गेल्या आठवड्यात आपण अ-२ स्वयंसूचना पद्धतीचा अभ्यास केला होता. त्यानुसार व्यक्त होणार्या किंवा मनात उमटणार्या प्रतिक्रियांच्या चुकांविषयी सारणीमध्ये अ-२ पद्धतीने स्वयंसूचना लिहिण्याचे ठरवले होते.
आजच्या सत्संगामध्ये आपण अ-१ आणि अ-२ स्वयंसूचना पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत.
स्वयंसूचना कोणत्या प्रसंगात द्याव्यात ?
आपल्याकडून होणार्या अयोग्य कृती, मनातील अयोग्य विचार किंवा भावना यांच्या संदर्भात अ-१ पद्धतीने स्वयंसूचना देतात, तर कमी कालावधीसाठी म्हणजे १ – २ मिनिटांसाठी मनात उमटणार्या प्रतिक्रियांसाठी अ-२ पद्धतीने स्वयंसूचना देतात.
स्वयंसूचना बनवण्याची सूत्रे
अ-१ आणि अ-२ पद्धतीने स्वयंसूचना देण्याचे सूत्र म्हणजे formula कोणता आहे ?, याचीही आपण उजळणी करूया.
१. अ-१ पद्धतीने स्वयंसूचना बनवण्यासाठीचे सूत्र (formula)
अ-१ पद्धतीने स्वयंसूचना बनवण्यासाठीचे सूत्र म्हणजे formula कोणता आहे ?, तर –
‘अयोग्य कृती + योग्य दृष्टीकोन किंवा परिणाम + योग्य कृती’.
अ-१ पद्धतीने स्वयंसूचना बनवण्याची वाक्यरचना कशी असते, तर अयोग्य कृती — तेव्हा — दृष्टीकोन / परिणाम यांची जाणीव — योग्य कृती
२. अ-२ पद्धतीने स्वयंसूचना देण्याचे सूत्र
अ-२ पद्धतीने स्वयंसूचना देण्याचे सूत्र आहे –
प्रसंग + योग्य दृष्टीकोन + योग्य प्रतिक्रिया (विचार किंवा कृती).
अ-२ पद्धतीने स्वयंसूचना बनवण्याची वाक्यरचना कशी असते, तर प्रसंग–तेव्हा — योग्य दृष्टीकोन — योग्य विचार / कृती. ‘अ २’ स्वयंसूचना बनवतांना आपल्याला कुठले महत्त्वाचे सूत्र लक्षात घ्यायचे आहे ?, तर मनात येणार्या अयोग्य प्रतिक्रियांचा आपल्याला स्वयंसूचनेमध्ये उल्लेख करायचा नाही, तर केवळ प्रसंगाचा उल्लेख करायचा आहे.
या सूत्रांचे किंवा ‘फॉर्म्युल्या’चे महत्त्व काय आहे ?, तर जसे सूत्र योग्य असेल, तर गणित सुटते, त्याप्रमाणे स्वयंसूचनेचे सूत्र योग्य असेल, तर ती अधिक प्रभावी होते आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेला वेग येतो.
३. अयोग्य विचार / भावना आणि अयोग्य प्रतिक्रिया यांमधील भेद
आज आपण कोणत्या प्रसंगात अ-१ पद्धतीने स्वयंसूचना बनवायची आणि कोणत्या प्रसंगात अ-२ पद्धतीने बनवायची, हे समजून घेऊया. त्याआधी अयोग्य विचार / भावना आणि प्रतिक्रिया यांमध्ये नेमका काय भेद आहे ?, आणि प्रसंगाचे विश्लेषण कसे करायचे ?, ते पाहूया.
अयोग्य विचार किंवा अयोग्य भावना म्हणजे काय ?, तर आपली विचारप्रक्रियाच चुकीची असणे. एका उदाहरणाच्या माध्यमातून आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ‘समजा आकाशला १० मिनिटांसाठी काही कामानिमित्त बाहेर जायचे आहे. त्या वेळी ‘१० मिनिटांनी परत येणार, तर वडिलांना न सांगताच गाडी नेली तरी चालेल’, असा विचार त्याच्या मनात आला’, तर तो झाला अयोग्य विचार ! किंवा ‘बाबांना त्यांची गाडी घेऊ का ?, असे विचारले, तर ते मलाच पेट्रोल भरायला सांगतील’, त्यामुळे त्यांना न विचारताच परस्पर गाडी घेऊन जाऊया, हा झाला अयोग्य विचार !
