वटपौर्णिमा हे व्रत का करतात ?
वटपौर्णिमा हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमा या तिथीला करतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदू स्त्रिया हे व्रत करतात. वादविवादात यमाला हरवून हरण केलेले पतीचे प्राण परत मिळवणार्या सावित्रीच्या पातिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते. सावित्री आणि यमाचे वटवृक्षाखाली संभाषण झाल्यामुळे या दिवशी वटवृक्षाला महत्त्व प्राप्त झाले. वटवृक्ष आणि वटपौर्णिमा यांचे महत्त्व खालील लेखातून समजून घेऊया.
भरतखंडात प्रसिद्ध असलेल्या पतीव्रतांपैकी सावित्री ही आदर्श मानलेली आहे. तसेच तिला अखंड सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे; म्हणून स्त्रियांनी या व्रताचा आरंभ केला. वटपौर्णिमा या व्रताची मुख्य देवता सावित्रीसह ब्रह्मदेव असून सत्यवान, नारद आणि यमधर्म या उपांग (गौण) देवता आहेत.
वटपौर्णिमा हे व्रत करण्याची पद्धत
१. संकल्प
प्रथम सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा संकल्प करावा.
२. पूजन
वडाचे षोडशोपचारे पूजन करावे. पूजेत अभिषेक झाल्यानंतर वडाला सूत्रवेष्टन करावे, म्हणजे वडाच्या खोडाभोवती सुती धाग्याने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीनदा गुंडाळावे. पूजेच्या शेवटी ‘अखंड सौभाग्य लाभू दे, जन्मोजन्मी हाच पती लाभू दे, तसेच धनधान्य आणि कुल यांची वृद्धी होऊ दे’, अशी सावित्रीसह ब्रह्मदेवाला प्रार्थना करतात.
उपवास
स्त्रियांनी संपूर्ण दिवस उपवास करावा.
विविध सण आणि व्रते कसे साजरे करावे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी सनातन संस्थेच्या ऑनलाइन साप्ताहिक सत्संगात सहभागी व्हा !
साधना संवाद
वटवृक्षाचे महत्त्व
यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. शास्त्रचर्चा वटवृक्षाखाली झाली; म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले.
‘प्रलय झाला तरी वटवृक्ष असतोच. तो युगान्ताचा साथीदार आहे.
बाल मुकुंदाने प्रलयकाळी वटपत्रावर शयन केले.
प्रयागच्या अक्षय्य वटाखाली राम, लक्ष्मण आणि सीता विसावले होते.
ब्रह्मा, श्रीविष्णु, महेश, नृसिंह, नील आणि माधव यांचे वटवृक्ष हे निवासस्थान आहे.
वड, पिंपळ, औदुंबर आणि शमी हे पवित्र अन् यज्ञवृक्ष म्हणून सांगितले आहेत. या वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य अधिक असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही पुष्कळ होतो.
अक्षय अशा प्राणाचे दर्शक असणे : ‘वटसावित्रीची पूजा म्हणजे `सावित्रीच्या पातिव्रतेच्या सामर्थ्याची पूजा’; म्हणून या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते. वटवृक्ष हा अक्षय अशा प्राणाचे दर्शक आहे.’
