स्वधर्म आणि स्वसंस्कृती यांचा हिंदूंना पडलेला विसर आणि पाश्चात्त्य संस्कृतीची पडलेली भुरळ यांचा परिणाम म्हणून आपल्या धार्मिक कृतींवर पाश्चात्त्य संस्कृतीचा मोठा प्रभाव पडला आहे. वाढदिवस औक्षण करून नव्हे, तर केक कापून आणि मेणबत्त्या विझवून साजरा करणे; उद्घाटन नारळ वाढवून नव्हे, तर फीत कापून करणे; दीपप्रज्वलन तेलाच्या दिव्याने नव्हे, तर मेणबत्तीने करणे यांसारख्या कितीतरी उदाहरणांवरून हे लक्षात येते. अशा कृतींतून चैतन्य मिळत तर नाहीच, उलट त्या आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारकही ठरतात.
धार्मिक कृतींचे महत्त्व आणि हिंदु धर्मशास्त्रानुसार त्या केल्यास होणारे लाभ यांविषयी प्रस्तुत लेखात पाहू.
१. हिंदु धर्मातील धार्मिक, कौटुंबिक आणि सामाजिक कृतीतून धर्माचरणाचा संदेश !
‘सुखं न विना धर्मात् । तस्मात् धर्मपरो भवेत् ।।’ म्हणजेच ‘खरे सुख (आनंद) हे धर्मपरायण झाल्याविना मिळत नाही; म्हणून नेहमी धर्मपरायण असावे’, असे संस्कृत सुवचन आहे. जीवनाचे रहाटगाडे चालवतांना सतत धर्मपरायण बनण्याची, म्हणजेच धर्माचरण करण्याची सोपी संधी हिंदु धर्माने विविध धार्मिक कृती, संस्कार, सण, व्रते इत्यादींच्या माध्यमातून दिली आहे. नित्याची देवपूजा, तसेच सण-व्रते यांसारख्या उपासनेशी संबंधित कृतींतूनच नव्हे, तर कौटुंबिक आणि सामाजिक स्तरांवरील धार्मिक कृतींतूनही धर्माचरणाचा संदेश हिंदु धर्माने दिला आहे.
२. कोणतीही विधायक कृती हिंदु धर्माप्रमाणे विधीवत केल्यास होणारे लाभ
कोणतीही विधायक कृती ही हिंदु धर्माप्रमाणे विधीवत, म्हणजेच अध्यात्मशास्त्रीय आधार असलेल्या विधींचे पालन करून केली, तरच त्या कृतीद्वारे देवतांचा आशीर्वाद मिळून त्यांच्या कृपेमुळे वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासही साहाय्य होते. अशी कृती व्यष्टीसह (स्वतःसह) समष्टीलाही (इतरांनाही) आध्यात्मिक लाभ मिळवून देत असल्याने ती एकप्रकारे समष्टी साधनाच ठरते.
वाढदिवस, औक्षण, अहेर देणे, ५० व्या वर्षानंतर व्यक्तीची प्रत्येक पाच वर्षांनी शांती करणे यांसारख्या कौटुंबिक कृती आणि उद्घाटन, दीपप्रज्वलन, सत्कार करणे आणि शोकप्रदर्शन इत्यादींसारख्या सामाजिक कृती करण्यामागील उद्देश, त्यांच्या अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य पद्धती अन् त्यांमागील शास्त्र समजून घेऊन ती ती कृती श्रद्धापूर्वक केली असता, त्या कृतीद्वारे होणारी फलप्राप्ती अधिक असते.
३. व्याख्या
अ. धार्मिक कृती
धार्मिक कृतींचा अर्थ आहे, धर्माचरणाने बद्ध (बांधलेल्या) अशा कृती.
आ. आचरण
१. अर्थ
धार्मिक कृतीमागील विचार हा कर्माशी (आचाराशी) बांधील असतो, यालाच ‘आचरण’ म्हणतात.
२. परिणाम
आचरणातून उत्पन्न झालेला परिणाम हा सामाजिक स्तरावर, म्हणजेच समष्टी स्तरावर चैतन्यदायी ठरतो.
४. कौटुंबिकता, धार्मिकता आणि सामाजिकता
कौटुंबिकता ही कर्तव्यतेशी, धार्मिकता ही कर्माशी, म्हणजेच आचाराशी, तर सामाजिकता ही आचरणाशी संबंधित असते.
५. साधक, कार्यकर्ता अन् पाट्याटाकू कामकरी
कौटुंबिकता, धार्मिकता आणि सामाजिकता या तीनही गोष्टींकडे लक्ष देऊन सेवाभावाने नित्यनैमित्तिक कर्म करणार्या जिवाला ‘साधक’ अशी संज्ञा दिली जाते. भावनेपोटी कृती करणार्या व्यक्तीला ‘कार्यकर्ता’ अन् कर्तव्यकर्म नाकारण्याची वृत्ती असणार्याला ‘पाट्याटाकू कामकरी’ अशी संज्ञा दिलेली आहे.
६. शास्त्रानुसार अन् तन्मयतेने सर्व कृती केल्याने साधकाची
कौटुंबिक, धार्मिक आणि सामाजिक ऋणे फेडली जाऊन त्याची उन्नती शीघ्रगतीने होणे
साधक हा कौटुंबिकतेतून मातृ-पितृ ऋणातून, धार्मिकतेतून देवऋणातून आणि सामाजिकतेतून समाजऋणातून मुक्त होऊन तो ईश्वराच्या मूळ, म्हणजेच निराकार धर्माशी एकरूप होतो. तीनही ऋणांतून मुक्त होणारा जीव किंवा त्या दिशेने जाणारा जीव ईश्वराला आवडतो. अशा जिवाचे पारदर्शकतेकडे अधिगमन होत असते. (‘अधिगमन’ म्हणचे साधनेच्या विहंगम अर्थात अतीजलद मार्ग.)
७. प.पू. डॉक्टरांनी (सनातनचे प्रेरणास्थान
प.पू. डॉ. आठवले) शीघ्र उन्नतीसाठी सांगितलेला ‘साधक धर्म’
प.पू. डॉक्टरांनी तीनही कर्मांकडे कृतीच्या स्तरावर लक्ष वेधून ‘साधक धर्म’ सांगितला आहे. सेवाभावाला ‘साधक धर्म’ म्हणतात. हाच धर्म साधकाच्या मोक्षप्राप्तीला कारणीभूत होतो. चांगला साधक वरील तीनही कृत्ये तितक्याच तन्मयतेने करतो. कृत्यातील तन्मयता ही त्यातील अंतर्गत गाभ्याशी, म्हणजेच चैतन्य उत्पन्नतेशी निगडित असते.
– सूक्ष्म-जगतातील ‘एक विद्वान’ (पू. सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १.१२.२००६, सकाळी १०.३७)
हिंदु धर्मशास्त्रानुसार विविध धार्मिक कृती आचरणात आणून सर्वांची व्यष्टी आणि समष्टी उन्नती साधली जावो, तसेच हिंदूंमध्ये आपला धर्म अन् संस्कृती यांविषयीचा अभिमान जागृत होवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.