सनातनच्या ११३ व्या व्यष्टी संत अनगोळ (बेळगाव) येथील पू. (श्रीमती) विजया दीक्षित (वय ९१ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

‘पू. (श्रीमती) विजया दीक्षित (वय ९१ वर्षे) यांना लहानपणापासूनच देवाधर्माची आवड होती. त्यांच्या माहेरी आणि सासरीही घरातील वातावरण धार्मिक होते.  त्यांनी महिला मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या समवेत आध्यात्मिक स्तरावर वर्षातील सण सर्वांनी मिळून साजरे करणे, एकत्रित नामजप करणे, चातुर्मासात सर्वांनी मिळून एखादा नियम पाळणे, दुपारच्या वेळेत सर्वांनी एकत्र जमून पोथी वाचन करणे, असे समष्टी कार्यही केले. या लेखात त्यांचा साधनाप्रवास त्यांच्याच शब्दांत आपण जाणून घेऊया.

१. बालपण

१ अ. माझा जन्म १.११.१९३२ या दिवशी सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे या गावी झाला. आमची आर्थिक परिस्थिती बेताची होती. माझे बालपण सुसंस्कृत कुटुंबात गेले.

१ आ. लहानपणापासून देवाविषयी प्रेम आणि आवड निर्माण होणे : माझी आई (कै. लक्ष्मीबाई विष्णुपंत कुलकर्णी) आणि वडील (कै. विष्णुपंत कृष्णाजी कुलकर्णी, हिवरेकर) आध्यात्मिक वातावरणात रहाण्याचा प्रयत्न करत असत. माझे वडील चाकरीत असतांना उच्च पदावर होते, तरीही त्यांनी देवधर्म कधीही चुकवला नाही. माझी आई धर्माचरणी होती. अशा वातावरणात आम्ही ६ भावंडे मोठी झालो. आमच्यावरही तसेच संस्कार झाले आहेत. त्यामुळेच लहानपणापासून मला देवाविषयी प्रेम आणि आवड निर्माण झाली.

१ इ. माझा अध्यात्माकडे ओढा असल्याने विविध आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करता यावा, यासाठी मी परीक्षा दिल्या आणि त्यांत मी उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाले.

१ ई. लहानपणापासून केलेली उपासना : लहानपणी घरात परंपरेने चालत आलेल्या गोष्टी, म्हणजे प्रतिदिन सायंकाळी स्तोत्रे म्हणणे, घरात साजरे केले जाणारे सण, उत्सव यांत मोठ्यांना साहाय्य करणे, असे मी करत होते.

२. विवाहानंतर

२ अ. सर्वांशी मिळून मिसळून वागणे : आतापर्यंतच्या आयुष्यात मी कुणाशीही भांडले नाही किंवा माझ्यामुळे काही गोष्टी वाईट घडल्या नाहीत. ‘जें जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत ।।’ (ज्ञानेश्वरी, अध्याय १०, ओवी ११८) अशी माझी दृष्टी असते. त्यामुळे माझे सासरे मला ‘तू अजातशत्रू आहेस’, असे म्हणत असत.

२ आ. घरी आलेल्या पाहुण्यांचा आदर-सत्कार करण्यात मला पुष्कळ आनंद मिळतो. पाहुण्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून त्यांना खाऊ घालण्यात मला समाधान मिळते.

२ इ. मी वहीवर श्रीरामाचा नामजप लिहीत असे. त्या वह्या मी सज्जनगडावर जाऊन अर्पण केल्या.

२ ई. नेतृत्व आणि समष्टीभाव : माझ्या यजमानांचे विविध ठिकाणी स्थानांतर (बदली) होत असे. तेव्हा निरनिराळ्या गावांत गेल्यावर तेथील अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने मी जमेल तसे प्रयत्न करत होते. यजमानांचे स्थानांतर (बदली) होऊन आम्ही बेळगावला आलो. तेव्हा आम्ही ५० वर्षांपूर्वी रहात असलेल्या भागात महिलामंडळ चालू केले. या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या समवेत आध्यात्मिक स्तरावर सर्वांनी मिळून वर्षभरातील सण साजरे करणे, एकत्रित नामजप करणे, चातुर्मासात सर्वांनी मिळून एखादा नियम पाळणे, दुपारच्या वेळेत सर्वांनी एकत्र जमून पोथीवाचन करणे, तसेच गावात आणि जिल्ह्यात राबवल्या जाणार्‍या विशेष मोहिमांमध्ये सहभाग घेणे, देशकार्य करणार्‍यांकरता किंवा देशावर आलेल्या संकटांच्या वेळी मंडळाच्या वतीने सर्वांनी मिळून आवश्यक ते साहाय्य करणे, या आणि अशा वेगवेगळ्या स्तरांवर देवानेच आमच्याकडून कार्य करवून घेतले.

