सत्संग २४ : अ-१, अ-२ आणि अ-३ स्वयंसूचना पद्धतींचा अभ्यास

गेल्या आठवड्यात आपण न्यूनगंड, आत्मविश्वासाचा अभाव अशा प्रकारच्या स्वभावदोषांवर मात करण्यासाठी अ-३ पद्धतीने स्वयंसूचना कशी द्यायची, हे समजून घेतले. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत आपण आतापर्यंत स्वयंसूचनांच्या अ-१, अ-२ आणि अ-३ पद्धती पाहिल्या, तसेच स्वयंसूचना बनवतांना कोणती काळजी घ्यायची, हेही समजून घेतले. स्वयंसूचना बनवण्याच्या अजून २ पद्धती आहेत. त्या आपण पुढच्या सत्संगांमध्ये जाणून घेणारच आहोत; पण आपण आतापर्यंत जे काही शिकलो आहोत, तो अभ्यास पक्का व्हावा, यासाठी आपण आजच्या सत्संगात अ-१, अ-२ आणि अ-३ स्वयंसूचना पद्धतींचा सराव घेणार आहोत.

आजच्या सत्संगात तुम्हाला काही प्रसंग सांगितले जातील, त्या प्रसंगांचा अभ्यास करून तुम्हाला स्वयंसूचना बनवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्या त्या प्रसंगांच्या योग्य सूचनाही तुम्हाला नंतर सांगण्यात येतील. ‘आपल्याला स्वयंसूचना तयार करायला जमेल का ?, सूचना चुकतील का ?’, असा कोणताही विचार मनात न आणता आपण स्वयंसूचना बनवण्याचा प्रयत्न करूया. या सत्संगातून आपल्याला शिकायचे आहे आणि शिकण्यात आनंद आहे, हे लक्षात घेऊन आपण मनापासून आणि मोकळेपणाने सहभागी होऊया.

आपल्याकडून होणार्‍या अयोग्य कृती, आपले अयोग्य विचार, भावना दूर करण्यासाठी अ-१ पद्धतीने स्वयंसूचना बनवली जाते. मनात उमटणार्‍या किंवा व्यक्त होणार्‍या आणि अल्प काळ टिकणार्‍या प्रतिक्रियांसाठी अ-२ पद्धतीने, तर भीती, न्यूनगंड, आत्मविश्वासाचा अभाव अशा प्रकारचे दोष दूर करण्यासाठी अ-३ पद्धतीने स्वयंसूचना बनवली जाते. आता आपण प्रत्यक्ष उदाहरणे पाहूया. सर्व जण स्वयंसूचना बनवण्यासाठी सिद्ध आहेत ना ?

 

स्वयंसूचना बनवण्याच्या सरावासाठी उदाहरणे

१. प्रसंग

सौ. सीमा यांना रात्रीचे जेवण झाल्यावर ओटा आवरायचा कंटाळा येतो. त्यामुळे त्या ओट्यावर जेवणाचे पदार्थ तसेच ठेवतात. त्यामुळे जेवणाचे पदार्थ तसेच उघडे रहातात किंवा क्वचितप्रसंगी ते खराबही होतात, असा प्रसंग आहे.

आपल्याला स्वयंसूचना बनवण्यासाठी १ मिनिटाचा वेळ आहे. या वेळेत आपण प्रसंगाचा अभ्यास करून स्वयंसूचना बनवण्याचा प्रयत्न करूया.

या प्रसंगात कोणत्या पद्धतीने स्वयंसूचना बनवायची ? ही कृतीच्या स्तरावरील चूक असल्याने आपल्याला अ-१ पद्धतीने स्वयंसूचना बनवायची आहे. ही चूक आपल्याकडून आळशीपणा किंवा सवलत घेणे किंवा विसराळूपणा या स्वभावदोषांमुळे होऊ शकते. याविषयी योग्य स्वयंसूचना कशी असू शकेल ?, ते आपण पाहूया.

