परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे त्वरित आणि तंतोतंत आज्ञापालन करणार्‍या अन् वर्षाला ५ टक्के इतक्या वेगाने प्रगती करून सर्वांसमोर आदर्श निर्माण करणार्‍या सनातनच्या पहिल्या संत प.पू. (कै.) श्रीमती विमल फडके !

अनुक्रमणिका

वर्ष २००३ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले मिरज आश्रमात वास्तव्याला असतांना प.पू. (श्रीमती) विमल फडकेआजी (माझी आई) त्यांना भेटण्यासाठी मिरजेला गेल्या होत्या. १८.८.२००३ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प.पू. फडकेआजी यांच्याविषयी कृपाशीर्वादरूपी लिखाण एका कागदावर केले आणि ते प.पू. फडकेआजींच्या खोलीत येऊन त्यांना वाचून दाखवले. गुरुदेवांनी तो कागद प.पू. फडकेआजींच्या हातात दिला. त्या कागदावर गुरुदेवांनी लिहिले आहे, ‘८.७.२००३ ते १८.८.२००३ या कालावधीत पू. फडकेआजींची २ टक्के आध्यात्मिक प्रगती झाली. एरव्ही त्यांची वर्षाला ५ टक्के प्रगती होते. सर्वसाधारण साधकाची वर्षाला १ टक्का प्रगती होते.’

ते आठवल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘प.पू. फडकेआजींची वर्षाला ५ टक्के आध्यात्मिक प्रगती कशी होत असावी ?’ तेव्हा मला प.पू. फडकेआजींच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण कृतींचे स्मरण झाले. ते प्रसंग आठवल्यावर मला या प्रश्नाचा उलगडा झाला. येथे दिलेल्या प.पू. फडकेआजींशी संबंधित प्रसंगांतून त्यांच्यातील साधनेची तळमळ आणि भाव किती उच्च प्रतीचे होते, ते लक्षात येते. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती गतीने झाली. येथे दिलेली त्यातील काही सूत्रे सर्वांनाच शिकण्यासारखी आहेत.

प.पू. (कै.) श्रीमती विमल फडके

 

१. नवस पूर्ण करण्याची प.पू. फडकेआजींची जाणवलेली तळमळ, चिकाटी आणि देवावरील दृढ श्रद्धा !

‘वर्ष १९७० मध्ये प.पू. फडकेआजी (माझी आई) एका वैयक्तिक कारणासाठी गणपतीला नवस बोलल्या होत्या. त्यासाठी त्या प्रतिदिन शिवाजी पार्क (दादर) येथे असलेल्या गणपति मंदिरात जाऊन गणपतीला २१ प्रदक्षिणा घालत असत. एकदा घरी दिवसभर पाहुणे असल्यामुळे त्या ते विसरल्या. रात्री ९.४५ वाजता त्यांना ‘आज मी मंदिरात गेले नाही’, याची जाणीव झाली. त्या मला म्हणाल्या, ‘‘तू माझ्या समवेत चल. आपण दोघी मंदिरात जाऊया. माझ्या आजच्या प्रदक्षिणा राहिल्या आहेत.’’ मी लहान (९ वर्षांची) असल्याने त्यांना म्हणाले, ‘‘आता रात्र झाली आहे. उद्या जाऊया का ?’’ तेव्हा मला ‘नवस म्हणजे काय ?’ हेही कळत नव्हते.’’ प.पू. फडकेआजी म्हणाल्या, ‘‘नको. त्या त्या दिवशीच ते पूर्ण करायचे असते.’’ आमच्या निवासास्थानापासून गणपति मंदिर चालत २० मिनिटांच्या अंतरावर होते. तेवढ्या रात्री आम्ही मंदिरात गेलो. प.पू. फडकेआजींनी प्रदक्षिणा पूर्ण करेपर्यंत रात्रीचे ११ वाजले. त्या काळी इतक्या रात्री मार्गावर कुणीच नसायचे. या प्रसंगातून रात्रीची वेळ असून प.पू. फडकेआजींची नवस पूर्ण करण्याची तळमळ, चिकाटी आणि देवावरील दृढ श्रद्धा दिसून आली.

