जम्मू-काश्मीरच्या मध्यावर ‘हरि पर्वत’ नामक विशेष टेकडी आहे. हे महाशक्तीचे सिंहासन आहे. दिव्य माता शारिका भगवती हिला ‘महात्रिपुरसुंदरी’ आणि ‘राजराजेश्वरी’ असेही म्हणतात.
१८ भुजा असलेली श्री शारिकादेवी ही काश्मीरची ग्रामदेवता आहे. देवीमुळेच या स्थानाचे नाव ‘श्रीनगर’ असे पडले आहे.
श्री शारिकादेवीचे स्वरूप
येथे श्री शारिकादेवी ‘महाश्रीयंत्रा’च्या रूपात आहे. हे स्वयंभू श्रीयंत्र एका उंच खडकावर आहे. यामध्ये गोलाकार रहस्यमयी छाप आणि त्रिकोणी आकार आहेत, तसेच मध्यभागी बिंदू आहे.
श्री शारिकादेवीशी निगडित कथा
‘विशेष तद्वैता’नुसार ‘श्री’ ही भगवंताची पत्नी आहे आणि ती ईश्वर अन् मनुष्य यांच्यातील दुव्याचे काम करते. इतिहासकारांच्या मते, हरि पर्वत टेकडी एकेकाळी ‘जलोभव’ नामाच्या राक्षसामुळे एक प्रचंड तलाव बनली. भक्तांनी साहाय्यासाठी देवी पार्वतीला आर्ततेने आळवले. भक्तांच्या रक्षणासाठी देवीने आषाढ शुक्ल पक्ष नवमी या दिवशी ‘साळुंकी’ या पक्षाचे रूप घेतले. या पक्षाने चोचीमध्ये दिव्य दगड घेऊन तो जलोभव राक्षसावर टाकून त्याचा वध केला आणि श्रीनगर बुडण्यापासून वाचवले. त्यानंतर श्री शारिकादेवीने हरि पर्वतावर कायमचा निवास केला.
नवरात्रीमध्ये म्हणजेच काश्मिरी पंडितांच्या नववर्षाच्या काळात भक्त नियमितपणे प्रार्थना आणि पूजा करण्यासाठी हरी पर्वताला भेट देतात. श्री शारिकादेवी, मकदूम साहिब आणि गुरुद्वारा छती पादशाही या धार्मिक स्थळांमुळे काश्मीरमधील सर्व लोक या पर्वताला अत्यंत पवित्र मानतात.