२ उ. विवाहानंतर गुरुप्राप्ती होईपर्यंत केलेली साधना : माझ्या सासरी आध्यात्मिक वातावरण होते. आमच्या घरी पुष्कळ संत जेवायला किंवा रहायला येत असत. मलाही त्यांची सेवा करणे मनापासून आवडत असे. देवाने माझ्याकडून संतसेवा करवून घेतली. संत सहवासामुळे माझ्यामध्ये मुळात असलेली अध्यात्म आणि साधना यांविषयीची ओढ वाढत गेली. त्यामुळे नामजप करणे, वेगवेगळे नियम आणि व्रते पाळणे, असे मी करत होते. घरात आधीपासूनच श्री गुरुदेव दत्ताची उपासना होत असल्याने प्रत्येक गुरुवारी आरती करणे, प्रतिदिन दत्तबावनी स्तोत्र म्हणणे, गुरुवारी उपवास करणे, ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करणे, असे मी करत होते.

२ ऊ. गुरुप्राप्ती होणे : माझ्या मनात ‘आपल्याला गुरु असावेत’, असा विचार सतत यायचा; पण ‘हे कसे शक्य होणार ?’ माझ्या सासर्‍यांनी मला गुरु करण्यासंदर्भात काही सूत्रे सांगितली होती. त्यामुळे ‘जेव्हा एखादी आध्यात्मिक व्यक्ती आमच्या घरी येऊन मला साधनेविषयी मार्गदर्शन करील, तेव्हा आपण ‘साधना’ चालू करायची’, असे मी ठरवले होते. श्री. जी.बी. वेल्हाळ हे भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त अधिकारी आमच्या घरी नेहमी येत असत. त्यांनी मला समोर बसवून ‘सोऽहम्’ हा मंत्र दिला. त्यानंतर नित्यनेमाने मी तो मंत्रजप भावपूर्ण करू लागले. जप करण्याचा मला जणू छंदच लागला. मी प्रतिदिन पहाटे ४ वाजता उठून ध्यानाला बसत असे आणि माळ घेऊन अनुमाने १०० माळा जप करत असे.’

मी देवपूजा, धार्मिक ग्रंथांचे वाचन इत्यादी गोष्टी नियमित करत असे. ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’ म्हणजे ‘धर्माचरणासाठी शरीर हेच प्रथम साधन आहे’ म्हणजेच साधनेसाठी शरीर चांगले असणे उपयोगाचे आहे, असे वचन आहे.’ या उक्तीनुसार ‘देवाने दिलेले शरीर शेवटच्या क्षणापर्यंत सुदृढ राहून हातून धमकार्यच घडावे’, अशी देवाच्या चरणी प्रार्थना आहे.’

३. साधना करत असतांना आलेल्या अनुभूती

३ अ. नरसोबाच्या वाडीला गेले असता नदीमध्ये पडून गटांगळ्या खाणे आणि एका अनोळखी माणसाने पाण्याच्या बाहेर काढल्यामुळे जीव वाचणे : एकदा मी आणि माझा धाकटा मुलगा चि. प्रसाद नरसोबाच्या वाडीला गेलो होतो. तेथे नदीच्या घाटावर पुष्कळ माणसे अंघोळ करत होती. मी नेहमीप्रमाणे पाण्यात उतरले आणि माझा पाय घसरला अन् मी पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. सर्व लोक बघत उभे होते; परंतु एक माणूस धावत आला आणि त्याने मला उचलून पाण्यातून बाहेर काढले. त्याने मला विचारले, ‘तुमच्या अंगावरील दागिने नीट आहेत ना ?’ मी म्हणाले, ‘‘सर्व ठीक आहे.’’ तेव्हा तो निघून गेला. माझ्या मनात विचार आला, ‘कोण असेल तो ?’ प्रत्यक्ष देवच त्याच्या रूपाने मला वाचवायला आला असल्याचे मला स्पष्ट जाणवले. तेथूनच मी देवाला नमस्कार केला.

३ आ. देवावर श्रद्धा ठेवल्याने मानसिक धैर्य वाढणे : कठीण प्रसंगांमुळे देवावर माझी अतूट श्रद्धा बसली. ‘संसारात अडचणी, जीवघेणी संकटे येणारच. त्यातून ‘देवावर पूर्ण श्रद्धा ठेवून शांतपणे पार कसे पडायचे ?’, याचे ज्ञान आणि अनुभव येत गेल्याने माझे मानसिक धैर्य वाढले.

