शाकाहारावरील टीका आणि तिचे खंडन

Article also available in :

शाकाहारामुळे व्यक्तीमधील सत्त्वगुण वाढतो. सत्त्वगुण आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वाचा आहे, हे ज्यांना माहीत नाही आणि जे भोगविलासी आहेत, असे लोक शाकाहारावर टीका करतात. या लेखात शाकाहारात गणल्या गेलेल्या काही अन्नपदार्थांची माहिती करून घेऊया.

 

१. शाकाहारावरील टीका आणि तिचे खंडन

टीका : ‘अप्पाला (गुरुदेव डॉ. काटेस्वामीजींच्या साहित्यातील व्यक्तीरेखा) त्याचे अमेरिकी मित्र म्हणायचे, “तुझ्यात काय बळ आहे ? तुझी स्थिती अशी का ? शतकेच्या शतके तुमचे राष्ट्र दास (गुलाम) राहिले ना ? मांसाहार टाळला की, मनुष्य दुबळा बनतो. दास होतो. तुमचे ढोबळ (सरासरी) आयुर्मान किती ? तुम्ही शतशः रोगाने ग्रस्त होताच ना ? मांसाहारी देशातील लोकांचे ढोबळ आयुर्मान ८० पर्यंत पोहोचले आहे. लवकरच ९५-१०० पर्यंत जाईल. इथे भारतात ढोबळ आयुर्मान ३५ च्या आसपास आहे. तुम्ही इथेच अडकला आहात. मांसाहार न करणार्‍याची शक्ती आणि बुद्धीही अशक्त बनते; कारण त्यांना योग्य प्रथिने आणि जीवनसत्त्वे कुठे मिळतात ? शक्ती आणि ऊर्जा कुठे मिळते ? शरीर दुबळे म्हणून आयुर्मान घसरते. शक्ती घटते.

शुद्ध शाकाहाराने बुद्धी शुद्ध होते ना ? मग सगळी नोबेल पारितोषिके भारतियांनाच का मिळाली नाहीत ? बुद्धी तर काही वाढलेली दिसत नाही. रविंद्रनाथ टागोरांना नोबेल पारितोषिक मिळाले खरे; पण ते शाकाहारी नव्हते. ते मांसाहार करायचे. भारत दोन सहस्र वर्षांपासून शाकाहारी आहे. दोन सहस्रवर्षांत बुद्धी काही शुद्ध झालेली दिसत नाही. अरे अप्पा, नोबेल पारितोषिक मिळाले नाही ना ? ऑलिंपिकची सुवर्णपदके मिळाली नाहीत ना ?’’

खंडन : अप्पा हिरीरीने सांगतो, “सुवर्णपदके काय करायची आणि नोबेल पारितोषिकांचे काय करायचे ? ती मुलांना खेळायला दे. अरे, आम्हा भारतियांना वेगळाच पुरस्कार पाहिजे आहे. तो पुरस्कार परमात्माच देतो. दुसरा कुणीच देऊ शकत नाही. तो पुरस्कार ब्रह्मानंदाचा आहे, अद्वैताचा आहे. द्रष्ट्याचा निर्लिप्ततेचा, साक्षीचा, परमशांतीचा आहे. नोबेल पारितोषिक तुम्हीच सांभाळा. ती खेळणी मुलांना द्या खेळायला. मांसाहार करणार्‍याचे ढोबळ आयुर्मानही जास्त आहे ना ! ८०-८५ वर्षे सहज जगतो ना ? त्यापेक्षा आम्ही ४-६ वर्षे अल्प जगू. त्याने काय मोठे अंतर पडणार आहे ? अधिक जगून काय लाभ ? दीर्घ जीवन मिळवून काय करणार ? आणखी काही जनावरेच खाणार ना ? आणखी कराल काय ? असे पशू-पक्ष्यांना मारण्याकरता जगायचे कशाला ? मांसाहारी शक्तीमान आणि शाकाहारी दुबळा, ठीक आहे; पण तुम्ही या शक्तीचे कराल काय ? तुम्हाला कुणाची हिंसा करायची आहे कि कुणाला मारायचे आहे ? युद्ध करायचे आहे कि हिंसक बनायचे आहे ? दोन दिवसांची इथे वस्ती आहे. पुरस्कार प्राप्त करून घ्यायचा, तर तो परमात्म्याचाच घ्यावा. त्याकरताच जीवन असावे. शरीर जावो; जीवन जावो; धन, आप्त आणि स्वकीय जावोत; सगळे जावोत. केवळ अंतरीचा परमात्मा, अद्वैताची अनुभूती आणि अंतरीच्या परमात्म्याचा रस उरू दे. मग सगळे बचावेल. ज्याने अंतरीच्या परमात्म्याचा रस गमावला, त्याने सगळे गमावले. मग बाहेर कितीही प्रचंड ऐश्वर्य असू दे. ज्याने अंतरीचा रस वाचवला, त्याने सर्व वाचवले. तो दरिद्री का असेना.’’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

