गेल्या आठवड्यात आपण अ-१ आणि अ-२ या स्वयंसूचना पद्धतींचा तूलनात्मक अभ्यास केला. आजच्या सत्संगामध्ये आपण न्यूनंगड, भीती यांवर मात करण्यासाठी अ-३ पद्धतीने स्वयंसूचना कशा द्यायच्या ?, याविषयी जाणून घेणार आहोत. त्याआधी आपण साधनेचा प्रायोगिक अभ्यास घेऊया.
अ-३ स्वयंसूचना पद्धतीचे तत्त्व
आपल्यापैकी प्रत्येकाने अनुभवले असेल की, कोणत्या ना कोणत्या प्रसंगांना सामोरे जायचा आपल्या मनावर ताण असतो किंवा आपण ते प्रसंग शक्यतो टाळायचा प्रयत्न करतो, उदा. कुणाला रेल्वेमधून अथवा बसने एकट्याने प्रवास करायचा ताण असतो, कुणाला परीक्षेची काळजी असते, कुणाला बँकेत जाऊन व्यवहार करायचा ताण असतो, ATM मधून पैसे काढण्याचा ताण असतो, कुणाला मुलाखतीमध्ये बोलण्याचा, कुणाला समारंभाला जाण्याचा, कुणाला परीक्षांचा, तर कुणाला मुलांच्या शाळेत पालक-बैठकीत बोलण्याचा ताण असतो ! आपण दैनंदिन जीवनात असे प्रसंग अनुभवतो ना ? आपल्याला एखादी कृती करण्याची भीती वाटत असेल, तर अशा प्रसंगांवर अ-३ पद्धतीने स्वयंसूचना देऊन मात करता येऊ शकते.
अ-३ स्वयंसूचना पद्धतीत व्यक्ती आपण कठीण प्रसंगाला यशस्वीरित्या तोंड देत आहोत, अशी कल्पना करते. त्यामुळे मनात त्या प्रसंगाला तोंड द्यायची एक प्रकारे तालीम किंवा सराव होत असल्याने प्रत्यक्ष प्रसंगाला सामोरे जातांना व्यक्तीच्या मनावर ताण येत नाही.
अ-३ स्वयंसूचना कोणत्या स्वभावदोषांवर द्यावी ?
चिकाटी नसणे, पुढाकार न घेणे, गप्प बसणे, आत्मविश्वासाचा अभाव, पडते घेणे, न्यूनगंड वगैरे स्वभावदोष नाहीसे करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. एखाद्या प्रसंगात ‘मला अमुक एक कृती करणे जमत नाही किंवा जमेल कि नाही’, असा नकारात्मक संस्कार दूर करण्यासाठी ही पद्धत वापरतात.
उदाहरण आणि स्वयंसूचना
आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून ही स्वयंसूचना पद्धत समजून घेऊया.
१. प्रसंग
महिन्याचा किराणा भरण्यासाठी यजमानांनी मला ATM मधून पैसे काढण्यास सांगितले. त्या वेळी ‘मला एकटीने ATM मधून पैसे काढायला जमेल का ?’, याचा मला ताण आला. त्यामुळे मी यजमानांना सांगितले, ‘किराणा उशिरा भरला गेला, तरी चालेल; पण तुम्हीच ATM मधून पैसे काढून आणा.’
या प्रसंगाचे मूळ काय आहे, तर मला ATM कार्ड वापरून पैसे काढण्याचा आत्मविश्वास नाही. या न्यूनगंडावर अ-३ पद्धतीने स्वयंसूचना देऊन मात करता येऊ शकते. अ-३ पद्धतीने स्वयंसूचना द्यायची म्हणजे काय करायचे आहे, तर ATM मधून पैसे काढण्याची कृती आपण व्यवस्थित समजून घेऊन आत्मविश्वासाने आणि यशस्वीपणे करू शकत आहोत, अशी कल्पना करायची आहे. अ-३ स्वयंसूचना चालू वर्तमानकाळात बनवतात. ही स्वयंसूचना अ-१, अ-२ प्रमाणे २-३ ओळींची नाही, तर थोडी विस्तृत असते, तर मग या प्रसंगात स्वयंसूचना कशी होऊ शकेल, ते आपण पाहूया. स्वयंसूचना देतांना आपल्याला स्वयंसूचनांची वाक्ये मनातल्या मनात किंवा पुटपुटून म्हणायची आहेत.
