नामसंकीर्तनाच्या माध्यमातून ईश्‍वराशी अनुसंधानात रहाणार्‍या चेन्नई येथील सौ. कांतीमती संतानम् (वय ८१ वर्षे) संतपदी विराजमान !

Article also available in :

पू. (सौ.) कांतीमती संतानम् यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

चेन्नई – अनेक जण देवाची भजने गातात आणि इतरांनाही ते शिकवतात; मात्र भगवंताची भक्ती करण्यासाठी त्यांच्यातील काही जणच भजन गातात. त्यातील भक्तांतूनही एक-दोन उत्कट भक्तच ईश्‍वरप्राप्ती करतात. अशाच प्रकारे नामसंकीर्तन आणि भजने यांच्या माध्यमातून संतपद गाठणार्‍या थोर विभूतीचे दर्शन सनातन संस्थेच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांच्या संगीत साधनेतील गुरु चेन्नई येथील सौ. कांतीमती संतानम् यांच्या रूपाने उपस्थितांना घडले. २५ ऑगस्ट या दिवशी पू. (सौ.) रविचंद्रन् यांच्या निवासस्थानी सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सौ. कांतीमती संतानम् यांच्याशी भावपूर्ण संवाद साधला. हा संवाद चालू असतांनाच सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांनी सौ. कांतीमती संतानम् (वय ८१ वर्षे) संतपदी विराजमान झाल्याचे घोषित केले. सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांनी त्यांचा हार, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. याप्रसंगी पू. कांतीमतीमामींची लहान मुलगी सौ. रमा आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.

 

१. संतपदाहून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे
दर्शनच अधिक महत्त्वाचे वाटणार्‍या पू. (सौ.) कांतीमतीमामी !

या वेळी पू. (सौ.) कांतीमतीमामी यांनी त्यांच्या संतपदाचे सर्व श्रेय उपास्यदेवता श्री मुरुगन् (कार्तिकेय) आणि त्यांचे पती श्री. संतानम् यांच्या चरणी अर्पण केले. या वेळी पू. (सौ.) कांतीमतीमामी म्हणाल्या, ‘‘मी संतपदावर आरूढ झाले, त्याहूनही ‘या जीवनात मला सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दर्शन झाले’, हे अतिशय महत्त्वाचे आहे. आज मला सद्गुरूंचे दर्शन झाल्यामुळे माझ्या जीवनातील सर्व दु:खे याच क्षणी दूर झाली आहेत. याहून अधिक मला काय हवे ?’’

 

२. ‘नामसंकीर्तन’ म्हणजे काय ?

‘नामसंकीर्तन’ म्हणजे लहान लहान भजनपंक्तींच्या माध्यमातून देवाला आळवून त्याची भक्ती करणे. नामसंकीर्तन हा दक्षिण भारतातील भक्ती पंथातील काही संतांनी समाजाला ईश्‍वराकडेे वळवण्यासाठी अवलंबलेला सोपा मार्ग होय ! खरेतर तमिळनाडूत नामसंकीर्तन ही संकल्पना महाराष्ट्रातून आलेल्या विठ्ठलाच्या अभंगांच्या माध्यमातून चालू झाली. आज तमिळनाडूत अनेक संत, भजनी मंडळ आणि कथाकार आदी विठ्ठल, मुरुगन् (कार्तिकेय), कृष्ण, राधा-कृष्ण, दुर्गादेवी आदींवर लहान द्विपदी, चौपदी करून त्याला एका रागामध्ये आणि लयीत गातात. अशा प्रकारे भजन गाणार्‍या महिला भजन म्हणत असतांनाच कधी कधी टिपर्‍या घेऊन सुंदर भावपूर्ण नृत्यही करतात.

 

३. पू. कांतीमतीमामी यांची काही वैशिष्ट्ये

अ. अनेक वेळा वयामुळे पू. (सौ.) कांतीमतीमामींची प्रकृती चांगली नसते, तरीही त्या आवर्जून भजने गायला जातात. त्या भजन गात असतांना ‘मुरुगन्च (कार्तिकेय) त्यांच्या मुखातून भजन गात असतो’, असा त्यांचा भाव असतो.

आ. पू. मामी अन्यत्र भजन गायला जातात, तेव्हा त्यांचे कधीही मानधन किंवा मंदिर व्यवस्थापनाकडून मिळणारे पैसे यांकडे विशेष लक्ष नसते. पू. मामी म्हणतात, ‘मी माझ्या मुरुगन्साठी गायला तिकडे जाते.’ असे असतांना त्यांच्या समवेत भजन गाणार्‍या गरीब महिला, तबलावादक, पेटीवादक यांना आवश्यक तेवढे मानधन मिळण्याकडे त्या आवर्जून लक्ष देतात.

इ. पू. मामींना आजपर्यंत त्यांच्या उपास्यदेवतेचे दर्शन होणे किंवा स्वप्नदृष्टांत होणे अशा अनुभूती आलेल्या नाहीत; मात्र त्यांना नेहमी असे वाटते की, मुरुगन् (कार्तिकेय) त्यांच्याशी बोलतो. ही अनुभूती पू. मामी सतत घेत असतात. थोडक्यात पू. मामी अखंड अनुसंधानात असतात.

 

४. पू. कांतीमतीमामी यांचे विचारधन

अ. ‘भारतीय शास्त्रीय संगीत हे भक्तीवर आधारित असल्याने शाश्‍वत आहे, तर पाश्‍चात्य संगीत हे पैशांवर आधारित असल्याने अशाश्‍वत आहे. भारतीय शास्त्रीय संगीतामुळेच आनंदाची अनुभूती घेता येते.

आ. आजपर्यंत माझ्या जीवनात अनेक संकटे आणि समस्या आल्या. केवळ माझी इष्टदेवता श्री मुरुगन्च्या (कार्तिकेयच्या) कृपेमुळेच माझे सर्व संकटांतून रक्षण झाले आहे आणि यापुढेही तो माझे सर्व संकटांपासून रक्षण करणार आहे.’ – पू. (सौ.) कांतीमती संतानम्

 

५. पू. (सौ.) कांतीमती यांचा विविध संगीत सभा आणि कांची मठ
यांनी केलेला गौरव पू. (सौ.) कांतीमती संतानम् यांना ‘भागवत शिरोमणी’,

‘भागवत चुडामणी’, ‘नामावली रत्न’, ‘तिरुपुगझ चेम्मन्नी’, ‘भागवतरत्न’, ‘संकीर्तन चुडामणी’ आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

 

पू. (सौ.) कांतीमती संतानम् यांचा अल्प परिचय

सौ. कांतीमती संतानम्

पू. (सौ.) कांतीमती संतानम् या ‘नामसंकीर्तन चूडामणी’, ‘भावरत्न’ आदी अनेक पदव्यांनी अलंकृत आहेत. सतत हसतमुख असणार्‍या आणि वयाच्या ८१ व्या वर्षीही लहान मुलांसारख्या उत्साही असणार्‍या पू. (सौ.) संतानम् यांना सर्वजण प्रेमाने ‘मामी’ म्हणतात. पू. (सौ.) कांतीमतीमामी यांना त्यांच्या वडिलांनी लहान वयातच भजने गायला शिकवले. त्या २ वर्षांच्या असतांना त्यांचे वडील कै. रामस्वामी अय्यर त्यांना मंदिरात घेऊन जायचे. वडील त्यांना मंदिराच्या भिंतीवर लिहिलेल्या भजनाच्या ओळी वाचायला आणि जमेल तसे गायला सांगायचे. पुढे वडील भजन-कीर्तन करत असतांना पू. मामी त्यांच्या समवेत सतत असायच्या, तसेच स्वत:हून सर्व शिकायच्या. भजन म्हणतांना मामी देहभान विसरायच्या. वर्ष १९६१ मध्ये त्यांचा विवाह चेन्नई येथील श्री. संतानम् यांच्याशी झाला. त्यानंतर दोघांनी वर्ष १९७५ मध्ये नवीन घर खरेदी केले. तेव्हापासून आजपर्यंत गेली ४४ वर्षे पू. मामी प्रतिदिन भजनांचे वर्ग घेत असून आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहस्रो जण भजन गायला शिकले आहेत.

त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. सर्वांचे विवाह झाले असून या चौघांनाही भजन आणि संगीत यांची आवड आहे. दोन्ही मुले अमेरिकेत असतात. मोठी मुलगी तमिळनाडूतील सेलम् येथे, तर धाकटी मुलगी चेन्नई येथे असते. गेल्या २ वर्षांपासून पू. मामींचे पती श्री. संतानम् अर्धांगवायूने अंथरूणाला खिळून आहेत. वयामुळे आणि शारीरिक आजारांमुळे पू. मामींना चालणे जमत नाही. असे असतांनाही त्या भजने गाण्यासाठी आनंदाने बाहेर जात असतात.

Leave a Comment