मानस सर्व देहशुद्धी : ईश्वरी चैतन्याने सर्व देह चैतन्यमय
करण्यासाठी पू. राजेंद्र शिंदे यांनी दिलेली एक अभिनव उपायपद्धत !
पू. राजेंद्र शिंदे
काहीही न सुचणे, चिडचीड होणे, कोणतेही शारीरिक कारण नसतांनाही अकस्मात् गळल्यासारखे होणे, प्रचंड थकवा येणे इत्यादी अनुभव अनेकांना अल्प-अधिक प्रमाणात आलेले असतात. या सर्वांमुळे शरीर, मन आणि बुद्धी यांवर ताण येतो. यांसारख्या सर्वच समस्यांवर ‘मानस सर्व देहशुद्धी’ हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. हा उपाय प्रतिदिन एकदा अथवा दोनदा आपल्या वेळेनुसार करता येईल. यासाठी २० ते २५ मिनिटांचा कालावधी लागतो.
१. मानस सर्व देहशुद्धीचा अभिप्रेत असलेला अर्थ
येथे सर्व देहशुद्धी म्हणजे केवळ स्थूलदेहाची अर्थात् शरिराची शुद्धी, असे अभिप्रेत नसून स्थूलदेहाच्या समवेतच सूक्ष्मदेह, मनोदेह (मन), कारणदेह (बुद्धी) आणि महाकारणदेह (अहं) या सर्व देहांची शुद्धी, असे अभिप्रेत आहे. यावरून या सर्व देहशुद्धीची परिणामकारकताही स्पष्ट होते.
२. मानस सर्व देहशुद्धीमागील अध्यात्मशास्त्र
२ अ. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ !
अध्यात्मातील या मूलभूत तत्त्वानुसार मानसपूजा, मानस नमस्कार इत्यादींसारख्या सूक्ष्मातून केलेल्या कृती आध्यात्मिकदृष्ट्या अधिक परिणामकारक ठरतात, तसेच मानस सर्व देहशुद्धीचेही आहे.- (पू.) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद. (३.८.२०१३)
२ आ. संतांच्या संकल्पाचा लाभ !
ही मानस सर्व देहशुद्धी सनातनचे ६ वे संत पू. राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेली आहे. त्यामुळे ऐकणार्यांना त्यांच्या संकल्पाचाही लाभ होणार आहे. – संकलक
२ इ. भाव तेथे देव !
या सिद्धांतानुसार आपण जसा भाव ठेवू, त्याप्रमाणे आपल्याला ईश्वराचे साहाय्य मिळते. त्यामुळे जेवढी श्रद्धा आणि भाव ठेवून आपण ही सर्व देहशुद्धी करू, तेवढ्या अधिक प्रमाणात आपल्याला तिचा लाभ मिळेल. ही मानस सर्व देहशुद्धी करतांना भगवान श्रीकृष्णाला आळवून त्याच्याकडून येणारा चैतन्याचा अखंड प्रवाह आपल्या सहस्रारातून शरिरात प्रवेश करत आहे आणि सर्व देहांची शुद्धी करत आहे, असा भाव ठेवायचा आहे. भाव आणि श्रद्धा ठेवून मानस सर्व देहशुद्धी वाचणार्याला आध्यात्मिक अनुभूती आल्याविना रहाणार नाही, हे निश्चित !
३. लाभ
३ अ. शारीरिक
आजाराची तीव्रता घटू शकते.
३ आ. मानसिक
नकारात्मक विचार न्यून होऊन उत्साह वाढतो.
३ इ. आध्यात्मिक
१. नामजप एका लयीत चालू होतो आणि ध्यान लागण्यास साहाय्य होते. २. वाईट शक्तींमुळे वासनेचे विचार येत असल्यास ते न्यून होण्यास साहाय्य होते. ३. वाईट शक्तींचा त्रास असलेल्या साधकांनी हे उपाय नियमित केल्यास त्यांचा त्रास न्यून होऊ लागतो.
४. पू. राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेली प्रत्यक्ष मानस सर्व देहशुद्धीची प्रक्रिया
पुढील सर्व अत्यंत संथ गतीने आणि जणूकाही आपण अनुभवत आहोत, अशा प्रकारे म्हणावे.