 

२. साधनेची तीव्र तळमळ !

श्रीमती मनीषा गाडगीळ

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अभ्यासवर्गांतील सूत्रे घरी आल्यावर पुन्हा सुवाच्च अक्षरात लिहून काढणे

वर्ष १९९० मध्ये प.पू. फडकेआजींनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. तेव्हा त्यांचे वय ६१ वर्षे होते. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले अध्यात्मावरील अभ्यासवर्ग घ्यायचे. अभ्यासवर्गाहून घरी आल्यानंतर प.पू. फडकेआजी त्यातील काही सूत्रे सुवाच्च अक्षरात लिहून ठेवत असत. त्या ती सूत्रे अन्य साधकांना वाचायला देत किंवा बारसे, हळदी-कुंकू यासारख्या घरगुती समारंभात छोटे प्रवचन करून किंवा साप्ताहिक सत्संगात प्रसंगानुसार त्यातील सूत्रे सांगत असत.

२ आ. नातवंडे किंवा नातेवाईक यांच्या मायेत न अडकता प्रत्येक रविवारी परात्पर गुरु डॉ. आठवले घेत असलेल्या अभ्यासवर्गाला जाणे

प.पू. डॉक्टर घेत असलेला अभ्यासवर्ग रविवारी असायचा. तो सुटीचा दिवस असल्याने काही वेळा नातेवाईक घरी यायचे किंवा मी माझ्या मुलांना घेऊन आईकडे (प.पू. फडकेआजींकडे) यायचे. तेव्हा माझा मुलगा (श्री. निनाद गाडगीळ, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३६ वर्षे) ३ वर्षांचा होता. प.पू. फडकेआजी अभ्यासवर्गाला जायला निघाल्यावर तो ‘आजी, तू बाहेर जाऊ नको’, असे म्हणत पुष्कळ रडायचा; पण त्या कधीही भावनेत अडकल्या नाहीत. ‘नातवंडांच्या प्रेमापोटी त्या अभ्यासवर्गाला गेल्या नाहीत’, असे कधीच झाले नाही.

 

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे त्वरित आणि १०० टक्के आज्ञापालन करणार्‍या प.पू. फडकेआजी !

३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अभ्यासवर्गात मृत व्यक्तीचे छायाचित्र घरात न लावण्यामागचे शास्त्र सांगितल्यावर स्वतःच्या निधन झालेल्या मुलाचे घरात लावलेले छायाचित्र काढून ठेवणे आणि यजमानांनी विरोध केल्यावर त्यांना त्यामागील शास्त्र समजावून सांगणे

प.पू. डॉक्टर घेत असलेल्या अभ्यासवर्गात ते जसे सांगतील, त्याप्रमाणे लगेच प्रत्येक कृती करून प.पू. फडकेआजींनी त्यांचे आज्ञापालन केले. एका अभ्यासवर्गात प.पू. डॉक्टरांनी ‘घरात मृत व्यक्तीचे छायाचित्र लावल्यामुळे मृत व्यक्ती आणि घरातील कुटुंबीय एकमेकांमध्ये अडकून रहातात. त्यामुळे मृत व्यक्तीला पुढची गती मिळत नाही’, असे सांगितले. वर्ष १९७५ मध्ये प.पू. फडकेआजींच्या मोठ्या मुलाचे (कै. अभय फडके याचे) वयाच्या २४ व्या वर्षी निधन झाले होते. अभ्यासवर्गाहून घरी आल्यावर केवळ अर्ध्या घंट्यात प.पू. फडकेआजींनी मुलाचे भिंतीवर लावलेले छायाचित्र काढून ठेवले. माझ्या वडिलांनी ((कै.) नारायण फडके यांनी) त्यांना ‘मुलाचे छायाचित्र पुन्हा लाव’, असे ८ दिवसांत अनेक वेळा सांगितले. तेव्हा प.पू. फडकेआजींनी स्थिर राहून मुलाचे छायाचित्र न लावण्यामागचे आध्यात्मिक कारण त्यांना समजावून सांगितले. त्यानंतर वडील शांत झाले.

