सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतची कर्मे दिनचर्येत येतात. दिनचर्येत येणार्या काही कर्मांचे ज्ञान पुढे दिले आहे.
१. नित्यकर्म
जे केले असता ज्याचे फल चित्तशुद्धीहून अधिक मिळत नाही; पण न केल्याने मात्र दोष लागतो, ते नित्यकर्म होय, उदा. ब्राह्मण व्यक्तीसाठी संध्या करणे आणि गायत्री मंत्राचा जप करणे, ही नित्यकर्मे आहेत. नित्यकर्मांची काही उदाहरणे
अ. वर्णानुसार सांगितलेली नित्यकर्मे
ब्राह्मणाचे नित्यकर्म अध्ययन आणि अध्यापन (अध्यात्म शिकणे आणि शिकविणे); क्षत्रियाचे नित्यकर्म समाजाचे दुर्जनांपासून रक्षण करणे; वैश्याचे नित्यकर्म गोपालन, कृषी आणि व्यापार यांद्वारा समाजाची सेवा करणे आणि शुद्राचे नित्यकर्म ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या विशिष्ट व्यवसायांव्यतिरिक्त कोणताही व्यवसाय करणे, हे आहे.
आ. आश्रमानुसार सांगितलेली नित्यकर्मे
ब्रह्मचर्याश्रमात धर्माचे पालन कसे करायचे, याचा अभ्यास करणे; गृहस्थाश्रमात देव, ऋषी, पितर आणि समाज ही ऋणे फेडणे; वानप्रस्थाश्रमात शरीरशुद्धी आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास या हेतूंनी साधना करणे आणि संन्यासाश्रमात भिक्षाटन, जप, ध्यान इत्यादी कर्मे करणे, ही नित्यकर्मे सांगितली आहेत.
२. प्रातःकाल ते सायान्हकाल या काळात करावयाची कर्मे
दिवसाचे (१२ घंट्यांचे) प्रातःकाल, संगवकाल, माध्यंदिन अथवा माध्यान्हकाल, अपराण्हकाल आणि सायान्हकाल असे पाच विभाग असतात. हा प्रत्येक विभाग तीन मुहुर्तांएवढा असतो. २४ घंट्यांच्या दिवसात ३० मुहूर्त असतात. एक मुहूर्त म्हणजे दोन घटिका, म्हणजे ४८ मिनिटे. थोडक्यात प्रत्येक विभाग हा २ घंटे २४ मिनिटांचा असतो. प्रत्येक विभागात करावयाची कृत्ये पुढे दिली आहेत.
२ अ. प्रातःकाल (सूर्योदयापासून चालू): संध्यावंदन, देवपूजा आणि प्रातर्वैश्वदेव.
२ आ. संगवकाल : उपजिविकेचे साधन
२ इ. माध्यान्हकाल : माध्यान्हस्नान, माध्यान्हसंध्या, ब्रह्मयज्ञ आणि भूतयज्ञ.
२ ई. अपराण्हकाल : पितृयज्ञ (तर्पण, पिंडदान, श्राद्ध इत्यादी)
२ उ. सायान्हकाल : पुराणश्रवण आणि त्यावर चर्चा करणे अन् सायंवैश्वदेव आणि संध्या.
३. पंचमहायज्ञ
अध्यापनं ब्रह्मयज्ञः पितृयज्ञस्तु तर्पणम् ।
होमो दैवो बलिर्भौतो नृयज्ञोऽतिथिपूजनम् ।। – मनुस्मृति, अध्याय ३, श्लोक ७०
अर्थ : शिष्याला अध्यापन करणे, हा ब्रह्मयज्ञ; पितरांना तर्पण हा पितृयज्ञ; वैश्वदेव हा देवयज्ञ; बलीप्रदान हा भूतयज्ञ आणि अतिथीपूजन हा मनुष्ययज्ञ होय.
अ. ब्रह्मयज्ञ
वेदांचा अभ्यास (म्हणजे स्वाध्याय) करणे आणि देव अन् ऋषी यांना तर्पण करणे, हा ब्रह्मयज्ञ होय.
आ. पितृयज्ञ
पितरांना तर्पण करणे (ज्या ऋषींची पूर्वजांत गणना केली आहे, उदा. सुमंतु, जैमिनी, वैशंपायन असे ऋषी आणि स्वतःचे पूर्वज यांच्या नावाने पाणी देण्याचा विधी)
इ. देवयज्ञ
वैश्वदेव, अग्नीहोत्र आणि नैमित्तिक यज्ञ हे देवयज्ञाचे भाग आहेत.
इ १. नित्य होणार्या ‘पंचसूना’ जीवहिंसेचे प्रायश्चित्त म्हणून वैश्वदेव करणे
नित्य उपजीविका करत असतांना मानवाच्या हातून नकळत होणारी जीवहिंसा शास्त्रात ‘पंचसूना’ या नावाने ओळखली जाते.