पू. राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेली प्रत्यक्ष मानस सर्व देहशुद्धी (Audio)
डाऊनलोड करा ! (Download)
४ अ. भावपूर्ण प्रार्थना
आपण आधी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करूया आणि आपल्यामध्ये संपूर्ण शरणागत भाव निर्माण करण्याचा प्रयत्न करूया. १. भगवंताविना माझे कोणीच नाही. भगवंतच माझे सर्वस्व आहे. इतर सर्व मिथ्या आहे, खोटे आहे. ईश्वर हेच सत्य आहे. २. माझ्या मनात श्रीकृष्णाविषयी पुष्कळ प्रेम निर्माण झाले आहे. ३. साक्षात् भगवंतच माझ्यासमोर येऊन उभा राहिला आहे. ४. संपूर्ण शरणागत भावाने मी श्रीकृष्णाला प्रार्थना करत आहे, हे श्रीकृष्णा, तू किती परमदयाळू आहेस. साक्षात् तूच माझ्यासमोर येऊन उभा राहिलास. भगवंता, मी अज्ञानी आहे. मला काहीच कळत नाही. ५. श्रीकृष्णा, हे तुझे अस्तित्व आणि चैतन्य यांचा मला पूर्णपणे लाभ मिळू दे, अशी तुझ्या चरणी शरण जाऊन मी प्रार्थना करत आहे. ६. हे श्रीकृष्णा, तुझ्याकडून प्रक्षेपित होणार्या सगुण आणि निर्गुण चैतन्याचा मला आवश्यकतेप्रमाणे लाभ होऊ दे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. प्रार्थना केल्यानंतर लगेचच श्रीकृष्णाकडून चैतन्याचा प्रवाह माझ्या दिशेने येऊ लागला आहे. सहस्रारातून तो प्रवाह माझ्या शरिरामध्ये जात आहे. प्रत्येक श्वासातून तो प्रवाह माझ्या शरिरामध्ये जात आहे.
४ आ. चैतन्याने स्थूलदेहातील अवयवांची टप्याटप्याने शुद्धी करणे
४ आ १. उजवे पाऊल
चैतन्याचा प्रवाह माझ्या उजव्या पायाच्या दिशेने जात आहे. माझा उजवा पाय, उजव्या पायाची पाचही बोटे आणि तळवा हळूहळू चैतन्याने भरत आहे. आता उजवे पाऊल घोट्यापर्यंत चैतन्याने भरले आहे. हे चैतन्य सहस्रार आणि श्वास यांतून वेगाने माझ्या शरिरात येत आहे आणि ते माझ्या उजव्या पायाच्या दिशेने जात आहे. उजवा पाय हळूहळू चैतन्याने भरत आहे. पोटर्यांपर्यंत चैतन्य वाढत गेले आहे आणि चैतन्य वाढतच जात आहे. उजव्या पायाच्या गुडघ्यापर्यंत चैतन्य वाढत गेले आहे. चैतन्य आणखी वर चालले आहे. आता मांडीही चैतन्याने भरत आहे. श्रीकृष्णाकडून सतत मिळत असलेल्या चैतन्यामुळे माझ्या शरिरातील चैतन्य वाढत आहे. उजव्या पायाच्या मांडीपासून जांघेपर्यंतचा सगळा भाग पूर्णपणे चैतन्याने भरून गेला आहे.
४ आ २. डावे पाऊल
हे श्रीकृष्णा, हा चैतन्याचा प्रवाह माझ्या डाव्या पायामध्येही येऊ दे, अशी श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यावर लगेच चैतन्य माझ्या डाव्या पायाच्या दिशेने जात आहे. डाव्या पायाची पाचही बोटे, तळवा आणि पूर्ण डावे पाऊल चैतन्याने भरले आहे. माझा प्रत्येक श्वास शरिरामध्ये पुष्कळ चैतन्य घेऊन येत आहे. सहस्रारातून जे चैतन्य येत आहे, तेही माझ्या डाव्या पायाच्या दिशेने चालले आहे. डाव्या पायाच्या पोटर्यांपर्यंतचा भाग चैतन्याने भरला आहे. गुडघ्यापर्यंतचा भाग पूर्णपणे चैतन्याने भरला आहे. चैतन्याची पातळी वाढतच चालली आहे. डावी मांडी आणि मांडीपासून जांघेपर्यंतचा सगळा भाग पूर्णपणे चैतन्याने भरला आहे.
४ आ ३. कंबर ते खांद्यापर्यंतचा भाग
माझा उजवा आणि डावा असे दोन्ही पाय पूर्णपणे चैतन्याने भरून गेले आहेत. आता ते चैतन्य कमरेखालच्या भागामध्ये जमा होत आहे. चैतन्य वाढतच चालले आहे. ओटीपोट आणि कमरेच्या खालचा संपूर्ण भाग चैतन्याने भरला आहे. आता तो चैतन्याचा प्रवाह पोटात जात आहे. पोट चैतन्याने पूर्णपणे भरले आहे. श्रीकृष्णाच्या कृपेमुळे माझ्या शरिरात चैतन्य जमा होत आहे. पोट आणि पाठ यांचा सगळा भाग पूर्णपणे चैतन्यमय झाला आहे. हळूहळू चैतन्याची पातळी वाढत आहे. एखाद्या भांड्यामध्ये नळातील पाणी सोडल्यानंतर पाणी वाढतच जाते, त्याप्रमाणे माझ्या शरिरातील चैतन्यातही वाढ होत आहे. आता छातीमध्ये चैतन्य जमा होत आहे. छाती चैतन्याने भरली आहे. आता पाठ आणि छाती चैतन्याने पूर्णपणे भरली आहे. खांद्यापर्यंतचा भाग चैतन्याने भरत आहे.
४ आ ४. उजवा हात
दोन्ही खांदे चैतन्याने भरल्यानंतर आता तो चैतन्याचा प्रवाह उजव्या हाताकडे जात आहे. उजव्या हाताची पाचही बोटे आणि मनगटापर्यंतचा भाग पूर्णपणे चैतन्यमय झाला आहे. आता ते चैतन्य वाढत आहे. मनगट आणि कोपरापर्यंत हळूहळू चैतन्य भरत आहे. श्रीकृष्णाची केवढी कृपा आहे ! माझा देहच चैतन्यमय होत आहे. दंडामध्ये चैतन्य भरले जात आहे. आता हळूहळू पूर्ण उजवा हात चैतन्याने भरला आहे.
४ आ ५. डावा हात
आता ते चैतन्य डाव्या हातामध्ये जात आहे. डाव्या हाताची पाचही बोटे चैतन्याने भरून गेली आहेत. मनगटापर्यंतचा भाग चैतन्यमय झाला आहे. आता हळूहळू चैतन्य वाढत जाऊन ते कोपराच्या दिशेने चालले आहे. हातातील चैतन्य वाढत आहे. आता चैतन्य कोपरापासून वर दंडापर्यंत जात आहे. दंड पूर्णपणे चैतन्याने भरला आहे. आता माझा खांद्यापासून खालचा सगळा देह चैतन्याने पूर्णपणे भरला आहे.
४ आ ६. गळा ते सहस्रार येथपर्यंतचे संपूर्ण शरीर चैतन्यमय होणे
आता ते चैतन्य गळ्यामध्ये आले आहे. गळा चैतन्याने पूर्णपणे भरला आहे. आता ते चैतन्य तोंडवळ्यावर जमा होत आहे. माझ्या डोक्यामध्येही जमा होत आहे. माझे तोंड घशापासून चैतन्याने पूर्णपणे भरून गेले आहे. दोन्ही नाकपुड्यांमध्ये चैतन्य भरले आहे. दोन्ही कानांमध्ये चैतन्याचा प्रवाह जात आहे. दोन्ही डोळे चैतन्याने भरले आहेत. आता सहस्रारापर्यंत पूर्ण शरीर भगवंताच्या कृपेने चैतन्यमय झाले आहे. माझा देह म्हणजे चैतन्याचा एक गोळाच बनला आहे. पूर्णपणे चैतन्य, चैतन्य आणि चैतन्यच !
४ आ ७. स्थूलदेहातील सर्व त्रासदायक शक्ती नष्ट होऊ देत, अशी प्रार्थना करणे
हे श्रीकृष्णा, या चैतन्याने माझ्या स्थूलदेहातील सर्व त्रासदायक शक्ती नष्ट होऊ देत. मांत्रिकांची त्रासदायक शक्ती नष्ट होऊ दे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. शरिरातील सर्व त्रासदायक शक्ती नष्ट होत चालली आहे. मांत्रिकांनी सिद्ध केलेली यंत्रे पूर्णपणे नष्ट झाली आहेत.
४ इ. सूक्ष्मदेह
हे भगवंता, माझ्यावर कृपा कर रे. हे चैतन्य माझ्या सूक्ष्मदेहातही जाऊ दे, अशी प्रार्थना केल्यावर लगेच हे चैतन्य माझ्या सूक्ष्मदेहाकडे जाण्यास आरंभ झाला आहे.
४ इ १. प्राणदेह
माझा प्राणदेह चैतन्यमय होत आहे. प्राणदेहामध्ये चैतन्य भरत चालले आहे. माझी प्राणशक्ती वाढू लागली आहे. प्राणदेह चैतन्यमय झाल्यानंतर आता ते चैतन्य मनोदेहामध्ये जाऊ लागले आहे.
४ इ २. मनोदेह (बाह्यमन आणि अंतर्मन)
मनोदेहामध्ये चैतन्य जात आहे. अंतर्मनामध्ये माझ्या दोषांचे केंद्र आहे. अरे बापरे ! माझ्या अंतर्मनामध्ये किती दोष आहेत ! चैतन्य आत आत जात आहे. दोषांमुळे आलेल्या त्रासदायक आवरणाशी चैतन्य युद्ध करत आहे. एकेका दोषावर आलेले आवरण आणि तो दोष त्या चैतन्याने दूर होत आहे. माझ्यामध्ये केवढे दोष आहेत ! साधना करून मला दोष लवकर न्यून करायचे आहेत. भगवंताच्या कृपेमुळे सर्व दोषांवरचे त्रासदायक आवरण नष्ट होत आहे. दोषही क्षीण आणि दुर्बळ होत चालले आहेत.
४ इ २ अ. बाह्यमन आणि अंतर्मन यांवर चैतन्याचा प्रभाव पडू लागणे
हळूहळू अंतर्मनावर चैतन्याचा प्रभाव पडला आहे. पूर्ण अंतर्मन चैतन्याने भरून गेले आहे. बाह्यमनही चैतन्याने पूर्णपणे भरून गेले आहे. सर्व दोष आणि त्यांवर आलेले आवरण दूर झाल्यामुळे माझे मन तणावरहित झाले आहे. मला शांत आणि प्रसन्न वाटत आहे. मनोदेहावर आलेले त्रासदायक आवरण पूर्णपणे दूर होऊन माझा मनोदेह चैतन्यमय झालेला आहे.
४ ई. कारणदेह (बुद्धी)
आता हे चैतन्य कारणदेहामध्येही जात आहे. बुद्धीवर आलेले त्रासदायक आवरण दूर होत आहे. बुद्धीवर आलेले सर्व आवरण नष्ट होत आहे. बुद्धी मला परत परत सांगत आहे, ईश्वरप्राप्ती हेच तुझ्या जीवनाचे प्रथम आणि अंतिम ध्येय आहे. तुला केवळ ईश्वरप्राप्तीच करायची आहे. या जन्माचे सार्थक करायचे आहे. हे सगळे आता बुद्धीला व्यवस्थित कळायला लागले आहे. सात्त्विकता हे बुद्धीचे सामर्थ्य आहे. ते वाढत चालले आहे. बुद्धी पूर्णपणे चैतन्यमय झाली आहे. कारणदेह शुद्ध झाला आहे. प्राणदेह, मनोदेह आणि कारणदेह पूर्णपणे शुद्ध होत चालले आहेत.
४ उ. महाकारणदेह
आता त्या चैतन्याचा प्रवाह महाकारण देहाच्या दिशेने जात आहे. केवढा अहंभाव आहे पहा ! चैतन्य महाकारण देहामध्ये जातच नाही, एवढे अहंचे आवरण माझ्याभोवती निर्माण झाले आहे. देवाजवळ जाण्यासाठी मी आलो आहे आणि या अहंमुळेच मी देवापासून दूर राहिलो आहे. चैतन्याच्या प्रवाहाला महाकारणदेहात जाण्यासाठी मोठे युद्ध करावे लागत आहे, संघर्ष करावा लागत आहे. शेवटी देवाचाच विजय होतो. महाकारण देहामध्ये चैतन्य जायला प्रारंभ झाला आहे. महाकारण देहावर आलेले त्रासदायक आवरण दूर होत आहे. माझ्या महाकारणदेहामध्ये चैतन्य पूर्णपणे जात आहे. माझ्या अहंची मला जाणीव होत आहे. देव तो अहंभाव दूर करत आहे. अहंभाव दूर करायला पाहिजे, याची जाणीव वाढवत आहे आणि आता हळूहळू माझा महाकारणदेहही पूर्णपणे चैतन्यमय होत आहे. किती आनंदाची स्थिती आहे ही !
४ ऊ. स्थूलदेह आणि सूक्ष्मदेह पूर्णपणे चैतन्यमय होणे
स्थूलदेह आणि सूक्ष्मदेह पूर्णपणे शुद्ध, पवित्र अन् चैतन्यमय झाले आहेत. असा शुद्ध आणि पवित्र देह श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करत आहे, त्याला प्रार्थना करत आहे, हे भगवंता, मी हा जीव तुझ्या चरणी अर्पण करत आहे. तूच या जिवाचा उद्धार कर. तूच मला सेवा आणि साधना कशी करायची, ते शिकव.
५. नामजपाच्या संदर्भात श्रीकृष्णाला केलेली याचना
५ अ. नामजप एकाग्रतेने व्हावा !
भगवंता, नामजप एकाग्रतेने कसा करायचा, ते मला शिकव रे. भगवंताने लगेचच माझा नामजप चालू केला आहे. माझा ॐ नमो भगवते वासुदेवाय । हा नामजप अतिशय एकाग्रतेने चालू झाला आहे. थोडा वेळ मी तो करणार आहे. माझा नामजप एकाग्रतेने आणि लयबद्धतेने होत आहे.
५ आ. नामजप भावपूर्ण व्हावा !
हे श्रीकृष्णा, मला भावपूर्ण नामजप करायला शिकव. माझा ॐ नमो भगवते वासुदेवाय । हा नामजप भावपूर्ण होत आहे.
५ इ. श्वासाला जोडून नामजप व्हावा !
हे श्रीकृष्णा, हा नामजप श्वासाला जोडून कसा करायचा, ते मला शिकव ना रे. भगवंत मला श्वासाला जोडून नामजप कसा करायचा, ते शिकवत आहे. भगवंताच्या कृपेने माझा नामजप श्वासाला जोडून होत आहे. हे भगवंता, केवळ श्वासावर मन कसे एकाग्र करायचे, हेही मला शिकव ना रे. श्वासाला जोडून नामजप कसा करतात किंवा केवळ श्वासावर लक्ष एकाग्र कसे करायचे, ते भगवंत मला शिकवत आहे. माझे लक्ष श्वासावर पूर्णपणे एकाग्र झाले आहे. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास यांकडे मी एकाग्रतेने लक्ष देत आहे. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा उच्छ्वास एवढ्यावरच माझे लक्ष आहे. बाकी काहीही नाही. केवळ श्वासावरच माझे मन एकाग्र झालेले आहे. सोऽहं, सोऽहं. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा उच्छ्वास. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने एक अलौकिक अनुभव मी प्राप्त करत आहे.
६. शरणागत होऊन श्रीकृष्णाला विविध प्रकारे केलेली आळवणी
६ अ. देवा, अशक्य हा शब्दच तू माझ्या शब्दकोषातून काढून टाक ना !
हे श्रीकृष्णा, मी तुला संपूर्णपणे शरण आलो आहे. मला सतत पुढच्या पुढच्या स्थितीत घेऊन जा. मला माझ्या दोषांशी लढायला शिकव. मला माझ्या अहंशी लढायला शिकव. तुझ्या कृपेने या विश्वात अशक्य असे काहीच नाही, हा दृढ संस्कार तू माझ्या मनावर निर्माण कर. अशक्य हा शब्दच तू माझ्या शब्दकोषातून काढून टाक. देवाला अशक्य असे काहीच नाही. ज्याने केवळ संकल्पाने ब्रह्मांडाची निर्मिती केली, त्याला माझे दोष दूर करणे, माझा अहंभाव नष्ट करणे, माझ्यात भाव निर्माण करणे, हे सहज शक्य आहे.
