सत्संग २७ : आपत्काळ आणि साधनेचे महत्त्व

गेल्या आठवड्यात आपण संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण हा विषय समजून घेतला होता. आजच्या सत्संगामध्ये आपण आपत्काळ आणि साधनेचे महत्त्व यांविषयी जाणून घेणार आहोत.

जसे चांगले आणि वाईट असे २ प्रकार असतात, तसे काळाचेही २ प्रकार असतात. एक अनुकूल आणि दुसरा प्रतिकुल. अनुकूल काळ म्हणजे संपत्काळ, तर आपत्काळ म्हणजे संकटकाळ अर्थात आपत्काळ !

आपण पहातो की, अलिकडच्या काळात वेगवेगळ्या प्रकारची संकटे आली. कोरोना नावाच्या विषाणूचा अनुभव, त्या महामारीची भिषणता आपण सर्वांनीच अनुभवली आहे. एक सूक्ष्मविषाणू संपूर्ण जगाचे दळणवळण ठप्प करेल, असे कधीतरी आपल्याला वाटले होते का ? नाही ना ? मागील काही वर्षांमध्ये अतिवृष्टी, अनावृष्टी चक्रीवादळ, स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू अशी अनेक प्रकारची संकटे लक्षात आली. देशविदेशात सतत कुठल्या ना कुठल्या आजाराची टांगती तलवार आपल्यावर आहेच, हे आपण पहात आहोत. आजही घरोघरी आजारपणं वाढलेली दिसतात. सध्या आपण हवामानातील चढउतार अनुभवत आहोत. अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असतो, तर काही ठिकाणी एकाच वेळी कडाक्याची थंडी आणि तीव्र ऊन अशा विषम तापमानाचा सामना करावा लागतो आहे. त्यातच तिसर्‍या महायुद्धाचे संकटही आहेच.

आज जगभरात अनेक देश अणुऊर्जा संपन्न झाले खरे; पण एक प्रकारची जागतिक असुरक्षितताही निर्माण झाली आहे. कोणत्या देशाकडून कधी युद्धाची ठिणगी पडेल, ते सांगता येत नाही. ज्योतिषशास्त्रानुसारही काही ज्योतिष अभ्यासकांनी ‘भारतासहित संपूर्ण जगामध्ये युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते’, असे म्हटले आहे. या सर्वांचा आर्थिक गोष्टींवरही निश्चितपणे परिणाम होतो. आज पेट्रोलचे भाव, तसेच महागाई प्रतिदिन वाढत आहे. अनेक बँका आज डबघाईला आल्या आहेत. हे सगळे चित्र काय दर्शवते ? यातून सध्याचा काळ हा एकप्रकारे आपत्काळाचेच स्वरूप आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे.

 

संकटकाळाचे कारण

अशी स्थिती निर्माण होण्यामागचे कारण आणि उपाय या दोन्हींविषयी हिंदु धर्मशास्त्राने सांगून ठेवले आहे. हिंदु धर्मशास्त्र सांगते की, ‘धर्माचरणाचा र्‍हास होऊन अधर्म बळावला की, पृथ्वीवर संकटे येतात’. धर्माचरणाचा किती प्रमाणात र्‍हास झाला आहे, हे आपण पहातच आहोत. कित्येक घरांमध्ये प्रतिदिन देवपूजाही केली जात नाही. आज पुढारलेपणाच्या नावाखाली आपल्या प्राचीन परंपरा मोडीत काढल्या जात आहेत. आपले आचार-विचार, वेशभूषा, केशभूषा, भाषा या सर्वांवर पाश्चात्त्य विकृतीचा पगडा बसला आहे. त्यामुळेच संकटांची मालिका चालू झाली आहे. अशा संकटकाळात भौतिक साधनसामुग्री, वैज्ञानिक प्रगती, पैसा-अडका कधीतरी आपल्या मदतीला येईल का ? नाही ना ? त्यासाठी साधनेचे बळच आवश्यक आहे.

 

आपत्काळाविषयी संत आणि द्रष्टे यांची भाकिते

आपल्याला असे वाटेल की, हे सगळे अचानक कसे उद्भवले ? तर, हे अकस्मात् वगैरे आलेले नाही. अनेक संत, द्रष्टे यांनी आधीच आपत्काळाविषयी सांगून ठेवले आहे.

