१. देवाला हात जोडून नमस्कार कसा करावा ?
देवाला साष्टांग नमस्कार घालणे शक्य नसेल, तेव्हा हात जोडून नमस्कार करावयाचा असतो. हा नमस्कार सावकाश अन् काही विशिष्ट टप्प्यांनी करायचा असतो. हे टप्पे खाली विशद करून सांगितले आहेत, तसेच हात जोडून नमस्कार करण्याची कृती २ चित्रांच्या साहाय्याने दाखवण्यात आली आहे. आपणही आजपासूनच या टप्प्यांनुसार नमस्कार करावयास प्रारंभ करा आणि त्याद्वारे ईश्वरी चैतन्य प्राप्त करा !
अनुक्रमणिका
- १. देवाला हात जोडून नमस्कार कसा करावा ?
- २. देवाला साष्टांग नमस्कार कसा घालावा ?
- ३. देवळात देवतेला नमस्कार करणे
- ४. संतांना नमस्कार करणे
- ५. वडीलधार्यांना नमस्कार का करावा ?
- ६. विवाहानंतर पती आणि पत्नी यांनी जोडीने नमस्कार का करावा ?
- ७. नमस्कार करण्याचे लाभ
- ८. हे लक्षात घ्या !
- ८ अ. नमस्कार करतांना डोळे का मिटावेत ?
- ८ आ. नमस्कार करतांना पादत्राणे का घालू नयेत ?
- ८ इ. एका हाताने नमस्कार का करू नये ?
- ८ ई. नमस्कार करतांना हातात वस्तू का धरू नये ?
- ८ उ. नमस्कार करतांना पुरुषांनी डोके झाकू नये; मात्र स्त्रियांनी डोके का झाकावे ?
- ८ ऊ. धार्मिक कृतींच्या वेळी गळ्याला वस्त्र का लपेटू नये ?
- ८ ए. हस्तांदोलन (शेकहँड) न करता हात जोडून नमस्कार का करावा ?
नमस्कार कसा करावा ? चलच्चित्रपट (Namskar kasa karava? Videos : ९)
१ अ. कृती
अ. ‘देवाला नमस्कार करतांना सर्वप्रथम दोन्ही हातांचे तळवे छातीसमोर एकमेकांवर ठेवून हात जोडावेत.
१. हात जोडतांना बोटे सैल ठेवावीत.
२. हाताच्या दोन बोटांमध्ये अंतर न ठेवता ती जुळवून घ्यावीत.
३. हाताची बोटे अंगठ्यापासून दूर ठेवावीत.
४. प्राथमिक स्तरावरील साधकांनी आणि सर्वसामान्य लोकांनी नमस्कार करतांना तळहात एकमेकांना चिकटवून ठेवावेत. हातांमध्ये पोकळी ठेवू नये. साधना चालू करून पाच-सहा वर्षे झालेल्या पुढील स्तरावरील साधकांनी नमस्कार करतांना तळहातांमध्ये पोकळी ठेवावी.
आ. हात जोडल्यावर पाठीतून थोडे खाली वाकावे.
इ. त्याच वेळी डोके थोडे खाली झुकवून दोन्ही हातांच्या अंगठ्यांचा स्पर्श भ्रूमध्याच्या ठिकाणी, म्हणजे दोन्ही भुवयांच्या मध्यभागी करून मन देवतेच्या चरणांशी एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा.
ई. त्यानंतर जोडलेले हात सरळ खाली न आणता जोडलेल्या हातांचे अंगठे छातीच्या मध्यभागी टेकतील, अशा रीतीने काही वेळ ठेवून मग खाली आणावेत.
२. देवाला साष्टांग नमस्कार कसा घालावा ?
