१. कार्याचे महत्त्व
२५०० वर्षांपूर्वी जैन-बौद्धांच्या बरोबरीनेच या देशात ठिकठिकाणी अड्डे जमवून बसलेले अन्य संप्रदायही वैदिक धर्माला आतून पोखरीत होते. शैव, शाक्त, वैष्णव, गाणपत्य, कापालिक अशी त्या संप्रदायांची नावे होती. त्यांच्या जोडीला तांत्रिकही मोठ्या प्रमाणावर होते. इ.स.चे सातवे शतक हे तांत्रिकांच्या उत्कर्षाचे युग मानायला हवे. शैव, शाक्त, बौद्ध, गाणपत्य इत्यादी अनेक तंत्रे त्या काळी मोठ्या जोरावर होती. या तंत्रविद्येच्या नावाखाली त्या काळात अनाचाराचे थैमान चालू झाले. तंत्रविद्येचे रहस्य जाणणारे फारच थोडे असल्यामुळे भोंदू आणि विषयलंपट लोकांचे फावले. त्यामुळे सामान्य लोकांना खरे काय आणि खोटे काय, हेच समजेनासे झाले. सर्व बाजूंनी त्यांची दशा दयनीय झाली. जो तो पंथ त्यांना अहमहमिकेने आपल्या जाळ्यात ओढू लागला. खरा धर्म या कोलाहलात गडप झाला. भारतात सर्वत्र धार्मिक अराजक माजले. अशा या अराजकाच्या काळात वैदिक धर्माला केवळ शाब्दिक पंडिताची नव्हे, तर क्रियाशील पंडिताची आवश्यकता होती. ज्याचे आचरण शुद्ध असेल, ज्याची बुद्धी सखोल आणि वाणी पवित्र असेल, ज्याच्या अंतरात सामान्य जनांच्या उद्धाराचा कळवळा असेल, असा कोणीतरी लोकोत्तर पुरुष त्या कामासाठी अवतरायला हवा होता. एष पन्था एतत्कर्म । (हा मार्ग आहे आणि हेच (योग्य) कर्म आहे), असे आपल्या वाणीने आणि कृतीने उद्घोषित करील, असा तो पुरुषश्रेष्ठ असायला हवा होता. भगवत्पूज्यपाद श्री शंकराचार्य तशा महापुरुषाच्या रूपाने अवतरले. त्यांनी वैदिक धर्मावरचे आघात परतवून लावले, धर्मातल्या विकृती दूर केल्या, कालधर्माप्रमाणे वाढलेली त्याच्यावरची जळमटे दूर केली आणि आचारप्रधान अन् अद्वैतप्रधान अशा वैदिक धर्माचा प्रकाश भारतभूमीवर सर्वत्र भरून टाकला. विझू पहाणारी वैदिक धर्माची ज्योत त्यांच्या विशुद्ध आचरणामुळे, ग्रंथकर्तृत्वामुळे आणि अखंड दीर्घोद्योगामुळे पुन्हा प्रकाशमान झाली. वैदिक धर्माचा यशोदुंदुभी सर्वत्र वाजू लागला, उपनिषदांची दिव्य वाणी पुनश्च प्रभावशाली बनली, भगवद्गीतेला अधिक गौरव प्राप्त झाला आणि देशातल्या धार्मिक अराजकाचे साम्राज्य निरस्त झाले. आज या भारतभूमीत वेदांविषयी जी श्रद्धा आणि ज्ञानाविषयी जो काही आदर दिसतो, त्याचे बरेचसे श्रेय आचार्यांनाच द्यावे लागेल. या लोकोत्तर कृतीने शंकराचार्य हे जगद्गुरु ठरले.
