श्रेणी २ सत्संग ३ : सत्सेवा

मागील दोन सप्ताहात आपण सत्सेवेचे महत्त्व काय आहे ?, सत्सेवेच्या माध्यमातून अष्टांग साधना कशी होते, याविषयीची सूत्रे जाणून घेतली होती. आजच्या सत्संगात आपण आताच्या काळात सत्सेवेची कोणती माध्यमे आहेत, आपल्या दैनंदिन व्यापातही आपण सत्सेवा कशी करू शकतो, हे समजून घेणार आहोत. आपल्यापैकी काही जणांनी प्रत्यक्ष थोडीफार सेवा करायला सुरुवातही केली आहे. काही जणांनी अनुभवही घेतला आहे की, सत्सेवा करतांना आनंद मिळतो किंवा चांगले वाटते. असे का होते ? याचे कारण आहे गुरुतत्त्व ! सत्सेवा करतांना गुरुतत्त्व कार्यरत झालेले असते.

 

सत्सेवेचे महत्त्व

कित्येक जणांना नामजप करतांना मनाची एकाग्रता साधता येत नाही; परंतु सत्सेवा हे एक असे माध्यम आहे की, ज्या माध्यमातून आपण सत् च्या विचारांमध्ये रहातो. परिणामी आपला नामजपही अधिक चांगला होता. सत्सेवेमुळे मनातील मायेचे किंवा प्रपंचाचे विचार कमी होतात. आपली सेवेची तळमळ जसजशी वाढते, तसे गुरुतत्त्व आपल्यासाठी अधिक कार्य करते. आपल्याला ईश्वराच्या अस्तित्वाची अनुभूती येऊन आपली श्रद्धा वाढते, तसेच साधनेत जलद प्रगती होते. सत्सेवेला आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने ६५ टक्के एवढे महत्त्व आहे, तर नामजप साधनेला ३५ टक्के महत्त्व आहे. आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने आपल्याला सत्सेवा आणि नामजप दोन्ही करणे आवश्यक आहे.

 

सत्सेवेची माध्यमे

१. प्रवचनांच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार

आपण या आधीच्या सत्संगातही समजून घेतले आहे की, अध्यात्मप्रसार ही सर्वोत्तम सत्सेवा आहे. प्रत्येकाला सगुण गुरुरूपाची सेवा करण्याची संधी मिळेलच, असे नाही; पण आपण गुरूंच्या निर्गुण रूपाची सेवा तर करू शकतो. अध्यात्मप्रसार ही गुरूंच्या निर्गुण रूपाची सेवा आहे. अध्यात्मप्रसाराचा एक भाग म्हणून आपण आपले परिचित, नातेवाईक, कार्यालयातील कर्मचारी यांच्यासाठी साधनाविषयक प्रवचनांचे आयोजन करू शकतो. आपण आता जसा सत्संग घेत आहोत, तसे प्रवचन आयोजित करू शकतो. लोकांना आताच्या काळात योग्य असलेली साधना सांगणे, ही खरेच मोठी समष्टी सेवा आहे; कारण ही अशी संधी आहे की, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये आमूलाग्र पालट होऊ शकतात. आज सगळेच जण मनःशांतीच्या किंवा समाधानाच्या शोधात आहेत. खरे समाधान आणि शांती साधना करूनच मिळू शकते. त्यासाठी आपण तणावमुक्तीसाठी साधना, व्यसनमुक्तीसाठी साधना, आनंदी जीवनासाठी साधना या विषयीची प्रवचने आयोजित करू शकतो. सनातनचे साधक त्या ठिकाणी या विषयांची माहिती सांगू शकतात.

‘आपण कुठे प्रवचन आयोजित करू शकतो’, असा देवाने विचार सुचवला असेल, तर आपण वहीमध्ये त्याची नोंद करून ठेऊया. आपल्याला सत्संगाच्या शेवटी त्याविषयी चर्चा करायची आहे.

२. आध्यात्मिक ग्रंथ आणि सात्त्विक वस्तू भेट देणे

अध्यात्मप्रसाराचा अजून एक सोपा मार्ग काय आहे, तर आध्यात्मिक ग्रंथ आणि सात्त्विक वस्तू यांचा प्रसार करणे. वेगवेगळ्या कौटुंबिक प्रसंगी, उदा. वाढदिवस, लग्न, मुंज किंवा हळदी-कुंकू समारंभ, बारसे, परीक्षेतील यश अशा कितीतरी प्रसंगी आपण काही ना काही भेटवस्तू इतरांना देत असतो. त्या प्रसंगी आपण आवर्जून सात्त्विक उत्पादने किंवा आध्यात्मिक ग्रंथ भेट देऊ शकतो. ही आध्यात्मिक भेट ही खरी शाश्वत भेट आहे. अनेकांना वाचनाची आवड असते. आपण जर आध्यात्मिक ग्रंथ भेट दिले, तर त्या माध्यमातून आपलीही सत्सेवा होऊ शकते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले सनातनचे ग्रंथ म्हणजे चैतन्यमय ज्ञानभांडारच ! हे ग्रंथ म्हणजे केवळ स्पर्शाने लोखंडाचे सोने करणार्‍या परिसाप्रमाणे आहेत; कारण ग्रंथातील शिकवण आचरणात आणल्याने अनेकांच्या जीवनात आमूलाग्र पालट होत आहेत ! सनातनच्या वतीने एप्रिल २०२४ पर्यंत १३ (मराठी, इंग्रजी, कन्नड, हिंदी, गुजराती, तेलुगु, तमिळ, बंगाली, मल्ल्याळम्, ओडिया, पंजाबी, नेपाळी आणि आसामी) भाषांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरील ३६५ ग्रंथांच्या ९४ लक्ष ५४ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत. या ग्रंथांची माहिती www.SanatanShop.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे किंवा आपण आपल्या संपर्कातील सनातनच्या साधकांकडूनही ती माहिती सविस्तर जाणून घेऊ शकता. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची ज्ञानशक्ती या ग्रंथांच्या माध्यमातून कार्यरत आहे. हे ग्रंथ वेदस्वरूपच आहेत. ते साध्या, सोप्या भाषेत लिहिण्यात आले आहेत. त्यामुळे हे ग्रंथ भेट देऊन अध्यात्मप्रसाराच्या कार्यात आपण सहभागी होऊ शकतो.

आपण दैनंदिन व्यवहारातही पहातो की, लहान मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेमध्ये विद्यार्थ्यांना किंवा मित्रांना चॉकलेट-गोळ्या किंवा अन्य काही तरी भेटवस्तू दिली जाते. अशा वेळी विशेषतः लहान मुलांसाठी म्हणून आपण रामरक्षा, मारुतीस्तोत्र, अथर्वशीर्ष यांविषयीचे लघुग्रंथ सर्वांना भेट देऊ शकतो. स्तोत्रविषयक हे ग्रंथ लहान मुलांसाठी, तसेच पालकांसाठीही उपयुक्त ठरू शकतात. हे लघुग्रंथ अगदी २० रुपयांना उपलब्ध आहेत.

त्या जोडीला कापूर, अत्तर, जपमाळ, अष्टगंध, कुंकू, उदबत्ती अशा प्रकारची सात्त्विक उत्पादनेही संस्थेच्या वतीने बनवण्यात येत आहेत, तीही आपण भेट म्हणून इतरांना देऊ शकतो.

३. ‘सनातन प्रभात’चा प्रसार

प्रसाराचे अजून एक माध्यम आहे, ते म्हणजे ‘सनातन प्रभात’ ! आपल्यापैकी अनेक जण ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार आहेत. मराठी, हिंदी, इंग्लिश, कन्नड, गुजराथी या भाषांमध्ये ‘सनातन प्रभात’ प्रसिद्ध केले जाते. सनातन प्रभात म्हणजे केवळ बातम्या देणारे वर्तमानपत्र नाही, तर बातम्यांच्या जोडीला सनातन दृष्टीकोन देणारे नियतकालिक आहे. ‘सनातन प्रभात’मधून चालू घडामोंडीचे हिंदुत्व आणि साधना यांच्या दृष्टीने विश्लेषण करून संपादकीय टिपण्यांच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती केली जाते. नियमित साधनाविषयक लिखाण प्रसिद्ध करून वाचकांना साधनेसाठी उद्युक्त केले जाते. साक्षात् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे या नियतकालिकाचे संस्थापक-संपादक आहेत. ‘सनातन प्रभात’च्या मागे संतांचा संकल्प असल्याने साधनामार्गावर अनेकांना ते मार्गदर्शक ठरत आहे. आपण आपल्या परिचित, नातेवाईक यांना ‘सनातन प्रभात’विषयी सांगून त्यांना वर्गणीदार बनवू शकता.