उरसा शिरसा दृष्ट्या मनसा वचसा तथा ।
पद्भ्यां कराभ्यां जानुभ्यां प्रणामोऽष्टाङ्ग उच्यते ।।
अर्थ : १. छाती, २. शिर (डोके), ३. दृष्टी (डोळ्यांनी नमस्कार करणे), ४. मन (मनाने नमस्कार करणे), ५. वाचा (‘तोंडाने’ नमस्कार असे म्हणणे), ६. पाय, ७. हात आणि ८. जानु (गुडघे), या आठ अंगांनी केलेल्या नमस्काराला ‘साष्टांग नमस्कार’ म्हटले जाते.
‘याप्रमाणे केल्या जाणार्या नमस्काराला ‘विधीवत् नमस्कार’ असे म्हणतात. यामध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक पद्धतीने देवतांना शरण येऊन त्यांना आवाहन केले जाते.
२ अ. दुसरी व्याख्या
षड्रिपू, मन आणि बुद्धी या आठ अंगांसह ईश्वराला शरण जाणे, म्हणजे साष्टांग नमस्कार करणे होय. षड्रिपू हे सूक्ष्ममनाशी संबंधित आहेत. वरील व्याख्येत मन आणि बुद्धी हे दोन घटक अनुक्रमे स्थूलमन आणि स्थूलबुद्धी या अर्थी वापरले आहेत. ईश्वरप्राप्तीची तळमळ ६० टक्क्यांच्या पुढे असलेला साधकच ‘अहं’सहित शरण येऊ शकतो; म्हणून वरील व्याख्या ही सर्वसाधारण तळमळ असलेल्या साधकाच्या संदर्भातील आहे.’ – सौ. अंजली गाडगीळ, ८.७.२००५, दुपारी १.३४
(‘षड्रिपू म्हणजे चित्तावर जन्मोजन्मीच्या असलेल्या संस्कारांचा आविष्कार. संस्कार हे चित्ताशी, म्हणजे अंतर्मनाशी संबंधित असतात आणि अंतर्मन हे बाह्यमनाच्या संदर्भात सूक्ष्म आहे. यासाठी षड्रिपू हे सूक्ष्ममनाशी संबंधित असतात, असे येथे म्हटले आहे. सर्वसाधारणतः ज्यांना आपण विचार करणारे मन (बाह्यमन) आणि विचार करणारी बुद्धी असे संबोधतो, त्यांना येथे अनुक्रमे स्थूलमन आणि स्थूलबुद्धी असे संबोधले आहे.’ – संकलक)
२ आ. योग्य कृती
१. साष्टांग नमस्कार घालतांना प्रथम दोन्ही हात अनाहतचक्राशी (छातीशी) जोडून कटीत (कमरेत) वाकावे आणि त्यानंतर ओणवे होऊन दोन्ही हात भूमीवर टेकवावेत.
२. आधी उजवा, मग डावा पाय मागे ताणून सरळ लांब करावा.
३. हातांचे कोपरे दुमडून डोके, छाती, हातांचे पंजे, गुडघे आणि पायांची बोटे भूमीला टेकतील, असे आडवे पडावे अन् डोळे मिटावेत.
४. मनाने नमस्कार करावा. मुखाने ‘नमस्कार’ असे उच्चारावे.
५. उभे राहून दोन्ही हात छातीशी जोडून भावपूर्ण नमस्कार करावा.
२ इ. साष्टांग नमस्कार घालतांना खांद्यांपासून बोटांपर्यंत पूर्ण हात भूमीवर टेकवणे अयोग्य
बरेच जण साष्टांग नमस्कार घालतांना दोन्ही हात डोक्याच्या वर नेऊन खांद्यांपासून हाताच्या बोटांपर्यंत पूर्ण हात भूमीवर टेकवतात. या पद्धतीमध्ये जननेंद्रियांचा भूमीला स्पर्श होतो. धर्मशास्त्रानुसार जननेंद्रियांचा भूमीला स्पर्श होणे योग्य नाही. त्यामुळे अशा प्रकारे घातलेला साष्टांग नमस्कार अयोग्य ठरतो.