 

२. शाकाहारात गणल्या जाणार्‍या अन्नप्रकारांची काही उदाहरणे आणि त्यामागची कारणे

२ अ. वनस्पती

२ अ १. वनस्पतींना भावना असतात, तरी त्यांना शाकाहारी समजले जाण्याचे कारण ‘या भावना तमोगुणी इच्छादर्शक क्रियेशी संबंधित नसतात; म्हणून त्यांना स्थिरत्वाच्या रूपात, म्हणजेच शांत प्रकृती दर्शवणार्‍या शाकाहाररूपी पवित्रतेच्या रूपात गणले जाते. तसेच वनस्पतींच्या भावना त्यांच्यातील तेजाच्या साहाय्याने त्यांच्या काष्ठात स्थिर झालेल्या असल्याने त्यांना अग्नीस्वरूपाचे अधिष्ठान दिलेले असल्याने त्यांना पवित्र मानले जाते.

२ अ २. वनस्पतींतून सजिवाचा जन्म होऊ शकत असला, तरी त्यांना शाकाहारी समजले जाण्याचे कारण वनस्पतीतून अंकुरणार्‍या सजिवाच्या उत्पत्तीमागे शुद्ध तेज-पृथ्वीस्वरूप भूमीलहरींचे अधिष्ठान असते. हे अधिष्ठान स्वतःच्या संपर्कात येणार्‍या रज-तमात्मक लहरींना प्रभावहीन करण्याचे कार्य करत असते, तसेच ही उत्पत्ती प्राण्यांसारख्या तमोगुणी कामवासनात्मक संबंधातून निर्माण झालेल्या कनिष्ठ इच्छेशी संबंधित नसते; म्हणून त्यांना पवित्र, म्हणजेच शाकाहारी समजले जाते.

२ आ. दूध

हे सत्त्वगुणी गायीच्या उदरपोकळीतून निर्माण झालेले असल्याने ते सत्त्वगुणी शाकाहारात मोडते. दूध, पाणी, वायू (हवा) इत्यादींत सूक्ष्म जीव असले, तरी ते शाकाहारात गणले जाण्याचे कारण शाकाहारात पवित्रता, म्हणजेच सत्त्व-रजगुणाचे प्राबल्य असल्याने हे गुण त्यांच्या संपर्कात येणार्‍या सूक्ष्म जीवरूपी रज-तमात्मक घटकाला सामावून घेऊन त्यांना त्या त्या गुणाच्या माध्यमातून कार्य करण्याच्या स्तरावर निष्क्रीय करतात, म्हणजेच शाकाहारातील सूक्ष्म-जीव आहारातील सत्त्व रजोगुणाच्या कार्यकारी प्राबल्यामुळे जास्त प्रमाणात प्रभावहीन झालेले असल्याने त्यांच्या त्या त्या आहाराच्या स्तरावरील उपस्थितीला नगण्य महत्त्व दिले जाते. दूध, पाणी आणि वायू (हवा) यांच्यात पंचतत्त्वांच्या स्तरावर कार्य करणारी आणि सर्वांना त्यांच्या रज-तमासह स्वतःत सामावून घेणारी तेज अन् वायूस्वरूप उच्च तत्त्वे असल्याने या तत्त्वांच्या प्रभावाने त्यांच्यातील सूक्ष्म जीव प्रभावहीन होतात.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, फाल्गुन शुद्ध १४, कलियुग वर्ष ५११० १०.३.२००९, रात्री ९.१७)

 

३. अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने शाकाहारी बनण्यापेक्षा
‘नाम’धारी बनण्याला, म्हणजे नामजप करण्याला महत्त्व असणे

आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी शाकाहारी बनणे अत्यावश्यक नाही; पण शाकाहारामुळे व्यक्तीमधील सत्त्वगुण वाढतो. सत्त्वगुण आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वाचा आहे. तसेच आपण कोणत्या मार्गाने साधना करत आहोत, त्यावरसुद्धा शाकाहाराचे महत्त्व अवलंबून आहे, उदा. हठयोगामध्ये देहशुद्धीला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे हठयोगानुसार साधना करणार्‍याला शाकाहारी असणे आवश्यक ठरते. अध्यात्मशास्त्रानुसार शाकाहाराने व्यक्तीतील ०.०००१ टक्के इतका सत्त्वगुण वाढतो, तर भावपूर्ण नामजपाने तो ५ टक्के इतका वाढतो. त्यामुळे भावपूर्ण नामजप करणे जास्त महत्त्वाचे आहे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सात्त्विक आहाराचे महत्त्व’

1 thought on “शाकाहारावरील टीका आणि तिचे खंडन”

  1. होय शाकाहारी असण्याचे खूप फायदेही आहेत. मी जेव्हा पासून शाकाहारी आहे तिथपासून मला माझ्या स्वामींचा पुष्कळ अनुभव आहे. भावजागृती सुद्धा लवकर होतें.

    Reply

Leave a Comment