण्याचे अनेक लाभ’ समोर आले आहेत.
१. जे लोक रात्री वेळेवर झोपून सकाळी लवकर उठतात, त्यांना दिवसभर ताजेतवाने वाटते.
२. सकाळी लवकर उठण्याची वंशपरंपरागत सवय ज्यांना आपल्या आई-वडिलांकडून मिळाली आहे, ते शांत असतात. ते लगेच चिडत नाहीत. त्यांना नैराश्य आणि ‘सिजोफ्रेनिया’ यांसारखे मनोविकार होण्याची चिंता नसते. त्यांचे मानसिक आरोग्यही चांगले रहाते.
३. याविषयी ‘नेचर कम्युनिकेशन्स’ नावाच्या नियतकालिकामध्ये छापलेल्या एका शोधपत्रामध्ये माणसाच्या दिनचर्येविषयी मोठा खुलासा करण्यात आला होता. ‘उशिरा झोपणे आणि उशिरा उठणे’, यामुळे मानसिक आरोग्यावर कसा विपरीत परिणाम होऊ शकतो, याविषयी या शोधपत्रामध्ये उल्लेख आहे. यासमवेतच यामुळे इतर रोगही होऊ शकतात.
४. याविषयीचे संशोधन ब्रिटनचे ‘एक्सटर विश्वविद्यालय’ आणि अमेरिकेचे ‘मेसेच्युसेट्स जनरल हॉस्पिटल’ यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे.
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र
५. रात्रीचे अनावश्यक जागरण टाळा !
‘शरिराचे कार्य सुरळित चालू रहाण्यासाठी जसे योग्य प्रमाणात खाणे आवश्यक आहे, तसे योग्य प्रमाणात झोप घेणेही आवश्यक आहे. रात्री उशिरापर्यंत जागरण केले, तर पित्त वाढते. बुद्धीची क्षमता न्यून होते. पचनासंबंधी विकार चालू होतात. शरीर दुबळे आणि कृश होत जाते. झोपेची घडी न बसवता या विकारांसाठी कितीही औषधे घेतली, तरी ‘रात्रीचे जागरण’ हे मूळ कारण जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत औषधांचा फारसा लाभ दिसत नाही. त्यामुळे रात्री उशिरात उशिरा ११ ते ११.३० पर्यंत झोपावे. रात्री उशिरा जागून जे काम करायचे, ते पहाटे ४ किंवा ५ वाजता उठून करावे. कधीतरी जागरण झाले, तर चालू शकते; पण प्रतिदिन रात्रीचे जागरण टाळावे.’
६. रात्रीच्या जागरणाचा त्रास होऊ नये, यासाठी हे करा !
‘कधी सेवेनिमित्त रात्री जागरण करावे लागते. रात्रीचे जेवण लवकर झाल्याने जागरण झाल्यावर भूक लागते. अशा वेळी शेव, चिवडा यांसारखे फराळाचे पदार्थ खाऊ नका. जागरण होते तेव्हा पोटामध्ये पित्त वाढलेले असते. अशा वेळी फराळाचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्ल्याने पित्ताचा भडका उडेल. शरीर स्वतःला सुस्थितीत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असते. त्यामुळे पित्ताचा भडका उडाला, तरी एखाद्या दिवशी याचे दुष्परिणाम दिसणार नाहीत; परंतु वारंवार असे करत असाल, तर त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याविना रहाणार नाही. जागरण होते तेव्हा पित्ताचा त्रास होऊ नये, यासाठी स्वतःजवळ तुपाची बरणी ठेवा आणि रात्री अवेळी भूक लागेल तेव्हा भुकेच्या प्रमाणानुसार १ ते ४ चमचे तूप चघळून खा. निवळ तूप खाणे कठीण वाटत असेल, तर तुपात थोडी साखर किंवा गूळ घालून खाल्ले, तरी चालेल. तूप पचण्यासाठी त्यावर अर्धी वाटी गरम पाणी प्या. (तूप मोजण्यासाठी चहाचा चमचा वापरा. १ ते ४ चमचे हे पातळ तुपाचे प्रमाण आहे. त्यामुळे तूप थिजलेले असल्यास त्या अनुमानाने घ्या.)
वाढलेल्या पित्ताला शांत करण्याचा हा सर्वांत प्रभावी उपाय आहे; परंतु ‘अनावश्यक जागरण टाळणे’ हा मूलगामी उपाय आहे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.