हे करत असतांना आपल्याला काय लक्षात घ्यायचे आहे की, हे सगळे आपल्याला सेवा म्हणून करायचे आहे. ‘सनातन प्रभात’चे महत्त्व सांगून त्यांना वर्गणीदार होण्यासाठी उद्युक्त करणे, एवढीच आपली साधना आहे. कुणी वर्गणीदार झाले, तर आपली सेवा झाली आणि कुणी वर्गणीदार झाले नाही, तर आपली साधना झाली नाही, असे नाही. देव केवळ आपली धडपड पहात असतो. आपल्याला आपले कुणी नातेवाईक, सहकारी किंवा परिचित यांना ‘सनातन प्रभात’विषयी सांगू शकतो, असे लक्षात येत असेल, तर आपण त्यांची नावे काढून त्यांच्याशी बोलू शकता.

४. सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे अध्यात्मप्रसार

अध्यात्मप्रसाराचे अजून एक सोपे माध्यम आहे, ते म्हणजे सामाजिक प्रसारमाध्यमे अर्थात् ‘सोशल मीडिया’ ! आजकाल जवळपास सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत. बरेच जण ‘फेसबूक’, ‘व्हॉटस् ॲप’, ‘ट्वीटर’ यांसारखे ‘प्लॅटफॉर्मस्’ वापरतातही. या माध्यमातून आपण अध्यात्मप्रसार करू शकतो. अध्यात्म आणि धर्म यांच्याविषयी माहिती देणार्‍या पोस्ट सनातन संस्थेच्या वतीने प्रतिदिन पाठवल्या जातात. या पोस्ट आपण स्वत: वाचून आपले मित्र परिवार, नातेवाईक, परिचित यांना पाठवू शकतो आणि त्याचा फेसबूक आणि व्हॉटस् ॲप यांचा वापर करून प्रसार करू शकतो. त्याचा प्रसार करणे, ही सुद्धा सत्सेवाच आहे.

अनेकदा ट्वीटरवरही हिंदुत्वाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषयांवर ‘ट्रेंड’ चालू असतात. आपणही ‘ट्वीटस्’ करून त्यात सहभागी होऊ शकता. या सेवा करण्यासाठी आपल्याला खूप वेळ द्यावा लागेल, असेही नाही. आपण दिवसभरातून कितीतरी वेळ ‘मोबाईल’ हाताळत असतो किंवा कुठलेही ‘मेसेज फॉरवर्ड’ करत असतो. त्यातूनच थोडा वेळ काढून आपण अध्यात्मप्रसारासाठी देऊ शकतो. या पोस्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जागृती होते.

ऑनलाईन प्रसाराचे महत्त्व आपल्याला वेगळे सांगायला नको. अगदी देशस्तरावर जनमत तयार करण्यामध्ये ऑनलाईन माध्यमे महत्त्वाची भूमिका बजावतात. काही काळापूर्वीपर्यंत माध्यमक्षेत्रामध्ये साम्यवाद्यांची किंवा हिंदु विरोधकांची मक्तेदारी होती. ते लोक हिंदु धर्माविषयी लोकांमध्ये न्यूनगंड कसा निर्माण होईल, त्यांची सनातन धर्माशी असलेली नाळ कशी तुटेल, यासाठी प्रयत्न करायचे; पण आता हे चित्र पालटत आहे. सनातन धर्मीय हिंदु माध्यमांमध्येही सक्रीय होऊन धर्मरक्षण करत आहेत. आपणही यामध्ये सहभागी होऊ शकता. आपल्याला ट्वीटर कसे वापरायचे, फेसबूकच्या माध्यमातून प्रसार कसा करायचा, हे शिकायचे असेल, तर तसेही साधक आपल्याला शिकवू शकतील. आपल्याला आश्चर्य वाटेल, कोरोना महामारीच्या काळात जेव्हा दळणवळण बंदी घोषित करण्यात आली, तेव्हा सनातनच्या अनेक ग्रामीण भागांतील किंवा वय झालेल्या साधिकांनीही ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून प्रसार कसा करायचा, हे शिकून घेतले आणि आज ते चांगल्या प्रकारे प्रसार करत आहेत.

