सत्संग २५ : उपासनेचे महत्त्व

गेल्या आठवड्यात आपण अ-१, अ-२ आणि अ-३ पद्धतीने स्वयंसूचना कशा तयार करायच्या याचा सराव करून घेतला होता. आजच्या सत्संगामध्ये आपण उपासनाकांड आणि ज्ञानकांड यांचे महत्त्व समजून घेणार आहोत.

 

उपासनाकांड आणि ज्ञानकांड यांचे महत्त्व

आतापर्यंतच्या सत्संगांत आपण अष्टांग साधनेचे महत्त्व, तसेच आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया समजून घेतली. आपण प्रसंगांनुरूप विविध धार्मिक विधी आणि सण साजरे करण्यामागचे शास्त्रही समजून घेत आहोत. आजच्या सत्संगात आपण कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड या उपासना पद्धतींचे तुलनात्मक महत्त्व आणि जलद आध्यात्मिक प्रगतीसाठी साधनेचे कोणते प्रयत्न करावेत, हा महत्त्वपूर्ण विषय समजून घेणार आहोत.

प्रस्तावना

त्यापूर्वी आपण साधना करण्याचे आणि सत्संगाचे महत्त्व समजून घेऊया. आपण सत्संगामध्ये का येतो ? सत्संगात आल्यापासून आपल्याला स्वतःच्या संदर्भात काय वैशिष्ट्यपूर्ण पालट लक्षात आले ? थोडक्यात, आपल्याला चांगले वाटते, मन शांत होते, नवीन सूत्रे शिकायला मिळतात म्हणून आपण सत्संगात येतो. सत्संगात आपल्याला आनंद मिळतो. याचे कारण सत्संगात ईश्वराविषयीची चर्चा होत असते. ईश्वर सत्-चित्-आनंद स्वरूप आहे. केवळ ईश्वराविषयी चर्चा केल्याने, त्याविषयी श्रवण केल्याने आनंद मिळतो, तर प्रत्यक्ष ईश्वराशी एकरूप झालो, ईश्वरप्राप्तीच्या दिशेने एक एक पाऊल टाकले, तर आपल्याला किती आनंद मिळेल !

ईश्वरप्राप्ती करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. कोणत्याही योगमार्गानुसार साधना केली, तरी ईश्वरप्राप्ती होते; पण आपल्याला काय करायचे आहे, तर जलदगतीने ईश्वरप्राप्ती करून देणारा मार्ग निवडायचा आहे. व्यवहारातही आपण असेच करतो ना ! समजा, एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी बैलगाडी, दुचाकी, रेल्वे, विमान असे पर्याय उपलब्ध आहेत आणि ते वापरणे सहज शक्य आहे, तर आपण सर्वसामान्यपणे कोणता पर्याय निवडू ? विमानाचा ना ? तसेच अध्यात्मातही आहे. साधनेच्या संदर्भात पहायचे झाले, तर जलद ईश्वरप्राप्ती करण्याचा मार्ग म्हणजे गुरुकृपायोग ! गुरुकृपेविना अध्यात्मात खरी प्रगती होत नाही. ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग असे मोक्षप्राप्तीचे वेगवेगळे मार्ग आहेत, तर गुरुकृपायोगात या तिनही योगमार्गांचा संगम आहे. ही कुठलीही सांप्रदायिक साधना नाही, तर प्रत्येक व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत करणारी वाट आहे. म्हणूनच आपण या सत्संगांमध्ये गुरुकृपायोगानुसार साधना शिकत आहोत. अध्यात्म हे कृतीचे आणि अनुभूतीचे शास्त्र असल्याने प्रत्यक्ष कृती करण्याला, म्हणजेच अध्यात्म जगण्याला महत्त्व दिले आहे. स्वत:च्या मनाला रूचेल अशी उपासना करण्याऐवजी आपण काळानुरूप साधना केली, तर त्याचे अधिक फळ मिळते.

काळानुसार साधना

काळानुसार साधना म्हणजे काय, तर त्या त्या काळात करण्यासाठी योग्य असलेली साधना ! काळ हा अनंत असल्याने युगाच्या भाषेतच मोजता येतो. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग ! सत्ययुगात ‘सोऽहं’भाव होता आणि ज्ञानयोग होता. त्या काळच्या लोकांमध्ये वेदांचा भावार्थ समजून घेण्याची क्षमता होती. त्रेतायुगात समाधीसारख्या खडतर तपश्चर्या होत्या. हे सगळे करण्याची मन आणि शरीराची क्षमता न्यून झाल्यावर द्वापारयुगात कर्मकांड ही साधना झाली. त्यात यज्ञयाग हा मुख्य भाग होता. पुढे कलियुगात हे करणेही कठीण होऊ लागले; याचे कारण यज्ञयागांसाठी लागणारे आवश्यक ते धन, सात्त्विक वस्तू, पुरोहित इत्यादी मिळणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे, हे आताच्या काळातही आपण पहातो; पण अशा परिस्थितीतही भगवंताने आपली उत्तम सोय केली आहे. कलियुगात जलद गतीने जास्तीतजास्त आध्यात्मिक उन्नती करता यावी म्हणून नामसाधना ही सर्वोत्तम साधना सांगितली आहे. अनेक संतांनीही नामस्मरण हीच साधना सांगितली आहे. आपणही आपले नामस्मरण कसे नियमित होईल ? कसे एकाग्रतेने होईल ? याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. नामस्मरण ही साधना तुलनेने सोपी आहे. नाम घ्यायला शौच-अशौच, सोयर-सुतक-मासिक धर्म, काळ-वेळ आदी कशाचेच बंधन नाही.

