श्री गणेश, त्याची उपासना आणि उपासनेमागील शास्त्र
श्री गणेश या देवतेची काही वैशिष्ट्ये आणि तिच्या उपासनेच्या संदर्भातील उपयुक्त अध्यात्मशास्त्रीय माहिती आपण जाणून घेऊया. प्रथम आपण श्री गणेशाचा कार्यारंभी म्हणायचा श्लोक बघूया.
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ।।
याचा अर्थ आहे, वाकडी सोंड असलेला, मोठ्या देहाचा, कोटीसूर्याप्रमाणे कांती असलेला, अशा हे देवा, तू मला सर्वदा सर्व कार्यांत निर्विघ्न कर.
श्री गणेशाच्या या ध्यानमंत्रामध्ये त्याच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन आहे. गणपति हे श्री गणेशाचे एक नाव आहे. ‘गणपति’ हा शब्द ‘गण’ आणि ‘पति’ या दोन शब्दांनी बनला आहे. ‘गण’ याचा अर्थ पवित्रक. ‘पति’ म्हणजे पालन करणारा. गणपति सूक्ष्मातीसूक्ष्म चैतन्यकणांचा म्हणजे पवित्रकांचा स्वामी आहे. श्री गणेश जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणार्या रजतम लहरींवर नियंत्रण ठेवतो, तसेच लवकर प्रसन्न होतो.