किंवा
‘दीपकचे बाबा त्याने गाडी मागितल्यावर त्याला लगेच गाडी देतात, माझे बाबा मात्र गाडी देतांना मला अनेक सूचना करतात’, असा विचार आला तर ती अयोग्य भावना आहे; कारण इथे दीपकचे बाबा आणि माझे बाबा असे तुलनेचे विचार मनात आहेत.
अयोग्य प्रतिक्रिया म्हणजे काय, तर बाबांच्या प्रतिसादावरून मनात नकारात्मक पडसाद उमटणे ! ‘उदा. मी बाबांना त्यांची गाडी घेऊन जाऊ का ?’, असे विचारल्यावर त्यांनी त्यांना गाडी लागणार असल्याचे सांगितल्यावर ‘ते मला नेहमी असेच करतात. मला समजून घेत नाहीत’, असे वाटले किंवा ‘बाबांनी गाडी देतांना ‘ती काळजीपूर्वक चालव’ असे सांगितल्यावर, ते नेहमी सारख्या सूचनाच करत असतात’, असे विचार आले. या झाल्या अयोग्य प्रतिक्रिया !
अयोग्य विचार / भावना आणि अयोग्य प्रतिक्रिया यांमधील भेद सगळ्यांच्या लक्षात आला ना ? थोडक्यात, मुळातून आपली विचारप्रक्रिया चुकली असेल, तर अ-१ पद्धतीने स्वयंसूचना द्यावी आणि इतरांचा प्रतिसाद अथवा परिस्थिती पाहून मनात प्रतिक्रिया येत असतील किंवा त्रागा होत असेल, तर अ-२ पद्धतीने स्वयंसूचना द्यावी.
स्वयंसूचना बनवण्याचा अभ्यास
उदाहरण १
१. अ-१ पद्धतीने स्वयंसूचना बनवण्याचा अभ्यास
आता या दोन्ही प्रकारे या प्रसंगांमध्ये स्वयंसूचना कशी बनवता येऊ शकते ?, ते आपण पाहूया. सर्वप्रथम आपण अ-१ पद्धतीने स्वयंसूचना देण्याचा अभ्यास करूया.
अ-१ पद्धतीने स्वयंसूचना बनवण्याचे सूत्र काय आहे, तर ‘अयोग्य कृती / विचार + योग्य दृष्टीकोन किंवा परिणाम + योग्य कृती’
या प्रसंगात अयोग्य विचार काय आहे ? ‘१० मिनिटांसाठीच बाहेर जायचे आहे, तर बाबांना न विचारता त्यांची गाडी मी परस्पर घेऊन गेलो, तरी चालेल.’
परस्पर न विचारता बाबांची गाडी घेऊन गेलो, तर परिणाम काय होईल, तर नेमक्या त्याच वेळी कोणाला गाडी हवी असल्यास शोधाशोध करण्यात वेळ जाऊन अडचण निर्माण होईल. संबंधितांना मनःस्ताप होईल आणि त्यांची गैरसोय होईल. महत्त्वाचे म्हणजे, अशा प्रसंगात योग्य कृती काय आहे ?, तर इतरांची वस्तू वापरतांना आपण संबंधितांना ती वस्तू वापरण्याविषयी विचारूनच घ्यायला हवे.
या प्रसंगात स्वयंसूचना कशी होऊ शकते ?, तर –
‘जेव्हा मी बाबांची गाडी त्यांना न विचारता परस्पर घेऊन जाणार असेन, तेव्हा त्यामुळे बाबांची गैरसोय होऊ शकते, याची मला जाणीव होईल आणि मी बाबांना विचारूनच गाडी नेण्याविषयीचा निर्णय घेईन.’