आताच्या काळात कर्मकांड करण्याच्या मर्यादा

याउलट कर्मकांडाला अनेक बंधने आहेत. यज्ञयाग किंवा आताच्या काळात पहायला गेले, तर पूजा-अर्चा, व्रत वैकल्ये अशांसारखे धार्मिक विधी कर्मकांडात येतात. हे करत असताना ती ती बंधने आपल्याला पाळावी लागतात. कर्मकांड करतांना काही नियम पाळावे लागतात. सर्व नियम पाळून केलेल्या कर्मकांडाचे फळ जरी १०० टक्के सांगितलेले असले, तरी आपण पाहिले की आज सद्यस्थितीत सात्त्विक वस्तू, पुरोहित इत्यादी मिळणेही कठीण असल्याने शंभर टक्के नियम पाळणे कठीण आहे. अशाप्रकारे केलेल्या कर्मकांडाचे फळ कधीतरी शंभर टक्के मिळेल का ? त्याशिवाय ते ते उपचार करताना आपला भाव नसेल, तर त्याचा आध्यात्मिक स्तरावर अपेक्षित लाभ होत नाही; किंबहुना कर्म करतांना काही उणिवा राहिल्यास त्याचा दोषही लागतो. म्हणून कर्मकांडाला मर्यादा आहेत. त्या आता आपण समजून घेऊया.

१. पूजा

आपण घरात प्रतिदिन पूजा करतो. ती पूजा करत असतांना मन अन्य विचारांमध्ये गुरफटलेले असेल किंवा पूजेची पूर्वसिद्धता नीट न केल्याने पूजा करतांना साहित्य घेण्यासाठी मध्ये-मध्ये उठावे लागत असेल, तर पूजा हा केवळ उपचार होईल. पूजा करतांना इतरांशी बोलणे, भ्रमणध्वनीवर बोलणे असेही होत असते, अशाप्रकारे एकाग्रता नसलेल्या पूजेत भाव राहील का ? भाव नसेल, तर अध्यात्मात अपेक्षित प्रगती होईल का ?

२. मंत्रोच्चार

तसाच प्रकार मंत्रोच्चाराच्या संदर्भातही आहे. मंत्रोच्चार योग्य झाले, तर ते पुष्कळ प्रभावी असतात; पण चुकीचे मंत्रोच्चार झाले, तर त्याचा वेगळा परिणामही होऊ शकतो.

याउलट आपण नाम प्रेमाने घेतले, निरसपणे घेतले किंवा वेडेवाकडे घेतले, तरी त्याचा परिणाम सकारात्मकच होतो. ते फलदायीच ठरते. आपण घेतलेले एकही नाम वाया जात नाही. आपल्याला वाल्या कोळ्याची गोष्ट ठाऊक आहे ना ? वाल्याने राम-रामच्या ऐवजी मरा-मरा असा जाप केला, तरी त्याची सर्व पापे धुतली गेली आणि वाल्याचे वाल्मिकी ऋषी झाले. म्हणून कर्मकांडापेक्षाही नामस्मरण आणि देवाची भक्ती अधिक श्रेयस्कर आहे.

३. उपवास

उपवासाच्या संदर्भातही आपण पहातो की, एक उपचार म्हणून उपवास केला जात असला, तरी त्याचा खरा आध्यात्मिक उद्देश काय आहे, याकडे सहसा लक्ष जात नाही. उपवास याचा अर्थ भगवंताच्या जवळ जाणे. सद्यस्थितीत मात्र ‘उपवास’ म्हणजे आहारात बदल एवढेच दिसून येते. उपवास म्हटल्यावर देवाची अधिक उपासना कशी करायची, याऐवजी केवळ साबुदाणा वडे, केळ्याचे वेफर, बटाटा चिवडा, खिचडी असे कोणते फराळाचे पदार्थ करायचे याचेच नियोजन होते.