३. देवळात देवतेला नमस्कार करणे
३ अ. देवळात प्रवेश करतांना पायरीला नमस्कार करावा
३ अ १ कृती : ‘मंदिराच्या किंवा गर्भगृहाच्या पहिल्या पायरीला दोन्ही हात लावून नंतर हात डोक्यावरून फिरवावेत. पायरीला एका हाताने नमस्कार करू नये.
३ अ २ शास्त्र : देवळाच्या प्रांगणात देवतांच्या लहरींच्या संचारामुळे सात्त्विकता वाढलेली असते. परिसरातील चैतन्यामुळे पायर्यांनाही देवत्व प्राप्त झालेले असल्याने पायरीला दोन्ही हात लावून हात डोक्यावर फिरवण्याची पद्धत आहे. ‘पायर्यांवरील धूळही चैतन्यमय असल्याने आपण तिचाही मान राखायचा असतो आणि तिच्यातील चैतन्याचाही लाभ करून घ्यावयाचा असतो’, हे यावरून लक्षात येते. नमस्कार करतांना ‘पायरीत आलेले देवतेचे चैतन्य हातांतून संपूर्ण शरिरात संक्रमित होत आहे’, असा भाव ठेवल्याने जिवाला अधिक लाभ होतो; परंतु या वेळी जिवाचा अहंही न्यून असेल, तर नमस्काराचे मिळणारे फळ सर्वाधिक असते. कुठलीही कृती ही ‘स्व’चा त्याग करून केली असता, ते अकर्म कर्म होते.
३ अ ३. काही कारणास्तव पायरीला हात लावून नमस्कार करता न आल्यास काय करावे ? : एखाद्याला वयोमानानुसार किंवा आजारपणामुळे पायरीला हात लावून नमस्कार करणे शक्य नसेल, तर त्याने देवतेची क्षमायाचना करून पायर्या भावपूर्णरित्या चढल्या, तरी त्याला आवश्यक त्या प्रमाणात चैतन्याचा लाभ होतो.’
– सौ. अंजली गाडगीळ, ८.७.२००५, दुपारी ३.१५
३ अ ४. शिवालयात नंदीजवळ आणि अन्य देवळात कासवाच्या प्रतिकृतीजवळ उभे राहून देवतेला नमस्कार का करावा ? : शिवालयात नंदीजवळ आणि अन्य देवळात कासवाच्या प्रतिकृतीजवळ उभे राहून देवतेला नमस्कार केल्यामुळे देवतेकडून येणार्या सात्त्विक लहरींचा आपल्याला त्रास होत नाही आणि त्या आवश्यकतेप्रमाणे ग्रहण करता येतात.
३ अ ५. देवतेला नमस्कार : पुरुषांनी शक्यतो देवतेला साष्टांग नमस्कार घालावा; मात्र स्त्रियांनी देवतेला साष्टांग नमस्कार घालू नये.
४. संतांना नमस्कार करणे
४ अ. पुरुषांनी संतांना साष्टांग नमस्कार घालणे
पुरुषांनी शक्यतो संतांना साष्टांग नमस्कार घालावा. ही कृती देवतेला साष्टांग नमस्कार घालण्याच्या कृतीप्रमाणेच आहे. स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये.
४ आ. पुरुष आणि स्त्री यांनी संतांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करणे
साष्टांग नमस्कार करणे शक्य नसल्यास पुरुषांनी संतांना या पद्धतीने नमस्कार करावा. स्त्रियाही या पद्धतीने नमस्कार करू शकतात.
४ आ १. चरणांवर ठेवायचा डोक्याचा भाग : ब्रह्मरंध्रातून (टाळूतून) आपण चैतन्य सर्वांत अधिक प्रमाणात ग्रहण करू शकतो. ब्रह्मरंध्र संतांच्या चरणांवर ठेवता येत नाही; म्हणून कपाळ संपून डोके जेथे सुरू होते, तो भाग संतांच्या चरणांवर ठेवावा. यामुळे संतचरणांतून बाहेर पडणारे चैतन्य अधिकाधिक ग्रहण करता येते.
