संतांच्या दर्शनाने काहीतरी चांगले वाटणे किंवा काहीच न वाटणे :…

संतांच्या दर्शनाने काहीतरी चांगले वाटणे किंवा काहीच न वाटणे : एखाद्या संतांकडे गेल्यावर काही जणांना खूप चांगले वाटते किंवा त्यांचा भाव जागृत होतो, तर काही जणांना काहीच वाटत नाही. त्यातील काही जणांना काहीच न वाटल्यामुळे वाईटही वाटते. अनुभूती येणे किंवा न येणे याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

१. संतांच्या स्थूलदेहाकडे लक्ष जाणे : साधनेच्या आरंभी फक्त संतांना डोळ्यांनी पहाणे आणि त्यांचे बोलणे कानांनी ऐकणे असे होते. तेव्हा संतांकडून येणार्‍या चैतन्य, आनंद इत्यादी लहरींची अनुभूती घेण्याची क्षमता नसल्याने काही निराळे वाटत नाही. साधनेत प्रगती केलेल्यांना ते जाणवते.

२. कृतज्ञताभाव असणे किंवा नसणे : काही जणांचा संतांना पाहून भाव जागृत होतो. तो कृतज्ञताभाव असतो. संतांनी आतापर्यंत केलेले मार्गदर्शन आणि साहाय्य आठवून भाव जागृत होतो. प्राथमिक अवस्थेतील साधकांत कृतज्ञताभाव नसल्याने त्यांचा भाव जागृत होत नाही.

३. साधनामार्गाप्रमाणे काहीतरी चांगले वाटणे : काही जणांना फक्त ते करत असलेल्या साधनामार्गातील स्पंदने जाणवतात. त्यामुळे त्यांना त्या मार्गातील संत भेटले की, चांगले वाटते. साधनेत पुढे गेलेल्यांना कोणत्याही साधनामार्गातील संत भेटले की, त्यांच्या साधनामार्गानुसार वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येतात.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले