सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू आणि सनातन संस्थेचे ज्ञानयोगी संत पू. अनंत बाळाजी आठवले यांनी लिहिलेल्या ‘अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांचे बोध’ या मराठी लघुग्रंथाचे लोकार्पण पू. अनंत आठवले यांच्या ढवळी, गोवा येथील निवासस्थानी करण्यात आले. सनातनचे ज्ञानयोगी संत पू. अनंत बाळाजी आठवले यांच्यासह सनातन संस्थेचे पू. पृथ्वीराज हजारे, सौ. सुनीती आठवले (पू. अनंत आठवले यांच्या पत्नी) आणि श्री. विजय आठवले (पू. अनंत आठवले यांचे सुपुत्र) यांनी लघुग्रंथाचे लोकार्पण केले. या सोहळ्यात लघुग्रंथाची सेवा करणारे सनातनचे साधक आणि पू. अनंत आठवले यांच्या सेवेत असणारे साधकही उपस्थित होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन सनातनचे साधक श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांनी केले.
लघुग्रंथाचे लोकार्पण झाल्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पत्राद्वारे कळवलेल्या लघुग्रंथाच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचे वाचन करण्यात आले. या वेळी उपस्थित संत आणि पू. अनंत आठवले यांचे नातेवाईक यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. लघुग्रंथाची सेवा करणारे साधक आणि पू. अनंत आठवले यांच्या सेवेत असणारे साधक यांच्या मनोगताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
माझे मोठे भाऊ पू. अनंत बाळाजी आठवले यांच्या
‘अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांचा बोध’ या लघुग्रंथाची अद्वितीय वैशिष्ट्ये
माझे मोठे भाऊ ज्ञानयोगी संत पू. अनंत बाळाजी आठवले यांच्या ‘अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांचा बोध’ या लघुग्रंथाचे प्रकाशन झाले. मी त्या प्रकाशन समारंभाला जाऊ शकत नसल्यामुळे त्यांनी माझ्याकडे त्या ग्रंथाची एक प्रत पाठवली. तिच्यासंदर्भात माझ्या लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. माझे वय ८२ वर्षे आहे. आतापर्यंत मी अध्यात्मातील शेकडो ग्रंथांचा अभ्यास केला आहे. हा पहिलाच ग्रंथ असा आहे की, तो हातांत घेतल्यावर माझ्या दोन्ही हातांना अतिशय आनंददायी स्पंदने जाणवत होती. तो आनंद हृदयातही जाणवत होता.
२. हा पहिलाच ग्रंथ असा आहे की, जो वाचतांना मला प्रत्येक वाक्यातून विषय समजत होता आणि आनंद होत होता. या ग्रंथाचे वाचन करतांना वाचकांना आनंद होईल आणि विषय कळेल. अध्यात्मातील इतर ग्रंथ वाचतांना विषय समजण्यासाठी मन एकाग्र करावे लागते.
३. अध्यात्मातील विविध विषय इतक्या सोप्या भाषेत मांडणारा हा ग्रंथ कल्पनातीत आहे. मी स्वतः संकलित केलेले २६९ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत; पण पू. भाऊ यांच्यासारखे सोप्या भाषेत लिखाण करणे मला जमलेले नाही.
४. अध्यात्मातील विविध विषयांवर लेखन करणारे लेखक अल्प आहेत. पू. भाऊ त्यापैकी एक आहेत.
५. मी हा ग्रंथ माझ्या बाजूला असलेल्या दोन साधकांच्या हातात दिला. तो हातात घेतल्यावर ज्याला वाईट शक्तींचा त्रास नाही, त्याला माझ्याप्रमाणे आनंद झाला आणि ज्याला वाईट शक्तींचा त्रास आहे त्याच्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय झाले. त्यामुळे वाईट शक्तींचा त्रास असणार्या सहस्रो जणांना या ग्रंथामुळे आध्यात्मिक उपायांचाही लाभ होणार आहे.
६. वयाच्या ८८ व्या वर्षी असा आध्यात्मिक ग्रंथ लिहिणारे अनंत बाळाजी आठवले, हे एकमेव ग्रंथलेखक असावेत; म्हणून आणि माझे मोठे भाऊ म्हणून मी त्यांच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालतो.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
लघुग्रंथाच्या लोकार्पणाच्या वेळी संत आणि नातेवाईक यांनी व्यक्त केलेले मनोगत !