२. मठस्थापना
आचार्यांनी पांडित्य आणि तर्क यांच्या बळावर विरोधी मतवाद्यांचे फड मोडून काढले. हे विरोधी मतवाले लोक भारताच्या पुण्यक्षेत्रांमध्ये आपापले आखाडे स्थापून बसले होते. आचार्यांनी त्यांना तिथून हटवले आणि सगळी तीर्थक्षेत्रे वैदिक धर्माच्या कक्षेत आणली. ज्या वैदिक धर्माची त्यांनी पुनःप्रतिष्ठा केली, तो वैदिक धर्म पुढेही देशात टिकून रहायला हवा होता. त्या कामी सतत आणि शास्त्रशुद्ध प्रचाराची निकड होती. या कार्यासाठी त्यांनी भारताच्या चारही दिशांना चार धर्मपीठे स्थापली, तसेच धर्मजागृती सदोदित होण्यासाठी यतींचा (संन्याशांचा) एक संघही स्थापन केला.
२ अ. शंकराचार्यांची अन्य दोन पीठे आणि काही उपपीठे
चार प्रमुख पीठांव्यतिरिक्त काशीचा सुमेरपीठ आणि कांचीचे कामकोटीपीठ ही दोन्ही पीठे आचार्यनिर्मितच असल्याचे मानण्यात येते. कामकोटीपीठाचे अधिपती त्यालाच आचार्यांचे प्रधानपीठ समजतात. त्यांच्या मते आचार्यांनी चार मठांवर शिष्यांची नियुक्ती केली आणि ते कांचीक्षेत्री आले. तिथे त्यांनी स्वत:साठी पीठ निर्माण केले. कैलासाहून आणलेले योगलिंग त्यांनी इथे स्थापले आणि कामाक्षी देवीची उपासना करत इथेच आपला देह ठेवला. वरील प्रमुख पिठांच्या अंतर्गत काही उपपीठेही निर्माण झाली आहेत. त्यांची नावे अशी – कूडली, संकेश्वर, पुष्पगिरि, विरूपाक्ष, हव्यक, शिवगंगा, कोप्पाल, श्रीशैल, रामेश्वर आणि बागड.
संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘धर्मग्रंथ’
आद्य शंकराचार्यांनी स्थापलेली चार
पिठे ही हिंदु धर्माची परमोच्च श्रद्धास्थाने !
आद्य शंकराचार्यांनी सनातन वैदिक हिंदु धर्माच्या रक्षणार्थ भारतात चहुदिशांना चार शांकरपिठांची स्थापना केली. ही चार धर्मपिठे आजही सनातन हिंदु धर्माचे ज्ञानदीपस्तंभ आणि हिंदूंची परमोच्च श्रद्धास्थाने आहेत. या पीठचतुष्टयाचा सामान्यपरिचय पुढे दिला आहे.
दिशा |
पिठाचे नाम |
वेद |
प्रथम शंकराचार्य |
संन्यासी |
ब्रह्मचारी |
आराध्य देवता/देवी |
महावाक्य |
पूर्व | गोवर्धन (पुरी, ओडिशा) | ऋक | श्रीपद्मपाद | वन, अरण्य | प्रकाश | श्रीजगन्नाथ / श्रीविमला | प्रज्ञानं ब्रह्म। |
पश्चिम | शारदा (द्वारिका, गुजरात) | साम | श्रीसुरेश्वर | आश्रम, तीर्थ | स्वरुप | श्रीसिद्धेश्वर / श्रीभद्रकाली | तत्वमसि। |
उत्तर | ज्योतिः (बद्रिकाश्रम, उत्तराखंड) | अथर्व | श्रीतोटक | गिरी, पर्वत, सागर | आनन्द | श्रीनारायण / श्रीपूर्णगिरी | अयमात्मा ब्रह्म। |
दक्षिण | शृंगेरी(कर्नाटक) | यजुः | श्रीहस्तामलक | सरस्वती, भारती, पुरी | चैतन्य | आदिवरह / श्रीकामाक्षी | अहं ब्रह्मास्मि। |