सोलापूर येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ विषयावर प्रवचन
सोलापूर – ज्या कुळात आपला जन्म झाला आहे, त्या कुलदेवतेचे नामस्मरण करा. ती आपल्या प्रारब्धाशी संबंधित देवता आहे. आपली साधना वाढल्यावर आपल्याला जीवनात सद्गुरु भेटतील. नामस्मरण केल्यास जीवनाचे कल्याण होईल, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. ६ मार्च २०२४ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने उपलप मंगल कार्यालय येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मिनेश पुजारे यांनी केले. या वेळी उपस्थित जिज्ञासूंनी श्री. चेतन राजहंस यांना साधनेविषयी विविध शंका आणि प्रश्न विचारून त्याचे समाधान करून घेतले. या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या समष्टी संत पू. (कु.) दीपाली मतकर यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली.