१. कसबा गणपति, पुणे
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील परंपरांचे अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गणेशोत्सवात अग्रपूजेचा मान ‘कसबा गणपति’ला लाभला आहे.
महत्त्व : जागृत देवस्थान असल्यामुळे कुठल्याही नवसाला पावतो. कुठल्याही अडचणी / संकटे यावर मात करण्याचे सामर्थ्य देतो. विशेष म्हणजे या मंदिराच्या दाराची कडी कुठल्याही दुखणार्या भागाला लावली, तर दुखणे थांबते. येथील भक्त दाराची कडी डोके, डोळे, हात, पाय यांना लावल्याविना दर्शन घेऊन बाहेर पडत नाहीत. संकटनाशक म्हणून याची प्रचीती येते.
२. श्री चिंतामणी (थेऊर (ता. हवेली, जि. पुणे))
हे पेशव्यांचे श्रद्धास्थान !
महत्त्व : येथे नवस बोलल्यास संतती प्राप्ती होते, असा भक्तांचा समज आहे. येथे अनुष्ठान करणार्यांच्या चित्तास शांती आणि स्थिरता प्राप्त होते. मानसिक संतुलन बिघडलेले लोक येथे वास्तव्य करतात. सात्त्विक लहरींची प्रचीती येत असल्यामुळे मोठ्या उमेदीने, आत्मविश्वासाने घरी परततात. येथे येऊन गतजन्मीची शापमुक्ती मिळते. येथे गौतम ऋषींनी इंद्राला शापमुक्त केले (इंद्राने गौतम पत्नी अहिल्या हिला भ्रष्ट केले होते); म्हणून गतजन्मीचे शाप तपश्चर्येने नष्ट होतात.
३. मंगलमूर्ती (चिंचवड)
चिंचवड हे मोरया गोसावी या महान गणेशभक्ताने स्थापन केलेले अत्यंत जागृत असे गणपति क्षेत्र आहे.
महत्त्व : हे अत्यंत जागृत स्थान असून भक्तांना येथे दृष्टांत घडतात. तसेच मंगलमूर्ती मोरयाच्या उपासनेमुळे अनेकांची संकटे निवारण झाली आहे.
४. श्री महागणपति (टिटवाळा)
माधवराव पेशवे यांना दृष्टांत होऊन ही मूर्ती दिसली आणि त्यांनी देऊळ बांधले.
विशेष : या मूर्तीला ‘वरविनायक’ अथवा ‘विवाह विनायक’ असेही म्हणतात. ‘न जुळणारे विवाह तसेच विभागलेले संसार या गणेशाच्या भक्तीने आणि दर्शनाने जुळून येतात’, अशी याची ख्याती आहे.
५. सिद्धीविनायक (प्रभादेवी-मुंबई)
महत्त्व : हे देवस्थानही अतिशय जागृत आहे. कुठलाही नवस अथवा मनोकामना सफल होण्याचे सामर्थ्य या सिद्धी विनायकात आहे. सिद्धी प्राप्त होते. संपत्ती, संसारसुख, शिक्षण, आरोग्य या गोष्टींवर त्याची सत्ता असून भक्तांच्या श्रद्धेप्रमाणे अनुभव येतो. सर्व प्रकारचे लोक येतात आणि मानसिक समाधान घेऊन परततात. संसारातून मुक्ती मिळते, अशी याची प्रचीती आहे.
६. महागणपति (राजूर (छत्रपती संभाजीनगर))
ही गणेश मूर्ती अतिप्राचीन असून स्वयंभू मानली जाते. या गणेश मंदिरात मूर्तीसमोर १०८ नंदादीप सतत तेवत असतात.
विशेष : हे स्थान अत्यंत जागरुक आहे. कुठलाही बोललेला नवस खरा होतो. कोर्टकचेरी, राजकारण, कौटुंबिक वाद यांत यशप्राप्ती मिळते.
७. विज्ञान गणेश : राक्षसभुवन (मराठवाडा)
दत्तात्रयाने गणेशाला प्रसन्न करून घेतले आणि गणेशाची ‘विज्ञान गणेश’ या नावाने स्थापना केली आणि गणेश विज्ञानाचा प्रचार केला.
विशेष : येथे शापापासून मुक्तता मिळते, अशी प्रचीती आहे. पत्नी शापापासून मुक्त होण्यासाठी ‘शनी’ने इथेच गणेशाची उपासना केली होती. श्री शनिचे स्थान त्यामुळेच इथे असून हे क्षेत्र ‘शनिचे राक्षसभुवन’ या नावाने ओळखले जाते. हे स्थान पुष्कळ जागृत असून मनोकामना पूर्ण करणारे आहे.
८. श्रीक्षेत्र पद्मालय (जळगाव)
कृतवीर्य राजाचा मुलगा कार्तवीर्य याला जन्मतः हात-पाय नव्हते; पण त्याने तपश्चर्या करून गणेशाला प्रसन्न केले. गणेशाच्या कृपाप्रसादाने त्यास हात-पाय फुटून सहस्र बाहुंचा लाभ झाला; म्हणून त्याने प्रवाळाची मूर्ती स्थापून देवालय बांधले.
विशेष : अपंग व्यक्तींचे अपंगत्व नाहीसे होते. हे अत्यंत जागृत स्थान असून त्या गणपतीचा अनेकांना अनुभव आलेला आहे. काहींची संकटे निवारण झाली, काहींना संततीचा लाभ झाला, तर काहींना इष्ट फळ लाभले.
९. एकदंत गणपती : ध्रांगध्रा (गुजरात)
विशेष : हा एकदंत गणेशभक्तांना त्वरित ऋणमुक्त करतो, असा समज आहे. कर्ज फिटते. आर्थिक समस्या न्यून (कमी) होतात.
१०. श्री महागणपति : (नवगण राजुरी)
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात ‘राजुरी’ नावाचे गाव असून तेथे अत्यंत जागृत असे महागणपतीचे स्थान आहे.
विशेष : असे सांगितले जाते की, श्री गणेशाच्या प्रभावाने गावात चोर्या होत नाहीत. घरादारांना कड्या-कुलुपे वापरण्याची आवश्यकता भासत नाही. क्वचित कधी चोरी झालीच, तर त्यास या गावची वेस ओलांडून बाहेर पडता येत नाही. तोच चोर आपोआप या मंदिरात येतो आणि मूर्तीभोवती प्रदक्षिणा घालत रहातो.
महत्त्वाचे : वरील गणेशस्थाने जागृत असली, तरी त्यांची प्रचीती येण्यासाठी भक्त सुद्धा श्रद्धावान, नियमित उपासना करणारा असावा, हे लक्षात असू द्यावे. |