प्रत्यक्षात संतांनी सांगितले आहे, ‘नाम घेता ग्रासो ग्रासी, तो नर जेवूनी उपवासी’ ! याचाच अर्थ अन्नाचा प्रत्येक घास घेतांना नामजप केला, तर तो उपवास केल्यासारखाच असतो. नामस्मरणाच्या संदर्भात असेही म्हटले आहे की, ‘नाम घेता वाट चाली, यज्ञ तो पावलो पावली’ म्हणजेच येता-जाता आपण नामजप करत असू तर आपल्या हातून यज्ञकर्म घडल्याचे पुण्य मिळते. यातून कर्मकांडापेक्षा उपासनाकांडाचे श्रेष्ठत्व आपल्या लक्षात येते.

कर्मकांडातील काठिण्य

आताच्या स्पर्धात्मक आणि धावपळीच्या युगात कर्मकांडांतर्गत साधनेचे काटेकोर नियम पाळून संसारात राहून साधना करणे अवघड आहे, म्हणून भक्तीमार्ग सोपा आहे. कर्मकांडातील विधींचे शास्त्रशुद्ध ज्ञान असणे महत्त्वाचे असते. ते फार कमी जणांना असते. निर्णयसिंधु या ग्रंथात कर्मकांड विधीसंदर्भातील मार्गदर्शन उपलब्ध केले आहे. शास्त्रशुद्ध विधीच्या अभावी अपेक्षित फलप्राप्ती न झाल्यास विधीवर पुष्कळ व्यय झाला; परंतु अनुभवायला काहीच आले नाही, असे होऊन विधी करण्याविषयीची श्रद्धा अल्प होते. वयोपरत्वे शरीर थकत असल्याने पुढे पुढे कर्मकांडातील विधी शास्त्रशुद्ध आणि सर्व नियमांचे काटेकोर पालन करून करता न आल्यास मनाची चिडचिड होते. अशी कोरडेपणा असलेली, आनंद मिळत नसलेली, परावलंबी असलेली साधना करण्यात काय अर्थ आहे ? याचा अर्थ कर्मकांड चुकीचे आहे, असा कोणी घेऊ नये, तर उपासनाकांड सोपे आहे, असा घ्यावा. कर्मकांडाचे त्या त्या स्तरावर लाभ निश्चितपणे आहेत; पण आताच्या काळात काटेकोर कर्मकांड करणे, तुलनेने अवघड असल्याने अनेक संतांनी भक्तीमार्गाचा पुरस्कार केला आहे. म्हणूनच आपणही या सत्संगांत अष्टांग साधनेवर अधिक भर देत आहोत.

उपासनाकांडाची सुलभता

उपासना म्हणजे आराधना किंवा भक्ती करणे ! कर्मकांड आणि ज्ञानकांडाची उपासना करण्यासाठी ती योग्यता, तो अधिकार असावा लागतो; परंतु उपासनाकांडानुसार साधना करणारे भक्तीमार्गी असल्याने त्यांच्यासाठी कोणतीही अट लागत नाही. शिक्षण असो वा नसो, शारीरिक क्षमता असो वा नसो, बुद्धी असो वा नसो, देवाची भक्ती करून अल्पावधीत ईश्वराशी एकरूप होता येते. भक्तीचे नवविधा प्रकार सांगितले आहेत (श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, अर्चन, पादसंवाहन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन). त्याद्वारे आपण भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहू शकतो. देवाप्रतीचा भाव साधनेबद्दल आपलेपणा निर्माण करतो. देवाची भक्ती करण्यात आनंद आहे; म्हणून प्रत्यक्ष श्रीकृष्णानेही त्याचा अत्यंत ज्ञानी भक्त असलेल्या उद्धवाला गोपींची भक्ती शिकता यावी; म्हणून गोकुळात पाठवले होते. भक्तीयोग प्रत्येकालाच सहज आचरता येण्यासारखा आहे. भक्तीमार्गात भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहून अध्यात्म प्रत्यक्ष जगता येते. म्हणून बहुतांश संतांनीही भक्तीमार्गाचा पुरस्कार केला आहे.

 

व्यष्टी साधना करताना स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया का आवश्यक ?

नामस्मरण आणि भक्ती करणे, हा व्यष्टी साधनेचा म्हणजे वैयक्तिक उपासनेचा भाग झाला. व्यष्टी साधनेच्या जोडीला स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियाही महत्त्वाची आहे. तपश्चर्येने किंवा उपासनेने पुण्य मिळते; पण स्वभावदोष उफाळून आले, तर पुण्याचा साठा झटकन रिकामा होतो. पूर्वीच्या काळच्या काही कथाही आपण ऐकल्या असतील. ऋषिमुनी रानात तपश्चर्येला बसायचे; पण त्यांच्या साधनेत व्यत्यय आला किंवा काही कारणाने ते रागावले, तर रागाच्या भरात त्यांची साधना खर्च होऊन त्यांचे परमार्थ मार्गावरून पतन व्हायचे; म्हणून स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया महत्त्वाची आहे.