स्वयंसूचना :

‘मी जेव्हा रात्री जेवण झाल्यावर ओटा आवरून ठेवायचा कंटाळा करत असेन, तेव्हा ओटा तसाच खरकटा ठेवल्याने ते दिसायला अयोग्य दिसते, तसेच त्यामुळे अन्नपदार्थही खराब होऊ शकतात, याची मला जाणीव होईल आणि मी नामजप करत ओटा आवरीन.’

२. प्रसंग

आता आपण पुढचा प्रसंग पाहूया. प्रसंग आहे, अनावश्यक आणि निरर्थक विचार करण्याच्या संदर्भात ! सकाळी नामजप करायला बसल्यावर ‘उद्या मला खरेदी करण्यासाठी जायचे आहे. कार्यालयातून घरी येण्यापूर्वी अधिकोषात गेले, तर अधिकोषातून पैसे काढता येणार नाहीत, म्हणून कार्यालयात जाण्यापूर्वीच मला अधिकोषात जावे लागेल. त्यासाठी उद्या सकाळी घरातून लवकर निघावे लागेल…..’, असे अनावश्यक विचार माझ्या मनात आले.

सर्वांच्या प्रसंग लक्षात आला ना ! नामजप करतांना अनावश्यक विचार मनात येत आहेत. यावर आपल्याला स्वयंसूचना बनवायची आहे. आपल्याला स्वयंसूचना बनवण्यासाठी १ मिनिटाचा वेळ आहे. या वेळेत आपण प्रसंगाचा अभ्यास करून स्वयंसूचना बनवण्याचा प्रयत्न करूया. या प्रसंगात कोणत्या पद्धतीने स्वयंसूचना बनवायची ? ही अयोग्य विचारांच्या स्तरावरील चूक असल्याने याही प्रसंगात आपल्याला अ-१ पद्धतीने स्वयंसूचना द्यायची आहे. अनावश्यक किंवा निरर्थक विचार करण्याच्या संदर्भात योग्य स्वयंसूचना कशी असू शकेल, ते आपण पाहूया.

स्वयंसूचना :

‘नामजप करत असताना मी अधिकोषातून पैसे काढण्याविषयी विचार करत असेन, तेव्हा नामजपातील चैतन्य ग्रहण करण्यापासून मी वंचित राहीन याची मला जाणीव होईल आणि मी एकाग्रतेने नामजप करीन.’

अभ्यास :

आपल्याला स्वयंसूचनेत मनातील सर्व अनावश्यक विचार लिहायचे नाहीत, तसेच ‘माझ्या मनात नामजप करत असतांना अनावश्यक विचार येत असतील, असा मोघम उल्लेखही करायचा नाही, तर अनावश्यक विचारांचा उल्लेख थोडक्यात करायचा आहे; म्हणून आपण ‘नामजप करत असताना मी अधिकोषातून पैसे काढण्याविषयी अनावश्यक विचार करत असेन तेव्हा…’ अशा प्रकारची वाक्यरचना केली आहे. परिणामांची जाणीव करून देणारा दृष्टीकोनही आपण आपल्याला जो भावतो, त्याप्रमाणे देऊ शकतो. इथे आपण निरर्थक विचार केल्याने मी ‘नामजपातील चैतन्य ग्रहण करण्यापासून मी वंचित राहीन’ असा दृष्टीकोन घेतला आहे, त्याऐवजी ‘नामजपाचा अपेक्षित असा लाभ घेण्यात मी कमी पडीन’ किंवा ‘या निरर्थक विचारांमुळे माझा नामजपातील वेळ वाया जात आहे, याची मला जाणीव होईल’ अशा प्रकारेही दृष्टीकोन लिहू शकतो.