६ आ. माझा पदोपदी अपमान झाला, तरी चालेल;
पण मला तुझ्या चरणांजवळ घट्टपणे टिकवून ठेव रे भगवंता !
हे भगवंता, मी तुला संपूर्णपणे शरण आलो आहे. तुला जशी स्थिती अपेक्षित आहे, तशा स्थितीत तू मला ठेव. माझा अहंभाव पूर्णपणे नष्ट कर. माझा पदोपदी अपमान झाला, तरी चालेल; पण मला तुझ्या चरणांजवळ घट्टपणे टिकून रहायचे आहे. दोषांमुळे माझी हानी होत आहे, मला कुठेतरी मायेत अडकल्यासारखे होत आहे. हे सर्व सोडून मला तुझ्या चरणांजवळ घेऊन जा. मी संपूर्णपणे तुझ्या चरणांजवळ येण्यासाठी सिद्ध आहे. अशाच स्थितीमध्ये तू मला अखंड ठेव. मला माझे दोष आणि अहं यांची जाणीव सतत करून दे. भावजागृतीसाठी काय काय प्रयत्न करायला पाहिजेत, अष्टांग साधना कशी करायला पाहिजे, हे सतत तू मला सांगत रहा भगवंता.
६ इ. भगवंता, मला अखंड शिकण्याच्या स्थितीत ठेव !
हे जे तू सांगतो आहेस, ते माझ्या लक्षात येऊ दे. एवढी कृपा तू माझ्यावर कर. मी तुला संपूर्णपणे शरण आलो आहे. तू मला अखंड शिकवत असतोस; पण माझ्या स्थितीमुळे ते माझ्या लक्षात येत नाही. मला अखंड शिकण्याच्या स्थितीत ठेव भगवंता ! भगवान श्रीकृष्णाच्या चरणी संपूर्ण शरणागत भावाने कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करूया. हळूहळू डोळे उघडायचे आहेत. टीप : या लेखात दिलेली मानस सर्व देहशुद्धी हा देहशुद्धीचा एक नमुना आहे. आपल्या भावानुसार आपण त्यात पालटही करू शकतो. – (पू.) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद (आषाढ कृष्ण पक्ष द्वादशी, कलियुग ५११५ (३.८.२०१३)
मनातील निरर्थक आणि नकारात्मक विचार घालवण्यासाठी करायच्या प्रार्थना !
१. मनात अकस्मात् येणार्या निरर्थक आणि नकारात्मक
विचारांमागील कारण आध्यात्मिक असल्याने ते बुद्धीला न उमगणे
अकस्मात् आपल्या मनात कधी कधी अनावश्यक आणि निरर्थक विचार येतात. या विचारांमुळे मन अस्वस्थ होणे, नकारात्मकता येणे आणि निरुत्साह वाटणे यांसारख्या विविध त्रासांना सामोरे जावे लागते, तसेच त्यासाठी मनाची ऊर्जा वापरली गेल्याने थकवाही येतो. अकस्मात् येऊ लागलेल्या या विचारांमागील नेमके कारण हे आपल्या बुद्धीला उमगत नाही. हे कारण आध्यात्मिकही असू शकते. ते ओळखण्याचे एक लक्षण म्हणजे बाह्य परिस्थिती प्रतिकूल नसूनही मनात असे विचार येऊ लागणे, काही न सुचणे इत्यादी. या सर्व विचारांवरील एक परिणामकारक उपाय म्हणजे ईश्वराला प्रार्थना करणे.
२. मनात निरर्थक आणि नकारात्मक विचार येत असल्यास करावयाच्या प्रार्थना !
