श्रेणी २ सत्संग ४ : दायित्व घेऊन सेवा करणे

आपण गेल्या काही सत्संगांमधून साधनेचे वेगवेगळे पैलू शिकत आहोत. व्यष्टी आणि समष्टी साधना हे साधनेचे २ भाग आहेत. व्यष्टी साधना म्हणजे स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करायचे प्रयत्न, तर समष्टी साधना म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी करायचे प्रयत्न ! काळानुसार व्यष्टी साधनेला ३५ टक्के, तर समष्टी साधनेला ६५ टक्के महत्त्व आहे. आपली सेवा गुरुसेवा म्हणून होण्यासाठी, सेवा अधिकाधिक परिपूर्ण आणि भावपूर्ण होण्यासाठी कसे प्रयत्न करायचे, हे आपण आतापर्यंतच्या काही सत्संगांमधून समजून घेतले. आज आपण समष्टी साधना चांगली होण्यासाठी अजून एका महत्त्वपूर्ण पैलूविषयी समजून घेणार आहोत. तो पैलू आहे, दायित्व घेऊन सेवा करणे ! दायित्व म्हणजे जबाबदारी ! व्यावहारिक जीवनात जबाबदारीमुळे सहसा ताणतणाव वाढतो, तर अध्यात्मात दायित्व घेण्यामुळे शरणागती आणि देवाशी अनुसंधान वाढते. आपल्यामध्ये व्यापकत्व निर्माण होते. त्यामुळे आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने दायित्व घेऊन सेवा करणे महत्त्वाचे आहे. दायित्व घेऊन सेवा करायची म्हणजे काय, त्यामुळे आध्यात्मिक स्तरावर कसा लाभ होतो ? दायित्व घेण्याची वृत्ती विकसित करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ? ते आपण आजच्या सत्संगात समजून घेणार आहोत.

 

दायित्व म्हणजे काय ?

व्यावहारिक दृष्टीने पाहिले, तर आपल्यापैकी बहुतांश जणांकडे कौटुंबिक दायित्व आहे. काही जणांकडे कार्यालयीन दायित्व आहे. साधारणतः पुरुषांकडे घर चालवण्याचे दायित्व असते, तर महिलांकडे घर सांभाळण्याचे दायित्व असते. घरातील मध्यमवयीन सदस्यांवर वृद्ध कुटुंबियांचा सांभाळ करण्याचे किंवा लहान मुलांचे पालनपोषण करण्याचे दायित्व असते. कुणी कार्यालयात काम करत असतील, तर त्यांच्याकडे एखाद्या कार्यालयीन कामाचे दायित्व असते. हे दायित्व चांगल्या पद्धतीने पार पाडणे, हे आपले कर्तव्यच आहे. कार्यालयात दायित्व चांगल्या प्रकारे पार पाडले, तर बढती  मिळते. दायित्व चांगल्या पद्धतीने पार पाडले, तर संबंधित व्यक्तींना समाधान वाटते, त्यांना आपल्याविषयी विश्वास वाटतो. तसेच अध्यात्मातही आहे. आपण व्यष्टी आणि समष्टी साधना दायित्व घेऊन केली, तर भगवंतालाही आपल्याविषयी विश्वास वाटतो आणि भगवंत आपल्याला बढती देतो, म्हणजेच आपली आध्यात्मिक उन्नती होते. व्यावहारिक बढतीपेक्षा आध्यात्मिक उन्नतीला कैक पटींनी महत्त्व आहे.

१. दायित्वाची जाणीव

आपण आज सेवेच्या दायित्वाच्या दृष्टीने समजून घेऊया. दायित्वाची जाणीव म्हणजे सेवेविषयी आपलेपणाची भावना किंवा ‘सेवा माझी आहे’, असे वाटून ती चांगली करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करण्याची वृत्ती ! दायित्व किती मोठे आहे, यापेक्षाही दायित्वाची वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होत आहे ना, हे पहाणे महत्त्वाचे आहे.

