सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव
वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी
वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, असे सुवचन आहे. उच्च कोटीतील संत काळाच्या पलीकडीलही पाहू शकतात. अशाच उच्च कोटीतील संतांपैकी एक म्हणजे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले ! प.पू. डॉक्टर हे परात्पर गुरु या सर्वोच्चपदी विराजमान आहेत. एवढ्या उच्च स्थितीला असूनही प.पू. डॉक्टरांनी आपले शिष्यत्व टिकवून ठेवले आहे. ते त्यांच्या अनेक कृतींतून शिकायला मिळते. येथे परात्पर गुरु डॉक्टरांची संक्षिप्त माहिती, तसेच त्यांनी स्थापन केलेल्या वा त्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या संस्था, संघटना आदींच्या कार्याची माहिती दिली आहे. एका व्यक्तीकडून अल्पावधीत केवळ राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातच नव्हे, तर सूक्ष्म-जगताच्या संदर्भातही एवढे सर्वव्यापी कार्य होणे, ही खरे तर अशक्य कोटीतीलच गोष्ट आहे. यावरून परात्पर गुरु डॉक्टरांचे असामान्यत्व आणि आध्यात्मिक क्षेत्रातील त्यांचा सर्वमान्य अधिकारही लक्षात येईल. पुढे दिलेल्या माहितीमुळे वाचकांना अध्यात्म जाणून घेण्याची ओढ निर्माण होऊन ते साधना करण्यास प्रवृत्त होण्यास साहाय्यही होईल.
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा जन्म ६ मे १९४२ (वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी, कलियुग वर्ष ५०४४) या दिवशी श्री. बाळाजी वासुदेव आठवले (वर्ष १९०५ ते वर्ष १९९५) आणि सौ. नलिनी बाळाजी आठवले (वर्ष १९१६ ते वर्ष २००३) यांच्या पोटी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील नागोठणे या गावी झाला. इयत्ता ७ वीमध्ये माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रतिमास सहा रुपये, याप्रमाणे सतत ४ वर्षे शिष्यवृत्ती मिळाली. शालान्त माध्यमिक परीक्षेत ते गुणवत्ता सूचीत आले. १९६४ मध्ये त्यांनी एम्.बी.बी.एस्. ही वैद्यकीय पदवी प्राप्त केली. मुंबईत त्यांनी विविध रुग्णालयांत ५ वर्षे नोकरी केली. वर्ष १९७१ ते वर्ष १९७८ या कालावधीत ब्रिटनमध्ये संमोहन-उपचारपद्धतीवर यशस्वी संशोधन केल्यानंतर त्यांची संमोहन उपचारतज्ञ म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्ती झाली. वर्ष १९७८ मध्ये मुंबईला परतल्यावर त्यांनी मुंबईत मनोविकारांवरील संमोहन-उपचारतज्ञ म्हणून स्वतंत्र व्यवसाय चालू केला. वर्ष १९७८ ते १९८३ या कालावधीत त्यांनी ५०० हून अधिक आधुनिक वैद्यांना (डॉक्टरांना) संमोहनशास्त्र आणि संमोहन-उपचार यांचे सिद्धांत अन् प्रात्यक्षिके यांविषयी मार्गदर्शन केले.