इथे आपण काय लक्षात घ्यायला हवे की, घरात प्रत्येक वेळी विचारून कशाला घ्यायचे ?, असा विचार करायला नको; कारण आपली विचारून न करण्याची वृत्ती असेल, तर जसे घरात आपण मनाप्रमाणे वागणार, तसेच कार्यालयात किंवा इतरत्रही वागणार ! आज आपण बाबांना न विचारता गाडी घेऊन जात असू, तर उद्या कार्यालयात सहकार्यांच्या काही वस्तू त्यांना न विचारता परस्पर वापरण्याचा विचार येईल ! त्यामुळे ‘आपली अयोग्य कृती छोटीशीच आहे’ किंवा ‘एवढे चालते’, अशा प्रकारची विचारप्रक्रिया न ठेवता आपण प्रक्रियेच्या दृष्टीने गांभीर्याने प्रयत्न करायला हवेत. ‘एक छोटेसे छिद्रही महाकाय जहाजाला जलसमाधी द्यायला पुरेसे असते’, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे आपण आपली प्रत्येक अयोग्य कृती / विचार यांसंदर्भात सतर्क रहायला हवे.
२. ‘अ २’ पद्धतीने स्वयंसूचना बनवण्याचा अभ्यास
आता आपण या संदर्भात अ-२ पद्धतीने स्वयंसूचना कशी बनवायची, हे पाहूया. बाबांना गाडी नेण्याविषयी विचारल्यावर त्यांनी गाडी त्यांना लागणार असल्याचे सांगितल्यावर ‘ते मला नेहमी असेच करतात, समजून घेत नाहीत’, असे वाटले. या अयोग्य प्रतिक्रियेवर अ-२ पद्धतीने स्वयंसूचना बनवण्याचे सूत्र काय आहे, तर प्रसंग–तेव्हा — योग्य दृष्टीकोन — योग्य विचार / कृती.
यानुसार स्वयंसूचना कशी बनू शकेल ?, तर –
‘बाबांना काही कामासाठी त्यांची गाडी नेण्याविषयी विचारल्यावर ते त्यांना गाडी लागणार असल्याचे सांगतील, तेव्हा बाबांना काही तरी काम असेल, हे लक्षात घेऊन मी माझ्या अडचणीवर काय पर्याय काढता येऊ शकतो, याचा शांतपणे विचार करून त्याविषयी वडिलांशी मोकळेपणाने चर्चा करीन.’
आपण जेव्हा रागात असतो किंवा आपल्या मनात प्रतिक्रिया असतात, तेव्हा आपण योग्य निर्णय घेण्याची क्षमता गमावून बसतो. योग्य निर्णय घेता येण्यासाठी आपले मन स्थिर आणि सकारात्मक, तसेच उपायात्मक असणे आवश्यक असते. त्यामुळे बाबांनी गाडी त्यांना लागणार असल्याचे सांगितल्यावर आपण शांत आणि स्थिर राहून परिस्थितीचा स्वीकार केला, तर आपल्याला अनेक पर्याय सुचू शकतात. उदा. बाबांना गाडी कधी लागणार आहे, ते परत कधी येणार आहेत ?, हे जाणून घेऊ शकतो. मी माझे काम नंतर कधी करू शकतो का ?, गाडीव्यतिरिक्त अन्य पर्यायांचा वापर करून म्हणजे बसने किंवा पायी चालत जाऊन मला काम करणे शक्य आहे का ?, तातडीचे असेल, तर ते काम अन्य कोणी करू शकते का ? आदी पर्यायांचा विचार करू शकतो. उपाययोजना म्हणून ‘बाबांची गाडी वापरण्याचे आयत्या वेळी न विचारता आधीच विचारून तसे नियोजन करू शकतो का ?’, असे पाहू शकतो. कोणत्याही प्रसंगात मी योग्य कसे वागायला पाहिजे, याचे चिंतन करून त्याप्रमाणे कृती करणे, ही प्रक्रिया आहे. यामध्ये समोरच्या व्यक्तीचे वागणे योग्य आहे कि अयोग्य याला महत्त्व नाही. प्रक्रिया म्हणजे स्वतःमध्ये सकारात्मक पालट करणे.
आता आपण अजून एका प्रसंगाचा अभ्यास करूया.
प्रसंग
समजा, प्रसंग असा आहे की, नणंदेने मला एक भेटवस्तू दिली होती. घाईघाईत उघडून पहातांना ती हातांतून निसटली आणि त्याला तडा गेला. तेव्हा नणंदेने मला ‘ती वस्तू काचेची आहे, काळजीपूर्वक उघड’, असे सांगायला हवे होते, अशी प्रतिक्रिया आली.
