पूर्णस्वरूप श्रीकृष्णाशी एकरूप होण्यासाठी सातत्याने करत असलेले प्रयत्न म्हणजेच साधना ! – प.पू. पांडे महाराज

या विश्‍वात श्रीकृष्णाविना दुसरे काहीच नाही; म्हणून तो अनन्य आहे. अशा शाश्‍वत तत्त्वाशी एकरूप होऊन त्याच्या पूर्ण तत्त्वाशी संलग्न होणे, म्हणजे साधना. तो आणि मी, माझा जीव आणि ते शिवस्वरूप एक होण्यासाठी सतत त्याचे चिंतन करावे. जीवनातील प्रत्येक कर्म त्याच्या अनुसंधानात राहून करावे. प्रत्येक कार्य आणि कृती त्याची भावपूर्ण सेवा करत आहे, हा भाव ठेवून करावेे. इतकेच नव्हे, तर ते केलेले कार्यही त्याला अर्पण करावे. प्रत्येक वस्तूमध्ये त्याचेच अस्तित्व आहे. तोच त्या स्वरूपातून माझी सेवाच करत आहे, हे जेव्हा दिसून येते, तेव्हा आपला भाव जागृत होतो.

आपला उद्धार होण्यासाठी तोच किती प्रयत्न करत आहे, हे सतत जागृत राहून पाहिल्यास त्याच्या सतत चिंतनात आणि सान्निध्यात रहाण्यात आनंदच येईल. अशा प्रकारे सतत आनंदात राहून त्याच्या मीलनाच्या ओढीने केले गेलेले प्रयत्न म्हणजेच आपली खरी साधना ! पूर्ण स्वरूप श्रीकृष्णाशी एकरूप होण्यासाठी सातत्याने करत असलेले प्रयत्न म्हणजेच साधना !
– प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.१.२०१६)