१५ वर्षे संमोहन-उपचारतज्ञ म्हणून संशोधन केल्यावर काही रुग्ण नेहमीच्या औषधोपचारांनी बरे होत नाहीत पण तीर्थक्षेत्री किंवा संतांकडे गेल्यामुळे वा धार्मिक विधी केल्यामुळे बरे होतात, असे त्यांच्या लक्षात आले. यामुळे ‘अध्यात्मशास्त्र’ हे उच्च प्रतीचे शास्त्र आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी जिज्ञासू वृत्तीने अध्यात्मशास्त्राचा सखोल अभ्यास केला, अनेक संतांकडे जाऊन शंकानिरसन करून घेतले आणि साधना केली. १९८७ साली इंदूर येथील थोर संत प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांना गुरुमंत्र दिला. आता ते परात्पर गुरु या सर्वोच्चपदी विराजमान आहेत. एवढ्या उच्च स्थितीला असूनही त्यांनी आपले शिष्यत्व टिकवून ठेवले आहे. गुरुंनी सांगितलेली धर्मप्रसार आदी सेवा पुष्कळ अडथळे येऊनही आज्ञापालन म्हणून करत आहेत. प्राणशक्ती अत्यल्प असूनही गुरूंनी ग्रंथलिखाणासाठी दिलेल्या आशीर्वादाप्रमाणे, दिवसातील बहुतांश वेळ ते ग्रंथ लिखाणाची सेवा करत असतात. संतांसमोर शिष्यभावात वावरणे, जिज्ञासू वृत्ती, आध्यात्मिक संशोधन करणे, व्यक्तीगत जीवन विरक्त भावाने जगणे, वेळेचा विनियोग करणे, प्रीती, काटकसर, इतरांचा विचार करणे, समाजातील घटनांकडे संवेदनशीलतेने पहाणे ही त्यांची काही वैशिष्ट्ये आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी संगीताच्या माध्यमातून साधनेला आरंभ केला. संगीतातील कोणताही राग म्हणतांना अध्यात्माच्या दृष्टीकोनातून काय वाटले पाहिजे किंवा स्वर्गलोकातील संगीत कसे आहे, याविषयीचा अभ्यास प्रारंभीच्या काळात त्यांनी केला. अशाच प्रकारचे संशोधन सध्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार काही साधिका करत आहेत. संगीत किंवा गायन यांच्या माध्यमातून ईश्वराला कसे अनुभवावे, हे शिकत आहेत. ईश्वरनिर्मित सर्व कलांचे गतवैभव पुन्हा मिळवण्यासाठी ते कार्यरत अाहेत. येणा-या आपत्काळाच्या दृष्टीने संगीत-उपचार पद्धत या विषयाच्या अभ्यासाचाही त्यांनी आरंभ करणे, मे २०१६ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संगीत साधनेतील साधिकांना संगीत साधनेची पुढील दिशा दिली. त्यांनी सांगितले, ‘आपल्याला संगीताच्या तात्त्विक ज्ञानाच्या अनुभूती घ्यायच्या आहेत. आपल्याला संगीत साधनेत ‘ज्ञातपासून अज्ञाताकडे’ (नोन टू अननोन) या दिशेने मार्गक्रमण करायचे आहे. हा सगळा भाग नवीन असल्याने आपल्याला संशोधन करावे लागणार आहे.’
आपल्या संस्कृतीतील नृत्यकला ही मंदिरातच निर्माण झाली आहे. उपासनेचे माध्यम म्हणूनच ती विकसित झाली आहे. त्या माध्यमातूनही ईश्वरप्राप्ती करण्यासाठी सनातनच्या साधिकांनी आरंभ केला. त्या नृत्यशैली आणि नृत्यातील विविध मुद्रा यांतून नवरस (शृंगार, वीर, हास्य, करुण, रौद्र, भयानक, बीभत्स, अद्भूत आणि शांत) नव्हे, तर अध्यात्मातील शक्ती, चैतन्य, आनंद आणि शांती अशा अनुभूती मिळण्यासाठी अभ्यास करत आहेत. नृत्य या वरवर मनोरंजनात्मक वाटणार्या कृतीकडेही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेच्या अंगाने पहायला शिकवले. ‘नृत्याच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती’ हे ध्येय देऊन नृत्याच्या माध्यमातून येणा-या अनुभूती आणि त्याचे होणारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक परिणाम यांचा अभ्यास करण्यास उद्युक्त केले. आज समाजात नृत्य, गायन यांसारख्या कलांचे विकृतीकरण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सनातनचे साधक करत असलेले हे अमूल्य संशोधन अवघ्या विश्वासाठी मार्गदर्शक आहे.