वडाच्या झाडाचे पूजन करणे (सूक्ष्म-परीक्षण)
१. वडाच्या झाडात परमेश्वरी तत्त्व अगोदरच कार्यरत असणे
२. वटपूजन करतांना स्त्रीमध्ये भावाचे वलय निर्माण होणे
३. ईश्वराशी अनुसंधान होणे
४. पूजा सांगणार्या पुरोहिताच्या अनाहत चक्राच्या ठिकाणी मंत्रशक्तीचे वलय निर्माण होणे आणि त्याच्या मुखातून मंत्रशक्तीच्या प्रवाहाचे वातावरणात प्रक्षेपण होणे
५. झाडात परमेश्वराकडून निर्गुण तत्त्वात्मक प्रवाह आकृष्ट होणे
६. झाडात निर्गुण तत्त्वात्मक वलय निर्माण होणे
७. झाडात निर्गुण तत्त्वात्मक कण कार्यरत असणे
८. झाडात ईश्वराकडून आनंदाचा प्रवाह येणे
९. आनंदाचे वलय निर्माण होणे
१०. झाडात चैतन्याचा प्रवाह आकृष्ट होणे
११. झाडातून, तसेच त्याच्या पारंब्या आणि इतर भाग यांतून चैतन्याच्या प्रवाहांचे वातावरणात प्रक्षेपण होणे
१२. झाडात, तसेच वातावरणात चैतन्यकणांचे प्रक्षेपण होणे
१३. झाडातून पूजन करणार्या स्त्रीकडे चैतन्याच्या प्रवाहाचे प्रक्षेपण होणे
१४. स्त्रीमध्ये चैतन्याचे वलय निर्माण होणे
१५. ईश्वराकडून चैतन्यरूपी आशीर्वादाचा प्रवाह स्त्रीकडे आकृष्ट होणे
१६. स्त्रीच्या शरिरात शक्तीचे वलय निर्माण होणे
१७. तिच्या देहात शक्तीचे कण कार्यरत स्वरूपात फिरणे
१८. तिच्या देहाभोवती संरक्षककवच निर्माण होणे’
– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्येष्ठ शु. अष्टमी, कलियुग वर्ष ५१११ (३१.५.२००९))
वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाचे पूजन करणे आणि वडाची फांदी घरी आणून तिचे पूजन करणे यांतील भेद
वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाचे मनोभावे पूजन करण्याचा प्रघात आहे. त्यामुळे पूजन करणार्या स्त्रीला आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. हल्ली मात्र शहरासारख्या ठिकाणी वडाची फांदी घरी आणून तिचे पूजन करण्याची चुकीची प्रथा पडली आहे. वटवृक्षाचे पूजन करणे आणि वडाची फांदी घरी आणून तिचे पूजन करणे यांतील भेद खालील लेखातून समजून घेऊया.
घरी वडाची फांदी आणून तिचे पूजन करण्यापेक्षा प्रत्यक्ष वडाच्या पूजेतून अधिक लाभ मिळणे
वडाच्या मूळ खोडामध्ये अधिक प्रमाणात शिवतत्त्व सामावलेले असल्याने प्रत्यक्ष झाडाची भावपूर्णरित्या पूजा करून ३० प्रतिशत, तर केवळ फांदीच्या पूजेने २ – ३ प्रतिशत एवढ्याच प्रमाणात लाभ मिळण्यास साहाय्य होते. मूळ, खोडविरहित झाडाची फांदी ही झाडाच्या मूळ चेतनेपासून विलग झाल्याने तिच्यामध्ये अचेतनत्व अधिक प्रमाणात असल्याने तिची चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमताही अतिशय नगण्य असते. फांदीतील अचेनत्वाचा परिणाम म्हणून तिची चैतन्य वहन करण्याची क्षमताही अतिशय नगण्य असल्याने घरी वडाची फांदी आणून पूजा करण्याने फारसा लाभ मिळत नाही. ज्या ठिकाणी नैसर्गिकता अधिक असते, त्या ठिकाणी चेतनेचे प्रमाणही अधिक असल्याने चैतन्याच्या फलप्राप्तीचे प्रमाणही अधिक असते. – ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.५.२००६, दुपारी १.४५)
कागदावर वडाचे चित्र काढून त्याची पूजा करण्यापेक्षा प्रत्यक्ष वडाच्या पूजेतून अधिक लाभ मिळणे
कागदावर वडाचे चित्र काढून त्याची पूजा करून इष्ट चैतन्याची फलप्राप्ती करण्यासाठी पूजकाची पातळी ५० प्रतिशतच्या पुढे हवी, तरच पूजकाच्या अव्यक्त भावाच्या प्रमाणात चित्राला देवत्व प्राप्त होऊन पूजकाला चैतन्य प्राप्त होते, अन्यथा नाही. नाहीतर याचा सर्वसामान्य जिवाला १-२ प्रतिशत एवढ्या प्रमाणातच लाभ मिळण्यास साहाय्य होते. – ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.५.२००६, दुपारी २.४५)
स्त्रियांनो, पतीव्रता सावित्रीच्या कथेतून बोध घ्या आणि तिच्यासारखी साधना अन् धर्माचरण करा !
