समर्थ रामदासस्वामी आणि मारुति यांच्या कथेतून प्रतीत होणारा सद्गुरु महिमा

Article also available in :

बोधकथा

१. श्रीरामाने कृष्णातिरी जाण्याची केलेली आज्ञा म्हणजेच
पुरश्‍चरण असल्याचे मारुतीने समर्थांना सांगणे

पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक
पू. (सौ.) लक्ष्मी
(माई) नाईक

नाशिकमधील पंचवटीच्या जवळ टाकळी येथील मठाच्या ठिकाणी समर्थ रामदासस्वामी पुरश्‍चरणाला (तपश्‍चर्येला) बसले असतांना एकदा त्यांचा मारुतीशी वाद झाला. समर्थांचे पुरश्‍चरण संपत आले, तेव्हा प्रभु श्रीरामाने त्यांना आज्ञा केली, कृष्णातिरी जा. हे सांगताच समर्थ म्हणाले, पुरश्‍चरण पूर्ण करून जाण्याची आज्ञा द्या. तेव्हा मारुति म्हणाला, श्रीरामाची आज्ञा म्हणजेच पुरश्‍चरण आहे. मग तुमचे पुरश्‍चरण पूर्ण करण्याची तुम्हाला काय आवश्यकता आहे ? त्या वेळी समर्थ म्हणाले, लोकसंग्रहाच्या दृष्टीने पुरश्‍चरण पूर्ण करण्याची आज्ञा द्यावी. रामनवमीचा उत्सव पूर्ण करून मी कृष्णातिरी जाईन. (यातून संत, सद्गुरु सतत प्रथम लोकांचा, भक्तांचा विचार करतात हे लक्षात येते. – संकलक)

२. मारुतीने बटू वेशात येऊन समर्थांना पुराण सांगण्याची
विनंती करणे, त्यांनी लंकेतील कण्हेरीच्या झाडावरील फुलांचा रंग
पांढरा असल्याचे सांगणे, मारुतीने तांबड्या रंगाची फुले असल्याचे सांगून
समर्थांच्या वक्तव्यावर आक्षेप घेणे आणि शहानिशा करण्यासाठी स्वतः लंकेत जाणे

एके दिवशी मारुतीने बटू वेशात पुराण-श्रवणाच्या जागी येऊन समर्थांना पुराण सांगण्याची विनंती केली. त्या वेळी समर्थ म्हणाले, तुझ्या समोर पुराण सांगण्याची माझी योग्यता नाही आणि मला त्याचा व्यासंगही नाही. मारुति म्हणाला, मग घाबरता कशाला ? जिथे चुकेल, तिथे मी पालट करीन. पुराणिकबुवांची आज्ञा घेऊन समर्थांनी पुराण सांगण्यास प्रारंभ केला. मारुति सीतेला शोधासाठी लंकेत गेल्याची कथा समर्थ सांगू लागले. त्या वेळी समर्थ आणि बटू वेशातील मारुति यांच्यातील संवाद पुढे देत आहे.

समर्थ : मारुति सूक्ष्मातून कण्हेरीच्या झाडावर बसला होता. त्या झाडाची फुले पांढर्‍या रंगाची होती.

बटू (मारुति) : मुळीच नाही.

त्या वेळी दोघांचा वाद चालू झाला. इतर श्रोते बटूवर (मारुतीवर) संतापले. ते म्हणाले, काय रे मुला, पुराणात सांगितलेल्या गोष्टी खोट्या आहेत का ? कोणाशीही वाद घालतोस, हे चांगले नाही. समर्थांनी श्रोत्यांना समजावून पुराण संपवले.

मारुति (समर्थांना उद्देशून) : चला, मी तुम्हाला कण्हेरीची फुले तांबडी आहेत कि नाहीत, हे समक्ष दाखवतो.

समर्थ : मी तुझ्यासमवेत आल्यास श्रीरामाच्या पूजेत खंड पडेल.

मारुति : श्रीरामाच्या पूजेसाठी मी कण्हेरीची फुले आणतो. असे सांगून तो लंकेत गेला.

३. लंकेत जाऊन कण्हेरीची फुले पांढर्‍या रंगाची
असल्याचे पाहून मारुतीला आश्‍चर्य वाटणे आणि बिभीषणाने
परम श्रीरामभक्ताशी गाठ घालून देण्याची मारुतीला विनंती करणे

फुले तोडण्यास प्रारंभ करताच बिभीषणाने त्याला पाहिले. फुले पांढरी असल्याचे पाहिल्यावर आश्‍चर्य वाटून ही फुले अशीच होती का, असे त्याने बिभीषणाला विचारले. त्या वेळी बिभीषण म्हणाला, हो. ती पांढरीच होती. मग मारुतीने घडलेला प्रसंग बिभीषणाला कथन केला. बिभीषणाने अशा परम श्रीरामभक्ताशी गाठ घालून देण्याची मारुतीला विनंती केली. मारुति म्हणाला, ते पृथ्वी प्रदक्षिणेच्या वेळी येथे येतील.

४. मारुतीने तांबड्या रंगाची आणि स्वतः सांगितलेली पांढर्‍या
रंगाची फुले असण्यामागील कारण समर्थांनी स्पष्ट केल्यावर त्याने हार पत्करणे

लंकेतून परतल्यावर त्याने समर्थांना विचारले, फुले न पहाताच तुम्हाला ती पांढरी असल्याचे कसे कळले ? त्या वेळी समर्थ म्हणाले, तू सांगितल्याप्रमाणे फुले तांबडी होती, हे योग्य आहे आणि ती पांढरी असल्याचे मी म्हणालो, तेही योग्य आहे. सीतेच्या शोधात असतांना तू क्रोधायमान झाल्यामुळे तुला फुले तांबड्या रंगाची दिसली. रावण शिवभक्त असल्याने प्रत्यक्षात त्याच्या वाटिकेत पांढर्‍या रंगाची फुले अधिक असणार. हे मला ठाऊक होते. त्या वेळी मारुतीचे समाधान झाले. मारुतीने समर्थांकडे हार पत्करली.

यावरून सद्गुरु कि ईश्‍वर श्रेष्ठ आहे ? त्रैलोक्यात सद्गुरुच श्रेष्ठ आहेत. त्यांच्या कृपाशीर्वादाविना कोणतेही कार्य होऊच शकणार नाही. श्रीरामाच्या आशीर्वादाविना सीतेचा शोध घेणे किंवा लंकेत जाणे शक्य नव्हते. शेवटी काय, ईश्‍वर हाच सद्गुरु अन् सद्गुरु हाच ईश्‍वर !

– (पू.) सौ. लक्ष्मी (माई) नाईक, पानवळ, बांदा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग.