‘आपल्या घरी साक्षात् प्रभु श्रीराम येणार आहेत’, या भावाने प्रत्येकाने पूजन, प्रार्थना आणि श्रीरामनाम संकीर्तन करावे ! – सनातन संस्थेचे आवाहन
मुंबई – १६ ते २२ जानेवारी या कालावधीत अयोध्येतील श्रीराम मंदिरात श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासह विविध विधी संपन्न होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. या निमित्ताने सनातन संस्थेकडून देशभरात ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियाना’द्वारे ठिकठिकाणी श्रीरामनाम जप, श्रीरामाकडे रामराज्यासाठी प्रार्थना, तसेच श्रीरामांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. यासह ‘आपल्या घरी साक्षात् प्रभु श्रीराम येणार आहेत’, या भावाने प्रत्येक कृती करावी, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. प्रभु श्रीराम मंदिरामध्ये अवतरणार असल्याच्या क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लाभणार आहे, यासाठी श्रीरामांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करायला हवी. तसेच ज्या कारसेवकांनी प्राणांचे बलीदान देऊन श्रीरामजन्मभूमी मुक्त केली, त्यांच्याप्रतीही कृतज्ञता व्यक्त करायला हवी.
प्रभु श्रीरामतत्त्वाचा आध्यात्मिक स्तरावर अधिकाधिक लाभ व्हावा, यासाठी श्रीरामाची माहिती देणारे लघुग्रंथ, सनातन-निर्मित श्रीरामाचे चित्र आणि ‘श्रीराम जय राम जय जय राम’ ही नामपट्टीही उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचा लाभ सर्व रामभक्तांनी घ्यावा. यासह अयोध्येतील सोहळ्याचे निमंत्रण घेऊन राबवण्यात येत असलेल्या कलश यात्रेत, अक्षता वाटप कार्यक्रम आदी रामकार्यात यथाशक्ती सहभाग घ्यावा, असे आवाहनही सनातन संस्थेने केले आहे.
Country wide ‘Shri Ram Naam Sankirtan Abhiyan’ by @SanatanSanstha on the occasion of Pranpratishtha ceremony in Shri Ram temple !
With the spiritual emotion that ‘Prabhu Shri Ram Himself is going to come to our home’, let us engage in worship, prayers and Sankirtan of Prabhu… pic.twitter.com/Zs9035wQOX
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 14, 2024
श्रीरामनाम संकीर्तन अभियानाचे नियोजन
१. १५ ते २१ जानेवारी २०२४ या कालावधीत आपल्या नजीकच्या कोणत्याही मंदिरात एकत्र जमून सामूहिकरित्या ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप किमान ३० मिनिटे करावा.
२. यासमवेतच जमलेल्या रामभक्तांना ‘प्रभु श्रीरामाचे गुण आत्मसात करा’ याविषयी प्रतिदिन ५ ते १० मिनिटे विषय मांडावा.
३. शेवटी सर्वांनी सामूहिकरित्या रामराज्यासाठी प्रार्थना करून श्रीरामाच्या चरणी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करावी.
४. ज्यांना शक्य आहे, त्यांनी सप्ताहभर अन्यथा किमान २२ जानेवारी २०२४ या दिवशी ‘आपल्या घरी साक्षात् प्रभु श्रीरामच येणार आहेत’, असा भाव ठेवून देवघरातील श्रीरामाची मूर्ती किंवा चित्र यांचे पूजन करावे. दीपावलीप्रमाणे दाराबाहेर पणत्या लावाव्या. दारामध्ये किंवा अंगणात सात्त्विक रांगोळी काढावी. घरावर भगवा ध्वज फडकवावा.