४ आ २. चरणांवर डोके ठेवण्याचे योग्य स्थान : संतांच्या पावलांच्या अंगठ्यांतून सर्वांत जास्त अधिक प्रमाणात चैतन्य बाहेर पडत असते; म्हणून डोके पावलाच्या मध्यभागी न टेकवता अंगठ्यावर टेकवावे. डोके ठेवायला दोन्ही पायांचे अंगठे उपलब्ध असले, तर उजव्या पायाच्या अंगठ्यावर डोके ठेवावे.
४ आ ३. चरणांवर डोके ठेवतांना हातांची स्थिती : हातांचे तळवे संतांच्या चरणांवर रहातील, अशा पद्धतीने हात ठेवावेत.
(‘पुरुष आणि स्त्री यांनी ब्रह्मचारी, संन्यासी अन् अनुष्ठानाला बसलेले संत यांना नमस्कार करतांना त्यांना स्पर्श करू नये.’ – संकलक)
५. वडीलधार्यांना नमस्कार का करावा ?
ऊर्ध्वं प्राणा ह्युत्क्रामन्ति यूनः स्थविर आयति ।
प्रत्युत्थानाभिवादाभ्यां पुनस्तान्प्रतिपद्यते ॥
– मनुस्मृति २.१२०; महाभारत, उद्योग. ३८.१, अनु. १०४, ६४-६५.
अर्थ : वृद्ध व्यक्तीचे आगमन झाल्यावर तरुण व्यक्तीचे प्राण वरच्या दिशेने सरकू लागतात आणि जेव्हा तो (तरुण) उठून नमस्कार करतो, तेव्हा तो प्राणांना पूर्वस्थितीत प्राप्त करतो.
५ अ. परगावी जातांना आणि परगावाहून आल्यानंतर घरातील वडीलधार्यांना नमस्कार का करावा ?
घरातील वडीलधार्यांना नमस्कार करणे, म्हणजे एकप्रकारे त्यांच्यातील देवत्वाला शरण जाणे होय. ज्या वेळी एखादा जीव खाली वाकून लीनभावाने वडीलधार्यांमधील देवत्वाला शरण येतो, त्या वेळी त्याच्या देहात करुणरसाची निर्मिती होते. हा करुणरस त्याच्या सूक्ष्मदेहापर्यंत झिरपतो, त्या वेळी त्याची मनःशक्ती कार्यरत होऊन मणिपूरचक्राशी स्थित पंचप्राणांना कार्यरत करते. पंचप्राणांच्या शरिरातील वहनामुळे जिवाची आत्मशक्ती जागृत होते. आत्मशक्तीच्या बळावर सुषुम्नानाडी कार्यरत होऊन ती जिवातील व्यक्त भावऊर्जेचे अव्यक्त भावऊर्जेमध्ये रूपांतर करते. अव्यक्त भावऊर्जेच्या बळावर जिवाला वडीलधार्यांच्या माध्यमातून ब्रह्मांडातील आवश्यक त्या देवतेचे तत्त्व मिळते. यासाठी जिवाने घराबाहेर पडतांना वडीलधार्यांना नमस्कार करून सात्त्विक लहरींच्या बळावर स्वतःचे वायूमंडलातील त्रासदायक स्पंदनांपासून रक्षण करावयाचे असते आणि बाहेरून आल्यानंतरही लगेच मोठ्यांना नमस्कार करून त्यांच्यातील देवत्व प्रकट करून आपल्याबरोबर आलेल्या रज-तम कणात्मक वायूमंडलाचे विघटन करावयाचे असते. – सौ. अंजली गाडगीळ, २०.५.२००५, दुपारी २.५७
६. विवाहानंतर पती आणि पत्नी यांनी जोडीने नमस्कार का करावा ?