‘पती-पत्नीतील स्नेहसंबंध दृढ करून जिवांना आत्मज्ञान प्राप्त करून देणे’, हाच वटपौर्णिमा व्रताचा उद्देश आहे. सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी ब्रह्मदेवाची तीन दिवस उपासना केली अन् त्यानंतर यमदेवालाही भक्तीने संतुष्ट करून पतीचे प्राण परत मिळवले. सावित्रीची ही कथा महाभारताच्या वनपर्वात येते. अज्ञातवासाच्या काळात पांडवांना मार्कंडेय ऋषींनी ती पांडवांना ऐकवली.
मार्कंडेय ऋषींनी सांगितलेली कथा
अ. यमदूत सावित्रीच्या पातिव्रत्याच्या तेजासमोर भयभीत झाल्याने सत्यवानाचे प्राणहरण करण्यासाठी स्वतः यमदेवाला यावे लागणे
सत्यवानाची जीवनयात्रा समाप्त झाल्यानंतर त्याचे प्राण घेऊन जाण्यासाठी यमदूत त्याच्यासमोर उपस्थित झाले; मात्र त्या वेळी सत्यवानाचा देह सावित्रीच्या मांडीवर होता. तिच्या पातिव्रत्याच्या तेजासमोर यमदूतांना उभे रहाणेही कठीण झाले. त्यामुळे साक्षात यमदेवच त्याचे प्राणहरण करण्यासाठी गेला. त्याने आपल्या सामर्थ्याने सत्यवानाचे प्राण शरिरातून काढून घेतले.
आ. यमराजाच्या मागे चाललेल्या सावित्रीला सत्यवानाच्या आत्म्याला गती मिळण्यासाठी यमराजाने धर्मशास्त्रानुसार मृत्यूत्तर क्रियाकर्म करण्यास सांगणे
यमदेव सत्यवानाचा प्राण घेऊन निघाल्याचे बघून सावित्री त्याच्या मागे चालू लागली. सावित्रीला बघून यमदेव म्हणाला, ‘‘सावित्री, तुझी जीवनरेखा अजून संपलेली नाही. त्यामुळे तुला माझ्या मागून येता येणार नाही. तू परत जा.’’ तेव्हा सावित्री म्हणाली, ‘‘हे भगवन्, मी तुमच्या पाठीमागून येत नाही. मी माझ्या पतीच्या मागून चालत आहे.’’ यावर यमदेव म्हणाला, ‘‘तुझा पती वनामध्ये मृत्यू येऊन पडला आहे. तेव्हा त्याचे मरणोत्तर क्रियाकर्म करून त्याच्या आत्म्याला गती दे. धर्मशास्त्रानुसार ते तुझे कर्तव्य आहे.’’
इ. ‘पत्नीने नेहमी पतीच्या मागून जावे’, असे धर्मशास्त्रात सांगितलेले असल्याने पतीच्या मागे येत मी धर्माचरण करत आहे’, असे सावित्रीने सांगणे
यमदेवाच्या या विधानावर सावित्री म्हणते, ‘‘हे भगवन्, जे वनामध्ये मृत होऊन पडले आहे, ते शरीर म्हणजे माझा पती नाही. ते माझ्या पतीचे शरीर आहे. ते शरीर पंचमहाभूतांनी निर्माण केले आहे. त्यात माझा पती रहात होता. माझ्या पतीला तर तुम्ही घेऊन निघाला आहात. धर्मशास्त्र सांगते, ‘पत्नीने नेहमी पतीच्या मागून जावे.’ तेच धर्माचरण मी करत आहे आणि धर्माचरण करण्यापासून मला कुणी रोखू शकत नाही.’’ सावित्रीचे हे उत्तर म्हणजे आत्मनात्मविवेकाचे उत्तम उदाहरण आहे.
ई. पतीला जिवंत करण्याच्या बदल्यात सावित्रीने नेत्रहीन असलेल्या सासू-सासर्यांना नेत्र प्रदान करण्याचा वर मागणे
यमदेव हा स्वतः धर्मराज आहे. साहजिकच तो धर्माचरणापासून कुणाला रोखू शकत नाही. अशा प्रकारे धर्मसंकटात सापडलेल्या यमदेवाने सावित्रीला म्हटले, ‘‘तुझ्या या उत्तराने मी प्रसन्न झालो आहे; पण मला माझे कर्तव्य सोडता येणार नाही. त्यामुळे पतीला जिवंत करण्याच्या बदल्यात तू एक वर माग.’’ यावर सावित्री म्हणाली, ‘‘हे भगवन्, माझे सासू-सासरे नेत्रहीन आहेत. त्यांना नेत्र प्रदान करा.’’