अ. हे श्रीकृष्णा, मांत्रिक माझ्या मनात निरर्थक/नकारात्मक विचार घालत आहे. (… मनातील सर्व विचार श्रीकृष्णाला सांगावेत.) हे विचार माझे नसून मांत्रिकाचे आहेत. ते पूर्णपणे नष्ट होऊ देत. आ. हे श्रीकृष्णा, विचारांच्या माध्यमातून मला त्रास देणार्या मांत्रिकांना पाशात बांधून ठेव. त्यांना देवतांची शस्त्रास्त्रे सतत लागून त्यांची त्रासदायक शक्ती नष्ट होऊ दे. इ. हे श्रीकृष्णा, मला विचारांच्या माध्यमातून त्रास देण्यासाठी मांत्रिकांनी जी त्रासदायक शक्ती, यंत्र आणि यंत्रणा निर्माण केलेली आहे, ती स्थानांसह नष्ट होऊ दे. ई. हे श्रीकृष्णा, मी तुला संपूर्णपणे शरण आलो आहे, मला तुझ्या चरणांशी ठेव, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. वरील प्रार्थनांसह प्रत्येक नकारात्मक विचारावर सकारात्मक दृष्टीकोन देण्याची सवय लावावी. – (पू.) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद. (३.८.२०१३)
पू. राजेंद्र शिंदे यांच्या आवाजातील मानस सर्व देहशुद्धी ध्वनीफित ऐकण्याने स्थूल आणि सूक्ष्म देह यांची शुद्धी होणे आणि या संदर्भातील ध्वनीफित ही देवाची एक अमूल्य भेट आहे, असे वाटणे
कलियुगातील रज-तम वातावरणात स्थूल आणि सूक्ष्म देह यांची शुद्धी होण्यासाठी मानस सर्व देहशुद्धी ध्वनीफित ऐकणे हे एक चांगले माध्यम आहे, असे वाटते. ध्वनीफित ऐकतांना ती आपल्याला वर्तमान स्थितीत ठेवत असल्याने त्या त्या देहाची शुद्धी होते. त्यामुळे पायांपासून डोक्यापर्यंत स्थूलदेहाची, तसेच प्राणदेह, मनोदेह, कारणदेह आणि महाकारणदेह यांची शुद्धी होत असल्याने पुष्कळ हलकेपणा जाणवतो. संपूर्ण देहातील काळी शक्ती नष्ट झाल्याने आवरण न्यून झाल्याचे जाणवते; म्हणून प्रत्येक साधकाने ही ऐकणे आवश्यक आहे, असे वाटते.
१. ध्वनीफित ऐकतांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती
१ अ. त्रासदायक अनुभूती
१. आरंभी ध्वनीफित ऐकतांना केवळ शब्द कानावर पडत आणि मनात अन्य विचार येत असत. त्यामुळे काहीच वाटत नसे. २. नंतर मी श्रीकृष्ण समोर आहे, त्याच्याकडून चैतन्य येत आहे. ते माझ्या अवयवांत जात आहे आणि तेथील काळी शक्तीनाहिशी होत आहे, असा भाव ठेवून ध्वनीफित ऐकायला लागले. त्या वेळी मला त्रास होऊन ती ऐकूच नये, असे वाटत असे. त्यामुळे माझ्याकडून ती अर्धीच ऐकली जायची आणि नंतर मला उलटी होणार, असे वाटत असे. २-३ वेळा प्रयत्न करूनही तसाच त्रास झाला. ३. शेवटी एक दिवस ठरवले की, उलटी झाली तरी चालेल; पण आज पूर्ण मानस सर्व देहशुद्धीची ध्वनीफित ऐकायची. त्या दिवशी ती पूर्ण ऐकल्यानंतर शेवटी मला उलटी झाली आणि हा त्रास झाल्यानंतर पुन्हा तसा त्रास व्हायचा बंद झाला अन् चांगले वाटायला लागले.