विवाह म्हणजे शिवरूपी पती आणि शक्तीरूपी पत्नी या तत्त्वांचा संगम होय. प्रत्येक कर्म हे शिवरूपी सगुण क्रियाशक्ती (प्रत्यक्ष कार्य करणे) अन् त्या कर्माला गती प्राप्त करून देणारी, तसेच जास्तीतजास्त प्रमाणात निर्गुणाशी संबंधित असणारी शक्ती यांच्या जोड संगमाने पूर्णत्वास जाते. विवाहानंतर दोन्ही जीव गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतात. गृहस्थाश्रमात एकमेकांना पूरक होऊन संसारातील कर्मे करणे आणि त्यासाठी थोरामोठ्यांचा एकत्रितपणे आशीर्वाद घेणे महत्त्वाचे ठरते. दोघांनी जोडीने नमस्कार केल्यास ब्रह्मांडातील शिव-शक्तीरूपी लहरी कार्यरत होतात आणि त्यामुळे जिवांमध्ये लीनभावाचे संवर्धन होऊन गृहस्थाश्रमात परिपूर्ण कर्म घडल्यास त्याची योग्य फलप्राप्ती झाल्याने न्यूनतम देवाणघेवाण हिशोब निर्माण होणे शक्य होते. यासाठी विवाहानंतर दोघांनी प्रत्येक कर्माला पूरक बनून नमस्कारासारख्या कृतीतूनही एकमेकांना अनुमोदन देणे, असा वरील कृतीमागील उद्देश आहे.
पती आणि पत्नी यांची आध्यात्मिक पातळी किंवा ईश्वराप्रती असलेला भाव ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास त्यांनी जोडीने नमस्कार करणे अथवा एकट्याने नमस्कार करणे किंवा मानस नमस्कार करणे, यांतून होणारी फलप्राप्ती एकच असते; म्हणूनच प्रत्यक्ष कर्मापेक्षा त्यापाठी असलेल्या ईश्वराप्रतीच्या भावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. (‘पती-पत्नीपैकी नमस्कार करायला एकच जण उपस्थित असेल, तर एकट्यानेच नमस्कार करावा.’ – संकलक)
६ अ. जोडीने नमस्कार करतांना पत्नीने कोणत्या बाजूला उभे रहावे ?
पती आणि पत्नी यांनी जोडीने नमस्कार करतांना पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला रहावे ! (संदर्भग्रंथ – सार्थ षोडशसंस्कार रत्नमाला)
७. नमस्कार करण्याचे लाभ
‘नमस्कार करण्याचा मुख्य उद्देश हा आहे की, ज्याला आपण नमस्कार करतो, त्याच्याकडून आपल्याला आध्यात्मिक आणि व्यावहारिक लाभ व्हावेत.
७ अ. व्यावहारिक लाभ
देवतेवाला किंवा संतांना नमस्कार केल्याने त्यांचे गुण आणि कर्तृत्व यांचा आदर्श आपल्यासमोर नकळत उभा रहातो. त्यानुसार आपण स्वतःमध्ये सुधारणा करू लागतो.
७ आ. आध्यात्मिक लाभ
१. नम्रता वाढणे आणि अहं न्यून होणे : नमस्कार करतांना ‘आपण श्रेष्ठ आहात आणि मी कनिष्ठ आहे; मला कसलेही ज्ञान नाही, तुम्ही सर्वज्ञ आहात’, असे विचार असल्यावर आपल्यात नम्रता वाढू लागते आणि आपला अहं उणावण्यास साहाय्य मिळते.
२. शरणागतीचा आणि कृतज्ञतेचा भाव वाढणे : नमस्कार करतांना ‘मला काहीही येत नाही, तुम्हीच सर्व करा, मला तुमच्या चरणांशी स्थान द्या’, असे विचार असल्यावर शरणागतीचा आणि कृतज्ञतेचा भाव वाढण्यास साहाय्य मिळते.