सनातनच्या साधक-मूर्तीकारांनी सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती बनवली आहे. त्यांनी ‘कलेसाठी कला नव्हे, तर ईश्वरप्राप्तीसाठी कला !’ असा दृष्टीकोन ठेवून ‘सेवा’ म्हणून भावपूर्णरित्या मूर्ती बनवली असल्याने ती सात्त्विक झाली आहे. सात्त्विक श्री गणेशमूर्ती नेहमीसाठीही घरात ठेवणे लाभदायी असते. स्पंदनशास्त्रानुसार प्रत्येक आकृतीची स्पंदने तिच्यातील सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांमुळे वेगवेगळी असतात. आकृती पालटली की, तिच्यातील त्रिगुणांचे प्रमाणही पालटते. देवतेच्या मूर्तीसंदर्भातही असेच आहे. श्री गणपतीच्या हाताची लांबी, जाडी वा आकार यामध्ये किंवा मुकुटावरील कलाकुसरीमध्ये (नक्षीमध्ये) थोडा जरी पालट झाला, तरी एकूण स्पंदनांत पालट होतो. यासाठी मूर्तीचा प्रत्येक अवयव घडवतांना सूक्ष्मातील स्पंदने नीट जाणून घेऊन मूळ तत्त्वाशी मिळतीजुळती ठरतील, अशा स्पंदनांचा तो घडवावा लागतो. सनातनच्या साधक-मूर्तीकारांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली असा सूक्ष्मातील अभ्यास करून सात्त्विक मूर्ती घडवली आहे.
कला शिक्षणाचे ‘ईश्वरप्राप्ती’ हे मुख्य ध्येय असल्याने क्षणोक्षणी ईश्वररप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण करण्यावर भर दिला आहे. कला क्षेत्रामध्येही त्यांचे कार्य अद्वितीय आहे. गेली ३० वर्षे आध्यात्मिक दृष्टीकोनातून कला विश्वा्तील विविध सकारात्मक आणि नकारात्मक अशा अतींद्रिय शक्तींचा वेध घेणे अथवा त्यांची प्रत्यक्षता-अप्रत्यक्षता पडताळणे आदी माध्यमांतून कला अन् अध्यात्म यांची सुरेख सांगड घालून जगाला कलेच्या भाषेत अध्यात्म सांगण्याचे अमूल्य कार्य केले आहे. कलाक्षेत्रामध्ये अनेक कलांपैकी ‘चित्रकला’ या कलेमध्ये त्यांनी केलेले संशोधन आणि मार्गदर्शन इतके विपुल आहे की, त्यावरून आपल्याला अध्यात्म हे अनंताचे शास्त्र असल्याची प्रत्यक्ष अनुभूती येते. कलेच्या माध्यमातून साधकांना ईश्वराकडे नेण्याची त्यांची शिकवण आनंददायी आहे. कला देवासाठी अर्पण करतांना अहं न ठेवता ‘मला देवाच्या जवळ जायचे आहे आणि ही सेवा देवाजवळ नेणारे साधन आहे’, हे शिकायला मिळते. चित्रातील बारकावे प्रयोग करवून घेऊन शिकवले तसेच कलाकृती आकर्षक दिसण्यापेक्षा त्यांनी ती सात्त्विक होण्याला महत्त्व देण्यास शिकवले आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्म-चित्रकलेच्या माध्यमातून अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि चित्रकलारूपी तेजाकडून ज्ञानरूपी आकाशाकडे नेले. सूक्ष्म-चित्रकला किर्लियन छायाचित्रापेेक्षा १ लक्ष पटींनी सूक्ष्म असते. सूक्ष्म-चित्रे म्हणजे डोळ्यांनी न दिसणा-या अदृश्य गोष्टींची सूक्ष्म दृष्टीने काढलेली चित्रे आणि सूक्ष्म