 

४. सेवेची तळमळ !

४ अ. रिक्शावाल्यांनाही साधना आणि नामजप सांगून कृतीप्रवण करणे

प.पू. फडकेआजींना ‘समाजातील सर्वांपर्यंत सनातनचे कार्य पोचावे’, अशी पुष्कळ तळमळ होती. त्यामुळे त्या जी व्यक्ती भेटेल, तिला सनातनचे कार्य सांगायच्या. मुंबई आणि पुणे येथे रहात असतांना अनेकदा त्यांना रिक्शाने प्रवास करावा लागत असे. रिक्शात बसल्यापासून उतरेपर्यंत त्या रिक्शावाल्यालाही साधना अन् नामजप यांविषयी सांगत असत. प.पू. फडकेआजी रिक्शातून उतरतांना तो रिक्शावाला त्यांना म्हणायचा, ‘‘मी आता नामजप चालू करतो.’’

प.पू. फडकेआजींमधील तळमळीमुळेच त्यांच्या संपर्कातील व्यक्ती अल्प कालावधीत कृतीप्रवण होत असत.

४ आ. दादर ते नागपूर या प्रवासात रेल्वेच्या डब्यात फिरून साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या २५ अंकांचे वितरण करणे

वर्ष १९९९ मध्ये प.पू. फडकेआजी नागपूर येथील त्यांच्या नातेवाइकांकडे गेल्या होत्या. या प्रवासात त्यांनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या २५ अंकांचे वितरण केले. त्यांनी सहप्रवाशांना साधनेचे महत्त्व सांगून अर्पणही मिळवले. प.पू. फडकेआजी नागपूरहून परत आल्यावर मी त्यांना विचारले, ‘‘तुम्हाला रेल्वेत फिरायला कसे जमले ? एका डब्यातून दुसर्‍या डब्यात जाण्यासाठी असलेल्या जागेवर गाडी पुष्कळ हलते.’’ त्या म्हणाल्या, ‘‘प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. डॉक्टर माझ्या समवेत असतात. तेच माझी काळजी घेतात. एका डब्यातून दुसर्‍या डब्यात जातांना कुणीतरी मला साहाय्य करायचे अन् माझा हात धरून मला दुसर्‍या डब्यात पोचवायचे. श्री गुरूंविना माझा हात धरून मला कोण नेणार ?’’ यातून प.पू. फडकेआजींची श्री गुरूंवरील अपार श्रद्धा आणि सेवेची तळमळ दिसून येते.

४ इ. अंथरुणाला खिळलेल्या असूनही आश्रमातील साधकांकडे सतर्कतेने लक्ष असणे

वर्ष २००१ मध्ये प.पू. फडकेआजी देवद (पनवेल) आश्रमाजवळील सनातन संकुलात रहायला आल्या. नंतर ११.७.२००३ ते २०.२.२००७ ही साडेतीन वर्षे त्या अंथरुणाला खिळून असल्याने त्या आश्रमात जाऊ शकत नव्हत्या; पण त्यांचे घर आश्रमाच्या शेजारीच असल्याने आश्रमातील उद्घोषणेची यंत्रणा त्यांच्या घरीही जोडण्यात आली होती. त्यामुळे आश्रमात होणारी आरती, तसेच साधकांना संपर्कासाठी केल्या जाणार्‍या उद्घोषणा त्यांना घरात ऐकू येत असत. काही वेळा एखाद्या साधकासाठी अनेकदा उद्घोषणा केली जायची; परंतु त्याच्याकडून संपर्क केला जात नसे. तेव्हा प.पू. फडकेआजी म्हणायच्या, ‘‘इतक्या वेळा उद्घोषणा करूनही तो साधक संपर्क का करत नाही ? त्याच्या लक्षात येत नसेल, तर अन्य साधक त्याला सांगत नाहीत का ?’’ यातून प.पू. फडकेआजींची सतर्कता दिसून येते. खरेतर ‘संबंधित साधकाने संपर्क का केला नाही ?’, याकडे लक्ष देण्याची त्यांना काहीच आवश्यकता नव्हती; पण आश्रमातील साधकांकडेही त्यांचे बारकाईने लक्ष असायचे.’