इ १ अ. वैश्वदेवः प्रकर्तव्यः पञ्चसूनापनुत्तये ।
कण्डनी पेषणी चुल्ली जलकुम्भोपमार्जनी ।। – धर्मसिन्धु, परिच्छेद ३, पूर्वार्ध
अर्थ आणि विवरण : कांडणे, दळणे, चुलीचा उपयोग करणे, पाणी भरणे आणि झाडणे या पाच क्रिया करतांना सूक्ष्म जीवजंतूंची हिंसा अटळ असते. या हिंसेला ‘पंचसूना’ जीवहिंसा म्हणतात. या हिंसा हातून घडल्या, तर त्यांची दखल घेऊन त्यांचा आपल्या मनावर होणारा पापसंस्कार दूर होण्यासाठी ‘वैश्वदेव’ हे प्रायश्चित्तांगभूत कर्म नित्य करावे.
इ २. वैश्वदेव विधी
इ २ अ. अग्नीकुंडात ‘रुक् मक’ किंवा ‘पावक’ नावाच्या अग्नीची स्थापना करून अग्नीचे ध्यान करावे. अग्नीच्या सभोवती सहा वेळा पाणी फिरवून अष्टदिशांना गंध-फूल वहावे आणि अग्नीत चरूच्या (शिजवलेल्या भाताच्या) आहुती द्याव्यात. त्यानंतर अग्नीच्या सभोवती पुन्हा सहा वेळा पाणी फिरवून अग्नीची पंचोपचार पूजा करावी आणि विभूती धारण करावी.
इ २ आ. उपवासाच्या दिवशी तांदळाच्या आहुती द्याव्यात. (उपवासाच्या दिवशी तांदूळ शिजवत नसल्याने आहुत्या चरूच्या न देता तांदळाच्या देतात.)
इ २ इ. अतीसंकटसमयी केवळ उदकानेही (देवतांच्या नावांचा उच्चार करून ताम्हणात पाणी सोडणे) हा विधी करता येतो.
इ २ ई. प्रवासात असल्यास केवळ वैश्वदेवसूक्त किंवा वरील विधी नुसता तोंडाने म्हणूनही पंचमहायज्ञाचे फळ मिळते.
ई. भूतयज्ञ (बलीहरण)
वैश्वदेवाकरिता घेतलेल्या अन्नाच्या एका भागातून देवतांना बली अर्पण करतात. भूतयज्ञात बली अग्नीत न देता भूमीवर ठेवतात.
उ. नृयज्ञ अथवा मनुष्ययज्ञ
अतिथीचा सत्कार करणे म्हणजेच नृयज्ञ अथवा मनुष्ययज्ञ, असे मनूने (मनुस्मृति, अध्याय ३, श्लोक ७०) सांगितले आहे. ब्राह्मणाला अन्न देणे, हाही मनुष्ययज्ञच आहे.
३ अ. पंचमहायज्ञाचे महत्त्व
ज्या घरात पंचमहायज्ञ होत नाहीत, तेथील अन्न संस्कार झाले नसल्यामुळे संन्यासी, सत्पुरुष आणि श्राद्धाच्या वेळी पितर ग्रहण करू शकत नाहीत. ज्या घरात पंचमहायज्ञ करून उरलेले अन्न सेवन केले जाते, तेथे गृहशांती असते आणि अन्नपूर्णादेवीचा निवास असतो.
४. दिवसाचा काळ साधनेला अनुकूल असल्याने दिवसा झोपणे टाळावे
आरोहणं गवां पृष्ठे प्रेतधूमं सरित्तटम् ।
बालातपं दिवास्वापं त्यजेद्दीर्घं जिजीविषुः ।। – स्कन्दपुराण, ब्राह्मखण्ड, धर्मारण्यमाहात्म्य, अध्याय ६, श्लोक ६६, ६७
अर्थ : जो दीर्घकाळ जिवंत राहू इच्छितो त्याने गाय-बैल यांच्या पाठीवर चढू नये, चितेचा धूर आपल्या अंगाला लागू देऊ नये, (कातरवेळी गंगेव्यतिरिक्त दुसर्या) नदीच्या तटावर बसू नये, उदयकालीन सूर्याच्या किरणांचा स्पर्श होऊ देऊ नये आणि दिवसा झोपणे सोडावे.
४ अ. दिवसा का झोपू नये, याचे शास्त्र
‘दिवस आणि रात्र या दोन मुख्य काळांपैकी रात्रीच्या काळात साधना करण्यासाठी जास्त प्रमाणात शक्ती व्यय (खर्च) होते; कारण या काळात वातावरणात वाईट शक्तींचा संचार वाढल्याने साधनेसाठी हा काळ प्रतिकूल असतो. सात्त्विक जीव सात्त्विक काळात (दिवसा) साधना करतात. ‘दिवसा जास्तीतजास्त साधना करून त्या साधनेचे रात्रीच्या काळात चिंतन करणे आणि दिवसभरात झालेल्या चुका सुधारण्याचा संकल्प करून परत दुसर्या दिवशी परिपूर्ण साधना करण्यासाठी प्रयत्न करणे’, असे ईश्वराला अपेक्षित असल्याने दिवसा झोपणे टाळावे.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २१.३.२००५, दुपारी ३.०९)