सत्संग २६ : संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण

गेल्या आठवड्यात आपण उपासनाकांड आणि ज्ञानकांड यांचे महत्त्व समजून घेतले होते. आजच्या सत्संगामध्ये आपण संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण यांविषयी जाणून घेणार आहोत.

 

संचित, प्रारब्ध आणि साधनेचे महत्त्व

आता आपण आजच्या सत्संगाच्या मुख्य विषयाकडे वळूया. आतापर्यंतच्या सत्संगांमध्ये आपण जीवनात साधना करण्याचे महत्त्व, अष्टांग साधनेची सूत्रे आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया समजून घेतली. आज आपण प्रारब्ध म्हणजेच ज्याला सर्वसामान्य भाषेत नशीब म्हटले जाते, ते म्हणजे नेमके काय ? संचित कर्म, तसेच क्रियमाण कर्म म्हणजे काय ? आणि मनुष्याच्या जीवनावर त्याचा प्रभाव कसा पडतो ?, हे समजून घेणार आहोत.

प्रस्तावना

मनुष्याचे जीवन म्हटले की सुख आणि दुःख हे आलेच ! जीवनात ‘दुःख नको’; म्हणून ते टाळता येत नाही आणि सुख कितीही ‘ये ये’ म्हटले तरी ते येत नाही. याचे कारण काय, तर प्रत्येकाचे प्रारब्ध ! ते आपल्याला भोगूनच संपवावे लागते. ‘जे पेरले तेच उगवते’ या म्हणीनुसार आपल्या वाट्याला येणारे प्रारब्ध हे आपल्याच गत जन्मांतील चांगल्या-वाईट कर्मांचे फळ आहे. प्रारब्ध हे भोगूनच संपवावे लागते. अगदी संतांनाही प्रारब्धाचे भोग चुकले नाहीत, तेथे आपल्यासारख्या सर्वसामान्यांची काय कथा ! हे एकदा मनाला स्पष्ट झाले की, जीवनात घडणार्‍या चांगल्या – वाईट घटना आपल्याला सहज स्वीकारता येतात.

हिंदु धर्माचे महत्त्वाचे सिद्धांत

कर्मफलसिद्धांत आणि पुनर्जन्म सिद्धांत हे हिंदु धर्माचे २ महत्त्वाचे सिद्धांत आहेत. कर्मफलसिद्धांत असे सांगतो की, केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ तुम्हाला भोगावेच लागते. जर सत्कर्म केले, तर पुण्य मिळते, वाईट कर्म केले, तर पाप वाट्याला येते. पुनर्जन्मसिद्धांतानुसार व्यक्तीने आयुष्यभर केलेल्या कर्मानुसार तिला मृत्यूनंतर पुढची गती मिळते. व्यक्तीकडून झालेले पुण्यकर्म आणि पापकर्म यांचे फळ व्यक्तीला याच जन्मात भोगावे लागते, असे नाही, तर काही वेळा ते पुढील जन्मांतही भोगावे लागते. ते म्हणजेच संचित आणि प्रारब्ध.

मनुष्यजन्माचा उद्देश

आपण जन्माला यायचे मुख्य दोन उद्देश आहेत. पहिला म्हणजे मोक्षप्राप्ती करून जीवनमृत्यूच्या फेर्‍यांतून मूक्त होणे आणि दुसरे म्हणजे प्रारब्धभोग भोगून संपवणे. प्रत्येक जन्मात आपल्याकडून चुकाच झाल्याने देव पुनःपुन्हा आपल्याला देवाकडे जाण्याची संधी देत आहे. जेणेकरून या जन्मात तरी साधना करून आपण पुढच्या लोकात जाऊ. आपण या संधीचा म्हणजेच मनुष्यजन्माचा लाभ करून घेऊन स्वतःचा उद्धार होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

पुण्यकर्मापेक्षाही साधना महत्त्वाची

जसे शैक्षणिक प्रगती होण्यासाठी शिक्षण घ्यावे लागते, तसे आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी साधना करावी लागते. आध्यात्मिक उन्नती होऊन
मुक्ती मिळेपर्यंत आत्म्याचा पुन्हा पुन्हा जन्म होत असतो. एखादी व्यक्ती समजा आयुष्यभर पुण्यकर्म करत आहे; परंतु तिने साधना केली नाही, तर तिला जन्म-मरणाच्या चक्रातून मुक्ती मिळेल का ?, तर याचे उत्तर ‘नाही’, असे आहे. याचे कारण म्हणजे त्या व्यक्तीला मृत्यूनंतर चांगल्या कर्मांमुळे स्वर्गप्राप्ती होते. पुण्यबळाचा साठा असेपर्यंत ती तेथे रहाते आणि मग पुण्यबळ संपले की, तिला पृथ्वीवर गत जन्मांतील प्रारब्ध भोगण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागतो. पापकर्मे करणार्‍या व्यक्तीचे आध्यात्मिक पतन होते आणि मृत्यूनंतर त्वरित पुन्हा मनुष्ययोनीत जन्म मिळत नाही, तर कीटक, पशू, पक्षी, वृक्ष अशा ८४ लक्ष कनिष्ठ योनींमध्ये जन्म घ्यावा लागतो. साधना केली नाही, तर अशा प्रकारे ‘पुनरपि जननम्, पुनरपि मरणम्…’ असे चालूच रहाते; म्हणून मनुष्यजन्मात साधना करणे महत्त्वाचे आहे.

संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण यांचे सोपे विश्लेषण

सहस्रो, लक्षावधी, कोट्यवधी वर्षांपूर्वी कधीतरी आपला पहिला जन्म झालेला असतो. तेव्हा हवे तसे वागण्यासाठी परमेश्वराने सगळ्या गोष्टी पूर्णपणे आपल्या हाती दिल्या होत्या. तेव्हा आपण जे कर्म केले, ते सगळे क्रियमाणकर्म झाले. जे आपल्या हातात असते, त्याला क्रियमाण म्हणतात. त्या जन्मात आपण काही चांगली कर्मे केली, तर काही वाईट. या चांगल्या-वाईटाचा परिणाम आपल्याला भोगायचा आहे, त्याला संचित म्हणतात. त्यापैकी थोडा भाग आपण या जन्मात भोगला, तर ते प्रारब्ध झाले. संचितापैकी या जन्मात भोगायचा भाग म्हणजे प्रारब्ध ! पहिल्या जन्मातील संचित दुसर्‍या जन्मात पूर्णपणे भोगून होत नाही, तसेच दुसर्‍या जन्मातील कर्मामुळे संचितात भर पडत जाते. त्यामुळे आपले संचिताचे गाठोडे वाढत जाते. अशा प्रकारे आपल्या आतापर्यंतच्या लक्षावधी जन्मांच्या संचितापैकी थोडा भाग या जन्मात आपण प्रारब्ध रूपाने घेऊन येत आहोत.

कलियुगात प्रारब्ध आणि क्रियमाण यांचे प्रमाण

कलियुगात क्रियमाण केवळ ३५ टक्के आहे आणि ६५ टक्के गोष्टी प्रारब्धामुळे होत आहेत. असाच काळ पुढे पुढे जाऊन जेव्हा कलियुगाचा अंत येईल, तेव्हा आपल्या जीवनातील १०० टक्के गोष्टी प्रारब्धानुसार घडतील.

अहंकाराचा पोकळपणा

महर्षि व्यासांनीही म्हटले आहे की, ‘पूर्वजन्मकृतं कर्म तदैवमिति कथ्यते ।’ म्हणजे पूर्वजन्मांच्या कर्मांची फळे या जन्मी भोगावी लागतात. त्यांचा कार्यकारणभाव लक्षात येत नसल्यानेच त्यांना ‘दैव, नशीब किंवा प्रारब्ध’, असे म्हणतात. जन्माला येणार्‍या व्यक्तीची जन्मजात वृत्ती आणि व ती व्यक्ती किती काळ जगणार, हे त्या व्यक्तीच्या प्रारब्धकर्मानुसार ठरते. कर्मभोग भोगून संपले की, मृत्यू येतो. केवळ जन्म आणि मृत्यू एवढ्याच नाही, तर जीवनातील बर्‍याच गोष्टी नियतीच्या अधीन असतात. एका संस्कृत श्लोकात म्हटले आहे की, अन्न, धन, विवाह, जन्म आणि मृत्यू या पाच गोष्टी प्राक्तनाच्या, म्हणजे पूर्वकर्माच्या स्वाधीन आहेत. त्यामुळे ‘मी केले’ हा अहंकार खोटा आहे. व्यक्तीची जन्मवेळ, गुण, शरीराची घडण, आजार, निरनिराळी सुख-दुःखे, रहाण्याचे ठिकाण (देश-स्थळ), कुटुंब इत्यादी सर्व प्रारब्धाने ठरते.

प्रारब्धाचे प्रकार आणि उपासना

प्रारब्धाचे तीन प्रकार आहेत. मंद प्रारब्ध, मध्यम प्रारब्ध आणि तीव्र प्रारब्ध.

१. मंद प्रारब्ध

मंद प्रारब्ध साधनेने टाळता येते. त्यासाठी साधना कोणती करायची, तर कुलदेवतेची उपासना ! कुलदेवीची उपासना आणि नामस्मरण यांचे महत्त्व आणि ते कसे करायचे, हे आपण सुरुवातीच्या सत्संगांमध्ये पाहिले आहे. प्रारब्धभोग सहन करण्याची क्षमता वाढवणे किंवा मंद प्रारब्ध असेल, तर ते नष्ट करणे हे सर्व कुलदेवतेच्या उपासनेने साध्य होते. जीवनातील ६५ टक्के समस्या प्रारब्धामुळे निर्माण होत असल्यामुळे प्रत्येकाला कुलदेवतेचे काही ना काही करणे आवश्यकच आहे. त्यामुळे देव आपल्याला अशा ठिकाणी जन्माला घालतो की, ज्या कुलदेवतेचे नाम आपले प्रारब्ध घालवण्यासाठी उपयुक्त आहे.