 

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा समर्पित अन् उत्कट भाव !

५ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना रेल्वेचा डबा शोधायला लागू नये’, यासाठी एक घंटा आधी रेल्वेस्थानकात पोचून त्यांच्या डब्याजवळ उभे रहाणे

‘वर्ष १९९६ मध्ये प.पू. फडकेआजी एकदा प.पू. डॉक्टरांच्या समवेत विदर्भात प्रचारासाठी जाणार होत्या. त्यांची रेल्वे सुटण्याची वेळ संध्याकाळी ६ वाजता होती. प.पू. फडकेआजी १ घंटा आधीच दादर रेल्वेस्थानकावर पोचल्या. गाडी स्थानकात आल्यावर त्यांनी त्यांचे सामान त्यांच्या जावयांना (कै. अरविंद गाडगीळ, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) त्यांच्या जागेवर (सीटवर) ठेवायला सांगितले आणि त्या प.पू. डॉक्टरांच्या डब्याजवळ जाऊन उभ्या राहिल्या. ‘रेल्वेस्थानकात आल्यावर प.पू. डॉक्टरांचा डबा शोधण्यात वेळ जायला नको’ आणि ‘मला पाहून प.पू. डॉक्टर लगेचच या डब्याजवळ येतील’, असा त्यांचा भाव होता.

५ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ यांविषयी असलेला भाव !

वर्ष १९९८ मध्ये साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू झाले. तेव्हा प.पू. फडकेआजी पुणे येथे रहात होत्या. त्याच इमारतीत साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे २ वर्गणीदार रहात होते. प्रत्येक शुक्रवारी प.पू. फडकेआजी इमारतीतील वाचकांच्या घरी जाऊन त्यांना विचारायच्या, ‘‘तुम्हाला साप्ताहिक वेळेवर मिळते ना ? काही अडचण नाही ना ?’’ तेव्हा प.पू. फडकेआजींचे वय ६९ वर्षे होते. प.पू. फडकेआजी इमारतीच्या पहिल्या माळ्यावर रहात होत्या, तर दोन्ही वाचक इमारतीतील चौथ्या माळ्यावर रहात होते. माझी मोठी बहीण (सौ. शोभना करमरकर) प.पू. फडकेआजींना म्हणायची, ‘‘तुला ते वाचक भेटतील, तेव्हा त्यांना विचार. तू कशाला ४ जिने चढून वर जातेस ?’’ प.पू. फडकेआजी तिला म्हणाल्या, ‘‘हा माझ्या श्री गुरूंचा अंक आहे. तो त्यांना वेळेतच मिळायला हवा. मी इथे रहाते, म्हणजे ‘त्यांना अंक वेळेवर मिळाला कि नाही’, हे पहाणे माझे दायित्व आहे.’’

५ इ. ‘घर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आहे’, या भावाने घराची चावी त्यांच्या छायाचित्राजवळ ठेवणे

देवद, पनवेल येथे सनातनच्या संकुलात वास्तव्याला आल्यावर प.पू. फडकेआजी घराची चावी प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्राजवळ ठेवायच्या आणि आम्हाला सांगायच्या, ‘‘हे माझे घर नाही. गुरुदेवांचे आहे; म्हणून मी घराची चावी त्यांच्या छायाचित्राजवळ ठेवते. तेच घर सांभाळतात.’’

५ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेल्या अपार भावामुळे देहभान हरपून त्यांच्यासाठी खाऊ सिद्ध करणार्‍या प.पू. फडकेआजी !

५ ई १. परात्पर गुरु डॉ. आठवले देवद येथून गोवा येथे जातांना प.पू. फडकेआजींनी त्यांच्यासाठी खाऊ करून देण्याचे ठरवणे

प.पू. फडकेआजी देवद, पनवेल येथील सनातन संकुलात रहायला आल्यावर एकदा प.पू. डॉक्टर देवद आश्रमात ३ – ४ दिवस वास्तव्याला आले होते. तेव्हा एक दिवस संध्याकाळी प.पू. फडकेआजी मला म्हणाल्या, ‘‘प.पू. डॉक्टर उद्या सकाळी गोव्याला जाणार आहेत. आपण त्यांना १ किलो मुगाच्या पिठाचे लाडू करून देऊया. माझ्याकडे साजूक तूप आहे.’’

५ ई २. ‘गुरुचरणी अर्पण करायची प्रत्येक गोष्ट पूर्ण शुद्ध असावी’, या भावाने मुगाच्या डाळीचे पीठ घरी करून त्याचे लाडू करून ते अर्पण करणे

मुगाच्या डाळीचे पीठ करण्याविषयी आमच्या दोघींमध्ये झालेला संवाद येथे दिला आहे.

प.पू. फडकेआजी : गिरणीतून पीठ दळून आणले की, त्यात अन्य पिठे मिसळून येतात; म्हणून घरीच ‘मिक्सर’वर मुगाच्या डाळीचे पीठ करूया.

मी (श्रीमती मनीषा गाडगीळ) : त्याला फार वेळ लागेल.

प.पू. फडकेआजी : गुरुदेवांसाठी करायचे आहे, मग कितीही वेळ लागला, तरी चालेल.

‘गुरुचरणी अर्पण करायची प्रत्येक गोष्ट पूर्ण शुद्ध असावी’, या भावाने त्यांनी मुगाच्या डाळीचे पीठ घरी करून त्याचे लाडू केले. सर्व होईपर्यंत रात्रीचे ३:३० वाजले. त्यानंतर प.पू. फडकेआजींनी थोडी विश्रांती घेतली. काहीच वेळाने त्या उठल्या आणि सर्व आवरून पहाटे ५.३० वाजता प.पू. डॉक्टरांना लाडू देण्यासाठी आश्रमात गेल्या. यातून त्यांचा गुरुदेवांप्रती असलेला अपार भाव मला शिकता आला.

५ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करण्यासाठी झोपेवर मात करून रात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत समष्टीसाठी नामजप करणे

१३.१२.२००२ या दिवशी प.पू. डॉक्टरांनी प.पू. फडकेआजींच्या निवासस्थानी येऊन त्यांना ‘सनातनच्या पहिल्या संत’ घोषित केले. २०.५.२००३ या दिवशी प.पू. फडकेआजींचा ७५ वा वाढदिवस देवद आश्रमातील साधकांनी भावपूर्णरित्या साजरा केला. २१.५.२००३ या दिवसापासून प.पू. डॉक्टरांनी प.पू. फडकेआजींना रात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत समष्टीसाठी नामजप करायला सांगितला. तेव्हा प.पू. फडकेआजींना सेवा मिळाल्याचा पुष्कळ आनंद झाला. प.पू. फडकेआजी रात्री १२ वाजता नामजपाला बसत. त्यांना मध्यरात्री २ वाजता थोडी झोप येत असे; पण झोप आल्यावर त्या लगेचच उठून काठी घेऊन फेर्‍या मारत पहाटे ४ वाजेपर्यंत नामजप पूर्ण करत असत. त्यानंतरच त्या झोपायच्या आणि पुन्हा नेहमीच्या वेळेत ६.३० वाजता उठायच्या. तेव्हाही त्या पुष्कळ उत्साही असायच्या. जुलै २००३ मध्ये रुग्णाईत होईपर्यंत पावणेदोन मास त्यांनी असा नामजप केला.

