आज आपण सत्सेवा या विषयी जाणून घेणार आहोत. नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग, प्रीती, स्वभावदोष निर्मूलन, अहंनिर्मूलन आणि भावजागृती हे अष्टांग साधनेचे टप्पे आहेत. यामध्ये नामजप, सत्संग यानंतर सत्सेवेचा टप्पा येतो. सत्सेवा हा पुढचा टप्पा आहे.
आपण मागच्या सत्संगामध्ये व्यष्टी आणि समष्टी साधनेचे महत्त्व थोडक्यात समजून घेतले होते. व्यष्टी साधना म्हणजे स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करायचे प्रयत्न, तर समष्टी साधना म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करायचे प्रयत्न ! साधनेमध्ये आताच्या काळानुसार व्यष्टी साधनेला ३५ टक्के, तर समष्टी साधनेला ६५ टक्के महत्त्व आहे. नामजप, स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया हे सगळे प्रयत्न व्यष्टी साधनेच्या अंतर्गत येतात, तर सत्सेवा ही समष्टी साधनेच्या अंतर्गत येते. समष्टी साधनेला अधिक महत्त्व असले, तरी ती चांगली होण्यासाठी व्यष्टी साधनेचा पाया पक्का असावा लागतो. म्हणूनच व्यष्टी साधना करता करता आपल्याला समष्टी साधना म्हणजे सत्सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आज आपण सत्सेवेविषयीच जाणून घेणार आहोत.
सत्सेवा म्हणजे काय ?
सत्सेवा म्हणजे नेमके काय ? सत् म्हणजे ईश्वर ! सत्सेवा म्हणजे ईश्वराची सेवा ! आजच्या काळात प्रत्यक्ष ईश्वराची सेवा करणे अशक्य असल्याने संतांची सेवा करावी, असे म्हटले आहे. संत हे ईश्वराचे सगुण रूप आहे. आजच्या भाषेत सांगायचे झाले, तर संत हे ईश्वराचे दूत आहेत. जसे एखाद्या देशाचा राजदूत त्या देशाचे प्रतिनिधित्व करतो, तसे संत हे ईश्वराचे पृथ्वीवरील प्रतिनिधी असतात; पण आपल्याला प्रत्येक वेळी संतांची सेवा करण्याची संधी प्राप्त होऊ शकेल का ? मुळात आजच्या काळात खरे संत कोण आहेत, हे ओळखता येणेही कठीण आहे. मग सतत संतसेवेची संधी मिळणे, ही तर अजून दुर्मिळ गोष्ट आहे. मग अशा वेळी सत्सेवा म्हणून काय करायचे ?, असा प्रश्न आपल्याला पडू शकेल. याचे उत्तर असे की, प्रत्यक्ष ईश्वराची किंवा संतांची सेवा करता येणे अवघड असले, तरी त्यांना जे अपेक्षित आहे, ते करणे ही सत्सेवाच आहे. ईश्वराला किंवा संतांना काय अपेक्षित असते, तर धर्मप्रसार किंवा अध्यात्मप्रसार ! अध्यात्माचा म्हणजे साधनेचा प्रसार ही सर्वोत्तम सत्सेवा आहे.
आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने सत्सेवेचे महत्त्व १०० टक्के !
आनंदप्राप्तीसाठी किंवा ईश्वरप्राप्तीसाठी साधना करणार्या साधकाच्या दृष्टीने सत्सेवेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितले आहे की, साधनेत प्रयत्नपूर्वक केलेल्या नामजपाचे एकूण महत्त्व ५ टक्के आहे. सत्संग आणि संतसहवास यांचे महत्त्व ३० टक्के, तर सत्सेवेचे महत्त्व १०० टक्के एवढे आहे. यावरून सत्सेवेचे महत्त्व लक्षात येते. तथापि सत्सेवेचा टप्पा गाठता येण्यासाठी आणि तो टिकवून ठेवण्यासाठी नामजप आणि सत्संग ही दोन सूत्रेही तितकीच महत्त्वाची आहेत.
सत्सेवा हे गुरुकृपेचे उत्तम माध्यम
सत्सेवेच्या माध्यमातून संतांचे किंवा गुरुंचे मन जिंकता येते आणि त्या माध्यमातून गुरुकृपा कार्यरत होते. याचे एक व्यावहारिक उदाहरण घेऊया. समजा एका कार्यक्रमाच्या सिद्धतेसाठी कोणी साफसफाई करत आहे; कोणी जेवण बनवत आहे; कोणी भांडी धूत आहे, तर कोणी सजावट करत आहे ! आपण समजा साफसफाईच्या कामात आहोत. अशा वेळी आणखी एक जण आला आणि तो जेवण बनवणार्यांसह काम करायला लागला, तर आपल्याला त्याच्याविषयी काहीच वाटत नाही; मात्र तोच आपल्याला साफसफाईच्या कामात मदत करायला लागला, तर तो आपला वाटतो. गुरूंचे किंवा संतांचे तसेच असते. गुरूंचे आणि संतांचे कार्य काय असते ?, तर समाजाला धर्म आणि साधना सांगून सर्वांना साधना करायला प्रवृत्त करणे, तसेच अध्यात्माचा प्रसार करणे. आपण तेच काम जर आपल्या कुवतीप्रमाणे करायला लागलो, तर गुरूंना वाटते की, ‘हा माझा आहे’. त्यांना असे वाटणे हाच गुरुकृपेचा आरंभ आहे.
आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी गुरुकृपाच महत्त्वाची असते. अध्यात्मप्रसार आणि धर्मप्रसार ही गुरूंच्या निर्गुण रूपाची सेवा आहे.
अध्यात्मात ‘अ’ कळले की, तो इतरांना शिकवायला हवा
काही जणांना असे वाटते की, मलाच अध्यात्म, धर्म, साधना यांविषयी सगळे ठाऊक नाही, तर मी इतरांना काय सांगणार ? येथे लक्षात घ्यायला पाहिजे की, अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. याचा अर्थ आध्यात्मिक ज्ञान अमर्याद आहे. त्यामुळे मी ते सगळे प्राप्त करीन आणि मग त्याचा प्रसार करीन, असे म्हटले, तर या मर्यादित आयुष्यात आपण अध्यात्मासाठी वेळ देणार कधी, ते शिकणार कधी आणि त्याचा प्रसार करणार कधी ? अध्यात्मात एखादी गोष्ट शिकायला मिळाल्यानंतर ती आचरणात आणणे आणि जे शिकायला मिळाले, ते इतरांना शिकवणे, महत्त्वाचे असते. अध्यात्मात ‘अ’ कळले की, तो इतरांना शिकवायला हवा. समर्थ रामदास स्वामींनीही सांगितले आहे, ‘जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे ।’
स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे, ‘अन्नदान, प्राणदान, तसेच विद्यादान यांपेक्षाही धर्मदान सर्वश्रेष्ठ आहे.’ आज समाज धर्मापासून दूर चालला आहे. त्यामुळे लोकांना धर्माची खरी ओळख करून देऊन धर्मप्रसार करणे, हे श्रेष्ठ कार्य आहे. आज समाजात अनेक लोकांकडे पैसा, गाडी, बंगला अशा अनेक सुखसोयी आहेत; पण ते आनंदी नाहीत. विज्ञानामुळे जी भौतिक प्रगती झाली आहे, त्यामुळे सुखसोयीची अनेक साधने असली, तरी ती तात्कालिक किंवा थोड्या वेळेपुरते सुख देतात. चिरकाळ टिकणारा आनंद विज्ञानाद्वारे नाही, तर केवळ अध्यात्मातूनच मिळू शकतो.
अध्यात्मप्रसाराची माध्यमे
अध्यात्मप्रसार म्हणजे काय करायचे, तर आपण आरंभीच्या टप्प्याला कुलदेवी आणि दत्तगुरु यांच्या नामजपाचे महत्त्व आपले नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी यांना सांगून त्यांना नामजप करण्यासाठी उद्युक्त करू शकतो. अध्यात्मप्रसार म्हणून आपण या नामजपाचे महत्त्व इतरांना सांगून त्यांनाही नामजप करण्यासाठी उद्युक्त करू शकतो. हे महत्त्व कसे सांगायचे हे लक्षात येत नसेल तर आम्ही आपल्याला मदत करू. त्यासाठी कधीही आवर्जून आम्हाला संपर्क करू शकता किंवा काही जणांसाठी छोट्या प्रवचनाचे आयोजन करू शकता. सनातनचे साधक तेथे माहिती देऊ शकतील. आपण हा सत्संग सुरू करण्यापूर्वी जसे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ हे प्रवचन घेतले तसे प्रवचन आपण आपल्या ओळखीचे, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासाठीही आयोजित करू शकतो. त्याचप्रमाणे सणांचे अध्यात्मदृष्ट्या महत्त्व सांगण्यासाठी छोटी छोटी प्रासंगिक प्रवचनेही आयोजित करू शकतो. काही जणांना बाहेरगावी असल्याने तसेच नोकरी, व्यवसायातील व्यस्ततेमुळे प्रत्यक्ष सत्संगाला जाणे अगदीच अशक्य आहे अशांसाठी सनातन संस्थेच्या माध्यमातून ऑनलाईन संत्संग घेतले जातात. आपल्या संपर्कातील कोणी या सत्संगाचा लाभ घेण्यास इच्छुक असतील तर त्यांची नावे व संपर्क क्रमांक आम्हाला देऊ शकता. आम्ही नियोजन करण्याचा प्रयत्न करू.