३. सात्त्विकता मिळणे आणि आध्यात्मिक उन्नती वेगाने होणे
१. नमस्काराच्या मुद्रेतून आपल्याला सात्त्विकता जास्त प्रमाणात मिळते.
२. देवतेवाला किंवा संतांना नमस्कार केल्याने त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्या सूक्ष्म लहरी, उदा. सत्त्वलहरी किंवा आनंदलहरी आपल्याला मिळतात.
३. देवतेवाला किंवा संतांना नमस्कार केल्यामुळे आपल्याला त्यांचे आशीर्वादही मिळतात. त्यामुळे आपली आध्यात्मिक उन्नती वेगाने होते.’
– कु. मधुरा भिकाजी भोसले , २.१२.२००४, सायं. ७.१५
८. हे लक्षात घ्या !
८ अ. नमस्कार करतांना डोळे का मिटावेत ?
‘दोन्ही हात जोडून नतमस्तक होणे, म्हणजे ईश्वराला किंवा समोरच्या व्यक्तीतील देवत्वाला प्रणाम करणे होय. आपल्याच अंतर्यामी ईश्वराचे दर्शन व्हावे, यासाठी ईश्वराला किंवा आदरणीय व्यक्तीला वंदन करतांना डोळे मिटावेत.’ – कु. मधुरा भोसले, २.१२.२००४, सायं. ७.२८
८ आ. नमस्कार करतांना पादत्राणे का घालू नयेत ?
सोपानत्कश्चाशनासनशयनाभिवादननमस्कारन् वर्जयत् ।
– गौतमस्मृति ९
अर्थ : बसणे, भोजन करणे, झोपणे, गुरुजनांना अभिवादन करणे आणि (अन्य श्रेष्ठ व्यक्तींना) नमस्कार करणे, ही सर्व कार्ये पादत्राणे घालून करू नयेत.
८ इ. एका हाताने नमस्कार का करू नये ?
जन्मप्रभृति यत्किञ्चित्सुकृतं समुपार्जितम् ।
तत्सर्वं निष्फलं याति एकहस्ताभिवादनात् ।।
– व्याघ्रपादस्मृति ३६७
अर्थ : जो एका हाताने नमस्कार करतो, त्याचे जीवनभराचे पुण्य निष्फळ होते.
८ ई. नमस्कार करतांना हातात वस्तू का धरू नये ?
१. नमस्कार करतांना हातामध्ये एखादी वस्तू असल्यास हाताची बोटे आणि बोटांची टोके सरळ रेषेत न रहाता दुमडलेल्या स्थितीत रहातात. त्यामुळे समोरून येणार्या सत्त्वलहरींना दुमडलेल्या बोटांमधून आणि बोटांच्या टोकांमधून प्रवेश करता येत नाहीत.
२. समोरून येणार्या सत्त्वलहरी हातामध्ये धरलेल्या वस्तूवर धडकून पुन्हा मागे परत जातात. तसेच काही वेळा ती वस्तूही स्वतःमध्ये सत्त्वलहरी शोषून घेऊ शकते.
३. हातात धरलेली वस्तू जर राजसिक किंवा तामसिक असेल, तर अशी वस्तू नमस्कार करतांना कपाळाला किंवा छातीला लावल्यास, तिच्यातून प्रक्षेपित होणार्या रज-तम लहरी शरिरात प्रवेश करतात.’
– (श्रीचित्शक्ति) सौ. अंजली गाडगीळ (आताच्या श्रीचित्शक्ति [सौ.] अंजली गाडगीळ), ३.१२.२००४, दुपारी १.३२
८ उ. नमस्कार करतांना पुरुषांनी डोके झाकू नये; मात्र स्त्रियांनी डोके का झाकावे ?
