सर्वसंगविरहित शुद्ध आणि त्रिगुणातीत अवस्थेतील अनसूयेच्या पोटी आलेल्या दत्ताच्या जन्माची अद्भुत कथा

Article also available in :

१. माता अनसूया तपःपूत आणि पतीव्रता असल्याने
भगवंताने ब्रह्मा-विष्णु-महेशाच्या स्वरूपात
ऋषींचा वेश घेऊन तिच्याकडे भिक्षा मागायला जाणे

1404059972_p-p-pandemaharaj
प.पू. पांडे महाराज

दत्तात्रयांच्या जन्माची कथा मोठी अद्भुत आहे. ब्रह्मा, विष्णु आणि महेश एकदा अनसूयेकडे ऋषींच्या वेशात भिक्षा मागावयास गेले; कारण भगवंताने माता अनसूयेला मी तुझ्यापोटी जन्म घेईन, असा वर दिला होता. अनसूयेचे पती हे अत्रिऋषी म्हणजे ब्रह्मदेवाचे पुत्र. सप्तर्षींमधील एक ऋषी. ते तपःपूत आणि सामर्थ्यवान होते. माता अनसूयाही तशीच तपःपूत आणि पतीव्रता होती; म्हणूनच भगवंत ब्रह्मा-विष्णु-महेशाच्या स्वरूपात ऋषींचा वेश घेऊन तिच्याकडे भिक्षा मागावयास गेले.

 

२. ऋषींनी सांगितल्याप्रमाणे अनसूयेने त्यांना नग्नावस्थेत
भोजन वाढायला गेल्यावर तिला ते ऋषी बालकांच्या रूपात दिसणे आणि त्यानंतर ते त्रिमुखी स्वरूपात एकत्वाने दिसू लागणे

त्या वेळी अत्रिऋषी बाहेर गेले होते. अनसूया एकटीच होती. तिने त्या ३ ऋषींचे स्वागत केले आणि ती त्यांना भिक्षा वाढावयास गेली असता ऋषी म्हणाले, आम्हाला तुझ्या हातचे भोजन पाहिजे आणि तू नग्नस्थितीत आम्हाला वाढले पाहिजे. तिने जशी आपली इच्छा, असे म्हटले. त्यानंतर अनसूयेने स्वयंपाक करून ती नग्न अवस्थेत वाढायला गेल्यावर तिला ते ३ ऋषी बालकांच्या रूपात दिसले. नंतर तिने त्यांना पाळण्यात घातले. तेव्हा ते त्रिमुखी स्वरूपात एकत्वाने दिसू लागले. तेच हे दत्तस्वरूप !

३. नग्नावस्था म्हणजे
सर्वसंगविरहित शुद्ध आणि त्रिगुणातीत अवस्था !

येथे ऋषींनी सती अनसूयेला नग्न होऊन वाढण्यास सांगितले. नग्न याचा खरा अर्थ काय ?, हे पहाणे आवश्यक आहे. भगवंताचा जन्म होणे, म्हणजे मूळ स्वरूपाची स्थिती निर्माण होणे. त्याचे दर्शन त्या स्वरूपात तेव्हाच होईल, जेव्हा आपण सर्वसंगविरहित शुद्ध आणि त्रिगुणातीत अवस्थेत राहू. हीच ती नग्न अवस्था ! देहातीत अवस्था !! केवळ अंगावरील कपडे काढणे, याला नग्न म्हणत नाहीत. हा व्यावहारिक अर्थ झाला; परंतु मूळ स्वरूपसंधान तेव्हाच येते, जेव्हा आपले आपल्यातील आवरण नाहीसे होते. आत्म्यावर आणि विविध देहांवर अन्नमय कोष, प्राणमय कोष, मनोमय कोष आणि आनंदमय कोष यांचे आवरण असते. हे आवरण नाहीसे झाल्यावर तो त्रिगुणातीत, देहातीत आणि शुद्ध स्वरूपात येतो. तेव्हाच त्या भगवंताचे दर्शन होते, ही अवस्था आहे.

शिवापराधक्षमापन स्तोत्रात श्रीमद् आदिशंकराचार्यसुद्धा म्हणतात,

नग्नो निःसङ्गशुद्धस्त्रिगुणविरहितो ध्वस्तमोहान्धकारो
नासाग्रे न्यस्तदृष्टिर्विदितभवगुणो नैव दृष्टः कदाचित् ।
उन्मन्याऽवस्थया त्वां विगतकलिमलं शङ्करं न स्मरामि
क्षन्तव्यो मेऽपराधः शिव शिव शिव भो श्री महादेव शम्भो ॥ – श्‍लोक १०

अर्थ : नग्न = दिगंबर (दिक् + अंबर) = दिशा ज्याच्या वस्त्र आहेत, तो सर्वव्यापी झाला आहे. आकाशवत् निर्मळ, शुद्ध, स्वच्छ झाला आहे. अंतःर्बाह्य शुद्ध आहे. सर्वसंगरहित, शुद्ध, त्रिगुणरहित, मोहरूपी अंधःकाराचा नाश करणारे, नासाग्री दृष्टी लावून पद्मासनावर बसलेले, सर्व विश्‍वाच्या गुणांना जाणणारे मंगलमय, ध्यानस्थ अशा थाटात असलेले, अशा स्वरूपात मी कधी तुमचे दर्शन घेतले नाही. उन्मनि अशा अवस्थेत कठिमलरहित अशा तुमच्या कल्याणस्वरूपाचे स्मरणही केले नाही. हे देवाधिदेवा शंकरा, महादेवा, शंभो, माझ्या अपराधांची क्षमा करा !

वरील श्‍लोकात भगवान शंकराची अवस्था दिली आहे. तेव्हा मलाही त्या स्वरूपातूनच त्यांचे दर्शन घेतले पाहिजे. माता अनसूयेनेसुद्धा नासाग्री दृष्टी लावून आणि पद्मासनात ध्यानस्थ अवस्थेत बसून समोरील ऋषींना जेवण्यासाठी प्रार्थना केली. त्या वेळी तिची स्थितीही वर वर्णन केल्याप्रमाणेच होती. अशा या स्वरूपसंधानातून जेव्हा तिने डोळे उघडून त्या तीन ऋषींकडे बघितले, तेव्हा ते तिला बालस्वरूप दिसले.

– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.१२.२०१५)