हिंदु धर्मातील सगुण उपासनापद्धतीचा पाया म्हणजे ‘देवपूजा’. घरी येणार्या अतिथीचे स्वागत जसे आपण आदरपूर्वक करतो, तसेच देवाचे केले, म्हणजेच देवाची यथासांग पूजा केली, तरच तो आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतो.
धर्मशास्त्रात देवाचे आवाहन करणे, त्याला बसण्यासाठी आसन देणे, त्याला चरण धुण्यासाठी पाणी देणे यांसारखे क्रमवार सोळा उपचार शिकवून त्या माध्यमातून विधीवत भावपूर्ण धर्माचरण करण्यास शिकवले आहे. १६ उपचारांपैकी पुढील उपचार – ९. गंध लावणे, १०. फूल वहाणे, ११. धूप दाखवणे, १२. दीप ओवाळणे आणि १३. नैवेद्य दाखवणे, या पाच उपचारांना ‘पंचोपचार’ असे म्हणतात. सोळा उपचारांद्वारे देवपूजा करणे शक्य नसल्यास पाच उपचारांनी केली तरी चालते. बर्याच जणांना षोडशोपचारे पूजा करणे शक्य होत नसल्याने त्यांना पंचोपचार पूजेची माहिती पहाणे सोपे जावे, यादृष्टीने प्रस्तुत लेखात पंचोपचार पूजन करतांना करावयाच्या कृती देण्यात आल्या आहेत.
पंचोपचार पूजनाची कृती
कर्मकांडाच्या स्तरावरील देवपूजा
१. देवतेला गंध (चंदन) आणि हळदी-कुंकू वहाणे
प्रथम देवतेला अनामिकेने (करंगळीच्या बाजूच्या बोटाने) गंध लावावे. त्यानंतर हळदी-कुंकू वहातांना आधी हळद आणि नंतर कुंकू उजव्या हाताचा अंगठा अन् अनामिका यांच्या चिमटीत घेऊन देवतेच्या चरणांवर वहावे.
२. देवतेला पत्री आणि फुले वहाणे
अ. देवाला कागदी, प्लास्टिकची यांसारखी खोटी, तसेच शोभेची फुले वाहू नयेत, तर ताजी आणि सात्त्विक फुले वहावीत.
आ. देवाला वहावयाची फुले आणि पत्री यांचा गंध घेऊ नये.
इ. देवतेला फुले वहाण्याच्या पूर्वी पत्री वहावी.
ई. त्या त्या देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करणारी पत्री आणि फुले त्या त्या देवतेला वहावीत, उदा. शिवाला बेल आणि श्री गणेशाला दूर्वा अन् लाल फूल. श्री गणपतीला दूर्वा वहातांना मुख सोडून श्री गणपतीची संपूर्ण मूर्ती दूर्वांनी मढवून टाकतात. दिवसातून तीन वेळा दूर्वा पालटतात. त्यासाठी दिवसात तीन वेळा पूजा करतात.
उ. विशिष्ट देवतेला विशिष्ट संख्येत आणि रचनेत फुले वहावीत, उदा. श्री गणपतीला पोकळ शंकरपाळ्यासारख्या आकारात आठ फुले आणि मारुतीला पोकळ लंबगोलाकारात पाच फुले वहावीत. फुले वहातांना ती वेडीवाकडी दिसणार नाहीत, अशा रीतीने वहावीत.
ऊ. देवघरातील देवतांना फुले वहातांना आपल्या उपास्यदेवतेचे नाम घेऊन ताटातील छोट्या परंतु भडक रंगाच्या फुलाने आरंभ करून त्यानंतर मध्यम परंतु फिकट रंगाच्या फुलाकडे जाऊन त्यानंतर सर्वांत शेवटी मोठ्या आकाराच्या पांढर्या फुलाकडे जावे. देवतांच्या क्रमामध्ये शंकूच्या मध्यबिंदूशी ठेवलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीला / चित्राला फूल वाहून मगच पुढच्या म्हणजे द्वितीय स्तराला प्रथम पुरुष मुख्य देव आणि त्याला समांतर स्त्रीशक्ती देवता किंवा त्या देवाची उपरूपे यांना फुले वहावीत.
ए. देवाच्या डोक्यावर फुले वहाण्यापेक्षा चरणांवर वहावीत.
ऐ. फूल वहातांना फुलाचे देठ देवाकडे आणि तुरा आपल्या दिशेने येईल, अशा प्रकारे वहावे.
३. देवतेला धूप दाखवणे (किंवा उदबत्तीने ओवाळणे)
अ. देवाला धूप दाखवतांना तो हाताने पसरवू नये.
आ. धुपानंतर त्या त्या देवतेचे तत्त्व जास्त प्रमाणात आकृष्ट करून घेऊ शकतील अशा गंधांच्या उदबत्त्यांनी त्या त्या देवतेला ओवाळावे, उदा. शिवाला हीना आणि श्री लक्ष्मीदेवीला गुलाब.
इ. देवतेला ओवाळायच्या उदबत्त्यांची संख्या : सर्वसाधारणतः प्राथमिक अवस्थेतील शक्ती-उपासकाने पाच, कर्तव्य म्हणून पूजा वगैरे करणार्याने दोन आणि भक्तीभावाने उपासना करणार्या साधकाने एका उदबत्तीने देवतेला तीन वेळा ओवाळावे.
