श्रेणी २ सत्संग २ : सत्सेवा

गुरूंनी दिलेले नाम आणि ज्ञान इतरांना देऊन वाढवणे, हा सर्वोत्तम अध्यात्मप्रसार

मागच्या सत्संगात आपण अध्यात्मप्रसार ही सर्वोत्तम सत्सेवा आहे, हे समजून घेतले होते. अध्यात्मप्रसार ही गुरूंच्या निर्गुण रूपाची सेवा आहे. त्याविषयीची एक सुंदर कथा आहे. एकदा एका गुरूंनी त्यांच्या दोन शिष्यांना थोडे गहू दिले आणि सांगितले, ‘मी परत येईपर्यंत हे गहू नीट सांभाळा.’ एका वर्षाने परत आल्यावर गुरु पहिल्या शिष्याकडे गेले. त्यांनी त्याला विचारले, ‘गहू नीट ठेवले आहेस ना ?’  शिष्याने ‘हो’, असे सांगितले. गुरूंनी ते गहू पहाण्यासाठी मागितले. तेव्हा शिष्याने गहू ठेवलेला डबा आणून दाखवला आणि तो गुरूंना म्हणाला, ‘आपण दिलेले गहू जसेच्या तसे आहेत.’ गुरु ‘ठीक आहेत’, असे म्हणाले आणि दुसर्‍या शिष्याकडे गेले. गुरूंनी दुसर्‍या शिष्याला गव्हाविषयी विचारले. तो शिष्य गुरूंना जवळच्या शेतावर घेऊन गेला. गुरु पहातात, तर सगळीकडे गव्हाच्या कणसांनी डवरलेले पीक दिसत होते. ते पाहून गुरूंना खूप आनंद झाला. दुसर्‍या शिष्याने काय केले होते, तर गुरूंनी दिलेले गहू भूमीत पेरून गुरूंनी दिलेल्या गव्हापासून पुष्कळ गहू बनवले, तर पहिल्या शिष्याने ते गहू नुसतेच स्वतःजवळ ठेवून घेतले. या गोष्टीतून काय शिकायला मिळते, तर गुरूंना किंवा संतांना नेमके काय अपेक्षित आहे, हे जाणून त्याप्रमाणे कृती करायला हवी. गुरूंनी दिलेले नाम, तसेच अध्यात्माचे ज्ञान केवळ स्वतःपुरते न ठेवता आपण ते इतरांना देऊन वाढवले पाहिजे. श्री गुरूंना ते अपेक्षित आहे.

 

सत्सेवेच्या माध्यमातून अष्टांग साधना होते

सत्सेवेच्या माध्यमातून अष्टांग साधना होते. अष्टांग साधना म्हणजे काय, तर नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग, प्रीती, स्वभावदोष निर्मूलन, अहं निर्मूलन आणि भावजागृती !

१. भावजागृती

सत्सेवा करतांना आपण देवाला प्रार्थना करतो, सेवा चांगली करण्यासाठी काय काय करता येईल, याचा विचार करतो. त्यातून एकप्रकारे आपण देवाच्या अनुसंधानात असतो. यातून साधनेतील भावजागृतीचे अंग विकसित होते आणि ईश्वराचेही आपल्याला साहाय्य मिळते. समाजातून अनेक वेळा अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळतो. त्या वेळी आपल्या मर्यादांची जाणीव होते, ईश्वराच्या श्रेष्ठत्वाची जाणीव होते आणि ‘ईश्वरच सत् चे कार्य आपल्याला माध्यम बनवून कसे करवून घेत आहे’, याची जाणीव होऊन कृतज्ञता वाटते.

२. सत्संग

सत्सेवा करतांना आपल्याला साधकांचा किंवा संतांचा सत्संग मिळतो.

३. नामस्मरण

सत्सेवेच्या माध्यमातून आपल्याला सकारात्मक उर्जा आणि चैतन्य मिळत असल्यामुळे आपले नामस्मरणही चांगले होते. शारीरिक सत्सेवा करतांना नामस्मरण केले, तर त्या सेवेत ईश्वराचे साहाय्य मिळते, तसेच ईश्वराशी अनुसंधान अबाधित रहाते.

४. सत्साठी तन, मन, धन यांचा त्याग

अध्यात्मात तन, मन आणि धन यांचा त्याग करायचा असतो. जेव्हा सत्सेवेसाठी आपण शरीर झिजवतो, तेव्हा आपला तनाचा त्याग होतो. सेवा करतांना नामस्मरण केले, तर मनाचा त्याग होतो. सेवा अधिकाधिक चांगली होण्यासाठी आपण प्रयत्न करतो, तेव्हा त्यातून आपल्या बुद्धीचाही त्याग होतो. समजा सेवेसाठी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी आपला प्रवासाचा काही खर्च झाला, तर त्यातून धनाचा त्याग होतो. म्हणजे सत्सेवेच्या माध्यमातून कळत-नकळत आपला तन-मन-धनाचा त्याग होतो.

५. निरपेक्ष प्रेम आणि व्यापकत्व

सेवेच्या माध्यमातून आपल्यामध्ये व्यापकत्वही निर्माण होते. ते कसे ? तर सवेच्या माध्यमातून आपला समाजाशी संपर्क येतो. इतरांना आपण साधना सांगण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा आपल्यामध्ये व्यापकत्व येते. इतरांना त्यांच्या कलेकलेने सांगावे लागते. त्यातून आपल्यामध्ये प्रीती निर्माण होते.

६. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन

आपण जेव्हा अध्यात्मप्रसार करण्यासाठी समाजात जातो, तेव्हा आपल्याला कधी कधी प्रतिकूल प्रतिसादही मिळतो. त्या माध्यमातून आपले अहं निर्मूलन होते. पूर्वीच्या काळी साधनारत काही जीव भीक्षा मागून जेवायचे. त्याचा उद्देश देहबुद्धी, आवड-नावड नष्ट होऊन अहं निर्मूलन व्हावे, हाच तर होता. आपण या आधीच्या सत्संगांमध्ये स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व समजून घेतले होते. सेवेच्या माध्यमातून आपला अनेकांशी संपर्क येतो. त्यातून आपल्याला आपल्या चुका आणि स्वभावदोष लक्षात येतात. आपण काही प्रयत्न केले नाहीत, तर आपल्याला आपण स्वतः चांगलेच वाटत असतो; पण सत्सेवेच्या माध्यमातून आपल्यातील उणिवा आपल्या लक्षात येतात.

अशा प्रकारे सत्सेवेच्या माध्यमातून आपली अष्टांग साधना होते. त्यामुळे शीघ्र आध्यात्मिक उन्नती साध्य करायची असेल, तर सत्सेवा करणे महत्त्वाचे आहे. आज तीव्र तळमळीने सेवा करणार्‍या अनेक जणांनी आध्यात्मिक उन्नती करून घेतली आहे.

 

अनुभूती –

सेवेला जाण्याची तीव्र तळमळ असल्याने ८-१० वर्षांच्या अनोळखी मुलाने घरकामासाठी साहाय्य करणे

सेवेची तीव्र तळमळ असेल, तर सेवा करतांना शारीरिक, कौटुंबिक, आर्थिक मर्यादाही गळून पडतात आणि श्री गुरुच त्यांच्या अस्तित्त्वाची प्रचिती देतात. याच्या अनेक अनुभूती आहेत. अशीच एक अनुभूती आहे. तुळजापूर येथील एका काकूंना गुरुपौर्णिमेच्या सेवेमध्ये सहभागी होण्याची पुष्कळ इच्छा होती; पण घरातील आणि शेतीची कामे करायला कुणी नसल्याने त्यांना प्रसाराच्या सेवेसाठी जाता येत नव्हते. काकूंचे यजमान कामावर जात असल्याने त्यांना जनावरे घेऊन शेताकडे जावे लागायचे; पण त्यांना सेवेचा ध्यास लागलेला असल्याने त्या गुरूंना प्रार्थना करायच्या. एके दिवशी काकूंचे यजमान वाहन घेऊन घरी येत असतांना एका ८-१० वर्षांच्या मुलाने हात दाखवून त्यांचे वाहन थांबवले. काकांनी ‘कुठे जायचे आहे ?’, असे विचारल्यावर त्याने ‘तुळजापूरला जायचे आहे’, असे सांगितले. त्यांनी त्याला तुळजापूरला सोडले, तेव्हा तो मुलगा म्हणाला, मला तुमच्यासोबत यायचे आहे. काकांना थोडे आश्चर्य वाटले; पण त्यांनी त्या मुलाला घरी आणले आणि काकूंना सगळा प्रसंग सांगितला. तेव्हा काकूंनी विचार केला, त्यांना सेवेला जायचे आहे आणि गुरे राखायलाही कुणी नाही, तर त्याला ठेवून घेऊया. काकूंच्या यजमानांनी त्या मुलाला ‘तू रहाशील का ?’, असे विचारल्यावर तो ‘हो’ म्हणाला.

तो मुलगा प्रतिदिन शेतात जायचा आणि गुरे राखायचा. त्यामुळे काकूंना गुरुपौर्णिमेच्या सेवांना जाता येत होते. तो गुरुपौर्णिमेपर्यंत तिथे राहिला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्याने खिचडीही करून दिली. त्या मुलामुळे सेवा होऊ शकल्याने काकूंना पुष्कळ बरे वाटले. त्याने एवढी कामे केल्याने त्याला काही तरी पुढची मदत करण्याच्या दृष्टीने काकू म्हणाल्या, ‘तुझी काही कागदपत्रे असतील, तर आणून दे. तुला कुठेतरी काम देण्याचा प्रयत्न करू.’ त्याने अर्धा घंटा बाहेर जाऊन विचार केला; पण नंतर तो घरी आलाच नाही. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यावरही तो दिसला नाही. त्याने गुरुपौर्णिमेपर्यंत काकूंच्या घरची शेतातील सर्व कामे विनामूल्य केली. ईश्वर भक्ताच्या हाकेला धावून येतो, याची ती अनुभूती होती.

जनाबाईच्या घरी देवाने दळण-कांडण केले, संत एकनाथांच्या घरी श्रीखंड्या बनून पाणी भरले हे आपण कथांमधून ऐकले होते. हे केवळ पूर्वीच्या काळीच घडत होते, असे नाही, तर आताच्या काळातही तशा अनुभूती येत आहेत. आपली श्रद्धा आणि तळमळ मात्र त्यासाठी हवी !

 

सत्सेवा आणि असत्सेवा यांतील भेद समजून घ्या

काही जणांना वाटते की, रुग्णांची शुश्रुषा किंवा गरिबांना साहाय्य म्हणजे सेवाच आहे. काहीच न करण्यापेक्षा किंवा केवळ स्वतःचा विचार करण्यापेक्षा इतरांना साहाय्य करणे चांगलेच आहे; पण त्याने केवळ विशिष्ट टप्प्यापर्यंत आध्यात्मिक प्रगती होऊ शकते, मोक्षप्राप्ती नाही, हे लक्षात घ्यायला हव. असत् ची सेवा उदा. रोग्यांची सेवा वगैरे करतांना ती मिथ्या गोष्टीला सत्य मानून केली जाते, तसेच त्यात ‘मी सेवा करतो’, हा अहंही असतो; त्यामुळे तिचा साधना म्हणून विशेष उपयोग होत नाही. असत्सेवेने देवाणघेवाण हिशोब निर्माण होऊ शकतो. याउलट सत्सेवा ‘अहं’ला विसरण्यासाठी केली जाते. त्यामुळे सत्सेवा करण्याला प्राधान्य द्यायला हवे.

 

हिंदुसंघटन, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती करणे, हीही काळानुसार सत्सेवाच !

सध्या आपत्काळ चालू आहे. अशा काळात व्यष्टी साधनेला समष्टी साधनेची जोड दिली, तर साधना चांगली होते. समष्टी साधना म्हणजे सर्व समाजच सात्त्विक आणि धर्मपरायण होईल, यांसाठी प्रयत्न करणे ! पूर्वीच्या काळी समर्थ रामदास स्वामी, स्वामी विवेकानंद यांसारख्या द्रष्ट्यांनीही तेच केले. आपणही आता काळानुसार आवश्यक असलेले हिंदुसंघटन करणे, वेगवेगळ्या माध्यमांतून होणारी धर्महानी रोखणे, राष्ट्रीय अस्मितांचा सन्मान करणे, धर्मजागृती करणे अशा सेवा करू शकता. कृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीने उचलला, तेव्हा गोपगोपींनी आपापल्या काठ्या लावून पर्वत उचलून धरायला आपल्या परीने मदत केलीच होती. त्याप्रमाणेच आपल्यालाही करायचे आहे.

 

खारूताईसारखे समर्पणभावाने सत्सेवा केल्यास ईश्वराचा आशीर्वाद मिळतो

आपल्याला रामायणातील खारूताईचे उदाहरणही ठाऊक आहे. लंकेवर स्वारी करण्यासाठी वानरसेना श्रीरामाच्या मार्गदर्शनाखाली सेतू बांधत होती. त्यासाठी वानर मोठमोठे दगड उचलून ते पाण्यात टाकत होते. हे होत असतांना तेथे असणारी खारूताईही त्यात सहभागी होत होती. ती काय करायची, तर ती ओली होऊन मातीत लोळायची आणि ज्या ठिकाणी सेतू बांधला जात होता, त्या ठिकाणी जाऊन तिचे अंग झटकायची. सेतूनिर्माणाच्या दृष्टीने विचार केला, तर खारूताईचे कार्यात्मक योगदान अत्यल्प होते; पण ती तिच्या क्षमतेप्रमाणे ईश्वरी कार्यात सहभागी झाली होती. त्यामुळेच इवल्याशा खारूताईला रामरायांनी उचलून हातावर घेतले आणि तिच्या अंगावर प्रेमाने हात फिरवला. खारूताईचा उद्धार झाला. आपणही खारूताईच्या समर्पणभावाचा आदर्श ठेवून आपल्या वेळेनुसार, क्षमतेनुसार, आपल्या प्रकृतीनुसार सत्सेवेला आरंभ केला, तर देवाची कृपा आपल्यावर का नाही होणार ?

 

सत्सेवेसाठी आवाहन

खारुताईप्रमाणे आपणही सत्सेवेची अनुभूती घेऊयात ना ? साधनेच्या प्रयत्नांत सातत्य रहाण्यासाठी आपण आपली नियमितपणे सत्सेवा कशी होईल, यासाठी प्रयत्न करूयात. चालेल ना सर्वांना ? जर कोणाकडे वेळ उपलब्ध असेल आणि त्या वेळेमध्ये सेवा उपलब्ध करून द्यायची असेल, तर तसेही तुम्ही सांगू शकता. सनातन संस्थेच्या वतीने केवळ सत्संगांच्या माध्यमातूनच अध्यात्मप्रसार केला जातो, असे नाही, तर संकेतस्थळ, ग्रंथ, ‘सोशल मीडिया’, नियतकालिके, प्रवचने अशी अध्यात्मप्रसाराची वेगवेगळी माध्यमे आहेत. आपल्याला वेळ देणे शक्य असेल, तर आपली रूची, क्षमता, कौशल्य, शिक्षण, तसेच अनुभव यांच्या आधारे सत्सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही आवर्जून प्रयत्न करू.

या आठवड्यात आपण अजून एक प्रयत्न करूया. आपल्या परिचितांपैकी किमान ३ जणांना साधना आणि सत्संगात आपल्याला जी सूत्रे शिकायला मिळतात, ती सांगूया. साधनेचा पहिला टप्पा म्हणून कुलदेवी आणि दत्तगुरु यांचा नामजप का आणि कसा करायचा ? हे सांगूया. आपण समोरच्या व्यक्तीला तळमळीने सांगूया; पण त्यांनी ऐकायलाच पाहिजे, जप करायलाच पाहिजे, असा अट्टाहास धरायला नको. आपण आपली सेवा म्हणून देवाला प्रार्थना करून निरपेक्षपणे सांगण्याचा प्रयत्न करूया. कसे बोलायचे ? कसे सांगायचे ? सुरुवात कुठून करायची ? असे आपल्याला कोणतेही प्रश्न पडले, तरी विनासंकोच आम्हाला संपर्क करू शकता; पण किमान ३ जणांना साधना, नामजप, सत्संग यांविषयी सांगायचा प्रयत्न करूया. आपण असे प्रयत्न करूया ना ? (१,२ जणांना काय वाटते, ते जाणून घेऊ शकतो.)

Leave a Comment