५. फलकप्रसिद्धी

सेवेचे अजून एक सोपे माध्यम आहे, ते म्हणजे फलकप्रसिद्धी ! अनेक ठिकाणी सोसायट्यांमध्ये किंवा मुख्य चौकांमध्ये सूचनाफलक म्हणजे फळे असतात. बहुतांश वेळा हे फळे रिकामेच असतात किंवा जुनेच लिखाण त्यावर असते. त्या फळ्यांवर आपण खडूने अध्यात्मशास्त्रविषयक छोट्या चौकटी लिहू शकतो. आपल्याला असे फलकलेखन करणे शक्य असेल, तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आपण फलकलेखन करू शकतो. फळ्यावर लिहिण्यासाठीचे लिखाण आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो. फलकलेखन करण्याच्या संदर्भात आवश्यक वाटले, तर रीतसर अनुमतीही घ्यावी. उदाहरणार्थ, सोसायटीमधील फलक असेल, तर सोसायटीच्या अध्यक्षांना भेटून अध्यात्मशास्त्रविषयक लिखाण करण्यासाठीची परवानगी घेऊ शकतो. देशभरात अनेक ठिकाणी साधक सेवा म्हणून अशी फलकप्रसिद्धी करतात. सोसायटीतील लोक किंवा रस्त्यावरून ये-जा करणारे आवर्जून हा फलक वाचतात आणि त्या माध्यमातून त्यांना शास्त्र कळते. कित्येक ठिकाणी लोक फलकलेखन कधी होईल, याची वाट पहात असल्याचेही अनुभव आहेत.

६. हस्तपत्रकांचे वितरण

फलकप्रसिद्धीच्या जोडीला आपण हस्तपत्रकांचे म्हणजे ‘पॅम्प्लेटस्’चे वितरणही करू शकतो. सनातन संस्थेच्या वतीने सण-उत्सवांच्या निमित्ताने त्याचे अध्यात्मशास्त्र सांगणार्‍या हस्तपत्रकांची निर्मिती केली जाते. आपण आपल्या सोसायटीमध्ये किंवा जवळपासच्या देवळांमध्ये येणार्‍या भाविकांना ही हस्तपत्रके देऊ शकतो. आपण आपल्या संपर्कातील स्थानिक साधकांशी बोलून फलकप्रसिद्धी किंवा हस्तपत्रकांचे वितरण या सेवांमध्ये सहभागी होऊ शकता.

याचा साधनेच्या स्तरावर कसा लाभ होतो, तर फलकलिखाणाच्या, हस्तपत्रके वितरणाच्या माध्यमातून आपली जी प्रतिमा असते किंवा अहं असतो, त्याला छेद जातो. आपल्याला कोण काय म्हणेल, कोणी बघेल का, असे काही विचार आपल्या मनात आले, तर तो आपला अहंचा भाग आहे, असे समजून घ्यावे. कुठल्याही स्वरूपाचे गुरुकार्य करायला मिळणे, हा कमीपणा नाही, तर आपला गौरव आहे. आपल्यावर असलेली श्रीगुरूंची ती कृपा आहे. ही सत्सेवेची संधी मिळायलाही भाग्य लागते. अशा प्रकारे अहंकार निर्मूलनाच्या दृष्टीनेही या सेवांच्या माध्यमातून आपली साधना होते.

आपण आतापर्यंत प्रवचन आयोजित करणे, भेटवस्तू देणे, सनातन प्रभातचे वाचक करणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसार करणे, फलकप्रसिद्धी आणि हस्तपत्रकांचे वितरण अशी सेवेची ६ माध्यमे बघितली. ती सोपी आहेत ना ? आपण करू शकतो ना ?