१. नॉस्ट्रॅडॉमस : ४०० वर्षांपूर्वी फ्रान्समधील भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॉमस यांनी अनेक भविष्य वर्तवली होती. त्यातील बरीचशी तंतोतंत खरी ठरली. त्यांनी तिसर्‍या महायुद्धाविषयीही सांगितले आहे, ‘हे तिसरे महायुद्ध इतके महाभयंकर होणार आहे की, तुम्हाला पहिली दोन महायुद्धे खेळण्यासारखी वाटतील !’

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीही ३० वर्षांपूर्वीच आपत्काळाविषयी सांगून ठेवले होते. त्यांनी म्हटले आहे की, ‘तिसर्या महाभयंकर युद्धात भारत गोवला जाईल. गावेच्या गावे उद्ध्वस्त होतील. अणुबॉम्बच्या साहाय्याने होणारा संहार पुष्कळ असेल. वर्ष २०२१ पासून आपत्काळाची तीव्रता पुष्कळ वाढेल. वर्ष २०२५ पर्यंत, म्हणजे भारतात ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होईपर्यंत आपत्काळ असेल. त्यातून तरून जायचे असेल, तर साधना आवश्यक आहे.’ संतवचनावर श्रद्धा ठेवून आपण कृती केली, देवाची भक्ती केली, तर देवच आपले रक्षण करील.

 

आपत्काळात साधनेचे महत्त्व

वरकरणी सध्याची सर्व परिस्थिती भौतिक, राजकीय किंवा पर्यावरणीय वाटली, तरी हा कालचक्राचा परिणाम आहे, हे लक्षात घ्यायला हवे. कालचक्रानुसार कलियुगांतर्गत कलियुगांर्तगत कलियुग समाप्त हेऊन कलियुगांतर्गत कलियुगांतर्गत सत्ययुग चालू होण्याचा हा काळ आहे. याला ‘संधीकाळ’, असेही म्हणतात.

संधीकालात साधना करणार्‍यांची साधना अतिशय जलद गतीने होत असते. अन्य काळात १ सहस्र वर्षे साधना केल्यानंतर जे फळ प्राप्त होते, ते संधीकाळात काही कालावधीत प्राप्त होते. त्यामुळेच हा आपत्काळ साधनेसाठी सुवर्णसंधीकाळच आहे. त्याचा आपण स्वतःच्या साधनेसाठी लाभ करून घ्यायला हवा. आपण सगळे भाग्यवान आहोत की, अशा संधीकाळात साधना करण्याची संधी आपल्याला मिळत आहे. असा काळ शेकडो वर्षे पुन्हा येणार नाही. त्यामुळे आज नाही, तर आताच्या क्षणापासून आपण साधनेला झोकून देऊन आरंभ करूया.

 

न मे भक्तः प्रणश्यति

देवाची भक्ती केल्याने काय घडू शकते, याची उदाहरणे आपल्या इतिहासात आहेत. हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद क्षणोक्षणी नारायणाचे नाव घ्यायचा. प्रल्हादाने देवाचे नाव घेऊ नये; म्हणून हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला पुष्कळ त्रास देण्याचा प्रयत्न केला. प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकले, उंच कड्यावरून फेकून दिले, तरीही त्याला काही झाले नाही. उलट भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवंताला अवतार धारण करून प्रगट व्हावे लागले. हे भक्तीचे सामर्थ्य आहे. भगवान श्रीकृष्णानेही ‘न मे भक्तः प्रणश्यति’ असे वचन दिले आहे. याचा अर्थ, माझ्या भक्ताचा कधी नाश होणार नाही. भगवंताने आगामी आपत्काळात आपले रक्षण करावेसे वाटत असेल, तर आपण देवाचे भक्त बनले पाहिजे. आताच्या काळातही अनेक जणांनी देवाने संकटकाळात आधार देऊन त्यांचे रक्षण केल्याच्या अनुभूती घेतल्या आहेत. जसे जात्याच्या खुंट्याजवळ असलेले दाणे भरडले जात नाहीत, त्याप्रमाणे साधनारूपी खुंट्याला धरून राहिलो, तर आपलाही उद्धार होणारच आहे, याची निश्चिती बाळगा.