परीक्षणे म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन अन् बुद्धी यांच्या वापराविना सूक्ष्म पंचज्ञानेंद्रिये, सूक्ष्म कर्मेंद्रिये, सूक्ष्म मन अन् सूक्ष्म बुद्धी यांच्या साहाय्याने किंवा साहाय्याशिवाय जीवात्मा किंवा शिवात्मा यांनी केलेली परीक्षणे. बहुधा सूक्ष्म-चित्रे सूक्ष्म परीक्षणांवरून काढलेली असतात. सूक्ष्म-चित्रे स्पंदने, लाटा, वलये, लहरी, किरण, प्रकाश इत्यादी अनेक रूपांत दिसतात. या सर्वांना येथे ‘स्पंदने’ हा शब्द वापरला आहे. प्रत्येकाची आध्यात्मिक पातळी, प्रकृती आणि त्याचा (साधना) मार्ग यांनुसार परात्पर गुरु डॉ. आठवले साधना करवून घेतात. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सूक्ष्म-चित्रातील दिसणा-या स्पंदनांचे अर्थ आणि कार्य शिकवले, सूक्ष्मातील प्रक्रिया सांगतांना सूक्ष्म-चित्रातील लहरी ओळखण्यास शिकवले, बुद्धीच्या पलीकडील विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्या स्तरावरील सूक्ष्म-चित्र रेखाटण्यास शिकवणे इत्यादी.
सनातनचा साधक श्री. प्रशांत चंदरगी याच्याकडे देवपूजेसाठी फुले आणण्याची सेवा असतांना तो परडीमध्ये फुलांच्या अनेक प्रकारच्या सुंदर रचना करत असे. फुलांची कलात्मक दृष्टीने रचना करणे, ही ६४ कलांपैकी एक कला गणली जाते. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधकांना जीवनातील प्रत्येकच कृती कलात्मकरित्या आणि सत्यम्, शिवम् अन् सुंदरम् करण्याची जणू सवयच लागली आहे.
श्रीगुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या आज्ञेने आणि प्रेरणेने प.पू. डॉक्टरांनी वर्ष १९९१ मध्ये ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’ची स्थापना केली. ‘भारतभर आणि पुढे जगभरात अध्यात्मप्रसार करायचा’, ही श्री गुरूंची आज्ञा अन् आधुनिक विज्ञानाचा काळ’, या दोन्हींची सांगड घालायची, तर घरोघरी स्वत: जाऊन अध्यात्मप्रसार करण्यासह काळानुसार उपलब्ध असलेली सर्वच आधुनिक उपकरणे आणि माध्यमे यांचा उपयोग करणेही आवश्यक आहे, ही गोष्ट प.पू. डॉक्टरांनी अचूक ओळखली. दूरचित्रवाहिन्या आणि संगणकीय तंत्रज्ञान भारतात वेगाने येऊ लागले आहे, हे प.पू. डॉक्टरांच्या दृष्टोत्पत्तीस होतेच. या दृक्-श्राव्य माध्यमांचा जनमानसावरील पगडा वाढत होता. या माध्यमांद्वारे प्रसार केल्यास सर्वसामान्य व्यक्तीला कोणतेही सूत्र आकलन होण्यास आणि मनाची पकड घेण्यास सोपे जाते. हे लक्षात घेऊन प.पू. डॉक्टरांनी संस्थेच्या ध्वनीचित्रीकरण सेवांचा आरंभ केला. या सेवांच्या निर्मितीमागे अध्यात्मप्रसार आणि साधनाप्रसार, हे उद्देश होतेच; पण त्याचसमवेत ‘या सेवेअंतर्गत येणार्या प्रत्येक सेवेकर्याला ‘साधक’ म्हणून घडवणे आणि त्याची आध्यात्मिक उन्नती करवून घेणे, हाही त्यामागील महत्त्वाचा उद्देश होता.