१. यजमान मला ATM मधून पैसे काढून आणण्यास सांगत आहेत.
२. हे मी सकारात्मक पद्धतीने स्वीकारून यजमानांकडून ATM कार्ड वापरून पैसे काढण्याचे टप्पे समजावून घेत आहे. ती सूत्रे मी नोंदवहीमध्ये लिहून घेत आहे.
३. ATM मध्ये जाण्यापूर्वी पैसे काढून आणण्याच्या टप्प्यांचा पुन्हा अभ्यास करत आहे.
४. मी ATM मशीन असलेल्या ठिकाणी पोहोचत आहे.
५. ATM मशीनच्या बाहेर रांगेत उभे राहून माझा क्रमांक येईपर्यंत मी शांतपणे नामजप करत आहे.
६. माझा क्रमांक आल्यावर मी ATM मशीन असलेल्या खोलीत प्रवेश करत आहे.
७. मी ATM कार्ड मशीन मध्ये सरकवत आहे. आवश्यक पैसे आणि पासवर्ड याची नोंद करून पैसे मिळण्याची मी वाट पाहत आहे.
८. ATM मशीनमधून आलेली रक्कम योग्य आहे ना, याची मी खात्री करत आहे. ATM कार्ड अणि पैसे मी व्यवस्थित पर्समध्ये ठेवत आहे.
१०. मला ATM कार्ड वापरून व्यवस्थितरित्या पैसे काढता आले, याचा मला आनंद होत आहे. मी उपास्यदेवतेच्या चरणी त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत आहे.
अशा पद्धतीने आपल्याला स्वयंसूचना द्यायची आहे. सर्वांच्या हे सूत्र लक्षात आले ना ! परीक्षा देणे, मुलाखत किंवा प्रेझेंटेशन देणे यांचा ताण येत असेल, तर अ-३ पद्धतीने स्वयंसूचना देता येऊ शकते. आपण अजून एका उदाहरणाच्या माध्यमातून ही सूचना समजून घेऊया.
२. प्रसंग
दुचाकी वाहनाच्या लायसेन्ससाठी परिवहन अधिकार्यांसमोर वाहन चालवायचे आहे हे समजल्यावर मला सर्वांसमोर व्यवस्थित वाहन चालवता येईल ना ? मी वाहन चाचणीत उत्तीर्ण होईन ना ? असे विचार येऊन ताण आला.
आता याप्रकारच्या प्रसंगांवर स्वयंसूचना कशी बनवता येऊ शकेल, ते आपण पाहूया.
स्वयंसूचना –
१. मी वाहन चालवण्याचा व्यवस्थित सराव केला आहे.
२. वाहन चाचणीला जाण्यापूर्वी मी देवाला प्रार्थना करून निश्चिन्त मनाने बाहेर पडत आहे.
३. वाहन चाचणीच्या ठिकाणी गेल्यावर मी परीक्षेचे स्वरूप समजून घेत आहे.
४. आवश्यक ती कागदपत्रे मी सोबत घेतली आहेत आणि माझा क्रमांक येईपर्यंत शांतपणे नामजप करत आहे.
५. परीक्षा घेणारे अधिकारी सांगत असलेल्या सूचना मी स्थिरपणे ऐकत असून समजून घेत आहे.
६. माझा क्रमांक आल्यावर मी देवाचे स्मरण करून वाहन सुरु करत आहे.