३ इ. झोपेत असतांना पिसासारखी हलकी होऊन हवेत तरंगत पुष्कळ उंच एका पोकळीत जाणे आणि तेथे श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवणे : एकदा दुपारच्या वेळी माझा डोळा लागला होता. त्या वेळी मी अगदी पिसासारखी हलकी होऊन हवेत तरंगत होते. मी इतकी वर गेले की, त्या ठिकाणी केवळ आकाशाची निळी पोकळी होती. मी एकटीच त्या पोकळीत उभी होते. मला भीती वाटत नव्हती. पोकळीत मला श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवत होते. कुठून तरी बासरीचे स्वर माझ्या कानावर पडत होते आणि मी शांतपणे ते स्वर ऐकत होते. नंतर मला जाग आली.

३ ई. झोपेत असतांना ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देणे : एकदा आम्ही गोंदवले येथे गेलो होतो. आम्ही संध्याकाळी पोचलो आणि आरतीला गेलो. आरतीच्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘माझी साधना योग्य प्रकारे चालू असेल, तर महाराजांनी मला काहीतरी अनुभूती द्यावी.’ मी दिवसभराच्या प्रवासाने गाढ झोपले. झोपेत माझ्या डोक्यावर कोणीतरी उजवा हात ठेवल्याचे मला जाणवले. तो स्पर्श पुरुषी होता आणि हाताची उष्णता मला जाणवत होती. मला वाटले की, ‘लवकर उठवण्यासाठी यजमानांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आहे.’ डोळे उघडून पाहिले, तर तेथे कुणीच नव्हते. सर्व मंडळी गाढ झोपली होती. तेव्हा ‘महाराजांनीच माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि माझी साधना ठीक चालली असल्याचे मला सुचवले’, असे मला जाणवले. मी महाराजांना विनम्रपणे नमस्कार केला.

३ उ. कानात कुणीतरी जप सांगितल्याचे जाणवणे : एक दिवस मी नेहमीप्रमाणे ध्यानाला बसले असतांना माझ्या उजव्या कानात कुणीतरी जप सांगत असल्याचे मला स्पष्टपणे ऐकू येत होते. तो आवाज पुरुषी होता. जप ऐकून मला एक वेगळेच समाधान वाटत होते. त्यानंतर माझा जप अधिकच आवडीने होऊ लागला.

३ ऊ. गुरुदेव प्रकाशमान होत असल्याचे जाणवणे : एका गुरुवारी आरतीच्या वेळी मला वेगळाच आनंद जाणवू लागला. संपूर्ण विश्वातील अणू-रेणूतून गुरुदेव प्रकाशमान होत असल्याचे मला जाणवत होते आणि मला वेगळाच प्रकाश जाणवत होता. मी गुरुदेवांना हात जोडले आणि विनम्रपणे त्यांच्या चरणांशी नतमस्तक झाले. तेव्हापासून माझा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप अधिक होऊ लागला.

४. संतांचे आशीर्वाद

४ अ. यमकनमर्डीचे श्री हरिकाका गोसावी : माझ्या सासर्‍यांचे गुरु सद्गुरु सदानंद महाराज यांचे वास्तव्य अनगोळ (बेळगाव) येथे होते. तेथेच त्यांची समाधीही आहे. माझ्या यजमानांचे स्थानांतर गुजरातमधून कर्नाटकात झाल्यावर मिरजेला माहेरी जातांना बहुतेक वेळा आमचा बेळगावला मुक्काम व्हायचा. त्या वेळी आम्ही माझ्या सासर्‍यांच्या गुरूंच्या समाधीचे दर्शन घ्यायला जायचो. तेव्हा यमकनमर्डीचे श्री हरिकाका गोसावी यांचेही दर्शन होत असे. एकदा श्री हरिकाका यांनी मला कुंकू लावून माझ्या ओटीत नारळ घातला आणि ‘अध्यात्मात चांगली प्रगती करशील’, असा आशीर्वाद दिला होता.

४ आ. पू. कलावतीआई : माझ्या यजमानांचे स्थानांतर बेळगावला झाले. आमचे वास्तव्य अनगोळ भागात होते. तेथे जवळच पू. कलावतीआईंचे वास्तव्य होते. माझे यजमान त्यांचे ‘फॅमिली डॉक्टर’ असल्याने त्यांचे पू. आईंकडे जाणे-येणे व्हायचे. तेव्हा पू. कलावतीआईंनी ‘तुमच्या हातून पुष्कळ सेवा घडेल’, असे मला म्हटले होते.

४ इ. माझे गुरु श्री. वेल्हाळ यांनी, ‘तुम्ही अध्यात्मात पुष्कळ प्रगती कराल’, असे सांगितले होते.

५. सनातन संस्थेशी संपर्क

माझी मुलगी सौ. अंजली कणगलेकर आणि जावई श्री. यशवंत कणगलेकर यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना अन् सेवा करण्यास आरंभ केला. त्यानंतर वर्ष १९९७ मध्ये माझा सनातन संस्थेच्या कार्याशी परिचय झाला.

– (पू.) श्रीमती विजया दीक्षित, अनगोळ, बेळगाव. (१९.४.२०२४)

Leave a Comment