या संदर्भात आपण एक महत्त्वपूर्ण सूत्र काय लक्षात घ्यायचे आहे, तर नामजप करतांना मनात अनावश्यक विचार येतील आणि आपल्याला त्याची जाणीव होईल तेव्हा नामजप एकाग्रतेने होण्यासाठी कृतीच्या स्तरावरही आपण उपाययोजना काढायला हव्यात. म्हणजे काय करायचे, तर आपण यापूर्वीच्या सत्संगांमध्ये पाहिले आहे की, आपण नामजप थोडा जलद गतीने करू शकतो, वही-पेन घेऊन नामजप लिहू शकतो, आपण एकेक नामजप करत देवाच्या चरणांवर फूल अर्पण करत आहोत, अशा प्रकारचा भाव ठेवून नामजप करू शकतो किंवा नामजप करतांना मनात येणारे विचार आणि त्यापुढे त्याची उपाययोजना लिहून काढू शकतो.

३. प्रसंग

आता आपण पुढचा प्रसंग पाहूया. दोन वर्षांपूर्वी पदवी परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण करूनही श्री. ओंकारला अद्याप नोकरी न मिळाल्याने निराश वाटले.

यावर आपण १ मिनिटात स्वयंसूचना बनवण्याचा प्रयत्न करूया. याविषयी कोणत्या पद्धतीने स्वयंसूचना द्यायची ? नोकरी न मिळाल्याने ओंकारला निराश वाटत आहे. ही निराशेची भावना अयोग्य आहे. त्यामुळे याही प्रसंगात अ-१ पद्धतीने स्वयंसूचना देऊ शकतो. आता आपण योग्य स्वयंसूचना कशी असू शकेल, ते पाहूया.

स्वयंसूचना :

जेव्हा पदवी परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळण्यात अडथळे येत असतील, तेव्हा मी या अडथळ्यांचा अंतर्मुखतेने अभ्यास करीन आणि त्यावर मात करण्यासाठी अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घेईन.

अभ्यास :

या संदर्भात हेही लक्षात घ्यायला हवे की, आयुष्यातील ६५ टक्के घटना या प्रारब्धाधीन असतात. म्हणजे प्रारब्धात जसे असते, त्याप्रमाणे घडते. आपले क्रियमाण वापरणे आणि परिस्थिती स्वीकारणे यांतून आपली साधना होते.

त्यामुळे या प्रसंगात अशीही स्वयंसूचना देऊ शकतो की, जेव्हा पदवी परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळण्यात अडथळे येत असतील, तेव्हा प्रारब्धानुसार जे घडायचे, ते घडणारच आहे, देव माझ्यासाठी जे चांगले आहे, ते घडवणारच आहे, याची मला जाणीव होईल आणि मी सकारात्मकतेने प्रयत्न करण्याचे क्रियमाण वापरीन.

४. प्रसंग

पुढचा प्रसंग आहे, यजमान सकाळी उठून बराच वेळ वर्तमानपत्र वाचत होते, तेव्हा त्यांनी घरकामात थोडे साहाय्य करावे, अशा तीव्र विचारांनी त्रागा झाला आणि मला कोणीच साहाय्य करत नाही, या विचारांनी वाईट वाटले.

यावर आपण १ मिनिटात स्वयंसूचना बनवण्याचा प्रयत्न करूया. याविषयी योग्य स्वयंसूचना कशी असू शकेल, ते आपण पाहूया.

यजमानांच्या संदर्भात अयोग्य प्रतिक्रिया मनात उमटलेली असल्याने आपण या प्रसंगात अ-२ पद्धतीने स्वयंसूचना देणार आहोत. एखाद्या प्रसंगात मनात उमटलेल्या किंवा व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांच्या संदर्भात अ-२ पद्धतीने स्वयंसूचना देतात.

स्वयंसूचना :

जेव्हा यजमान सकाळी उठून वर्तमानपत्र वाचत असल्याचे पाहून त्यांनी मला घरकामात साहाय्य करावे, असे वाटत असेल, तेव्हा त्यांना तेवढाच मोकळा वेळ मिळतो, तेही दिवसभर दमतात, हे समजून घेईन आणि मी कामांचे प्राधान्य ठरवून त्याप्रमाणे नियोजन करून कृती करीन.