विचारप्रक्रियेचा अभ्यास
आताच्या प्रसंगाचा विचार केला, तर आपल्याला कोणते स्वभावदोष लक्षात येतात ? भेटवस्तू धांदरटपणे आणि घाईघाईने उघडणे, हा उतावीळपणा आहे, धांदरटपणा आहे. त्यामागे संयमाचा अभावही असू शकतो. वस्तू आच्छादलेली म्हणजे ‘कव्हर’ केलेली असतांना ती नाजूक आहे किंवा नाही, याची कल्पना येऊ शकत नाही; म्हणून कोणतीही वस्तू हाताळतांना ती काळजीपूर्वक हाताळल्यास संभाव्य हानी टाळता येईल.
त्याशिवाय या प्रसंगात अजून एक स्वभावदोष दिसून येतो, तो म्हणजे बहिर्मुखता ! स्वतःकडून चूक झाल्यावर ती कशामुळे झाली ?, ती टाळता येण्यासाठी काय करायला हवे, याचे चिंतन न करता ‘इतरांनी मला वस्तू काळजीपूर्वक हाताळण्याविषयी सांगायला हवे, असे वाटणे’, ही बहिर्मुखता आहे. थोडक्यात, आताचा प्रसंग एकच वाटत असला, तरी त्यात २ चुका लपलेल्या आहेत. त्यामुळे आपण सारणीमध्ये लिहितांना त्या २ चुका स्वतंत्रपणे लिहून त्यावर स्वयंसूचना द्यायला हवी.
पहिल्या चुकीविषयी म्हणजे भेटवस्तू घाईघाईने उघडून पहाण्याच्या चुकीविषयी कशी स्वयंसूचना होऊ शकेल ? जेव्हा मी नणंदेने दिलेली भेटवस्तू घाईघाईने उघडून पहात असेन, तेव्हा घाई केल्याने भेटवस्तू खाली पडू शकते, हे लक्षात घेऊन मी काळजीपूर्वक भेटवस्तू उघडीन. घाईने कृती करण्याच्या चुकीविषयी आपल्याला अ-१ पद्धतीने स्वयंसूचना द्यायची आहे; कारण ती कृतीच्या स्तरावरची चूक आहे.
दुसर्या प्रसंगात म्हणजे नणंदेने मला वस्तू काचेची आहे, असे सांगावे, असे वाटण्याच्या संदर्भात स्वयंसूचना कशी होऊ शकेल ?, तर जेव्हा नणंदेने भेटवस्तू देतांना ती काळजीपूर्वक हाताळण्याविषयी मला सांगावे, असे वाटत असेल, तेव्हा ही अपेक्षा अनाठायी आहे. भेटवस्तू काळजीपूर्वक हाताळणे, हे माझेच दायित्व आहे, हे लक्षात घेईन आणि माझे कुठे चुकले, याचे चिंतन करीन. इतरांविषयी मनात प्रतिक्रिया उमटल्याने आपण आता अ-२ पद्धतीने स्वयंसूचना द्यायची आहे.
कोणतीही प्रतिक्रिया मनात उमटल्यावर आरंभी आपल्या मनात आलेला विचार आपल्याला योग्यच वाटत असतो. समोरची व्यक्ती चुकीची वागल्यामुळे मला प्रतिक्रिया येतात, अशी विचारप्रक्रिया होते. थोडक्यात दुसर्यांच्या चुकांसाठी आपण न्यायाधीशाच्या भूमिकेत असतो, तर स्वतःच्या चुकांसाठी वकिलाच्या भूमिकेत असतो; पण त्रयस्थ होऊन अंतर्मुखपणे विचार केला, तर आपल्याला आपल्या उणिवा लक्षात येऊ शकतात. कोणी कसेही वागले, तरी त्या प्रसंगात माझ्याकडून योग्य असा प्रतिसाद दिला जाणे, ही साधना आहे. यात सगळ्यात महत्त्वाचे सूत्र काय आहे, तर आपली विचारप्रक्रिया किंवा आपली भूमिका आपल्याला योग्यच वाटत असते आणि हीच धोक्याची घंटा आहे. आपल्या मनात उमटणार्या प्रतिक्रियांचा स्वतःला किंवा इतरांना त्रास होत असेल, तर आपले काही तरी चुकत आहे, हे समजून घ्यावे. आपल्याला स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत काय करायचे आहे, तर या अयोग्य प्रतिक्रियांवर मात करून मनात सकारात्मक किंवा योग्य प्रतिक्रिया येण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आपल्याला इतरांना किंवा परिस्थितीला पालटण्यासाठी प्रयत्न न करता स्वतःला पालटायचे आहे, हा प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे.
