हिंदु धर्मातील सर्व सण, उत्सव तसेच व्रते यांवेळी रांगोळी काढली जाते. कोणताही सण-उत्सव कोणत्या तरी देवतेशी संबंधित असतो. त्या वेळी देवतेचे तत्त्व वातावरणात नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात असते. त्या तत्त्वाचा सर्वांना अधिकाधिक लाभ व्हावा; म्हणून ते तत्त्व आकृष्ट, तसेच प्रक्षेपित करणार्या रांगोळ्या काढाव्यात.
यादृष्टीने या लेखात आपण दत्ततत्त्व आकृष्ट करणार्या काही रांगोळ्या पहाणार आहोत. दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने अधिक प्रमाणात कार्यरत असते. या दिवशी दत्ताची नामतजपादी उपासना मनोभावे करण्यासह प्रस्तूत लेखात दिलेल्या रांगोळ्या काढल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास साहाय्य होईल.
सात्त्विक रांगोळ्यांचे वैशिष्ट्य
सात्त्विक रांगोळ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यातून प्रक्षेपित होणार्या देवतांच्या तत्त्वांमुळे उपासकाला शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती या ५ प्रकारच्या अनुभती येऊ शकतात.
१. दत्ताची पूजा करतांना दत्ततत्त्व आकर्षित करणार्या आकृतीबंधाचा वापर करणे
१ अ. दत्ततत्त्व आकर्षित करणारा आकृतीबंध
अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व. दत्ततत्त्व आकर्षित करण्यासाठी जसे दत्ताला निशिगंध, जाईचे फूल वहातात, तसे काही आकृती-बंधांमुळेही दत्ततत्त्व आकर्षित होण्यास साहाय्य होते. दत्ततत्त्वाला आकर्षित करणारा एक आकृतीबंध येथे दाखवला आहे. ही आकृती रांगोळी, तोरण इत्यादींमध्ये वापरल्यास दत्ततत्त्वाचा अधिकाधिक लाभ होतो.
२. दत्ततत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्या काही रांगोळ्या
दत्ताच्या पूजेपूर्वी, तसेच दत्त जयंतीला घरी किंवा देवळात दत्ततत्त्व आकृष्ट करणार्या आणि प्रक्षेपित करणार्या सात्त्विक रांगोळ्या काढाव्यात. अशा रांगोळ्यांमुळे दत्ततत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित झाल्यामुळे वातावरण दत्ततत्त्वाने भारित होऊन भक्तांना त्याचा लाभ होतो.
२ अ. या रांगोळ्यांमध्ये दर्शवलेले रंगच शक्यतो रांगोळ्यांमध्ये वापरावेत; कारण ते रंग सात्त्विक आहेत. अशा रंगांमुळे रांगोळीची सात्त्विकता वाढायला साहाय्य होते. रांगोळीची सात्त्विकता वाढली की, देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट व्हायला साहाय्य होते.
२ आ. रांगोळ्यांमध्ये अधिकतम १० टक्के देवतेचे तत्त्व आणता येऊ शकते. न्यूनतम ४ टक्के तत्त्व असलेल्या रांगोळ्या पुढे दिल्या आहेत.
२ इ. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांची शक्ती एकत्रित असते’, या अध्यात्मातील तत्त्वानुसार रांगोळीचे रूप आणि रंग यांत थोडा जरी पालट केला, तर रांगोळीतील स्पंदने (शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती) कशी पालटतात, हे पुढील रांगोळ्यांवरून लक्षात येईल.
१. दत्ताविषयी व्यक्त भाव जागृत करणारी आणि दत्ततत्त्व प्रक्षेपित करणारी रांगोळी
दत्ताला मूर्तीस्वरूपात पूजतांना ही रांगोळी काढावी. या रांगोळीत पुढे वर्णन केल्याप्रमाणे रंग भरल्याने दत्ताविषयी भाव जागृत होतो.
२. अव्यक्त भाव निर्माण करणारी आणि दत्ततत्त्व प्रक्षेपित करणारी रांगोळी
व्यक्त भावाची स्पंदने असणार्या रांगोळीची दिशा पालटून तिचे कोन पालटल्याने तिच्यातून अव्यक्त भावाची स्पंदने निर्माण होतात. या रांगोळीतील रंग व्यक्त भाव असलेल्या रांगोळीतील रंगांप्रमाणेच आहेत.
ही रांगोळी दत्ताच्या पादुका किंवा दत्ताला औदुंबर स्वरूपात पूजतांना काढावी. मूर्तीपेक्षा पादुकांच्या किंवा औदुंबराच्या ठिकाणी दत्ततत्त्व आहे, असा भाव ठेवून उपासना करण्याने अव्यक्त भाव जागृत होतो. व्यक्त भावापेक्षा अव्यक्त भाव श्रेष्ठ आहे.
३. भाव आणि आनंद यांची स्पंदने निर्माण करणारी अन् त्यांचे प्रक्षेपण करणारी रांगोळी
भाव अन् आनंद यांची स्पंदने निर्माण करणारी ही रांगोळी दत्तजयंतीला काढावी.
४. शांतीची स्पंदने आकृष्ट करणारी आणि प्रक्षेपित करणारी रांगोळी
भाव आणि आनंद निर्माण करणार्या रांगोळीची दिशा पालटल्यास त्यातून शांतीची स्पंदने आकृष्ट होतात. या रांगोळीतील रंग भाव आणि आनंद यांची स्पंदने असलेल्या रांगोळीतील रंगांप्रमाणेच आहेत.