एखादे बांधकाम करायचे म्हटले की, त्यासाठी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो; पण ते बांधकाम परिपूर्ण आणि भावपूर्ण केल्यासच कौशल्यपूर्ण होऊन त्यात जिवंतपणा येऊ शकतो, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवले. त्यांनी बांधकामाशी संबंधित सर्व बारकावे सांगून साधकांना ख-या अर्थाने बांधकाम क्षेत्रात आध्यात्मिक स्तरावर घडवले. टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवणे, साहित्याचा योग्य प्रकारे आणि योग्य ठिकाणी उपयोग करणे, साहित्य योग्य प्रमाणात वापरणे, साहित्याची काळजी घेणे, अल्प व्ययात चांगली सेवा करणे, मनाची ऊर्जा वाचवणे, अभ्यास करणे, नियोजन करणे, वस्तूंप्रती कृतज्ञता निर्माण करणे हे सर्व साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी बांधकामाच्या सेवेत असणा-या साधकांना शिकवले. याच प्रमाणे त्यांनी सनातनच्या आश्रमात स्वयंपाक बनवणा-या साधिकांना देखील अमूल्य मार्गदर्शन केले आहे.
‘साधना करणार्यांसाठी ‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’, म्हणजे ‘शिष्याचे परममंगल, म्हणजे मोक्षप्राप्ती ही केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते.’ गुरुकृपा संपादन करणे, ही आध्यात्मिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. सनातनचे आणि सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्या अन्य संघटनांचे साधक ‘गुरुकृपायोगानुसार साधने’चा अंगीकार करतात. त्यांचे भाग्य म्हणजे त्यांना साधनेसाठी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे मार्गदर्शन लाभते आणि ‘स्वतःची साधनेची वाटचाल कुठपर्यंत आली’, हेही कळते. सनातनच्या मार्गदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात केवळ व्यष्टी साधना नाही, तर समष्टी साधनाही आहे. म्हणजेच राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाचाही विचार आहे. असा व्यापक विचार असल्यानेच आणि हिंदु राष्ट्राची स्थापना (सनातन धर्म राज्याची स्थापना) हे ध्येय असल्याने ईश्वराचा कृपाशीर्वाद गुरुकृपेने भरभरून मिळतो. हेच साधकांची जलद उन्नती होण्याचे खरे गमक आहे. यातील पहिला महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे होय. आज १ सहस्र साधकांनी हा टप्पा गाठल्यामुळे परात्पर गुरुमाऊलींनी सांगितलेल्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या ध्येयाच्या दिशेने पहिले महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.
विश्वकल्याणासाठी कार्यरत असलेल्या सत्त्वगुणी लोकांचे (राज्यकर्ते आणि प्रजा यांचे) राष्ट्र, अशी ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाची आध्यात्मिक व्याख्या करणारे परात्पर गुरु डॉक्टर स्वतः हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी आवश्यक अशा सत्त्वगुणी लोकांची निर्मिती व्हावी, यासाठी यत्नशील आहेत. वर्ष २०११ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी देशभक्त आणि हिंदुत्ववादी यांच्या संघटनातूनच हिंदु राष्ट्र- स्थापनेचे कार्य होऊ शकते, यासाठी भारतभरातील राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटनांना एकत्रित करणारे व्यासपीठ असावे, असा विचार सर्वप्रथम मांडला. या विचारांतून प्रेरणा घेऊन सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती संयुक्तपणे वर्ष २०१२ पासून प्रतिवर्षी गोवा येथे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन, तर अन्यत्र राज्यस्तरीय अन् जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशने आयोजित करत आहेत. यांत सहभागी होणारे काही हिंदुत्ववादी त्यांच्या राष्ट्र आणि धर्म उत्थानाच्या तीव्र तळमळीमुळे जन्म-मृत्यु फे-यातून मुक्त होऊन महर्लोकात स्थान प्राप्त केले आहे. मोक्षप्राप्ती म्हणजेच र्इश्वरप्राप्तीचे ध्येय ठेवून धर्माचरण आणि साधना करत राहिल्यास जीव जन्म-मृत्युच्या फे-यातून मुक्त होतो.
