षोडशोपचार पूजाविधी (भाग १)

आपल्या त्रिकालदर्शी ऋषीमुनींनी धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे देवपूजा केल्यासच त्यांच्या संकल्पशक्तीचा आपल्याला लाभ मिळतो. देवाची यथासांग पूजा केली, तरच तो आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतो. यासाठी धर्मशास्त्रात देवाचे आवाहन करणे, त्याला बसण्यासाठी आसन देणे, त्याला चरण धुण्यासाठी पाणी देणे यांसारखे क्रमवार सोळा उपचार शिकवून त्या माध्यमातून विधीवत भावपूर्ण धर्माचरण करण्यास शिकवले आहे. याला ‘षोडशोपचार पूजन’ असे म्हणतात. प्रस्तुत लेखात षोडशोपचार पूजनासंदर्भातील सर्वसाधारणतः करावयाच्या पूजनाची कृती पाहूयात.

 

षोडशोपचार पूजनाची कृती

सर्वसाधारणतः करायच्या पूजनाची कृती

१. पहिला उपचार : देवतेला आवाहन (बोलावणे) करणे

अ. आवाहनापूर्वी देवतेचे ध्यान करावे. ‘ध्यान’ म्हणजे देवतेचे वर्णन आणि स्तुती.

आ. ‘देवतेने आपली अंगे, परिवार, आयुधे आणि शक्ती यांसह येऊन मूर्तीत प्रतिष्ठित व्हावे आणि आपली पूजा ग्रहण करावी’, यांसाठी संपूर्ण शरणागत भावाने देवतेची प्रार्थना करणे, म्हणजेच `आवाहन’ करणे. आवाहनाच्या वेळी हातांत गंधाक्षता, तुळशीदल किंवा फुले घ्यावीत.

इ. आवाहनानंतर देवतेचे नाव घेऊन शेवटी ‘नमः’ असे म्हणून गंधाक्षता, तुळशीदल किंवा फुले देवतेला वाहून हात जोडावेत.

टीप –

१. देवतेच्या रूपानुसार तिचे नाव घ्यावे, उदा. श्री गणपति असल्यास ‘श्री गणपतये नमः ।’, श्री भवानीदेवी असल्यास ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’ आणि विष्णु पंचायतन असल्यास ‘श्री महाविष्णु प्रमुख पंचायतन देवताभ्यो नमः ।’, असे म्हणावे.

२. शाळीग्राम असल्यास अक्षता वहात नाहीत, तर श्री गणपतीला तुळशीदल वहात नाहीत.

२. दुसरा उपचार : देवतेला आसन (बसायला) देणे

देवतेचे आगमन झाल्यावर तिला बसण्यासाठी सुंदर आसन दिले आहे, असे कल्पून त्या त्या देवतेला प्रिय असे फूल, पत्री इत्यादी (उदा. श्री गणेशाला दूर्वा, शिवाला बेल, श्रीविष्णूला तुळस) द्यावे किंवा अक्षता द्याव्यात.

३. तिसरा उपचार : पाद्य (देवतेला पाय धुण्यासाठी पाणी देणे)

देव ताम्हनात ठेवून त्यांच्या पायांवर पळीने पाणी घालावे.

४. चौथा उपचार : अर्घ्य (देवतेला हात धुण्यासाठी पाणी देणे)

पळीभर पाणी घेऊन त्यात गंध, अक्षता आणि फूल घालून ते मूर्तीच्या हातावर घालावे.

५. पाचवा उपचार : आचमन (देवतेला चूळ भरण्यासाठी पाणी देणे)

पळीभर कापूरमिश्रित पाणी घेऊन ते देवाला अर्पण करण्यासाठी ताम्हनात सोडावे.

६. सहावा उपचार : स्नान (देवतेवर पाणी घालणे)

धातूच्या मूर्ती, यंत्रे, शाळीग्राम वगैरे असल्यास त्यांच्यावर पाणी घालावे. मातीची मूर्ती असल्यास फूल किंवा तुळशीदल यांनी फक्त पाणी शिंपडावे. चित्रे असल्यास ती प्रथम सुक्या वस्त्राने पुसून घ्यावीत. धूळ वगैरे जाण्यासाठी वस्त्र झटकून घ्यावे. नंतर ओल्या वस्त्राने पुसून पुन्हा सुक्या वस्त्राने पुसून घ्यावीत. देवतांना पुसण्याचे वस्त्र स्वच्छ असावे. वस्त्र नवीन असल्यास एक-दोन वेळा पाण्यात भिजवून वाळवलेले असावे. आपल्या खांद्यावरील उपरण्याने किंवा नेसलेल्या वस्त्राने देवतांना पुसू नये.

