अर्थ : (प्रजेने धर्माचे पालन न केल्यामुळे) अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात.
तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत.
हिंदु संस्कृतीची वैशिष्ट्ये
हिंदु संस्कृती पिढ्यानपिढ्या टिकवण्यासाठी नवीन पिढीवरील संस्कार महत्त्वाचे ! : प्रत्येक देशाचे अस्तित्व म्हणजेच त्या देशाची जीवनप्रणाली आणि संस्कृती यांचे अस्तित्व. ही संस्कृती पिढ्यानपिढ्या टिकण्यासाठी नवीन पिढीवर जन्मापासून केलेले संस्कार महत्त्वाचे ठरतात.
– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका), चेंबूर, मुंबई. (१८.९.२०१३)
आपल्या पूर्वजांनी दिलेली शिकवण टिकवणे आवश्यक !
आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली शिकवण आपण टिकवू शकलो, तरी पुष्कळ आहे. आपल्याला आपल्या संस्कृतीविषयी आज थोडेतरी ठाऊक आहे; पण आपल्या पुढच्या पिढीला तेही ठाऊक नसणार. हे सर्व नामशेष होण्याआधी आपणच ते टिकवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ
हिंदु संस्कृतीचा होत असलेला र्हास
‘सध्या समाजाची स्थिती अत्यंत बिकट आहे. तरुण मुले-मुली आपल्या हिंदु संस्कृतीचा र्हास करतांना दिसत आहेत. एकूणच तरुणांचे राहणीमान, वागणे-बोलणे इत्यादी सर्वच गांभीर्याने विचार करण्याजोगे आहे. साम्यवाद आणि आधुनिकीकरण यांच्या नावाखाली आपण आपली संस्कृती विसरलो आहोत.
– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ
हिंदु धर्माप्रमाणे आचरण करा !
‘हिंदु धर्माप्रमाणे आचरण न केल्यामुळे सध्या सर्वत्र वादळे, भूकंप, अपघात, अतीवृष्टी, अनावृष्टी, स्वचक्र, परचक्र इत्यादी उत्पात घडत आहेत.’
– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.
रोगराई पसरु नये यासाठी सहज आचरणात आणता येईल अशी महान हिंदु संस्कृती !
हिंदु संस्कृतीनुसार करायच्या दिनचर्येतील कृती
पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे ‘बेड-टी’सारख्या असंस्कृत पद्धती हिंदूंमध्ये रूढ होत आहेत. सकाळी उठल्यावर मुखशुद्धी न करताच बेड-टी घेण्याची अत्यंत अयोग्य पद्धत शिकवणारी निकृष्ट पाश्चात्त्य संस्कृती कुठे, तर आध्यात्मिकदृष्ट्या योग्य असलेली, मुखशुद्धी करूनच अन्न ग्रहण करण्याची पद्धत शिकवणारी महान हिंदु संस्कृती कुठे !
‘फ्रेंच शास्त्रज्ञ सांगतो, ‘उभ्याने लघवी केली, तर मुत्राचे थेंब पायांवर पडतात आणि खालच्या भागी विखुरतात. बसून लघवी करण्याची हिंदूंची प्रथा अत्यंत उत्तम आणि आरोग्यदायक आहे. लघवीनंतर इंद्रिय धुतले पाहिजे. ते धुतले नाही, तर मूत्र वाळल्यानंतर तिथे मुत्राचे सूक्ष्म-खडे निर्माण होतात आणि ते रोगाला कारणीभूत होतात.’ युरोपियन शास्त्रज्ञ आमच्या लघवी करण्याच्या पारंपरिक पद्धतीचे पूर्ण समर्थन करतात. तरीही ते उभ्यानेच लघवी करतात. त्यांचे पाहून हिंदूही उभ्यानेच लघवी करतात. गोर्यांचे वळण गिरवण्यात आम्हाला धन्यता वाटते. उद्या गोरे लोक खाली बसून लघवी करू लागले की, आम्हीसुद्धा तसे करू आणि त्याला प्रगती म्हणू !’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
भारताचे कमीतकमी शब्दांत सांगता येईल असे वैशिष्ट्य म्हणजे ‘गुरु-शिष्य परंपरा’ होय ! गुरूंशिवाय तरणोपाय नाही. शिष्याच्या जीवनातील अंध:काराचा नाश करून त्याचे परब्रह्माशी मिलन घडवून आणण्याचे कार्य गुरु करतात. ‘गुरु’ ही धारणा भारतीय आहे. गुरूंना पाश्चिमात्य भाषांत शब्द नाही.
पूर्वी गुरुकुलात हिंदुधर्मविषयक आचार आणि विचार पद्धतींना, हिंदु धर्मातील शास्त्रशुद्ध प्रमाणांना आत्यंतिक महत्त्व देऊन देवतांच्या, ऋषींच्या कृपेने अध्ययन आणि अध्यापन केले जात असल्याने ते वातावरणच चैतन्याने आनंदीत झालेले असायचे. आता हे सर्व काळाच्या ओघात नष्ट झाले आहे. गुरुकुल शिक्षणपद्धतीतच राम, कृष्ण घडले. त्यामुळे त्याची उपयोगिता अनन्यसाधारण अशीच आहे.
पूर्वी मुंज झाल्यावर मुलांना गुरुकुलात शिक्षण घेण्यासाठी पाठवत असत. गुरुकुलामध्ये प्रारंभी अध्यात्मशिक्षण देत आणि त्यानंतर मुलांची आवड किंवा योग्यता यांनुसार ६४ कलांपैकी २ – ३ कलांचे शिक्षण त्यांना दिले जायचे. कलेतील शिक्षण हे संसार आणि व्यवहार यांत उदरनिर्वाहासाठी उपयोगी पडत असे. त्यातही आध्यात्मिक दृष्टीकोन कसा ठेवावा, हे गुरुकुलात शिकवले जायचे.
कुंभमेळा म्हणजे जगातील सर्वांत मोठी धार्मिक यात्रा ! कुंभमेळा हे भारताच्या सांस्कृतिक महत्तेचे केवळ दर्शन नव्हे, तर संतसंग देणारे आध्यात्मिक संमेलन आहे. कुंभपर्वाच्या निमित्ताने प्रयाग, हरद्वार (हरिद्वार), उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक या चार क्षेत्री प्रत्येक १२ वर्षांनी भरणार्या यात्रेला हिंदु जीवनदर्शनात महत्त्वपूर्ण स्थान आहे. कुंभमेळ्याचे आध्यात्मिक माहात्म्य आणि सांस्कृतिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. गुरूला राशीचक्र भोगण्यास १२ वर्षे लागत असल्यामुळे प्रत्येक १२ वर्षांनी कुंभयोग येतो. गुरु कन्या राशीत असतांना ‘कन्यागत’, सिंह राशीत असतांना ‘सिंहस्थ’ आणि कुंभ राशीत असतांना ‘कुंभमेळा’ अशा तीन मोठ्या पर्वणी हिंदु धर्मदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जातात. तेथे गंगास्नान, साधना, दानधर्म, पितृतर्पण, श्राद्धविधी, संतदर्शन, धर्मचर्चा इत्यादी धार्मिक कृती करण्यासाठी कोट्यवधी भाविक येतात. हा श्रद्धावानांचा मेळाच आहे. केवळ भाविकच नव्हे, तर देवता, ऋषी, संत अन् तेहतीस कोटी तीर्थे कुंभपर्वास येतात, हे सारे अदि्वतीय आहे. ‘हिंदूऐक्य’ हा कुंभमेळ्याचा उद्घोष आहे. कुंभमेळ्यातून हिंदूंची धार्मिक अन् सांस्कृतिक अमरता प्रतीत होते. हा मेळा परदेशी नागरिकांना हिंदु धर्माच्या अंतरंगाचे दर्शन घडवतो. कुंभमेळ्यात धर्मश्रद्धायुक्त आचरण करणार्या भाविकांनाच कुंभपर्वाचा खर्या अर्थाने आध्यात्मिक लाभ होतो.