उ. ‘उत्तम धर्माचरण करण्यासाठी शरीर सुदृढ असायला हवे’, असे सावित्रीने सांगितल्यावर तिच्या उत्तराने प्रसन्न झालेल्या यमराजाने तिच्या सासू-सासर्यांना नेत्र प्रदान करणे
सावित्रीचे बोलणे ऐकून यमदेवाला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, ‘‘आताच तू नश्वर शरिरावर भाष्य केलेस. मग वर मागण्यास सांगितल्यावर तू त्याच शरिराच्या नश्वर नेत्रांचा वर कसा मागितलास ?’’ सावित्री म्हणते, ‘‘हे देवा, ‘मनुष्य नेत्रहीन असला, तरी तो आंधळा असत नाही’, हे सत्य आहे. त्याला ज्ञानाची दृष्टी असते; पण जोपर्यंत जीवन आहे अन् दृष्टीगोचर जगात कर्मे करायची असतात, तर उत्तम धर्माचरण करण्यासाठी शरीर सुदृढ असायला हवे. सूक्ष्म ज्ञानेंद्रियांच्या समवेत स्थूल ज्ञानेंद्रियेही सक्षम असायला हवीत.’’ यमदेव या उत्तराने प्रसन्न झाला. त्याने सासू-सासर्यांना नेत्र प्रदान करून सावित्रीला परत जायला सांगितले, तरीही सावित्री पुन्हा यमदेवाच्या मागून चालू लागली.
ऊ. सावित्रीने सासू-सासर्यांचे गेलेले राज्य परत मागणे आणि ‘धर्म टिकवून ठेवण्यासाठीच मी हा वर मागितला’, हे सावित्रीचे उत्तर ऐकून प्रसन्न झालेल्या यमदेवाने तिला तो वर देणे
सावित्रीला पुन्हा पाठीमागून येतांना बघून यमदेवाने तिला येण्याचे कारण विचारले. तेव्हा सावित्री म्हणाली, ‘‘हे भगवन्, धर्मशास्त्र सांगते, ‘संतांची कृपा, सत्संग आणि देवदर्शन अत्यंत भाग्यवंताला लाभते. ते प्राप्त झाल्यानंतर मनुष्याने सर्वस्वाचा त्याग करून त्यांच्या चरणी रहावे. मग मी तुमचा सत्संग कसा सोडू ? मला धर्माचरण करण्यापासून रोखू नका.’’ या उत्तराने धर्मसंकटात पडलेल्या यमदेवाने तिला आणखी एक वर मागण्यास सांगितले. तेव्हा तिने सासू-सासर्यांचे गेलेले राज्य परत मागितले. सावित्रीने सासर्यांचे राज्य परत मिळण्याचा वर मागितल्याने यमराज पुन्हा अचंबित झाला. त्याने विचारले, ‘‘सावित्री, तू आताच सर्वस्वाचा त्याग करून संतांची कृपा आणि देवतांचे दर्शन यांचे महत्त्व सांगितलेस. मग वर मागतांना राज्य का मागितलेस ?’’ यावर सावित्री म्हणते, ‘‘हे भगवन्, धर्मशास्त्र सांगते, ‘मनुष्याला मोक्ष प्राप्त करण्यासाठी स्वतःच्या समवेत इतरांकडूनही धर्माचरण करून घेतले पाहिजे. इतरांकडून धर्माचरण करून घेण्यासाठी राजधर्मासारखा दुसरा उत्तम मार्ग नाही. राजसत्ता हातात असेल, तर सर्वांना धर्माचरणी करणे सोपे होते.’ धर्म टिकवून ठेवण्यासाठीच मी हा वर मागितला.’’ यमराज प्रसन्न झाला आणि त्याने वर दिला.