किंवा या संदर्भात अशीही स्वयंसूचना देऊ शकतो.

जेव्हा यजमान सकाळी उठून वर्तमानपत्र वाचत असल्याचे पाहून त्यांनी मला घरकामात साहाय्य करावे, असे वाटत असेल, तेव्हा ते घरकामात साहाय्य करू शकतात का ?, हे मी नम्रतेने आणि निरपेक्षपणे विचारीन. यजमान त्याविषयी जे म्हणतील, ते मी मनापासून स्वीकारीन.

अभ्यास :

येथे आपण अ-२ पद्धतीने स्वयंसूचना दिली आहे. तसे करतांना आपण आधी पाहिल्याप्रमाणे मनात उमटणार्‍या अयोग्य प्रतिक्रियांचा म्हणजे मला कोणी समजूनच घेत नाही, मला कोणी साहाय्य करत नाही, अशा प्रतिक्रियांचा स्वयंसूचनेमध्ये उल्लेख केलेला नाही. या वेळी बरेच वेळा बहिर्मुखतेमुळे आपल्याला ‘समोरची व्यक्तीच चुकत आहे, आपले म्हणणे योग्यच आहे’, असे वाटत असते. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत आपल्याला हीच विचारप्रक्रिया पालटून अंतर्मुख करायची आहे. आपल्याला परिस्थिती किंवा इतरांना बदलायला जायचे नाही, तर स्वतःत पालट करायचा आहे. सर्वांच्या ही सूत्रे लक्षात आली ना ? आपल्याला घरकामांचा अतिरिक्त भार पडत असेल, तर आपण यजमानांशी त्याविषयी मोकळेपणाने बोलून घेणे, कामांचे नियोजन करणे अशा प्रकारे कृतीच्या स्तरावरही प्रयत्न करू शकतो.

५. प्रसंग

अजून एका प्रसंगाचा आपण अभ्यास करूया. वरिष्ठांनी एका कामाच्या संदर्भात सहकारी श्री. राजेश याचे कौतुक केले; पण मी त्या कामात सहभागी असूनही माझे कौतुक न केल्याने मला श्री. राजेश यांचा हेवा वाटला.

यावर आपण स्वयंसूचना बनवण्याचा प्रयत्न करूया. याविषयी आपण कोणत्या पद्धतीने स्वयंसूचना बनवणार ? या प्रसंगात मनात अयोग्य प्रतिक्रिया उमटल्याने आपण अ-२ पद्धतीने स्वयंसूचना देणार आहोत. आपण आता योग्य स्वयंसूचना कशी असू शकेल, ते पाहूया.

स्वयंसूचना :

जेव्हा कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी कामाच्या संदर्भात माझे नाव घेण्याचे टाळून सहकारी श्री. राजेश याचे कौतुक करतील, त्या वेळी निष्काम भावाने कार्य करण्यातून माझी साधना होणार आहे, देवाला तर सर्वच ठाऊक असते, हे लक्षात घेईन आणि खिलाडूवृत्तीने प्रसंग स्वीकारून माझ्या पुढील कामावर लक्ष केंद्रीत करीन.

अभ्यास :

निष्काम भावाने कार्य करणे म्हणजे कोणतीही अपेक्षा न करता कर्म करण्याचे आपले कर्तव्य पार पाडणे. भगवान श्रीकृष्णानेही गीतेत म्हटले आहे, ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन् ।’ याचा अर्थ ‘कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे. ते तू पार पाड; पण फळाची अपेक्षा धरू नकोस.’  हा आपल्या दैनंदिन जीवनात उपयुक्त असा आध्यात्मिक दृष्टीकोन आहे. तो आपण विविध प्रसंगांच्या माध्यमातून मनावर बिंबवला, तर आध्यात्मिक स्तरावर जीवन जगण्यास ते साहाय्यभूत ठरते.