 

समष्टी साधनेचे महत्त्व

आताच्या काळात केवळ व्यष्टी साधना पुरेशी नाही, तर व्यष्टी साधनेच्या जोडीला समष्टी साधनाही आवश्यक आहे. व्यष्टी साधनेला ३५ टक्के, तर समष्टी साधनेला ६५ टक्के महत्त्व आहे. समष्टी साधना म्हणजे समाजाच्या उन्नतीसाठी करायचे प्रयत्न ! म्हणजेच अध्यात्मप्रसाराच्या कार्यात सहभागी होणे. धर्मग्रंथातील ज्ञानाचे अध्ययन आणि अध्यापन करणे, ही ज्ञानकांडाची आणि अजून पुढच्या टप्प्याची साधना आहे. आपल्याला सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे परिचितांना, कुटुंबियांना सांगणे हीही समष्टी सेवाच आहे. संतांनी सांगितले आहे, ‘जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे…’ सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेही सांगतात, अध्यात्मात ‘अ’ कळला की, तो इतरांना शिकवायचा. अध्यात्मप्रसाराच्या सेवेत आपापल्या प्रकृतीनुसार, आपल्या कौशल्यानुसार सहभागी होणे, ही समष्टी आणि ज्ञानमार्गाची साधना आहे. समष्टी सेवा करणारे देवाला, गुरूंना आणि संतांना आपले वाटतात. कारण व्यष्टी साधना म्हणजे केवळ स्वतःचा विचार झाला, तर समष्टी साधना म्हणजे स्वतःसह इतरांचा विचार झाला. म्हणून आपणही समष्टी कार्यात सहभागी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याप्रमाणे साखरेची गोडी चाखूनच पाहावी लागते, त्याप्रमाणे सेवेतील आनंद मिळवायचा असेल, तर सेवा करून पाहावी लागेल.

 

साधना शीघ्र गतीने करावी

हे सगळे साधनेचे प्रयत्न आपल्याला शीघ्र गतीने करायचे आहेत; कारण आपले आयुष्य मर्यादित आहे. आपल्या आयुष्याची दोरी किती लांब आहे, हे आपल्याला ठाऊक नाही. मग आपण ईश्वरप्राप्तीसाठीचे प्रयत्न जमेल तसे करू, म्हातारपणी करू किंवा आपल्या सगळ्या अडचणी दूर झाल्यावर करू, असे म्हटले, तर चालेल का ? नाही ना ! कारण पुन्हा हा दुर्लभ मनुष्यजन्म कधी मिळेल, ते सांगता येत नाही; म्हणून याच जन्मात मनुष्यजन्माचे सार्थक करायचे ध्येय आपण निश्चित केले पाहिजे. मनुष्यजन्माचे सार्थक कशात आहे ? ते गाडी-बंगला मिळवण्यात, परदेशवारी करण्यात नाही, तर साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्यात आहे. तोच खरा पुरुषार्थ आहे. भौतिक सुख कितीही कमवले, तरी मृत्यूसमयी ते आपल्याला इथेच सोडून द्यायचे आहे. मग मृत्यूनंतर आपल्या सोबत काय येते, तर आपण केलेली साधना ! या साधनेच्या बळावरच आपल्याला पुढील जन्म मिळतो.

आपण व्यवहारात समजा डॉक्टर, इंजिनियर झालो, तरी पुढच्या जन्मी पुन्हा अ, आ, इ, ई… पासून शिकावे लागते. अध्यात्मात तसे नसते. मृत्यूसमयी आपण ज्या आध्यात्मिक पातळीला असतो, त्याच्या पुढच्या टप्प्याचा प्रवास पुढील जन्मात चालू होतो. इतके साधनेचे महत्त्व आहे; म्हणून आपणही साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करण्याचा प्रयत्न करूया. नामजप आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया अधिक मनापासून आणि सातत्याने करण्याचा प्रयत्न करूया.

 

कर्मकांडाला मर्यादा आहेत. म्हणून साधना करतांना योग्य दिशा असणे व स्वतःला अयोग्य भ्रमांपासून वाचविणे हे किती महत्त्वाचे आहे हे आजच्या विषयामधून आपल्या लक्षात आलेच असेल. नामजप आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया अधिक मनापासून आणि सातत्याने करण्याचा प्रयत्न करूया. सेवेतील आनंद मिळविण्यासाठी सेवेत सहभागी होऊया. आपल्याला सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे परिचितांना, कुटुंबियांना सांगणे हीही समष्टी सेवाच आहे. तसे प्रयत्न आपण या आठवडयात करूया. पुढील सत्संगात आपण ‘संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण’, हा विषय पहाणार आहोत.

Leave a Comment