अ. देवतांना आधी पंचामृताने स्नान घालावे. पंचामृताने स्नान घालतांना दूध, दही, तूप, मध आणि साखर या क्रमाने घालावे. एका पदार्थाने स्नान घातल्यावर दुसर्‍या पदार्थाने स्नान घालण्यापूर्वी पाणी घालावे, उदा. दुधाने स्नान घातल्यावर दह्याने स्नान घालण्यापूर्वी पाणी घालावे.

आ. त्यानंतर देवतांना गंध आणि कापूर मिश्रित पाण्याने स्नान घालावे.

इ. पळीने पाणी घालून सुगंधी द्रव्यमिश्रित पाण्याने स्नान घालावे.

ई. देवतांना उष्णोदकाने स्नान घालावे. उष्णोदक म्हणजे खूप गरम नसलेले असे, म्हणजेच कोमट पाणी.

उ. यानंतर देवतांना महाभिषेक स्नान घालावे. महाभिषेक करतांना देवतांवर संततधार धरावी. यासाठी अभिषेकपात्राचा उपयोग
करावा. महाभिषेकाच्या वेळी शक्य असल्यास विविध सूक्ते म्हणावीत.

ऊ. महाभिषेकानंतर पुन्हा आचमनासाठी ताम्हनात पाणी सोडावे आणि देवतांना पुसून ठेवावे.

७. उपचार सातवा : देवतेला वस्त्र देणे

देवाला कापसाची दोन वस्त्रे अर्पण करावीत. एक वस्त्र देवाच्या गळ्यात अलंकारासारखे घालावे, तर दुसरे देवाच्या चरणांवर ठेवावे.

८. उपचार आठवा : देवतेला उपवस्त्र वा यज्ञोपवीत (जानवे) अर्पण करणे

पुरुषदेवतांना यज्ञोपवीत (उपवस्त्र) अर्पण करावे.

९ ते १३. उपचार नववा ते उपचार तेरावा :

देवतेला गंध (चंदन) लावणे, फुले वहाणे, धूप दाखवणे (किंवा उदबत्तीने ओवाळणे), दीप ओवाळणे आणि नैवेद्य दाखवणे – या पंचोपचारांच्या कृती वाचण्यासाठी ‘पंचोपचार पूजाविधी’ या लेखावर ‘क्लिक’ करा !

नैवेद्य दाखवल्यावर आरती आणि त्यानंतर कर्पूर-आरती करावी.

१४. उपचार चौदावा : देवतेला मनोभावे नमस्कार करणे
१५. उपचार पंधरावा : प्रदक्षिणा घालणे

नमस्कारानंतर देवाभोवती प्रदक्षिणा घालावी. देवाभोवती प्रदक्षिणा घालणे शक्य नसल्यास स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात.

१६. उपचार सोळावा : मंत्रपुष्प

प्रदक्षिणेनंतर मंत्रपुष्प म्हणावे आणि त्यानंतर देवावर अक्षता वहाव्यात.

सर्वांत शेवटी, पूजा करतांना आपल्याकडून कळत-नकळत झालेल्या चुका, तसेच पूजेत राहिलेल्या त्रुटी यांकरिता देवाची क्षमा मागावी आणि पूजेची समाप्ती करावी.

शेवटी विभूती लावावी, तीर्थ प्राशन करावे आणि प्रसाद ग्रहण करावा.

काही देवतांची पूजा करतांना त्या देवतेच्या वैशिष्ट्यानुसार किंवा देवतांची विशिष्ट पूजा करतांना नेहमीच्या षोडशोपचार पूजेत थोडाफार पालट (बदल) केला जातो. याविषयी जाणून घेण्यासाठी ‘षोडशोपचार पूजाविधी (भाग २)’ यावर ‘क्लिक’ करा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र’

2 thoughts on “षोडशोपचार पूजाविधी (भाग १)”

  1. खुप छान व उपयुक्त व शास्त्रोक्त माहिती! अनेकानेक धन्यवाद.

    Reply

Leave a Comment