६. प्रसंग

आता आपण अजून एका प्रसंगाच्या संदर्भात सूचना बनवण्याचा प्रयत्न करूया. समजा कोणाला रस्ता ओलांडायची भीती वाटत असेल किंवा एकट्याने बस किंवा रेल्वे यांनी प्रवास करायची भीती वाटत असेल, तर आपण कोणत्या पद्धतीने स्वयंसूचना देणार ? आपल्या मनातील एखाद्या प्रसंगाची भीती किंवा न्यूनगंडाची भावना घालवण्यासाठी आपण अ-३ पद्धतीने स्वयंसूचना देऊ शकतो.

आता आपण रस्ता ओलांडायची भीती वाटण्याच्या संदर्भात १ मिनिटात स्वयंसूचना बनवण्याचा प्रयत्न करूया.

या संदर्भात योग्य स्वयंसूचना कशी बनवू शकतो, ते पाहूया. आपल्याला ही स्वयंसूचना चालू वर्तमानकाळात करायची आहे.

स्वयंसूचना :

मी रस्त्याच्या कडेने काळजीपूर्वक चालत चालत चौकात आली आहे. रस्ता ओलांडण्यासाठी मी ‘झेब्रा क्रॉसिंग’च्या ठिकाणी थांबली आहे. आजूबाजूने गाड्या जात आहेत  ना, हे पहात आहे. लाल सिग्नल लागल्यावर गाड्या थांबल्याची निश्चिती करून मी नामजप करत रस्ता ओलांडत आहे. निम्म्या रस्त्यात आल्यावर मी दुसर्‍या बाजूने गाड्या येत आहेत का, हे पहात आहे. गाड्या येत नसल्याची निश्चिती झाल्यावर मी नामजप करत काळजीपूर्वक रस्ता ओलांडत आहे. मला व्यवस्थितपणे आणि एकटीने रस्ता ओलांडता आला, यासाठी मी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आहे.

ही सूत्रे सर्वांच्या लक्षात आली ना ? अशा प्रकारे आपण सारणीलिखाण करतांना चुकांच्या पुढे स्वयंसूचना लिहिण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या मनाला एखाद्या प्रसंगात योग्य कसे वागायचे, याची दिशा मिळते आणि आपल्या चित्तावरील जन्मोजन्मीचे स्वभावदोषांचे संस्कार दूर व्हायला साहाय्य होते.

 

स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेशी संबंधित सनातनचे ग्रंथ

स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेशी संबंधित ग्रंथ (स्वभावदोष आणि अहं यांच्या विविध पैलूंचे विश्लेषण, स्वयंसूचनांद्वारे स्वभावदोष निर्मूलन या ग्रंथांची मुखपृष्ठे दाखवू शकतो.) सनातन संस्थेच्या वतीने स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेच्या संदर्भात ग्रंथही प्रकाशित करण्यात आले आहेत. ते www.SanatanShop.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आपण या ग्रंथांचा आवर्जून लाभ घ्यावा.

आजच्या सत्संगात आपण अ-१, अ-२ आणि अ-३ स्वयंसूचना पद्धतींचा पुन्हा अभ्यास केला. त्यामुळे अ-१, अ-२ आणि अ-३ पद्धतीने स्वयंसूचना कधी द्यायच्या हे आपणा सर्वांच्या लक्षात आले असेल. आपण प्रतिदिन आपल्याकडून झालेल्या चुकांचे चिंतन करून सारणीलिखाण करूया. या आठवड्यात आपण आज शिकल्याप्रमाणे स्वयंसूचना लिहिण्याचा प्रयत्न करूया. आपला जेवढा सराव होईल, तेवढे आपल्याला स्वयंसूचना बनवणे चांगल्या प्रकारे जमू शकेल. पुढील सत्संगात आपण उपासनाकांड, कर्मकांड आणि ज्ञानकांड हा विषय समजून घेणार आहोत.

Leave a Comment