सरावासाठी उदाहरण
आता आपण अजून एका उदाहरणाचा अभ्यास करूया. या प्रसंगामध्ये तुम्हाला स्वयंसूचना बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रसंग आहे, ‘यजमानांना ‘लाईट बिल’ भरायला सांगूनही त्यांनी ते न भरल्याने ‘ते घरातील कामांना कधीच प्राधान्य देत नाहीत’, या विचारांनी त्रास झाला.’ या प्रसंगावर तुम्ही अ-१ पद्धतीने स्वयंसूचना बनवायची कि अ-२ पद्धतीने याचा विचार करून स्वयंसूचना बनवायचा प्रयत्न करा. आपल्याला त्यासाठी १ मिनिटाचा वेळ आहे. प्रसंगाचा अभ्यास करतांना मनात प्रतिक्रिया कोणत्या स्वभावदोषामुळे येतात, याचा विचार करायला हवा. यजमानांनी ‘लाईट बिल’ न भरल्याने ‘ते घरातील कामांना कधीच प्राधान्य देत नाहीत’, या प्रतिक्रियेतून काय लक्षात येते, तर पूर्वीच्या काही प्रसंगांमध्ये यजमानांनी घरकामात साहाय्य केले नसल्याची जाणीव मनात तीव्र आहे. असे असेल, तर आपल्या मनात पूर्वग्रह आहे, हे लक्षात घ्यायला हवे. त्या जोडीला यजमानांना ‘लाईट बिल’ भरायला काय अडचण आली, हे मी जाणून घेतले नाही. ते जाणून घेण्याच्या आधीच आपल्या मनात काही प्रतिक्रिया उमटत असतील, तर आपण इतरांना समजून न घेता निष्कर्ष काढत आहोत, हे लक्षात घ्यायला हवे.
या प्रसंगात अ-२ पद्धतीने स्वयंसूचना बनवावी लागेल. ती कशी होईल, तर ‘यजमानांना ‘लाईट बिल’ भरायला सांगितल्यावर त्यांनी ते भरले नसेल, तेव्हा त्यांना नेमकी काय अडचण आली, हे मी जाणून घेईन आणि ‘लाईट बिल’ कधी अन् कसे भरता येईल, या विषयी उपाययोजना काढीन.
स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेशी संबंधित सनातनचे ग्रंथ
सनातन संस्थेच्या वतीने स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेच्या संदर्भात ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहेत. ते www.SanatanShop.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आपण या ग्रंथांचा आवर्जून लाभ घ्यावा.
अशा प्रकारे या आठवड्यात आपण स्वयंसूचना लिहिण्याचा प्रयत्न करूया. आपला जेवढा सराव होईल, त्यामुळे आपण प्रतिदिन आपल्याकडून झालेल्या चुकांचे चिंतन करून सारणीलिखाण करूया.
आजच्या सत्संगात आपण अ-१ स्वयंसूचना पद्धत आणि अ-२ स्वयंसूचना पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास केला आहे. आपण प्रतिदिन आपल्याकडून झालेल्या चुकांचे चिंतन करून सारणीलिखाण करूया. या आठवड्यात आपण आज शिकल्याप्रमाणे स्वयंसूचना लिहिण्याचा प्रयत्न करूया. आपला जेवढा सराव होईल, तेवढे आपल्याला स्वयंसूचना बनवणे चांगल्या प्रकारे जमू शकेल. कधी कधी आपल्याला अमूक एक कृती करणे जमेल कि नाही याचा ताण असतो किंवा एखाद्या प्रसंगाला सामोरे जातांना आत्मविश्वासाचा अभाव असतो. अशा प्रसंगांत आपल्याला अ-३ स्वयंसूचना पद्धत उपयोगी पडते. यासाठीच पुढील सत्संगात आपण अ-३ स्वयंसूचना पद्धतीचा अभ्यास करणार आहोत.