सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७५ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न !

Article also available in :

‘साधना’ हा रामराज्यात प्रवेश मिळवण्यासाठीचा ‘परवाना’ (लायसन्स) आहे !

काळमहिम्यानुसार रामराज्य येणारच आहे. जसे ‘पहाट होणे’ कुणी थांबवू शकत नाही, तसे ‘रामराज्यरूपी हिंदु राष्ट्राचे निर्माण’ कुणीही थांबवू शकत नाही. ‘रामराज्यरूपी हिंदु राष्ट्राची स्थापना होणार’, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. रामराज्याचे आपल्याला साक्षीदार नाही, तर साथीदार व्हायचे आहे. आपणही रामराज्यात रहाण्यासाठी साधना करत धर्माचरणी बनले पाहिजे. आजच्या भाषेत सांगायचे, तर ‘साधना’ हा रामराज्यात प्रवेश मिळवण्यासाठीचा ‘परवाना’ (लायसन्स) आहे. सर्वोच्च प्रतीचा सतत टिकणारा आनंद केवळ साधनेनेच मिळतो. आपल्याला ईश्वरप्राप्ती करायची ओढ असो वा नसो, एक चांगले समाधानी जीवन जगता येण्यासाठीही साधना करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साधना करण्याचा आणि ती वाढवण्याचा संकल्प करूया.” असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या वक्त्यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवात ‘आनंदप्राप्ती अन् रामराज्याची स्थापना यांसाठी साधना’ या विषयांवर मार्गदर्शन करतांना केले. देशभरात एकूण ७५ ठिकाणी सनातन संस्थेद्वारे आयोजित ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. ठिकठिकाणी झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवांत विविध मान्यवरांसह मोठ्या संख्येने जिज्ञासू उपस्थित होते. या महोत्सवांत धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विविध विषयांवरील ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही लावण्यात आले.

६ भाषांमध्ये ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव : देश-विदेशांतील भाविकांना गुरुपौर्णिमेचा लाभ घेता यावा यासाठी सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजरात, तमिळ, मल्याळम् या ६ भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवही संपन्न झाले. या माध्यमांतून देश-विदेशांतील भाविकांनी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चा लाभ घेतला.

– श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था.

———————————————————————–

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७५ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ घेण्यात येणार

श्रीगुरुतत्त्वाचा एक हजारपटीने लाभ करून घेण्यासाठी गुरुपौर्णिमेत सहभागी व्हा ! – सनातन संस्थेचे आवाहन

हिंदु धर्मातील अद्वितीय अशी श्रेष्ठ परंपरा म्हणजे ‘गुरु-शिष्य परंपरा’ होय ! गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा अनादी काळापासून चालू आहे. गुरुपौर्णिमेला नेहमीपेक्षा एक हजारपटीने कार्यरत असलेल्या गुरुतत्त्वाचा लाभ समाजाला घेता यावा, यांसाठी या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने २१ जुलै २०२४ या दिवशी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हा महोत्सव मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, मल्याळम् आदी भाषांमध्ये देशभरात ७५ ठिकाणी होणार आहे. तरी सर्व राष्ट्र आणि धर्म प्रेमी हिंदूंनी सहकुटुंब या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा.

प्राचीन काळापासून राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना धर्मसंस्थापनेचे कार्य याच ‘गुरु-शिष्य’ परंपरेने केले आहे. सध्याही समाज, राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती दयनीय झाली आहे. अशा वेळी जनतेचा छळ करणार्‍या लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढणे आणि ‘रामराज्या’सारख्या ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करणे ही काळानुसार सर्वाेत्तम श्रीगुरुसेवाच आहे. यांसाठी श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन); समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी मान्यवरांचे विचार; तसेच ‘आनंदप्राप्ती अन् रामराज्याची स्थापना यांसाठी साधना’ या विषयांवरही मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. या महोत्सवात धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विविध विषयांवरील ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही लावण्यात येणार आहे.

ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव’ : देश-विदेशांतील भाविकांना गुरुपौर्णिमेचा लाभ घेता यावा यासाठी सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, मल्याळम् या भाषांत ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’ आयोजित करण्यात आले आहे. २१ जुलैला मराठी भाषेतील ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चा लाभ पुढील मार्गीकेवर घेता येईल. www.Sanatan.org/mr/gurupurnima

– श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था.

Leave a Comment