साधकांना साधनेला अनुकूल वातावरण पूर्णवेळ उपलब्ध व्हावे, यासाठी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी रामनाथी, गोवा येथे सनातन आश्रमाची निर्मिती केली आहे. येथे साधक आनंदी आश्रमजीवनाचा लाभ घेत आहेत.
स्वयंशिस्त आणि नियोजनबद्धता
१. आश्रमात प्रवेश केल्यावर स्वतःची पादत्राणे नीट मांडणीत ठेवणे, ध्यानमंदिरात नामजपाला बसणे, जेवल्यानंतर ताटात अन्न न टाकणे आदी सर्वच कृती शिस्तबद्धतेने केल्या जातात.
२. आश्रमातील साधक दैनंदिन सेवा, व्यष्टी साधना, प्रासंगिक कार्यक्रम इत्यादी ठरलेल्या नियोजनानुसार पार पाडतात.
स्वच्छता आणि नीटनेटकेपणा
१. आश्रमातील तरुण साधक प्रतिदिन न्यूनतम १ घंटा (तास) मन लावून आश्रमस्वच्छता (प्रसाधनगृहाची स्वच्छता करणे, परिसर झाडणे, लादी पुसणे आदी सेवा ) करतात.
२. प्रत्येक वस्तू (उदा. कपाटातील ग्रंथ, धुतलेल्या ताट- वाट्या) त्या त्या स्थानी नीटनेटकेपणाने ठेवली जाते.
प्रत्येक कृती सत्यं शिवं सुंदरम् (सात्त्विक) करणे
१. प्रत्येक कृतीतून चांगली स्पंदने यावीत, या उद्देशाने साधक प्रत्येक कृती सात्त्विक करण्याचा प्रयत्न करतात.
२. सात्त्विक वेशभूषा करणे, स्वतःच्या कपाटातील वस्तूंची मांडणी चांगली दिसेल अशा पद्धतीने त्यातील खण लावणे, धान्य नीट वाळत घालणे, ही त्याची काही उदाहरणे आहेत.
लहान लहान गोष्टींतूनही काटकसरीपणा
१. आश्रमातील प्रत्येक वस्तू ही गुरूंची आहे, तसेच वीज, पाणी आदी गोष्टी राष्ट्रीय संपत्ती आहेत, या भावाने सर्व वस्तू काटकसरीने वापरल्या जातात.
२. संगणकीय प्रतींसाठी पाठकोरे कागद वापरणे, लिखाणासाठी कागदाचे तुकडे वापरणे, ही त्याची काही उदाहरणे आहेत.
कुटुंबभावनेने एकमेकांच्या सुख-दु:खांत सहभाग
१. साधकांचे वाढदिवस, विवाह, पंचाहत्तरी आदी कार्यक्रम आश्रमात धर्मशास्त्रानुसार आनंदाने पार पाडले जातात.
२. कौटुंबिक अडचणी, दुःखाचे प्रसंग आदी समयीही साधक एकमेकांना तत्परतेने साहाय्य करतात.
रुग्ण-साधकांची मनःपूर्वक सेवाशुश्रूषा
१. पथ्याचे जेवण आवश्यक असणार्या साधकांसाठी त्यांच्या आवश्यकतेनुसार स्वयंपाक बनवला जातो.
२. साधक रुग्णाइर्त झाल्यास आश्रमातील साधक-डाॅक्टर आणि अन्य साधक त्याची सेवा करतात. रुग्णाला घरी जावे लागत नाही.
साधनेची तळमळ आणि सर्वस्वाचा त्याग
१. साधनेची तळमळ अन् सेवेची ओढ यांमुळे भारतातील विविध प्रांत अन् वयोगटांतील शेकडो साधक आश्रमजीवन स्वीकारतात.
२. नोकरी-व्यवसाय, कौटुंबिक सुख आदींचा त्याग करून आलेले हे सर्व साधक आश्रमातील सर्व सेवा विनावेतन करतात.