स्थुलातून घडणारी प्रत्येक घटना ही सूक्ष्मातून आधीच घडलेली असते. सध्या पृथ्वीवर सनातन धर्म राज्याच्या स्थापनेसाठी चालू असलेल्या सूक्ष्मातील युद्धात देवता आणि संत यांच्याकडून भुवर्लोकापासून ६ व्या पाताळापर्यंतच्या आसुरी शक्ती पराभूत झाल्या आहेत. त्याचा भारतावरील दृश्य परिणाम म्हणजे सर्वत्र तामसिक राजकीय पक्षांचा पराभव होऊन राजसिक राजकीय पक्षांचा विजय होत आहे. सातव्या पाताळातील आसुरी शक्तींना सूक्ष्मातील महायुद्धात पराभूत करू शकतील, अशा ब्राह्मतेज (आध्यात्मिक बळ) असलेल्या १०० संतांची आवश्यकता आहे. असे संत घडवण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतः कार्यरत आहेत. मार्च २०१७ पर्यंत परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ७० संत घडले असून येत्या २ – ३ वर्षांत एकूण १०० साधक संत होतील. या १०० संतांच्या माध्यमातून सातव्या पाताळातील आसुरी शक्तींचा पराभव झाल्यानंतरच त्याचा दृश्य परिणाम म्हणजे भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होईल.
‘वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना होईल’, असे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, तसेच इतर संत यांनी सांगितले आहे. हिंदु राष्ट्र चालवण्यासाठी साधकच पात्र आहेत; कारण सर्वसामान्यांच्या तुलनेत त्यांच्यात सत्त्वगुण वाढलेला असतो. ‘आध्यात्मिकदृष्ट्या लोकांचे कल्याण व्हावे’, यासाठी साधकच प्रयत्न करू शकतात. त्यांच्यात भाव, तळमळ, त्याग, प्रेमभाव इत्यादी गुण असतात. ते निष्काम भावाने स्वतःच्या साधनेसाठी, म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठीच हिंदु राष्ट्र चालवतील ! असे राज्य चालवायला पात्र व्यक्ती लागतील. ईश्वराने सनातनला सामान्यांपेक्षा उच्च आध्यात्मिक पातळी असलेल्या, म्हणजे गेल्या जन्मीची साधना असलेल्या शेकडो बालसाधकांची ओळख करून दिली आहे. आतापर्यंत उच्च स्वर्ग आणि महर् या लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेल्या ६०० पेक्षाही अधिक बाल अन् युवा वयाच्या साधकांना सनातनने ओळखले आहे. यांपैकी ९६ जणांची पातळी ६१ टक्के अथवा त्याहून अधिक आहे.
संतांचे कार्य आध्यात्मिक (पारलौकिक) स्तरावरचे असल्याने त्यांना लौकिक सन्मान अन् पुरस्कार यांचे अप्रूप वाटत नाही. किंबहुना मनोलय आणि अहंलय झालेला असल्याने ते सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणारे सन्मान अन् पुरस्कार यांच्या पलीकडे गेलेले असतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेही असेच आहे. असे असले, तरी संतच संतांना ओळखू शकतात आणि त्यांनाच अन्य संतांच्या कार्याचे महत्त्व कळते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याही आध्यात्मिक कार्याचे महत्त्व कळल्याने अनेक संतांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सन्मान अन् पुरस्कार यांद्वारे गौरव केला. सावंतवाडी येथील प.पू. भाऊ मसूरकर, कोल्हापूर येथील प.पू. तोडकर महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सन्मान केला ! ठाणे येथील जासूसी नजरें प्रकाशन संस्थानाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भारत गौरव रत्न पुरस्कार, सोलापूर येथील शनैश्वर देवस्थानाने त्यांना शनैश्वर कृतज्ञता धर्म पुरस्कार, मुंबई येथील परमपूज्य योगतज्ञ दादाजी वैशंपायन सत्कर्म सेवा सोसायटीने योगतज्ञ दादाजी वैशंपायन गुणगौरव पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.