ए. सावित्रीची वाक्पटूता बघून यमदेवाने तिच्या वडिलांना पुत्र होण्याचा वर देणे
सावित्री पुन्हा यमराजाच्या मागून चालू लागली. यावर यमराज म्हणाला, ‘‘तुला हवे ते वर दिले. आता तू माझ्या मागून का येतेस ?’’ यावर सावित्री म्हणते, ‘‘तुम्ही मला मोठ्या धर्मसंकटात टाकले आहे. ‘त्यातून मार्ग कसा काढावा ?’, ते मला समजत नाही. तुम्ही सत्यवानाचे प्राणहरण केल्याने वृद्धापकाळात मला सासू-सासर्यांची सेवा करावी लागेल. दुसर्या बाजूने माझ्या वडिलांना पुत्र नसल्याने त्यांच्याही राज्याचे दायित्व मला बघावे लागेल. मी अडचणीत सापडले आहे. मला तुमच्याविना कोण सोडवणार ?’’ सावित्रीची वाक्पटूता बघून यमदेवाने तिच्या वडिलांना पुत्र होण्याचा वर दिला अन् परत जाण्यास सांगितले, तरीही सावित्रीने यमदेवाचा पाठलाग चालूच ठेवला.
ऐ. सावित्रीने धर्मराज्य अबाधित ठेवण्यासाठी शंभर पुत्रांचे वरदान मागणे आणि त्या वराची पूर्ती होण्यासाठी सत्यवानाला जीवदान देणे यमदेवाला भाग पडणे
सावित्रीला पुन्हा पाठीमागून येतांना बघून आता मात्र यमदेव संतापला. तो म्हणाला, ‘‘सावित्री, मी तुला जे पाहिजे ते सर्व दिले. यापुढे तू येऊ नकोस. हवा तर तू आणखी एक वर माग; पण तू मागे येऊ नकोस.’’ यावर सावित्री म्हणते, ‘‘भगवन्, धर्मशास्त्र सांगते, ‘देवतांच्या दर्शनानेच माणसाचे कष्ट दूर होतात’; मात्र माझे कष्ट अजून दूर झालेले नाहीत. मी आपल्याला शरण आले आहे. आपण माझ्यावर कृपा करा आणि आमचे धर्माचे राज्य आमच्यानंतरही अबाधित रहाण्यासाठी शंभर पुत्रांचे वरदान द्या.’’ आता धर्मराज्य अबाधित ठेवण्यासाठी वर मागणार्या सावित्रीवर यमराज प्रसन्न झाला आणि त्याने तिला शंभर पुत्र होण्याचा आशीर्वाद दिला. साहजिकच त्यासाठी सत्यवानाला जीवदान देणे यमराजाला भाग पडले.
ओ. पती निवडतांना बाह्य सौंदर्यापेक्षा आत्मिक सौंदर्याला महत्त्व देणारी सावित्री !
शेवटी यमदेवाने सावित्रीला विचारले, ‘‘सत्यवानाचे आयुष्य अवघे १ वर्ष उरल्याची कल्पना नारदमुनींनी तुला दिली होती. तू राजकन्या होतीस. तुला सत्यवानापेक्षा सुंदर आणि पराक्रमी राजकुमार भेटला असता, तरीही तू पती म्हणून सत्यवानालाच का निवडलेस ?’’ यावर सावित्रीने उत्तर दिले, ‘‘जेव्हा मी वनात सर्वप्रथम सत्यवानाला बघितले, तेव्हा तो आपल्या अंध माता-पित्याची अतिशय मनापासून सेवा करत होता. ‘खडतर परिस्थितीतही शांत राहून आनंदाने जो माता-पित्यांची सेवा करतो, त्याच्यात निश्चितच दिव्य आत्मा वास करत असणार’, असे मला वाटले. निव्वळ शारीरिक सौंदर्य आणि पराक्रम मनाला आनंद अन् शांती यांची अनुभूती देऊ शकत नाही; म्हणूनच तेजस्वी आत्मा असलेल्या सत्यवानाला मी पती मानले.’’ ‘वटपौर्णिमा या व्रतातून धर्माचरण करण्याची बुद्धी सर्व सुवासिनींना प्राप्त होवो अन् सर्व स्त्रिया धर्माचरणी होवोत’, हीच श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना !’ – सौ. समृद्धी संतोष गरुड, पर्वरी, गोवा. (२२.६.२०१८)