२. उदाहरण

समजा, आपल्याला गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात उपस्थित रहायचे आहे, तर आपण केवळ कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन तेथील मार्गदर्शन ऐकू. याचा अर्थ, आपला सहभाग मर्यादित असेल; पण समजा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात बैठकव्यवस्थेचे दायित्व मिळाले आहे, तर आपला विचार व्यापक होईल, उदा. कार्यक्रमासाठी आसंद्या (खुर्च्या) किती आवश्यक आहेत, सतरंज्या लागतील का ? त्या कुठून उपलब्ध करायच्या ? एका ओळीत किती आसंद्या ठेवायच्या ? २ आसंद्यांमध्ये अंतर किती हवे ? २ ओळींमध्ये किती अंतर हवे ? या सेवेच्या अंतर्गत किती साधकांची आवश्यकता आहे ? इत्यादी. म्हणजे आपल्याकडे छोटेसे जरी दायित्व असेल, तरी आपल्याला त्यातून अनेक सूत्रे शिकायला मिळतात.

 

दायित्व घेऊन सेवा करण्याने होणारे लाभ

दायित्व घेऊन सेवा करतांना अनेक बारकावे शिकायला मिळतात. आपल्या विचारांमध्ये व्यापकता येते. शरणागती निर्माण होते. नियोजनकौशल्य वाढते. साधकांच्या अनेक प्रकृतींशी जुळवून घ्यावे लागते. त्यामुळे इतरांना समजून घेण्याची, परिस्थिती स्वीकारण्याची वृत्ती निर्माण होते. कोणत्याही परिस्थितीत स्थिर, सकारात्मक कसे रहायचे, ते शिकायला मिळते. सेवेत येणार्‍या अडचणींवर कशा प्रकारे मात करायची, ते शिकायला मिळते. सेवा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी भगवंताचा धावा चालू होतो. भगवंताची कृपा अनुभवता येऊन कृतज्ञताभाव वाढतो. दायित्व घेऊन सेवा करतांना खर्‍या अर्थाने गुरुकृपा अनुभवता येते.

थोडक्यात, दायित्व घेऊन सेवा करणे, म्हणजे साधनेचे दृष्टीकोन आत्मसात करण्याचे आणि कृतीत आणण्याचे एक ‘प्रॅक्टिकल’ असते. जसे हिर्‍यांच्या खाणीतील कोळशाला पैलू पाडले की, त्याचा हिरा बनतो. त्याप्रमाणे दायित्व घेऊन सेवा करतांना आपल्याला आपोआपच गुरुतत्त्व अनेक पैलू पाडते आणि आपल्याला देवत्वाच्या दिशेने घेऊन जाते.

दायित्व घेऊन सेवा करतांना देव कसा भरभरून आनंद देतो, हे शब्दांत सांगायलाही मर्यादा आहेत. जसे साखरेची गोडी कशी आहे, याचे कितीही वर्णन केले, तरी ती कळण्यास मर्यादा असते; पण तेच जर चिमूटभर साखर खाऊन बघितल, तर तिची गोडी आपोआप कळते. तसे दायित्व घेऊन सेवा करण्याने गुरुकृपा अनुभवता येते; पण त्यासाठी आपली शिकण्याची वृत्ती मात्र हवी. दायित्व म्हणजे अधिकार नाही, तर शरणागती, हेच आपण मनावर बिंबवायला हवे.

 

विचारांच्या अडथळ्यांवर मात करून दायित्व घ्यावे

काही जणांना असे वाटू शकते की, सेवेचे दायित्व घेतले आणि ते पार पाडायला जमले नाही, तर…? त्यापेक्षा दायित्वच घ्यायला नको. माझ्याकडून आहे तीच सेवा आणि साधना व्यवस्थित होत नाही, तर अजून दायित्व कसे घेऊ ? दायित्व घेऊन सेवा करतांना माझ्याकडून चुका तर होणार नाहीत ना ? दायित्व घेऊन सेवा करायला मला वेळ कुठे मिळतो ? अशा प्रकारचे विचार आपल्या मनात असतील, तर ते सगळे अनावश्यक आणि आपल्या साधनेत अडथळा निर्माण करणारे विचार आहेत, हे आपण सर्वप्रथम लक्षात घेऊया.

अध्यात्मात जेव्हा गुरु दायित्व देतात, तेव्हा ते पार पाडण्याची शक्तीही साधकाला देतात. आपल्याला केवळ त्याची अनुभूती घ्यायची असते. आपल्याला काही येते; म्हणून नाही, तर शिकण्यासाठी आणि घडण्यासाठी दायित्व घ्यायचे आहे. अध्यात्मामध्ये आपल्याला जेवढे जमते, त्यापेक्षा थोडे अधिक करायचा आपण प्रयत्न केला, तर आध्यात्मिक उन्नती जलद होते. दायित्व घेऊन सेवा करतांना आपल्याकडून कदाचित् काही चुकाही होऊ शकतील; पण त्याचीही चिंता करायची आवश्यकता नाही. आपल्यापैकी कुणीही परिपूर्ण नाही. केवळ भगवंत परिपूर्ण आहे. चुका झाल्या, तरी आपल्याला चुकांमधून शिकायचे आहे. आपल्याला सतत शिकण्याच्या स्थितीत रहायचे आहे. कोणतीही सेवा देव आपल्याला शिकण्यासाठी देत असतो. आपल्याला वाटते की, मी दायित्व घेऊन सेवा करतो किंवा अमुक एका साधकाने मला दायित्व दिले; पण प्रत्यक्षात कुणी साधकाने नाही, तर प्रत्यक्ष श्रीगुरूंनीच आपल्याला घडवण्यासाठी दायित्व दिलेले असते. आपण दायित्व घेण्यासाठी सिद्धता दर्शवली आणि ते पार पाडण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले, तर आपल्याला निश्चितपणे गुरुकृपेने भरभरून आनंद मिळेल आणि शिकायला मिळेल.

 

आध्यात्मिक  स्तरावरील  नेतृत्व

आपल्याला सेवांचे दायित्व घ्यायचे आहे. नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत; पण हे सर्व आध्यात्मिक  स्तरावर करायचे आहे. त्यासाठी आपणही दायित्व घेण्याच्या दृष्टीने, नेतृत्व विकसित करण्याच्या दृष्टीने आपल्यामध्ये काही गुण वाढवण्याचा प्रयत्न करूया. दायित्व घेऊन सेवा करतांना आपण नियोजन चांगल्या प्रकारे करायचा प्रयत्न करायला हवा. आपण वेळेचे नियोजन चांगले करू शकलो, तर आपण चांगल्या प्रकारे दायित्व पार पाडू शकतो. देवाने प्रत्येकाला दिवसाचे २४ घंटे उपलब्ध करून दिले आहे; पण आपण योग्य प्रकारे त्याचे नियोजन केले, तर आपण आपली सेवा आणि साधना यांची फलनिष्पत्ती चांगल्या प्रकारे प्राप्त करू शकतो. त्यामुळे दायित्व घेऊन सेवा करतांना आपण चांगल्या प्रकारे नियोजन करण्याकडे लक्ष द्यायला हवे. आपल्यामध्ये विचारून करण्याचा संस्कार असायला हवा. आपल्याला प्रत्येक गोष्ट उत्तरदायी सेवकांना विचारून करायची आहे. विचारून-विचारून करण्याने अनेक लाभ होतात. एक तर आपला अहं कमी होतो आणि दुसरे म्हणजे विचारून करण्याने अनेक सूत्रे शिकायला मिळतात. आपली विचारप्रक्रिया आध्यात्मिक स्तरावर आणि अधिकाधिक योग्य होऊ लागते. त्यामुळे दायित्व घेतांना विचारून विचारून करण्याची वृत्ती आपण वाढवायला हवी. त्या जोडीला आढावा देण्याचा गुणही वाढवायला हवा. सेवा करतांना आपण कसे नियोजन केले, त्यात काय अडचणी आल्या, काय शिकायला मिळाले, एखादा प्रसंग कसा हाताळला आदी अनेक सूत्रांचा प्रत्येक टप्प्याला आढावा द्यायला हवा. आढावा दिल्याने आपल्याला उत्तरदायी सेवकांकडून योग्य दिशा मिळते. आढावा आपण एखाद्या साधकाला देत असलो, तरी त्यामाध्यमातून श्री गुरुतत्त्वच आपल्याला मार्गदर्शन करत असते. त्या जोडीला आपल्यामध्ये प्रेमभावही असायला हवा. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्याला आध्यात्मिक स्तरावर नेतृत्व करायचे असेल, तर आपली व्यष्टी साधना चांगली असायला हवी. दायित्व घेऊन सेवा करतांना आपल्याला हे गुण वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.

