सिंधुदुर्ग – आपत्काळात वैद्यकीय साहाय्य समयमर्यादेत मिळणे कठीण असते. अशा वेळी बिंदूदाबन पद्धतीने रुग्णांवर उपचार करता येऊ शकतात. साधकांना बिंदूदाबन शिकवून त्यांना आपत्काळासाठी सिद्ध करण्याच्या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने पिंगुळी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सनातन संस्थेचे साधक तथा निसर्गाेपचारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी या शिबिरात मार्गदर्शन करण्यासह प्रायोगिक भागही घेतला. बिंदूदाबनासह व्यायामाचे महत्त्व, व्यायामाचे प्रकार, आहार-विहार यांच्या योग्य पद्धती यांचा एकत्रितपणे लाभ कसा होतो, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात अनेक साधक सहभागी झाले होते.
मणका, गुडघा, हात-पाय, तसेच पोट यांच्याशी संबंधित विविध विकार असलेल्या ४२ रुग्णांवर डॉ. दीपक जोशी यांनी उपचार केले. या उपचारानंतर बरे वाटल्याचे रुग्णांनी सांगितले. शिबिराचे सूत्रसंचालन कु. वैदेही खाडये यांनी, तर शिबिराचा उद्देश कु. वैभवी भोवर यांनी स्पष्ट केला.
शिबिराच्या पहिल्या दिवशी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती होती. या वेळी सद्गुरु स्वाती खाडये मार्गदर्शन करतांना म्हणाल्या, ‘‘आपल्याला या शिबिरात उपस्थित रहाण्याची संधी मिळाली, ही गुरुदेवांचीच कृपा आहे. बाहेर जाऊन आपण एवढे उपचार करून घेतो; परंतु त्याचे दुष्परिणामही काही वेळा आपल्यावर होतात. डॉ. जोशी यांनी शिकवलेले उपचार गांभीर्याने कृतीत आणूया.’’