साधना केल्याने आत्मबळ निर्माण होते. व्यावहारिक आवश्यकता अल्प होतात. दुःख सहन करण्याची क्षमता वाढून आनंदी रहाता येते. कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते. साधना म्हणजे काय ?, हे आपण आतापर्यंतच्या सत्संगात समजून घेतले आहे. साधना करण्यासाठी सर्वसंगपरित्याग करण्याची आवश्यकता नाही. संसारात राहूनही साधना करता येते. नामजप ही आताच्या काळातील सर्वश्रेष्ठ साधना आहे. त्यामुळे प्रतिदिन एकाग्रतेने आणि भावपूर्ण नामजप करणे आवश्यक आहे, तसेच आपले मन निर्मळ करण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे.

 

ध्येयनिश्चिती

साधनेमध्ये तात्त्विक विषयाला केवळ २ टक्के, तर प्रत्यक्ष कृतीला ९८ टक्के महत्त्व आहे. आपल्या साधनेच्या प्रयत्नांना गती येण्यासाठी आपण प्रतिदिन ध्येय ठरवून प्रयत्न करायला हवेत. कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असतांना ध्येय ठेवण्याचे महत्त्व आहे. ध्येयामुळे आपण चिंतनशील बनतो, आपल्या प्रयत्नांना गती मिळते आणि आपण कृतीशील होतो. आपण प्रतिदिन किमान १ घंटा बसून एकाग्रतेने नामजप करणार, स्वभावदोष निर्मूलन सारणीमध्ये किमान ५ चुका लिहिणार, प्रतिदिन किमान ५ स्वयंसूचना सत्रे करणार, अशा प्रकारचे ध्येय ठरवू शकतो. ध्येय
ठेवले, त्याचा आढावा दिला, अडचणी वेळोवेळी विचारून घेतल्या, तर आपल्या प्रयत्नांना गती येईल.

 

वर्तमानकाळात रहा

आगामी काही वर्षे प्रतिकुल असली, तरी त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. कालमहिम्यानुसार आपत्काळानंतर संपत्काळ म्हणजे चांगला काळ येणारच आहे. ओहोटीनंतर भरती, रात्रीनंतर दिवस हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे पुन्हा चांगला काळ कधी येईल, याचा अनावश्यक विचार करायला नको. आपण रात्र लवकर कधी संपणार, असा विचार केल्याने सूर्योदय लवकर होतो का ? नाही ना ? सूर्योदय जेव्हा होणार असेल, तेव्हाच होतो. त्यामुळे आपणही भूतकाळ, भविष्यकाळ यांचा अनावश्यक विचार न करता वर्तमानकाळात राहून आताचा क्षण जगला पाहिजे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेही सांगतात की, साधना करणार्‍यांनी नेहमी वर्तमानकाळात रहायला पाहिजे. साधना करतांना आपली श्रद्धा वाढत गेली की, भविष्यकाळाची काळजी उरत नाही; कारण ‘देव जे काही करतो, ते भल्यासाठीच’, अशी श्रद्धा दृढ होते आणि साधनेमुळे भूतकाळही पुसला जातो. त्यामुळे आपण आताच्या क्षणापासूनच साधना झोकून देऊन आणि प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करूया.

 

सनातनचे ग्रंथ

आपत्काळाच्या पार्श्वभूमीवर आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर काय प्रयत्न करावेत ?, याविषयी सनातनने ग्रंथही प्रकाशित केले आहेत. त्यामध्ये अतिशय प्रायोगिक स्तरावर सूत्रे दिलेली आहेत. हे ग्रंथ www.sanatanshop.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आपण या ग्रंथांचाही अवश्य लाभ करून घेऊया.

आपत्काळ कितीही कठीण असला तरी साधना केल्यामुळे तो सुसह्य होणारच आहे, हे आज भगवंताने आपल्या लक्षात आणून दिले. त्यामुळे नामजप आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया अधिक जोमाने आणि मनापासून करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या लक्षात आलेले आपत्काळातील साधनेचे महत्त्व, शिकायला मिळालेली सूत्रे परिचित, कुटुंबीय यांना सांगणे आवश्यक आहे. तसे प्रयत्न आपण या आठवडयात करूया.

Leave a Comment