७. सांगितलेल्या सूचनांचे पालन करत शांतपणे मी वाहन चालवत आहे.
८. माझी चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली असून देवाच्या कृपेने सर्व व्यवस्थित झाल्याने मला आनंद होत आहे.
९. चाचणी झाल्यावर मी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आहे.
स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेशी संबंधित सनातनचे ग्रंथ :
सनातन संस्थेच्या वतीने स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेच्या संदर्भात ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहेत. ते www.SanatanShop.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आपण या ग्रंथांचा आवर्जून लाभ घ्यावा.
आपण अशा प्रकारे एकदा स्वयंसूचना लिहून काढून नंतर ती मनातल्या मनात देऊ शकतो.
सूक्ष्मातील प्रयोग
आपण सूक्ष्मातील प्रयोगाच्या माध्यमातून स्वयंसूचनेचा मनावर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास करूया. आपण याआधीच्या सत्संगांत पाहिले होते की, अध्यात्मप्रसार ही सर्वोत्तम सत्सेवा आहे. समाजाला साधनेकडे वळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर भगवंताची कृपा होते. असे जीव गुरुकृपेसही पात्र होतात. आता समाजात अध्यात्मप्रसार करायचा असेल, तर अध्यात्माचे आपल्याला जे काही समजले आहे, ते आत्मविश्वासाने समोरच्या व्यक्तीला किंवा समूहाला सांगता आले पाहिजे किंवा पटवून देता आले पाहिजे.
आता अशी कल्पना करूया की, आपल्याला आपल्या नातेवाईकांना साधना सांगून अध्यात्मप्रसार करायचा आहे. साधना सांगायची आहे, म्हणजे काय करायचे आहे, तर आपण आतापर्यंतच्या सत्संगांत कुलदेवीच्या आणि दत्तगुरुंच्या नामस्मरणाचे महत्त्व समजून घेतले होते. ते आपल्याला आपल्या परिचितांना सांगायचे आहे.
काही जणांचे संभाषणकौशल्य चांगले असते, तसेच समूहासमोर बोलण्याचे दडपणही नसते, तर काही जणांच्या मनात ताणाचे विचार असतात. उदाहरणार्थ, ‘मला बोलता येईल का ?, मला साधना सांगायला जमेल का ?, समोरच्यांनी उलट प्रश्न विचारले, तर उत्तरे देता येतील का ?, त्यांना हा विषय कसा सांगायचा?, कुठून सुरुवात करायची ?, माझ्याकडून काही चूक तर होणार नाही ना ?, कोणी मला काही बोलणार तर नाही ना ?’ नातेवाईकांना साधना सांगायची म्हटल्यावर काहींच्या मनात अशा प्रकारचे विचार आले असणार. आपल्याला साधना करायची असेल, तर स्वभावदोषांवर मात करण्यासह गुरुसेवा करण्यासाठी आवश्यक गुणही आत्मसात करणे आवश्यक असते. आताच्या प्रसंगाचा विचार केला, तर समाजात जाऊन साधना सांगायचा ताण येत असेल, तर त्यामागे आत्मविश्वासाचा अभाव, पुढाकार न घेणे, पडते घेणे असे स्वभावदोष असू शकतात. अशा स्वभावदोषांवर अ-३ पद्धतीने स्वयंसूचना देऊन मात करता येऊ शकते, हे आपण समजून घेतले. आता आपण त्यासाठी प्रत्यक्ष स्वयंसूचना देऊया.
आपण सर्वांनी डोळे बंद करूया. आपल्या इष्ट देवतेचे नामस्मरण करून मन एकाग्र करूया. आपण मनातल्या मनात थोडा वेळ कुलदेवीचा नामजप करूया. (साधारण अर्ध्या मिनिटानंतर) मी जे एक एक वाक्य सांगत आहे त्याची सूचना आपण आपल्या अंतर्मनाला मनातल्या मनात देऊया.