ई. धूप दाखवतांना तसेच उदबत्तीने ओवाळतांना डाव्या हाताने घंटी वाजवावी.
४. देवतेला दीप ओवाळणे
अ. देवाला निरांजनाने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीन वेळा सावकाश ओवाळावे. याच वेळी डाव्या हाताने घंटी वाजवावी.
आ. दीप लावण्याच्या संदर्भात हे लक्षात घ्या !
१. दीप प्रज्वलित करतांना एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये.
२. तेलाच्या दिव्याने तुपाचा दिवा लावू नये.
३. देवघरातील तेलाच्या दिव्याची वात प्रतिदिन पालटावी.
५. देवतेला नैवेद्य दाखवणे
अ. नैवेद्यासाठीचे पदार्थ बनवतांना तिखट, मीठ आणि तेल यांचा वापर अल्प करावा अन् तुपासारख्या सात्त्विक पदार्थांचा वापर अधिक करावा.
आ. नैवेद्य दाखवण्यासाठी केळीचे पान घ्यावे.
इ. नैवेद्यासाठी सिद्ध केलेल्या पानात मीठ वाढू नये.
उ. नैवेद्य दाखवतांना प्रथम इष्टदेवतेला प्रार्थना करून देवासमोर भूमीवर पाण्याने चौकोनी मंडल करावे आणि त्यावर नैवेद्याचे पान (किंवा ताट) ठेवावे. नैवेद्याचे पान ठेवतांना पानाचे देठ देवाकडे आणि अग्र आपल्याकडे करावे.
ऊ. नैवेद्य दाखवतांना ताटाभोवती एकदाच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पाणी फिरवावे. (पाण्याचे मंडल काढावे.) परत उलट्या दिशेने पाणी फिरवू नये.
ए. देवाला नैवेद्य अर्पण करण्याची कृती
ए १. पद्धत १ – कर्मकांडाच्या स्तरावरील
देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीच्या दोन पानांनी पाणी प्रोक्षण करून एक पान नैवेद्यावर ठेवावे आणि दुसरे देवाच्या चरणी वहावे. त्यानंतर आपल्या डाव्या हाताचा अंगठा डाव्या डोळ्यावर आणि डाव्या हाताची अनामिका उजव्या डोळ्यावर ठेवून डोळे मिटावेत आणि ‘ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ।।’, हा पंचप्राणांशी संबंधित मंत्र म्हणत उजव्या हाताच्या पाचही बोटांच्या टोकाने नैवेद्याचा वास देवाकडे न्यावा.
ए २. पद्धत २ – भावाच्या स्तरावरील
देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीच्या दोन पानांनी पाणी प्रोक्षण करून एक पान नैवेद्यावर ठेवावे आणि दुसरे देवाच्या चरणी वहावे. ‘ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ।।’, हा पंचप्राणांशी संबंधित मंत्र म्हणत हात जोडून देवाला नैवेद्य समर्पित करावा.
ऐ. त्यानंतर ‘नैवेद्यमध्येपानीयं समर्पयामि ।’, असे म्हणून उजव्या हातावरून ताम्हनात थोडे पाणी सोडावे आणि परत ‘ॐ प्राणाय…’, हा पंचप्राणांशी संबंधित मंत्र म्हणावा. त्यानंतर `नैवेद्यम् समर्पयामि, उत्तरापोशनम् समर्पयामि, हस्तप्रक्षालनम् समर्पयामि, मुखप्रक्षालनम् समर्पयामि’, असे म्हणत उजव्या हातावरून ताम्हनात पाणी सोडावे.
ओ. ‘आपण अर्पण करत असलेला नैवेद्य देवतेपर्यंत पोहोचत आहे आणि देवता तो ग्रहण करत आहे’, असा भाव नैवेद्य दाखवतांना असावा.
६. देवपूजा झाल्यानंतर करावयाच्या कृती
अ. कर्पूरदीप लावणे : पंचोपचार पूजनामध्ये ‘कर्पूरदीप लावणे’ हा उपचार नसला, तरी कर्पूर हा सात्त्विक असल्याने कर्पूरदीप लावल्याने अधिक सात्त्विकता मिळण्यास साहाय्य होते. यासाठी नैवेद्य दाखवून झाल्यावर कर्पूरदीप लावू शकतो.
आ. शंखनाद करून देवतेची भावपूर्ण आरती करावी.
इ. आरती ग्रहण केल्यानंतर नाकाच्या मुळाशी विभूती लावावी.
ई. तीन वेळा तीर्थ प्राशन करावे. उजव्या हाताच्या पंज्याच्या मध्यभागी तीर्थ घेऊन प्यायल्यावर हाताचे मधले बोट आणि अनामिका यांची टोके हाताच्या तळव्याला लावून ती बोटे दोन्ही डोळ्यांना लावावीत अन् मग ती कपाळावरून डोक्यावर सरळ वरच्या दिशेने फिरवावीत.
उ. शेवटी प्रसाद ग्रहण करावा आणि नंतर हात धुवावेत.