वटपौर्णिमा या व्रताविषयी काही टीका आणि त्यांचे खंडण
विश्वाच्या आरंभापासून भूतलावर असणारा सनातन वैदिक धर्म (हिंदु धर्म), हिंदूंचे धर्मग्रंथ, देवता, संत, वर्णाश्रमव्यवस्था, अध्यात्म आदींवर अनेकांकडून टीका केली जाते. ही टीका भाषणे, चर्चासत्रे, पुस्तके, वृत्तपत्रे, टिंगलटवाळी आदींद्वारे समाजात प्रसृत केली जाते. अनेकांना ‘ही टीका आहे’, हेच कळत नाही ! अनेकांना ती अयोग्य टीका खरी वाटते, तर अनेकांना ‘ती टीका विखारी आहे’, हे लक्षात येऊनही टीकेचे खंडण सहज उपलब्ध नसल्यामुळे सडेतोड उत्तर देणे शक्य होत नाही. काही वेळा काही विद्वान किंवा अभ्यासक यांच्याकडूनही अज्ञानापोटी किंवा नकळत अयोग्य विचार मांडले जातात. असे सर्वच अयोग्य विचार आणि टीका यांचा योग्य प्रतिवाद न केल्याने हिंदूंची श्रद्धा डळमळीत होते. त्यामुळे हिंदूंना बौद्धिक बळ प्राप्त व्हावे, यासाठी ‘वटसावित्री व्रत’ या संबंधी अयोग्य विचार आणि त्यांचे खंडण पुढे दिले आहे.
वटपौर्णिमा या व्रताविषयी प्राप्त सूक्ष्म-ज्ञान
वटवृक्षाच्या खोडाला लाल सुती धागा गुंडाळल्याने काय लाभ होतो, स्त्रियांनी वटपौर्णिमा हे व्रत का करावे, व्रतात पाचच फळे का अर्पण करतात, व्रतात ‘सात जन्म एकच पती मिळावा’ असे मागितले जाते, तसेच घरी वडाच्या झाडाच्या फांदीचे पूजन केल्याने काय परिणाम होतो यांविषयी प्राप्त सूक्ष्म दैवी ज्ञान वाचा !
वटपौर्णिमा हे व्रत आपत्काळात कसे साजरे करावे ?
प्रस्तुत लेखात आपत्काळात धर्माचरण म्हणून काय करता येऊ शकेल, याचा विचार करण्यात आला आहे. येथे महत्त्वाचे सूत्र असे की, हिंदु धर्माने कोणत्या स्तरापर्यंत जाऊन मानवाचा विचार केला आहे, हे शिकायला मिळते. यातून हिंदु धर्माचे एकमेवाद्वितियत्व अधोरेखित होते.
आपत्काळातील वटपौर्णिमा (वडाच्या वृक्षाचे पूजन) !
काही जण वटवृक्षाची फांदी घरात आणून तिचे पूजन करतात; मात्र हे सर्वथा अयोग्य असून वृक्षपूजन करण्याच्या मूळ उद्देशालाच छेद देणारे आहे. सौभाग्यवती स्त्रीने घराबाहेर न पडता घरात पुढीलप्रमाणे पूजन करावे :
१. पाट किंवा चौरंग यांना प्रदक्षिणा घालता येईल, अशा रितीने पाट किंवा चौरंग पूर्व-पश्चिम ठेवावा.
२. पाट किंवा चौरंग यांवर गंधाने वटवृक्षाचे रेखाचित्र काढावे.
३. आपण प्रत्यक्ष वटवृक्षाखाली बसलो आहोत, असा भाव ठेवून त्याचे विधिवत् पूजन करावे.
४. आपण प्रत्यक्ष वटवृक्षालाच प्रदक्षिणा घालत आहोत, हा भाव ठेवून या पाटाला प्रदक्षिणा घालत सूताचे वेष्टन करावे (दोरा गुंडाळावा) आणि पतीला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी प्रार्थना करावी.
५. शहरात ʻफ्लॅटʼमध्ये रहाणार्या व्यक्तींना घरात पुरेशी जागा उपलब्ध नसल्यास त्यांनी पूजनानंतर प्रार्थना करून पाट बाजूला ठेवला तरी चालेल.
– श्री. दामोदर वझे, संचालक, सनातन पुरोहित पाठशाळा, रामनाथी, गोवा.