७. संकेतस्थळांशी संबंधित सेवा

आता पाहिलेल्या काही सेवांच्या जोडीला इतरही अनेक सत्सेवा उपलब्ध आहेत. सनातन संस्थेचे sanatan.org संकेतस्थळ आहे. हिंदुत्वाच्या क्षेत्रातील ही अग्रगण्य संकेतस्थळे आहेत. देशविदेशातील लाखो जिज्ञासू ही संकेतस्थळे पहातात. आपल्याला तंत्रज्ञानक्षेत्रातील, उदा. वेब डिजायनिंग, फॉर्मटिंग किंवा संकेतस्थळाशी संबंधित काही अनुभव असेल, तर आपण संकेतस्थळाशी संबंधित सेवांमध्ये योगदान देऊ शकता.

८. टंकलेखन, संकलन, भाषांतर

आपले कुठल्या भाषेवर प्रभुत्व असेल आणि आपल्याला टंकलेखनाचा म्हणजे टायपिंगचा, संकलनाचा म्हणजे एडिटिंगचा किंवा भाषांतराचा अनुभव असेल किंवा ते शिकण्याची इच्छा असेल, तर संकेतस्थळावरील लेखांच्या भाषांतराची सेवाही आपण करू शकता. मगाशी आपण सनातनच्या ग्रंथांचा विषय पाहिला होता, तर या ग्रंथांच्या भाषांतराच्या सेवेतही आपण सहभागी होऊ शकता.

९. कौशल्यानुरूप सेवा

कुणी ‘मीडिया’ म्हणजे पत्रकारिता क्षेत्रात असेल, तर अध्यात्मविषयक लेखांना प्रसिद्धी देऊन सहभागी होऊ शकता, धर्म-अध्यात्मविषयक वेगवेगळ्या ध्वनीचकत्या म्हणजे सी.डी. उपलब्ध आहेत, त्या लोकल केबल चॅनेलवरून प्रसारित होण्यासाठी प्रयत्न करू शकता. कोणी डॉक्टर, वकील, सी.ए., आर्किटेक्ट, छायाचित्रकार म्हणजे फोटोग्राफर, शेतीतज्ञ असाल, तर त्या त्या क्षेत्रातील आपल्या ज्ञानाचा उपयोग आपण सत्सेवेसाठी करू शकता. कलेच्या संदर्भात उदाहरणार्थ, चित्रकला, संगीत, नृत्य, वादन, मूर्तीकला अशा कलाक्षेत्राशी संबंधित सेवांमध्येही आपण योगदान देऊ शकता.

सनातन संस्थेतर्फे आपला हा साधना सत्संग सुरू आहे तसे वेगवेगळया वयोगटांच्या मुलांसाठी युवा साधना सत्संग, बालसंस्कारवर्ग इत्यादी सुरू आहेत. आपल्या पाल्यांवर, परिसरातील मुलांवर, परिचितांच्या मुलांवर, युवकांवर साधनेचे संस्कार व्हावेत, आपण जशी साधना शिकत आहोत तशी त्यांनीही साधना करावी, असे वाटते ना ? सत्सेवा म्हणून आपण स्वत:च्या पाल्यांना, परिचितांच्या मुलांना नजिकच्या वर्गात जाण्यासाठी प्राेत्साहन देऊ शकतो. आपल्या पैकी कोणामध्ये मुलांना हाताळण्याचे कौशल्य व आवड असेल तर आपणही ‘संस्कारवर्ग सेवक’ म्हणून सेवा करू शकतो. सेवा कशी करायची हे शिकवणारी यंत्रणा आपल्याकडे आहे. या माध्यमातूनही आपण सत्सेवा करू शकतो.

हा सगळा सेवेचा आवाका सांगण्याचे कारण; गुरुदेवांनी प्रत्येकासाठी सेवेची माध्यमे उपलब्ध करून दिली आहेत. प्रत्येकासाठी येथे सेवा उपलब्ध आहे. कोणतीही सेवा कमी-अधिक महत्त्वाची नाही, तर प्रत्येकच सेवा ही गुरुसेवा आहे. या सेवांच्या माध्यमातून भगवंत साधक घडवत आहे. सेवा करणार्‍या जिवांची आध्यात्मिक प्रगती करवून घेत आहे. आपण सुरुवातीच्या सत्संगामध्ये ‘व्यक्ती, तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’ हा अध्यात्माचा सिद्धांत अभ्यासला होता. आपण आपल्या क्षमतेनुसार, कौशल्यानुसार सेवा करणे आणि त्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती हे या सिद्धांताला धरूनच आहे. सेवा करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे टाकलं तर भगवंत आपल्याला पूर्णपणे घडवणारच याची निश्चिती बाळगूया. सत्सेवेतून गुणसंवर्धन होऊन आनंदही मिळणार आहे.