५ ऊ. कर्तेपणा नसल्यामुळे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले शक्ती देऊन नामजप करून घेत आहेत’, असा भाव असणे

‘रात्री नामजप करायला कसा जमतो ?’, असे कुणी विचारल्यास त्या सहजतेने सांगायच्या, ‘‘मी कुठे काय करते ! ७५ व्या वर्षी रात्री जागणे माझ्यासाठी अशक्यच आहे. प.पू. डॉक्टरच माझ्याकडून नामजप करून घेतात आणि त्यासाठी मला शक्तीही देतात. नाहीतर ते अशक्यच आहे.’’

५ ए. ग्लानी असतांनाही परात्पर डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करण्याचा ध्यास असणे आणि परात्पर डॉ. आठवले यांनी त्यांच्या तळमळीचे कौतुक करणे

परात्पर गुरु डॉक्टर मिरज आश्रमात असल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी प.पू. फडकेआजी जुलै मासात मिरज आश्रमात गेल्या आणि तिथेच रुग्णाईत झाल्या. १८.८.२००३ या दिवशी आम्ही प.पू. आजींना मिरज आश्रमातून देवद, पनवेल येथील त्यांच्या घरी घेऊन आलो. त्यानंतर एक दिवस त्यांना त्रास होत असल्याने त्या पुष्कळ ग्लानीत होत्या.

प.पू. फडकेआजींचा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’, हा नामजप अखंड चालूच असायचा; म्हणून प.पू. डॉक्टरांनी त्यांना पोटावर हात ठेवून न्यास करायला सांगितला होता. ग्लानीत असूनही त्या ‘स्वतःचा हात पोटावर आहे ना ?’ याकडे लक्ष ठेवत होत्या. मध्येच त्यांचा हात पोटावरून बाजूला  सरकायचा, तेव्हा त्या लगेच पुन्हा हात पोटावर ठेवत होत्या. काही वेळाने डोळे पूर्ण उघडल्यावर त्यांनी आधी मला विचारले, ‘‘माझा हात पोटावर होता का ? ग्लानीमुळे माझ्या ते लक्षात येत नव्हते. प.पू. डॉक्टरांनी न्यास करायला सांगितला होता ना ? तू त्यांना माझा निरोप दे, ‘मला पुष्कळ ग्लानी असल्यामुळे पोटावर हात नीट ठेवता आला नाही.’’ हे सर्व मी प.पू. डॉक्टरांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘त्यांची आज्ञापालनाची तळमळ किती आहे ना !’’

५ ऐ. ‘तीव्र शारीरिक त्रास होत असतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने नामस्मरण होत असल्याने वेदना सुसह्य होतात’, असा भाव असणे

तेव्हा प.पू. फडकेआजींना होणारे शारीरिक त्रास वाढत होते. काही वेळा शारीरिक त्रास वाढल्यावर त्या वैखरीने नामजप करत असत. वेदना न्यून झाल्यावर त्या मला सांगायच्या, ‘‘इतक्या वेदना होत असतांनाही प.पू. डॉक्टरांच्या कृपेने माझ्याकडून नामस्मरण होते. त्यामुळे मला वेदना सुसह्य होतात. माझा नामजप अखंड होत आहे. आता नाम थांबतच नाही.’’

‘प.पू. फडकेआजींच्या वरील सर्वच उदाहरणांतून शिकण्याची दृष्टी देऊन अध्यात्मातील विविधांगी पैलू लक्षात आणून दिले’, यासाठी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता ! ‘या उदाहरणांतून शिकता येऊन माझ्याकडूनही गुरुदेवांना अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न होऊ देत’, अशी त्यांच्या कोमल चरणी प्रार्थना !’

– श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६२ वर्षे) (प.पू. फडकेआजी यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.२.२०२४)

Leave a Comment