१. मला अध्यात्मप्रसार म्हणून माझे नातेवाईक, मित्रमंडळी यांना नामजप साधना सांगायची आहे. माझ्या समोर सर्व नातेवाईक एकमेकांशी गप्पा मारत बसले आहेत.
२. नातेवाईकांना कुठली सूत्रे, कशाप्रकारे सांगायची, याचे मी मनातल्या मनात चिंतन आणि अभ्यास करत आहे.
३. माझ्याकडून साधना सांगण्याची सेवा भगवंताला अपेक्षित अशी व्हावी; म्हणून मी देवाला आर्ततेने प्रार्थना करत आहे.
४. प्रार्थना झाल्यानंतर मी नातेवाईकांशी संवाद साधायला आरंभ करत आहे.
५. मी नातेवाईकांशी मोकळेपणाने आणि आत्मविश्वासाने बोलत आहे. साधनेचे महत्त्व, कुलदेवीच्या नामजपाचे महत्त्व, कुलदेवीचा नामजप कसा करायचा, हे सर्व सांगत आहे.
पूर्वजांच्या त्रासांपासून मुक्ती देणाऱ्या दत्तगुरुंच्या नामजपाचे महत्त्व सांगत आहे.
६. नातेवाईक, मित्रमंडळी यांनी विचारलेल्या प्रश्नांना मी अगदी सहजतेने उत्तरे देत आहे.
७. सर्व नातेवाईक शांतपणे सर्व विषय ऐकून घेत आहेत. माझी सर्व सूत्रे कधी सांगून झाली हे मला कळलेच नाही.
८. ईश्वरानेच माझ्याकडून ते करवून घेतले याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहे.
आता आपण डोळे उघडूया. अशा प्रकारे स्वयंसूचना दिल्यानंतर आपल्याला काय जाणवले ? आपल्या मनावरील ताण हलका झाल्यासारखे जाणवले न ? अशा प्रकारे अ-३ पद्धतीने स्वयंसूचना देऊन ‘आत्मविश्वासाचा अभाव’ हा स्वभावदोष दूर करता येऊ शकतो.
या प्रसंगात आपल्याला अजून एक महत्त्वाचे सूत्र काय पहायचे आहे ?, तर साधनेचे महत्त्व नेमके कसे सांगायचे ? कुठली कुठली सूत्रे आपण त्यात अंतर्भूत करायची, याचा अभ्यास करणे, त्याविषयी सत्संगसेवकांशी किंवा अन्य उत्तरदायी साधकांशी बोलून घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे नियोजन करणे, हे बाह्यमनाच्या पातळीला महत्त्वाचे असते, तर अ-३ पद्धतीने स्वयंसूचनांचा सराव करणे, हे अंतर्मनाच्या पातळीला महत्त्वाचे असते.
एखाद्या प्रसंगाचा किंवा परिस्थितीचा आपल्या मनावर ताण येत असेल, तर आपल्या मनाची स्थिती कशी असते आणि आपण आत्मविश्वासाने प्रसंगांना सामोरे जात असू, तर आपल्या मनाची स्थिती कशी असते, यातील भेद आपल्याला या प्रयोगातून लक्षात आला असेल. आपल्याला प्रत्येक परिस्थितीला सामोरे जायचे आहे. त्यापासून पळ काढायचा नाही. लाटांना घाबरणारी नाव कधी किनारा गाठू शकत नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
आजच्या सत्संगात आपण अ-३ स्वयंसूचना पद्धतीने स्वयंसूचना कशी द्यायची, हे समजून घेतले. आपण प्रतिदिन आपल्याकडून झालेल्या चुकांचे चिंतन करून सारणीलिखाण करूया. या आठवड्यात आपण आज शिकल्याप्रमाणे स्वयंसूचना लिहिण्याचा प्रयत्न करूया. पुढच्या सत्संगात आपण अ-१, अ-२ आणि अ-३ स्वयंसूचना पद्धतीचा सराव करणार आहोत.