 

गुरुसेवेच्या संदर्भातील अनुभूती

गुरुसेवा करणार्‍यांची गुरु कशी काळजी घेतात, याचे एक बुद्धीच्या पलीकडचे उदाहरण आहे. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे गुरु इंदूरनिवासी थोर संत प.पू. भक्तराज महाराज यांचे एक शिष्य होते. प.पू. रामजीदादा ! प.पू. भक्तराज महाराज भंडार्‍यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जायचे. गुरूंनी बोलावले की, त्यांच्यासह प.पू. रामजीदादाही जायचे. गुरूंचे बोलावणे आले की, ते मागे-पुढे पहायचे नाही. एकदा एका महिन्यात प.पू. रामजीदादा प.पू. भक्तराज महाराजांसह २०-२२ दिवस सेवेला गेले. प.पू. रामजीदादा एके ठिकाणी नोकरीला हाेते. गुरुसेवेवरून परत आल्यावर नोकरीच्या ठिकाणी गेल्यावर त्यांना वाटले की, त्या महिन्याचा पगार त्यांना मिळणार नाही; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना त्या महिन्याचा पूर्ण पगार मिळाला. याचा अर्थ रामजीदादा गुरुसेवेसाठी गेले, तर कार्यालयात दुसरे रामजीदादा गुरूंनी तयार केले होते. अर्थात् रामजीदादांचीही दृढ गुरुनिष्ठा होती. यातून शिकायला काय मिळते की, जेव्हा आपण झोकून देऊन गुरुसेवा करतो, तेव्हा श्री गुरुच आपला सर्व भार वहातात.

 

संधीकाळात सेवेचे महत्त्व

आपणही आता झोकून देऊन गुरुसेवा करूया. सध्या साधनेसाठी काळ अत्यल्प आहे, हे लक्षात घेऊन आपण या सत्सेवेच्या संधीचा लाभ करून घेऊया. आताचा काळ आपत्काळ असला, तरी साधनेच्या दृष्टीने तो संधीकाळ आहे. संधीकाळ म्हणजे कलियुगांतर्गत कलियुग संपून कलियुगांतर्गत सत्ययुग चालू होण्याचा काळ ! संधीकाळात साधना केल्याचे फळ सहस्रपट असते. कालमाहात्म्य लक्षात घेऊन आपण उपलब्ध सेवांचा स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी लाभ करून घेऊया. जो गुरूंच्या धर्मप्रसाराच्या कार्यात सहभागी होतो, तो गुरूंना आपला वाटतो. गुरूंना ‘हा माझा आहे’, असे वाटले की, गुरूंच्या संकल्पानेच साधकाची आध्यात्मिक उन्नती होते.

 

प्रत्यक्ष सेवांचे नियोजन

आपणही सेवा करायला तयार आहात ना ? आता सांगितलेल्या सेवांपैकी कोण-कोण कोणत्या सेवेमध्ये सहभागी होऊ शकता ? सत्सेवेच्या संदर्भात अध्यात्मप्रसारासाठी तणावमुक्तीसाठी साधना, व्यसनमुक्तीसाठी साधना, आनंदी जीवनासाठी साधना या विषयीची प्रवचने आयोजित करणे, आध्यात्मिक ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने भेट स्वरूपात देणे, सनातन प्रभातचे वर्गणीदार करणे, फलकप्रसिद्धी करणे, हस्तपत्रकांचे वितरण करणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसार करणे आणि आपल्या कौशल्यानुसार सेवेत योगदान येणे, अशी सर्वसाधारण सूत्रे आपण पाहिली. ‘आपण कोणती सेवा करू शकता’, असे आपल्याला वाटते, हे आपण सांगू शकता. भेट द्या : www.Sanatan.org/sampark

Leave a Comment