१ आ. चांगल्या अनुभूती
१. माझ्यावर पुष्कळ आवरण आले आहे, असे वाटते, तेव्हा मी मानस सर्व देहशुद्धी ही ध्वनीफित ऐकते. त्यानंतर पुष्कळ हलकेपणा जाणवतो. आवरण न्यून होते. उत्साह वाढतो. येत असलेली ग्लानी किंवा झोप जाते आणि सेवा करतांना सुचायला लागते. २. सेवा करतांना पुष्कळ त्रास होत असल्यास मानस सर्व देहशुद्धी ध्वनीफित ऐकल्यावर चांगले वाटते. संत देवाचे सगुण रूप असल्यामुळे त्यांच्या आवाजातील या मानस सर्व देहशुद्धीच्या ध्वनीफितीत पुष्कळ शक्ती जाणवते. ३. प्राणदेहाची शुद्धी झाल्याने प्राणशक्ती वाढत आहे. ४. मनोदेहाची शुद्धी झाल्याने दोषांची केंद्रे नाहिशी होऊन दोषांवरील त्रासदायक आवरण न्यून होत आहे आणि मन तणावमुक्त होऊन प्रसन्न होत आहे, तसेच शांतीची अनुभूतीही येते. ५. कारणदेहाच्या शुद्धीमुळे बुद्धीमधील मायेचे विचार न्यून होऊन ईश्वरप्राप्ती करायची आहे. या जन्माचे सार्थक करायचे आहे, हा दृढनिश्चय होत आहे. ६. महाकारणदेहाच्या शुद्धीमुळे अहं, म्हणजे देवाकडे जाण्यातील मोठा अडथळा अल्प होत आहे आणि अहंची जाणीव होऊन तो दूर करायला पाहिजे, याची जाणीव वाढत आहे. ७. संपूर्ण देहाची शुद्धी होऊन एक वेगळाच आनंद जाणवतो. देवाच्या चरणांजवळ गेल्यासारखे वाटते. ८. देवाला जिवाचा उद्धार करण्यासाठी प्रार्थना केल्यावर देव नामजप एकाग्रतेने करायला शिकवतो. नंतर श्वासाला जोडून नामजप कसा करायचा ?, हे शिकवतो आणि शेवटी केवळ श्वासावर लक्ष एकाग्र होते. तेव्हा ‘सोहम्’ची, म्हणजे हा जीव देवाशी एकरूप झाल्याची अनुभूती येते. – कु. गौरी मेणकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (श्रावण शुक्ल पक्ष सप्तमी, कलियुग वर्ष ५११५ (१३.८.२०१३)
पू. राजनदादांची मानस सर्व देहशुद्धी ही ध्वनीफित ऐकतांना
स्वतःतील सर्व काळी शक्तीआणि जडत्व उणावून हलकेपणा अन् उत्साह वाटणे
मी उपायांच्या वेळेत सुरुवातीलाच पू. राजनदादांची मानस सर्व देहशुद्धी ही ध्वनीफित ऐकतो. ती ऐकतांना सर्व अवयव, षट्चक्रे आणि चारही देह यांमध्ये चैतन्य प्रवेश करून तेथील सर्व काळी शक्ती आणि जडपणा क्रमाक्रमाने निघून जाऊन तेथे चैतन्य कार्यरत झाले आहे, असे जाणवते. त्यामुळे मानस सर्व देहशुद्धी ही ध्वनीफित ऐकल्यानंतर सर्व काळी शक्ती, जडत्व आणि थकवा जाऊन पुष्कळ हलकेपणा जाणवतो अन् उत्साही वाटू लागते. मन आणि बुद्धी यांवरील काळे आवरण उणावून चैतन्याचे कवच स्वतःभोवती जाणवते. पुष्कळ थकवा आल्यावर वा प्राणशक्ती न्यून असतांना मानस सर्व देहशुद्धी ही ध्वनीफित ऐकल्यावरही उत्साह जाणवतो. सर्व देहशुद्धी ऐकल्यानंतर स्वयंसूचना सत्र केल्यास ते एकाग्रतेने होऊन सूचना अंतर्मनात जात आहेत, असे जाणवते. सर्व देहशुद्धीत नामजप एका लयीत आणि नंतर श्वासासोबत करून घेतला जात असल्याने सर्व देहशुद्धी पूर्ण झाल्यानंतरही काही वेळ नामजपही एका लयीत आपोआप सुरू रहातो. सर्व देहशुद्धी पूर्ण झाल्यानंतर देहशुद्धीत वर्णन केल्याप्रमाणे शांत अन् प्रसन्न वाटते. – श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, श्रावण शुद्ध दशमी (१६.८.२०१३)