गुरुकृपायोगानुसार साधना करून सद्गुरुपदाला आरूढ झालेल्या सद्गुरु स्वाती खाडये यांचे उदाहरण आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. जेव्हा सद्गुरु स्वातीताई साधनेत आल्या, तेव्हा त्यांनी श्रीगुरूंनी सांगितलेली सेवा झोकून देऊन केली. स्वयंपाकापासून ते सभेत भाषण करण्यापर्यंत ज्या ज्या सेवा त्यांना मिळाल्या, त्या त्यांनी श्रीगुरूंवर श्रद्धा ठेवून झोकून देऊन गेल्या. परिणामी, आज त्या अध्यात्मात उच्च पातळीला आहेत.

 

साधकाचे दायित्व श्रीगुरूंकडे

दायित्वाच्या दृष्टीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी म्हटले आहे की, ‘देवाने माझ्यावर सेवेचे दायित्व दिले आहे. त्या अनुषंगाने माझ्याकडून सेवा होत आहे ना ? मी देवाला अपेक्षित अशी सेवा करत आहे ना ? ‘सेवेतून पूर्ण फलनिष्पत्ती मिळून सेवेच्या माध्यमातून साधनेचे ध्येय गाठणे’, या अनुषंगाने माझी सेवा चालू आहे ना ? ‘ही सेवा मला गुरूंच्या कृपेने मिळाली आहे’, याची सतत जाणीव ठेवून मी सेवेतून आनंद मिळवण्यासाठी प्रयत्नरत आहे ना ? सेवेच्या दायित्वाचे गांभीर्य लक्षात ठेवून मी सेवा परिपूर्ण होण्यासाठी तळमळीने प्रयत्नशील आहे ना ?’, इत्यादी प्रश्न मनाला विचारत राहिले की, सेवेप्रती गांभीर्य वाढून आपल्याला आपल्या दायित्वाची जाणीव होऊ लागते. ‘साधकाची सेवा परिपूर्ण होऊन त्यातून त्याची साधनाही व्हावी’, याचे खरे दायित्व आपल्या गुरूंनीच घेतलेले असते. साधकांनी सेवा करण्यामागे गुरूंच्या संकल्पशक्तीचे बळ कार्यरत असते. यामुळे गुरुचरणांना स्मरून तन्मयतेने सेवा केली की, साधकाच्या सेवेची फलनिष्पत्ती वाढते.’

 

मग आपण सगळे दायित्व घेऊन सेवा करण्यास सिद्ध आहात ना ? व्यवहारात पहिलीतून दुसरीत जाणे, दुसरीतून तिसरीत जाणे जसे असते, तसेच अध्यात्मातही आहे. आपण गेले सात-आठ महिने सत्संगांच्या माध्यमातून साधना शिकून ती कृतीत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आता पुढच्या टप्प्याचा प्रयत्न म्हणून आपल्याला दायित्व घेऊन सेवा करायची आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचे दायित्व घेतले आणि मावळ्यांच्या साथीने हिंदवी स्वराज्य स्थापन केले. लक्षावधी क्रांतिकारकांनी भारतमातेला स्वतंत्र करण्याचे दायित्व आपल्या खांद्यावर घेऊन निःस्वार्थपणे राष्ट्रकार्य केले. प्रसंगी प्राणार्पणही केले. आपल्यालाही श्रीगुरूंना अपेक्षित अशी साधना करायची आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करूया.

Leave a Comment