१. सनातनच्या साधकांचे सौभाग्य आहे की, त्यांना केवळ भक्ती आणि
चित्तशुद्धी शिकवणारे नाही, तर या दोन्हींसाठी प्रयत्न करून घेणारे गुरु लाभले आहेत ! – पू. अनंत आठवले
सनातनचे साधक अत्यंत भाग्यवान आहेत. त्यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यासारखे समर्थ गुरु लाभले आहेत. ‘समर्थ’ शब्द म्हटल्यावर समर्थ रामदासस्वामी यांची आठवण होते. त्यांनी एकूण २०५ श्लोक असलेले ‘मनाचे श्लोक’ ग्रंथ लिहिला आहे, त्यात त्यांनी मनाला उपदेश केले आहेत. यात पहिल्या श्लोकात त्यांनी देवांना नमन केले आहे, तर दुसर्या श्लोकाच्या पूर्वार्धात त्यांनी ‘भक्तीने सहजतेने श्रीहरि भेटू शकतो’, असे सांगितले, तर श्लोकाच्या उत्तरार्धात त्यांनी ‘भक्ती करण्यासह अनुचित आचरण करणे टाळावे, म्हणजे चित्तशुद्धी करावी’, असे सांगितले आहे. यातून ‘केवळ भक्तीने देव मिळत नाही. त्यासाठी चित्तशुद्धी करणेही आवश्यक आहे’, असा संदेश समर्थ रामदासस्वामींनी समाजाला दिला आहे. सनातनच्या साधकांचे सौभाग्य आहे की, त्यांना भक्ती आणि चित्तशुद्धी शिकवणारे नाही, तर साधकांकडून या दोन्हींसाठी प्रयत्न करून घेणारे गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले लाभले आहेत. त्यांनी सनातनच्या साधकांना स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया शिकवून आध्यात्मिक उन्नतीची वाट मोकळी करून दिली आहे.
२. अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेत विषयांची मांडणी करणे,
हे पू. अनंत आठवले यांच्या ग्रंथांचे वैशिष्ट्य ! – पू. पृथ्वीराज हजारे
पू. अनंत आठवले यांनी लिहिलेल्या ग्रंथांचे वैशिष्ट्य, म्हणजे अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेत ते करत असलेली विषयाची मांडणी ! ते इतक्या सहज आणि सोप्या भाषेत अध्यात्मातील गूढ तत्त्व मांडतात की, साधना ठाऊक नसलेल्या सामान्य वाचकालाही विषयाचे पूर्णपणे आकलन होते. यामुळे अनेक साधक आवडीने त्यांचे लिखाण वाचतात, तसेच चातकाप्रमाणे त्यांचे ग्रंथ आणि ‘सनातन प्रभात’मधील लेखाची वाट पहातात. ‘पू. अनंत आठवले यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्याकडून विविध विषयावर ग्रंथ लेखनाचे कार्य घडत राहो’, अशी ईश्वराला मी प्रार्थना करतो.
३. ‘माझे यजमान महान आहेत. मी त्यांच्याविषयी शब्दांत
काही सांगू शकत नाही !’ – सौ. सुनीती आठवले, पू. अनंत आठवले यांच्या पत्नी
४. लेखकाच्या पुस्तकाने वाचकांच्या हृदयात
स्वतःचे स्थान निर्माण करणे, हेच लेखकाचे यश असून
वडिलांनी ते मिळवले आहे !– विजय आठवले, पू. अनंत आठवले यांचे पुत्र
लहानपणीच आमच्या लक्षात आले होते की, माझ्या वडिलांमध्ये अनेक गुण आहेत. ते नोकरी करत असतांना कधीही विलंबाने कार्यालयात गेले नाहीत किंवा कधी कार्यालयातून लवकर घरी आले नाहीत. उलट कार्यालयात जाण्यासाठी विलंब होऊ नये; म्हणून ते ३० ते ४५ मिनिटे लवकरच घरातून बाहेर पडायचे. त्यांच्या अशा अनेक आदर्श कृतींना बघूनच आम्ही अनेक सूत्रे शिकलो.
ते सेवानिवृत्त होत असतांना त्यांचे ज्ञान आणि कार्याची गुणवत्ता बघून ३ बांधकाम व्यावसायिकांनी त्यांना त्यांच्या समवेत काम करण्याचा आग्रह केला होता. वडील धनार्जनाच्या उद्देशाने संबंधित प्रस्ताव स्वीकारू शकले असते; पण त्यांनी तसे न करता सेवानिवृत्त झाल्यावर साधना करण्याला प्राधान्य दिले. प्रथम मुंबई, त्यानंतर गोवा येथे वास्तव्य करतांना त्यांनी त्यांची साधना चालू ठेवली. पुढे त्यांनी ग्रंथलेखनाला आरंभ केला. त्यांनी लिहिलेले ग्रंथ मी आवर्जून माझे मित्र आणि नातेवाइक यांना देतो. त्या सर्वांना हे ग्रंथ पुष्कळ आवडतात. तेही ग्रंथांचे मोकळेपणाने कौतुक करतात. एका लेखकाच्या पुस्तकाने वाचकांच्या हृदयात स्वतःचे स्थान निर्माण करणे, हेच लेखकाचे यश असते. हे यश वडिलांनी मिळवले आहे.