न सोपानद्वेष्टितशिरा अवहितपाणिर्वाभिवादयीत ।
– आपस्तम्ब धर्मसूत्र १/४/१४/१९
अर्थ : पादत्राणे घालून, डोके झाकून किंवा हातात काही घेऊन नमस्कार करू नये. (स्त्रियांनी मात्र डोक्यावर पदर घेऊनच नमस्कार करावा.)
८ ऊ. धार्मिक कृतींच्या वेळी गळ्याला वस्त्र का लपेटू नये ?
प्रदक्षिणा, नमस्कार, पूजा, हवन आणि जप यांच्या वेळी, तसेच गुरु अन् देवता यांचे दर्शन घेतांना गळ्याला वस्त्र लपेटू नये. याचे कारण म्हणजे, गळ्याभोवती वस्त्र लपेटलेले असल्यास व्यक्तीचे विशुद्धचक्र जागृत होत नाही. त्यामुळे व्यक्तीला सात्त्विकतेचा लाभ अल्प होतो.
८ ए. हस्तांदोलन (शेकहँड) न करता हात जोडून नमस्कार का करावा ?
१. हस्तांदोलन करतांना हाताच्या माध्यमातून दुसर्याकडे रोगजंतूंचा प्रसार होऊ शकतो. तसेच काही व्यक्तींना खाल्ल्यावर किंवा बाहेरून आल्यावर हात धुवायची सवय नसते. अशा वेळी हस्तांदोलन आरोग्याला अहितकारक ठरू शकते.
२. ‘हस्तांदोलन करणे म्हणजे स्वतःतील लीनत्वाचा लय करून तामसिक वृत्तीचे संवर्धन करणे. ज्या वेळी दोन जीव हस्तांदोलन करतात, त्या वेळी त्यांच्या हातांतून प्रक्षेपित होणार्या रज-तमात्मक लहरी दोन तळहातांच्या पोकळीत संपुटित होतात. या संपुटिकरणातून उत्पन्न होणारी घर्षणात्मक ऊर्जा ही हातातून जिवांच्या देहात संक्रमित होते, तसेच या ऊर्जेतून उडणार्या कणांच्या माध्यमातून जिवाच्या बाहेरील वायूमंडलही तामसिक बनल्यामुळे वातावरणही अशुद्ध बनते. या रज-तमात्मक लहरींच्या शरिरातील वहनामुळे शरिरातील सूर्यनाडी कार्यरत होऊन शरिरात तमोकणांचे वहन वेगाने चालू होते. याचा परिणाम मनोमयकोषावर होऊन मनोमयकोषातील तमोकणांचे प्राबल्य वाढून जीव चिडचिडा बनू लागतो.
यामुळे हस्तांदोलनासारखी तामसिक कृती टाळून जिवात सात्त्विकतेचे संवर्धन करून जिवाला लीनभाव शिकवणारी नमस्कारासारखी कृती आचरणात आणावी. यामुळे जिवाला त्या त्या कर्मासाठी ईश्वराचे चैतन्यमय बळ मिळून त्याला ईश्वराची आशीर्वादरूपी संकल्पशक्ती प्राप्त होण्यास साहाय्य होऊन त्याची कृती साधना बनून अल्प कालावधीत पूर्णत्वास जाते.’
– सौ. अंजली गाडगीळ, २८.५.२००५
३. हस्तांदोलन करणे, ही पाश्चात्त्य संस्कृती आहे. हस्तांदोलनाची कृती करणे म्हणजे पाश्चात्त्य संस्कृतीचा पुरस्कार करणे, तर नमस्कार करणे, म्हणजे भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करणे. भारतियांनी स्वतः भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करून ही शिकवण भावी पिढीलाही द्यायला हवी.
संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘नमस्काराच्या योग्य पद्धती’
अन्य धार्मिक कृतींविषयी जाणून घेण्यासाठी अवश्य भेट द्या.