२. मध्यम प्रारब्ध

मध्यम प्रारब्ध घालवण्यासाठी संतांची किंवा गुरूंची कृपा असावी लागते. त्यांच्या संकल्पानेच ते जाऊ शकते. संतांना प्रसन्न करण्यासाठी काय करावे, तर त्यांच्या कार्यात सहभागी व्हावे. संतांचे किंवा परमेश्वराचे, अवतारांचे एकच कार्य असते, ते म्हणजे लोकांना साधनेकडे वळवणे आणि त्यांची प्रगती घडवून आणणे. या कार्यात आपण सहभागी झाल्यास आपल्यावरही संतांची, गुरूंची कृपा होते. समजा एखाद्या समारंभात आपल्याकडे एखाद्या कामाचे दायित्व आहे. त्या कामात आपल्याला कोणी साहाय्य करायला आल्यावर आपल्याला तो जसा आपला वाटतो. त्याप्रमाणे संतांचे जे कार्य आहे, समाजात सत् चा प्रसार करणे, लोकांमध्ये त्याची आवड निर्माण करणे, या कार्यात जीव झोकून दिला की, संत म्हणतात ‘हा माझा आहे’. त्यायोगे मध्यम प्रारब्ध संपते.

३. तीव्र प्रारब्ध

तीव्र प्रारब्ध असल्यास संत आणि गुरुरूही त्याच्या आड येत नाहीत. तीव्र प्रारब्धाचे भोग परमेश्वरानेच भोगण्यासाठी दिलेले असतात. परमेश्वर आणि संत किंवा गुरु निराळे नसल्याने ते यात ढवळाढवळ करत नाहीत. ते प्रारब्ध भोगण्याची क्षमता मात्र गुरु शेवटपर्यंत देत रहातात.

प्रारब्ध म्हणजे एकप्रकारे ईश्वराच्या बँकेत असलेल्या आपल्या खात्यातील आपल्या गेल्या अनेक जन्मांतील जमा-खर्चाचा (पुण्य-पापाचा) हिशोब असतो. खात्यात जे जमा असेल, तेच आपल्याला मिळते. जे आपले नाही, ते ईश्वरही आपल्याला देत नाही. हाच विचार आपण नेहमी केला, तर प्रारब्धाचे भोग भोगतांना आपल्याला दुःख होत नाही. माणसाला दुःख सहन करण्यासाठी धीर यायलाही प्रारब्धवाद उपयोगी पडतो.

क्रियमाण कर्माचे महत्त्व

जर बर्‍याचशा घटना प्रारब्धानुसारच होणार असतील, तर साधनेमुळे काय लाभ होतो, असा प्रश्न पडू शकतो. याचे उत्तर असे की, साधनेमुळे प्रारब्ध सुसह्य होते. दुःख हे दुःख वाटत नाही. जीवनावर प्रारब्धाचा प्रभाव असला, तरी प्रारब्धापेक्षा क्रियमाण कर्म अधिक श्रेष्ठ असते. क्रियमाण कर्म १ टक्का असले, तरी साधनेने ९९ टक्के प्रारब्धावर मात करता येते. क्रियमाण म्हणजे काय, तर साधना करणे ! प्रारब्धात काय आहे, हे माहीत नसले, तरीही साधना करत राहिल्यास प्रारब्ध आणि संचित कर्मे हळू हळू कमी होऊ लागतात. हे साधनेचे महत्त्व आहे. कित्येक साधक असे आहेत की, त्यांचे तीव्र प्रारब्ध साधना केल्यामुळे कमी झाले आणि आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांच्या जन्माचे सार्थक झाले. कोणतेही औषध किंवा कोणतेही यंत्र मनुष्याचे प्रारब्ध कधीतरी कमी करू शकते का ? नाही ना ? ते केवळ साधनेमुळेच शक्य होते. साधना हेच सगळ्या समस्यांचे उत्तर आहे, हे आपण लक्षात घेऊया आणि मनापासून आणि झोकून देऊन साधना करून याच जन्मात मनुष्यजन्माचा उद्धार करून
घेऊया.

सनातन-निर्मित ग्रंथ

संचित, प्रारब्ध, क्रियमाण आणि साधना यांविषयी सनातनने संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण कर्म, तसेच कर्मयोगाविषयी अन्य ग्रंथ प्रकाशित केले आहेत. ते www.sanatanshop.com या संकेतस्थळावर ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आपण त्याचा लाभ घेऊ शकता.

 

नामजप आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया अधिक मनापासून आणि सातत्याने करण्याचा प्रयत्न करूया. सेवेतील आनंद मिळविण्यासाठी सेवेत सहभागी होऊया. आपल्याला सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे परिचितांना, कुटुंबियांना सांगण्याचा प्रयत्न आपण या आठवडयात सुद्धा करूया. संधीकालात साधना करणार्‍यांची साधना अतिशय जलद गतीने होत असते. त्यामुळेच आपत्काळ हा साधनेसाठी सुवर्णसंधीकाळच आहे. त्याचा आपण स्वतःच्या साधनेसाठी लाभ करून घ्यायला हवा. यासाठी पुढील सत्संगात आपण ‘आपत्काळ आणि साधना’, हा विषय पहाणार आहोत.

Leave a Comment