१. व्याख्याने, प्रवचने, बैठका आदी माध्यमातून प्रबोधन आणि जागृती
कुणाकडे वक्तृत्व असेल, तर तो व्याख्याने, प्रवचने, संस्कारवर्ग, बैठका आदी माध्यमातून अध्यात्मप्रसार करू शकतो. आपला जसा हा सत्संग चालू आहे, तसे देशभरात अनेक ठिकाणी सत्संग चालू आहेत. काही सत्संगांतील जिज्ञासूंनी हनुमानजयंती, रामनवमी या सणांच्या निमित्ताने सणांची माहिती सांगण्याची सेवा केली. त्यातून त्यांना पुष्कळ आनंद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आपणही असे प्रयत्न करू शकतो. सध्या आपत्काळाला आरंभ झालेला असल्याने आपल्याला कमी कालावधीमध्ये पुष्कळ लोकांपर्यंत पोचायचे आहे. त्यासाठी अध्यात्म आणि साधना यांची प्रभावीपणे माहिती देणारे वक्ते आवश्यक आहेत.
२. टंकलेखन, तसेच भाषांतर
कुणाकडे लेखनकौशल्य असेल, तर तो लिखाणाच्या माध्यमातून अध्यात्माचे महत्त्व सांगू शकतो. ग्रंथांच्या लिखाणाचे टंकलेखन म्हणजे typing किंवा भाषांतर म्हणजे translation करू शकतो. धर्म आणि अध्यात्म यांविषयी साध्या-सोप्या भाषेत ज्ञान देणारे सनातनचे अनेक ग्रंथ आहेत. कुणाचे भाषेवर प्रभुत्व असेल, तर मराठी, हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगु, कन्नड, गुजराती, आसामी, गुरुमुखी, मल्याळम् अशा वेगवेगळ्या भाषेत भाषांतराची सेवाही उपलब्ध आहे.
३. ग्रंथ वितरण
सत्सेवेच्या अंतर्गत आपण सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे, अध्यात्मविषयक ग्रंथांचे वितरण करू शकतो. ग्रंथांमध्ये ज्ञानशक्ती आहे. ज्ञानशक्तीच्या माध्यमातून अनेक जण अध्यात्माशी जोडले जातात.
४. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून अध्यात्मप्रसार
आजकाल अनेकांकडे ‘स्मार्ट फोन’ उपलब्ध असतात. ‘व्हॉट्स ॲप’, ‘ट्विटर’, ‘फेसबूक’ यांसारख्या माध्यमातून आपण काही ना काही तरी संदेश ‘फॉरवर्ड’ करतच असतो. त्या जोडीला आपण ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून धर्म आणि राष्ट्र जागृतीपर ‘पोस्ट्स’ पाठवून धर्मप्रसार करू शकतो. आपल्याकडे सनातन चैतन्यवाणी किंवा ज्ञान देणारी वेगवेगळी ‘ॲपस्’ आहेत. त्याच्या लिंकस् आपण पाठवू शकतो. कुणाकडे तांत्रिक म्हणजे technical कौशल्य असेल, तर तो ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून अध्यात्मप्रसार करू शकतो. कुणाला हे कौशल्य शिकायची इच्छा असेल, तर त्यांच्यासाठी आपण प्रशिक्षणाचेही आयोजन करू शकतो. कुणाला ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून कसा प्रसार करायचा, हे शिकायचे असेल, तर आपण आपली नावे आम्हाला देऊ शकता. आपण शिकवण्याचे नियोजन करू. काळानुसार साधना किंवा अध्यात्मप्रसार करण्याची वेगवेगळी माध्यमे आहेत. आपण आपले कौशल्य वापरून त्यात सहभागी होऊ शकतो. आपले कुठल्या क्षेत्रात कौशल्य असेल किंवा अनुभव असेल, तर तसेही आपण सांगू शकता. आपल्या कौशल्यानुसार किंवा अनुभवानुसार सेवा उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. सत्सेवा करण्याची अनेक अनेक माध्यमे आहेत. ‘Sky is the limit, असे म्हणतात,’ त्याप्रमाणे हे आहे. सत्सेवा करतांना ती मनापासून आणि ‘जाणोनि श्री गुरुंचे मनोगत’, या भावाने केली, तर ती सेवा श्री गुरुचरणी रुजू होते. सत्सेवेमध्ये पुष्कळ आनंद आहे. सत्सेवेच्या माध्यमातून देवाशी सहजतेने अनुसंधान साधणे शक्य होते. आपल्यापैकी अनेक जणांनी यापूर्वी सत्सेवा केली आहे किंवा काही जण सध्या करतही असाल.
आताच आपण समजून घेतले, अध्यात्मप्रसार आणि धर्मप्रसार ही गुरूंच्या निर्गुण रूपाची सेवा आहे. सत्सेवा हा अष्टांग साधनेतील सत्संगाच्या पुढचा टप्पा आहे. अध्यात्माचा म्हणजे साधनेचा प्रसार ही सर्वोत्तम सत्सेवा आहे. आपल्या लक्षात आलेले आपत्काळातील साधनेचे महत्त्व, शिकायला मिळालेली सूत्रे परिचितांना, कुटुंबियांना सांगणे आवश्यक आहे. तसे प्रयत्न आपण या आठवडयात करूया. प्रतिदिन कुलदेवी आणि श्री दत्तगुरु यांचा नामजप भवपूर्ण करण्याचा प्रयत्न करूया.